You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सई परांजपेः विनोद आणि संवेदनशीलतेनं पडद्यावर तगडी पात्रं उभी करणारी दिग्दर्शिका
- Author, प्रियंका जगताप
- Role, बीबीसी मराठीसाठी
अंध शाळेतील एक दृष्टिहीन मुख्याध्यापक आणि एक डोळस विधवा शिक्षिका यांची प्रेमकहाणी असलेला एक हृदयस्पर्शी 'स्पर्श' नावाचा सिनेमा 1980 मध्ये आला होता.
स्पर्शची गोष्ट तशी सोपी असते पण तरीही ती भावनिक संघर्षानं घेरलेली असते.
कारण या गोष्टीत भावनिकदृष्ट्या एकदमच भिन्न जगांमधे जगणाऱ्या दोन व्यक्ती आपापल्या आयुष्यातील कमतरतांशी झुंजत असताना एकमेकांत गुंतत जातात.
या वास्तववादी सिनेमातील गुंतागुंत, अंध लोकांच्या आयुष्यातले बारकावे किती ताकदीनं आणि संवेदनशीलपणे मांडले गेलेत याची जाणीव हा सिनेमा बघताना सतत होत राहते आणि त्यातील पात्रांच्या भावनिक विश्वात आपणही नकळतपणे गुंतत जातो.
हेच तर वैशिष्ट्य आहे सई परांजपे यांच्या दिग्दर्शनाचं. सई परांजपे हे कलाविश्वातलं मोठं नाव. चित्रपट दिग्दर्शक-निर्मात्या तर त्या होत्याच. पण त्या उत्तम लेखिका आणि नाटककारही होत्या.
लहान मुलांसाठीही त्यांनी अनेक नाटकं लिहिली आहेत.
वयाच्या आठव्या वर्षी जिथं लहान मुलं साधं पुस्तकंही नीट वाचत नाहीत, त्या वयात सई परांजपे यांनी पुस्तक लिहिलं होतं.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त कलेच्या सौंदर्यानं भरलेला त्यांचा जीवनप्रवास या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
कलेचा वारसा घरातूनच मिळाला
नाट्य आणि चित्रपट प्रवास उलगडून सांगणारं 'सय माझा कलाप्रवास' नावाचा पुस्तक त्यांनी लिहिलं आहे.
त्यात त्यांनी लिहिलंय की, त्यांना लेखणाचा वारसा त्यांच्या आईकडूनच मिळाला. सईंच्या लिखाणाची शैली सुद्धा अगदी त्यांच्या आईसारखीच.
सई यांची आई शकुंतला परांजपे या लेखिका होत्या, तर त्यांचे रशियन वडील हे उत्तम चित्रकार होते. शकुंतला परांजपे यांनी रशियन चित्रकार युरा स्लेप्टझोफ यांच्याशी लग्न केलं होतं.
मात्र दीड वर्ष युरोपमध्ये संसार करून त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर 19 मार्च 1938 मध्ये जन्मलेल्या आपल्या तान्ह्या मुलीला घेऊन शकुंतला परांजपे पुण्यात राहणाऱ्या आपल्या वडीलांच्या घरी परत आल्या.
त्यानंतर तिथेच आजोबा आणि आईच्या सहवासात लहानशा सईची जडणघडण झाली.
सई यांनी त्यांच्या आत्मचरित्रात सांगितलं आहे की, त्यांच्या आईनं स्वतःच्या निधनाची कल्पना करून त्यावर 'माझी प्रेतयात्रा' हा विनोदी लेख लिहीला होता. त्यांनीच सईंना लिहितं केलं.
सई लहान होत्या तेव्हा रोज रात्री झोपताना त्यांची आई त्यांना एक गोष्ट सांगायची आणि मगच त्या झोपी जायच्या. एका रात्री त्यांच्या आईनं कंटाळा आल्यानं लहानशा सईलाच गोष्ट सांगायला सांगितलं.
मग सईनंही आईला एक गोष्ट तयार करून सांगितली. ती गोष्ट सईनं स्वतःच्या मनानं तयार करून आईला ऐकवली तसेच आपण अशा अनेक गोष्टी तयार केल्याचंही त्यांनी आईला सांगितलं.
हे पाहून आईनं त्यांना आणखी काही गोष्टी सांगायला लावल्या आणि त्यानंतर रोज दोन-तीन पानं काहीतरी लिहायचं आणि मगच खेळायला जायचं अशी शिस्तच त्यांनी छोटूशा सईला लावली.
तेव्हापासून म्हणजे आठ वर्षांच्या असल्यापासून सई यांचं लिखाण सुरू झालं. त्यांचं त्या वयातील लिखाण एकत्र करून त्यांच्या आईनं 'मुलांचा मेवा' नावाचं पुस्तकही छापलं.
सई परांजपे यांच्या मते, अशी खुप मुलं आहेत जी सुंदरपणे लिहू शकतात. मात्र त्यांचं दुर्दैव असं की त्यांना शकुंतला परांजपे सारखी आई लाभली नाही.
शिस्तप्रिय आईच्या सहवासात झालेली जडणघडण
त्याकाळी शकुंतला परांजपे या केंब्रिजमध्ये शिकल्या होत्या. त्यांना फ्रेंच, इंग्रजी, हिंदी, मराठी भाषा उत्तम येत होत्या. त्या उत्तम लेखिका तसेच अभिनेत्रीही होत्या.
त्यावेळी गणिताच्या उच्च परिक्षेमध्ये प्रथम श्रेणीत पास होणाऱ्यांना रँग्लर ही पदवी मिळत असे आणि प्रथम श्रेणीत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला सिनियर रँग्लर म्हणून किताब मिळत असे.
तर असा किताब मिळवणारे भारताचे पहिले सीनिअर रँग्लर, सुप्रसिद्ध गणितज्ञ डॉ. रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांच्या त्या कन्या होत्या.
हे सगळं असताना त्यांना कोणतीही चांगली नोकरी मिळाली असती. परंतु शकुंतला परांजपे यांनी त्यांचं सगळं लक्ष सईं यांच्या जडणघडणीवर केंद्रीत केलं.
आपली मुलगी सर्वगुण संपन्न झाली पाहिजे अशी त्यांची जबरदस्त महत्वाकांक्षा होती. म्हणूनच त्यांनी सईंना पोहणं, चित्रकला, घोड्यावर बसणं असे विविध प्रकारच्या शिकवण्या लावल्या होत्या.
त्यांची शिस्त अतेरिकी असल्याचं सई म्हणतात. छोट्या सईला रोज काही तरी कारणावरून आईकडून जबरदस्त मार मिळायचा.
शास्त्रीय संगीताची ही शिकवणी त्यांनी सईंना लावली होती, मात्र काही दिवस शिकवल्यानंतर लहानशा सईला गाण्याचं सुतराम अंग नाही याची जाणीव होताच त्यांची संगीत शिकवणी बंद झाली.
परांजपेंचं घराणं नास्तिक असूनही शकुंतला परांजपे छोट्या सईला संस्कृतचे श्लोक म्हणायला लावायच्या. त्यामुळेच सईंच्या मनात संस्कृत भाषेविषयी प्रेम निर्माण झालं.
सईंनी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना अभ्यास सोडून इतर अनेक गोष्टी केल्या. जसं की टेकडीवर फिरायला जाणं, टेनिस खेळणं, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेणं, नाटकं बसवणं आणि त्यात काम करणं.
बहुआयामी कारकिर्दींची रेडिओपासून सुरुवात
सई परांजपेंनी आकाशवाणीच्या पुणे केंद्रातून 'निवेदिका' म्हणून त्यांचा प्रवास सुरू केला होता. ध्यानी-मनी नसताना बी.ए.ची परीक्षा जवळ आलेली असताना त्यांना आकाशवाणी केंद्रावरून बोलावणं आलं.
त्यासाठी त्यांनी ना अर्ज केला होता, ना त्यांना ऑडिशन देण्यात रस होता परंतु आईच्या सांगण्यावरून त्या गेल्या आणि त्यांची मराठी आणि इंग्रजी निवेदक म्हणून निवडही करण्यात आली.
रोज केंद्रावर निवेदनाची पंधरा मिनिटं आणि जाणं येणं पकडून त्यांचा एकूण दीडतास काय तो खर्ची पडायचा. त्यासाठी त्यांना महिन्याला पगार म्हणून 50 रुपये मिळायचे.
आकाशवाणी पुणे केंद्राच्या 'बालोद्यान' या मुलांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सईंची सात-आठ नाटकं लिहून झाली होती. त्यातली चार एक नाटकं आकाशवाणी सप्ताहात निमंत्रितांच्या उपस्थितीत मंचावरून सादर करण्यात आली.
प्रचंड मेहनत घेऊन बसवलेल्या या नाटुकल्यांचा अवघा एक प्रयोग होई. त्यातून भूमिका करणारी मुलं हिरमुष्टी होत. त्यामुळे पुढं जाऊन त्यातून बालरंगभूमीच्या संकल्पनेचा उगम झाला.
लहान मुलांना घेऊन पुण्यात मुलांची नाटकं नियमितपणे पेश करायची. त्यातून नाट्यशिक्षण आणि मनोरंजन हे दोन्ही हेतू साध्य होतील. हाताशी जवळपास शंभर मुलं तयार होती, हक्काची नाटकं पण उपलब्ध होती.
अरुण जोगळेकर यांच्यासोबत सई आळीपाळीनं दिग्दर्शन करायच्या. या उपक्रमातलं पहिलंच नाटक होतं 'पत्तेनगरीत'. 'पत्तेनगरीत'चा शुभारंभाचा प्रयोग दणकेबाज झाला आणि नाटक पुढे छान चाललं.
भारताचे तेव्हाचे माहिती आणि नभोवाणी खात्याचे मंत्री श्री. बाळकृष्ण केसकर प्रमुख पाहुणे होते. पुढं एकदा या नाटकाच्या एका प्रयोगाला पंडित नेहरू देखील आले होते.
त्यांना यशवंतराव चव्हाण आग्रह करून घेऊन आले होते. चाचा नेहरूंच्या स्नेहभेटीमुळे बालरंगभूमीचा खूप बोलबाला होऊ लागला.
नाटकावरचं प्रेम
लहान मुलांचं भावविश्व समजून त्यांच्यासाठी नाटकं लिहिणं तसं तर सोपं काम नाही. मात्र सईंनी लहान मुलांसाठी अनेक प्रसिद्ध नाटकं लिहिली.
शेपटीचा शाप, जादूचा शंख, झाली काय गंमत, पत्तेनगरी, भटक्यांचे भविष्य, हरवलेल्या खेळण्यांचे राज्य, जास्वंदी, माझा खेळ मांडू दे ही त्यांनी लिहिलेली बालनाट्य आहेत.
'पत्ते नगरीत' हे नाटक सईंना आकाशवाणीवरून काम संपवून घरी जात असताना बस मध्ये सुचलं होतं. ससूनच्या स्टॉपवरून बस जशी सुटली तशी तिच्या जोडीनं सईंची कल्पना शक्ती देखील धावायला लागली.
मग बसच्या तिकिटावर बारीक मुंगीच्या अक्षरानं जे जे मु्द्दे सुचतील तसे त्यांनी ते लिहिले आणि घरी गेल्यानंतर पानावर उतरवले.
त्यांच्या मते,त्या जेव्हा कुठल्याही वाहनात बसतात तेव्हा त्याच्या गतीनं त्यांची कल्पनाशक्ती पण धावू लागते. त्यांना काही ना काही सुचत जातं. असे कित्येक सिनेमे आणि त्यांच्या पटकथा, कित्येक नाटकांच्या गोष्टी त्यांना वाहनात असताना सुचल्या असल्याचं त्या नेहमी सांगतात.
सई परांजपे एक तमाशा सुंदरसा, गीध, धिक् ताम्, पुन्हा शेजारी, सख्खे शेजारी ही नाटकं देखील त्यांनी लिहिली.
याच काळात सईंची अरुण जोगळेकर यांच्याशी मैत्री वाढली. पुढं जाऊन या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि नंतर त्यांनी लग्न केलं. लग्नाला फक्त एक महिना झाला होता आणि त्यावेळी एक जाहिरात सईंच्या पाहण्यात आली, ज्यामुळे कलेच्या क्षेत्रात त्या अजून एक पाऊल पुढं गेल्या.
त्यावेळी दिल्लीत नाट्य शिक्षण केंद्र म्हणजेच नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा सुरू करण्यात आलं होतं. ती जाहिरात त्यांचीच होती. त्यांना संपूर्ण भारतातून नाट्य शिक्षण घ्यायला विद्यार्थी हवे होते. ती त्यांची तिसरी बॅच होती.
मात्र नुकतंच लग्न झालेलं असताना कसं जायचं हा विचार करून त्याकडे दुर्लक्ष केलं. पण अरुण जोगळेकरांनी सईंना नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची मुलाखत द्यायला लावली, त्यात त्यांची निवडही झाली आणि त्या दोन वर्षांसाठी नाटक शिकायला दिल्लीला गेल्या.
त्यानंतर त्या शिष्यवृत्तीवर पॅरीसला काही वर्षांसाठी रंगभूमी शिकायला गेल्या होत्या. त्यानंतर त्यांचं नाटक प्रेम अजूनच वाढलं.
दरम्यान त्या त्यांच्या वडीलांना पहिल्यांदा भेटल्या. सई त्यांच्या वडीलांना पपा म्हणत. तिथं त्यांची 8 वर्षांची मरीना नावाची एक सावत्र बहीण होती, तिनं सईंना फ्रेंच भाषा शिकवली.
सिनेमाविश्वातलं स्वतःचं वेगळं स्थान
महिला असूनही दिग्दर्शिक म्हणून सिनेमाविश्वात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करताना सई परांजपे यांनी अनेक वेगवेगळ्या पठडीतले संवेदनशील विषय सिनेमांमधून हाताळले. त्यांच्या या सिनेमांना प्रेक्षकांनाही खुप पसंत केलं.
कथा, स्पर्श, दिशा, साज, चश्मे बद्दूर असे सिनेमे दिले. यातील पात्र प्रेक्षकांना आपलीशी वाटली. त्यांच्या १९८० मध्ये आलेल्या स्पर्श या सिनेमाला ताश्कंद चित्रपट महोत्सवासाठी आमंत्रण होतं.
म्हणून त्या स्पर्श या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी ताश्कंद येथील फिल्म फेस्टिवलला गेल्या होत्या. चित्रपट महोत्सावत जाण्याची आणि रशियाला जाण्याची त्यांची सईंची ती पहिलीच वेळ होती.
खरंतर रशिया हा त्यांचा वडीलांचा देश होता. त्यांचे आजोबा दिमित्री स्लेप्टझोफ एक सैनिक होते. ते झारच्या बाजूनी लढाईत मारले गेले होते.
त्यानंतर इतर श्वेत रशियन लोकांसोबत सईंच्या आजीनं आपल्या लहानग्या मुलाला घेऊन रशियातून थेट युरोप गाठलं होतं. त्यानंतर त्यांच्या वडीलांच्या कुटुंबातील कोणीही परत रशियात गेलं नाही.
सई या पहिल्याच होत्या, ज्या त्यानंतरच्या काळात रशियात गेल्या होत्या. असो, तर या चित्रपट महोत्सवादरम्यान निर्माता गुल आनंद यांची आणि सईंची भेट झाली.
खरंतर गुल आनंद यांना एक कॉमेडी चित्रपट करायचा होता. मात्र, त्याचं कथा लेखन तसेच दिग्दर्शन हे सईंनीच करावं असा त्यांचा प्रस्ताव होता.
काही काळ विचार केल्यानंतर, सईंनी त्यांचा तो प्रस्ताव स्वीकारला आणि सिनेरसिकांना दीप्ती नवल आणि फारुख शेख यांची प्रमुख भूमिका असलेला 'चश्मे बद्दूर' हा मास्टर पिस पाहायला मिळाला.
हा सिनेमा थेट प्रेक्षकांच्या हृदयाला जाऊन भिडला. म्हणूनच त्या वर्षी या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर हिट होऊन खोऱ्यानं पैसे ओढले.
'मी स्वतः विषय शोधत नाही, विषय आपल्या आसपासच असतात'
सह्याद्री वाहिनीवरील 'कथा सईची' या सई परांजपे यांच्या कलाप्रवासाचा वेध घेणाऱ्या मालिकेत सईंना सिनेमातील पात्र कशी सापडतात, यावर भाष्य केलं आहे.
त्या सांगतात,"मी स्वतः विषय शोधत नाही. विषय आपल्या आसपासच असतात. आपण फक्त डोळे उघडे ठेऊन वावरायचं येवढंच त्यातलं गुपीत आहेत. दिशा सिनेमाची कथा मला अशीच सुचली."
पुढं त्या सांगतात, "मी अनेक दिवस ऐकत होते की गावाकडून शहराकडं लोक येतात त्यामुळे शहरातील लोकसंख्या वाढते, त्यांचे हाल होतात आणि गावंही ओस पडतात. तर हा विषय माझ्या मनात घर करून राहीला.
त्यानंतर मी एकदा कामानिमित्त दुसऱ्या एका गावात गेले होते, तिथं सोमा नावाचा एक शेतकरी होता. तर तो पंधरा वर्ष रोज स्वतः विहिर खणायचा. सगळे त्याला वेडा म्हणायचे. मात्र त्यानं विहिर खोणणं सोडलं नाही. नंतर पंधरा वर्षांनी त्या विहिरीला पाणी लागलं.
त्यानंतर कधीतरी एकदा मी तिसऱ्या ठिकाणी गेले होते, तेव्हा तिथं मी विडी कामगारांच्या बायकांच्या अडचणी पाहिल्या. अशाप्रकारे अनेक विषय माझ्या मनात साठत गेले. त्यावर मी लिहिलं आणि दिशा सिनेमा झाला." असं त्या पुढं सांगतात.
"तुम्हाला तुमचा भोवताल दोन्ही हातांनी भरभरून खुप काही देत असतो, तुम्हाला फक्त ते स्वीकारचं असतं. मी माझ्या लिखाणात भोवतालचं खुप काही वापरत असते. त्यामुळे त्या लिखाणात जिवंतपणा येतो." असं ही त्या म्हणतात.
त्यांच्या दिशा सिनेमात नाना पाटेकर यांनी काम केलं होतं.
संदर्भ -
सह्याद्री वाहिनीवरील 'कथा सईची' ही सई परांजपे यांच्या कलाप्रवासाचा वेध घेणारी मालिका
सई परांजपे यांचं सय माझा कलाप्रवास हे पुस्तक
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.