बॉम्बे टॉकीज: एक असा चित्रपट स्टुडिओ ज्याचा मुंबईला 'मायानगरी' बनवण्यात आहे मोठा वाटा

    • Author, यासिर उस्मान
    • Role, चित्रपट इतिहासकार, बीबीसी हिंदीसाठी

ब्लॉकबस्टर...स्टार...मसाला चित्रपट....या सर्व शब्दांचा वापर आज भारतीय चित्रपटांच्या बाबतीत अनेकदा केला जातो. या शब्दांची सुरुवात ज्या फिल्म स्टुडिओमधून झाली, जिथून पहिला मसाला ब्लॉकबस्टर हिंदी चित्रपट तयार झाला आणि अनेक मोठे स्टार तयार झाले. मुंबई शहराला मायानगरी बनवण्यातही या फिल्म स्टुडिओचा मोठा वाटा असल्याचं म्हटलं जातं. त्या फिल्म स्टुडिओबद्दल जाणून घेऊया.

या स्टुडिओचं नाव होतं - बॉम्बे टॉकीज. चित्रपटसृष्टीला दिशा देणाऱ्या या ऐतिहासिक स्टुडिओचा जन्म 1930 च्या दशकात झाला होता.

बॉम्बे टॉकीजनं 1930 ते 1940 च्या दशकातील अनेक मोठ्या यशस्वी हिंदी चित्रपटांची निर्मिती केली. इतकंच नाही, तर अशोक कुमार, दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्यासारख्या स्टार्सच्या करियरची सुरुवात देखील इथूनच झाली.

भारतीय चित्रपटाच्या दुनियेत आगामी काळात व्यावसायिक चित्रपटांमधून हिंदी सिनेमाची एक वेगळी ओळख तयार झाली.

त्या चित्रपटांचा एक फॉरमॅट तयार झाला. गाणी, नाट्य, रोमांस आणि मोठा संघर्ष यांचा हा फॉर्मुला आजदेखील बॉलीवूडच्या ब्लॉकबस्टर्स चित्रपटांमध्ये दिसून येतो.

या फॉर्म्युल्याचा पायादेखील याच बॉम्बे टॉकीजमध्ये घातला गेला होता.

याशिवाय आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्याची फारशी चर्चा होत नाही. ती म्हणजे 1934 मध्ये सुरू झालेला 'बॉम्बे टॉकीज' हा देशातील पहिला कॉर्पोरेट फिल्म स्टुडिओ होता. तो अतिशय संघटित स्वरुपाचा आणि स्वयंपूर्ण स्टुडिओ होता.

यात अगदी कॉर्पोरेट क्षेत्रात असतात त्याप्रमाणे संचालक मंडळदेखील (बोर्ड ऑफ डायरेक्टर्स) होतं. या स्टुडिओचे अगदी शेअर्सदेखील बाजारात आणले गेले होते.

नफा झाल्यानंतर कंपन्यांप्रमाणे भागधारकांना लाभांश आणि बोनस सुद्धा देण्यात आला होता. लिस्टेड कंपन्याप्रमाणे या स्टुडिओची नोंदणी स्टॉक एक्सचेंजमध्ये देखील करण्यात आली होती.

काय आहे बॉम्बे टॉकीजची कहाणी?

बॉम्बे टॉकीजचं स्वप्न ज्यांनी पाहिलं आणि प्रत्यक्षात साकारलं त्या, त्यांचं नाव आहे हिमांशु रॉय. त्यांचा जन्म एका धनाढ्य बंगाली कुटुंबात झाला होता. सुबत्ता इतकी होती की त्याकाळी त्यांच्या कुटुंबाकडे एक खासगी थिएटर देखील होतं.

हिमांशु रॉय यांच्या चित्रपटांच्या वेडाची कहाणी सुरू होते लंडनमधून.

कलकत्त्यातून (आजचं कोलकाता) विधी क्षेत्रातील पदवी घेतल्यानंतर बॅरिस्टर होण्यासाठी हिमांशु रॉय लंडनला गेले. तिथेच त्यांच्यात थिएटर म्हणजे नाटकांची आवड निर्माण झाली. ते नाटकांमध्ये अभिनय देखील करू लागले होते.

त्यांनी लंडनमधील प्रसिद्ध वेस्टएंडमध्ये देखील काम केलं. तिथे हिमांशु रॉय यांची भेट नाटककार निरंजन पाल यांच्याश झाली.

निरंजन पाल म्हणजे सुप्रसिद्ध स्वातंत्र्यसेनानी बिपिन चंद्र पाल यांचे पुत्र. लंडनमधील नाटकांच्या दुनियेत निरंजन चांगलं नाव कमावत होते. मग पुढे निरंजन पाल यांनी त्यांच्या 'द गॉडेस' या नाटकात हिमांशु रॉय यांना हिरोचं काम दिलं.

त्यानंतर हिमांशु रॉय यांचं नाटकांचं वेड इतकं वाढलं की 1922 मध्ये त्यांनी शिक्षण सोडलं. बॅरिस्टर होण्याऐवजी त्यांनी एक थिएटर ग्रुप तयार केला. त्याचं नाव त्यांनी 'द इंडियन प्लेयर्स' असं ठेवलं. या ग्रुपनं ब्रिटनमध्ये अनेक ठिकाणी नाटकं सादर केली.

हिमांशु रॉय यांचं रुपेरी पडद्यावर आगमन

हिमांशु रॉय यांना चित्रपट बनवायचे होते. त्या काळच्या युरोपियन चित्रपटांवर वसाहतवादी मानसिकतेचा प्रभाव असायचा. त्यामुळे त्या चित्रपटांमध्ये भारताचं चित्रण एका विशिष्ट पद्धतीनं केलं जायचं.

हिमांशु रॉय यांची इच्छा होती की भारतीय समाजाचं खरं स्वरूप दाखवणारी एक नवी चित्रपटांची भाषा तयार करावी. जी पूर्णपणे भारतीय असेल मात्र त्यात आधुनिकतेची छाप सुद्धा असेल. तसंच तांत्रिकदृष्ट्या हे चित्रपट युरोपियन चित्रपटांच्या तोडीस तोड असावेत.

या हेतूनं त्यांनी 'द लाइट ऑफ एशिया' (हिंदीतील नाव 'प्रेम संन्यास') हा मूकपट तयार करण्याचा निर्णय घेतला. चित्रपटाची कथा भगवान गौतम बुद्धांच्या जीवनावर आधारित होती.

या चित्रपटाचं पटकथालेखन निरंजन पाल यांनी केलं होतं. 1924 मध्ये हिमांशु रॉय निरंजन यांच्याबरोबर जर्मनीतील म्युनिकला गेले. तिथे त्यांनी एमेल्का स्टुडिओबरोबर चित्रपटाची सह-निर्मिती करण्याचा निर्णय घेतला.

तेव्हा असं ठरलं होतं की तांत्रिक कर्मचारी आणि उपकरणं एमेल्का स्टुडिओची असतील तर चित्रपटासाठी लागणारा पैसा, भारतीय कलाकार आणि चित्रीकरणासाठीचं लोकेशन या सर्व गोष्टींची जबाबदारी हिमांशु रॉय यांच्यावर असेल.

हिमांशु आणि निरंजन यांनी काही महिन्यातच मुंबईतून पैसा उभा केला. स्वत: हिमांशु रॉय यांनी भगवान गौतम बुद्धांची भूमिका केली. तसंच जर्मन चित्रपटकार फ्रँज ऑस्टेन यांच्यासह चित्रपटाचं सह-दिग्दर्शन देखील केलं.

राजांनी दिले त्यांचे हत्ती-घोडे आणि किल्ले

1925 मध्ये प्रदर्शित झालेला हा पहिला भारतीय चित्रपट होता ज्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित करण्यात आलं होतं. या चित्रपटानं पहिल्यांदा गौतम बुद्धाची कहाणी पाश्चात्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. याच प्रेक्षकांवर हिमांशु रॉय यांना प्रभाव टाकायचा होता.

त्यानंतर हिमांशु रॉय यांनी जर्मनीतील प्रसिद्ध यूएफए स्टुडिओबरोबर ताजमहालवर आधारित एका प्रेमकहाणीची निर्मिती केली.

त्या चित्रपटाचं नाव होतं 'शीराज'(1928). त्यापाठोपाठ त्यांनी महाभारतातील एका प्रसंगावर आधारित 'ए थ्रो ऑफ डायस'(1929) या चित्रपटाची निर्मिती केली.

तीन चित्रपटांच्या दिग्दर्शनाची जबाबदारी जर्मन दिग्दर्शक फ्रँज ऑस्टेन यांनी सांभाळली तर या चित्रपटांचे हिरो हिमांशु रॉय हेच होते.

या चित्रपटांचं बहुतांश आउटडोअर चित्रीकरण भारतातच झालं. रॉय यांनी विनंती केल्यावर अनेक राजांनी त्यांचे महाल, किल्ले, हत्ती, घोडे इतकंच काय शूटिंगसाठी लागणारे एक्स्ट्रा लोकदेखील उपलब्ध करून दिले.

या अद्भूत चित्रीकरणाबद्दल दिग्दर्शक फ्रँज ऑस्टेन यांनी त्यांच्या डायरीत लिहिलं आहे, "पुजाऱ्यांची आणि भिकाऱ्यांची भूमिका करणारे लोक प्रत्यक्ष जीवनात देखील तेच काम करत होते. दुसऱ्या दिवशी मला एका अशा माणसाची आवश्यकता होती ज्याचा चित्रपटात मृत्यू होतो."

"माझा सहाय्यक दिग्दर्शक एका अशा माणसाला माझ्याकडे घेऊन आला, जो मोठ्या कष्टानं श्वास घेत होता. मी अतिशय घाबरलो. मात्र तो माणूस स्वत:च म्हणाला की उद्यापर्यंत कुठल्याही परिस्थितीत त्याचा मृत्यू होईलच. मात्र त्याला घेतल्यामुळे चित्रपटाचं चित्रण अगदी खरं वाटेल. त्या दिवसाचं चित्रीकरण झाल्यानंतर दोन दिवसांनी त्या माणसाचा मृत्यू झाला."

चित्रीकरणानंतर चित्रपटाची रिळं (निगेटिव्ह) जर्मनीत नेण्यात आली आणि तिथे त्यांचं संकलन म्हणजे एडिटिंग करण्यात आलं. भारतीय संस्कृतीकडे परदेशी दृष्टीकोनात पाहणारे हे चित्रपट ब्रिटन आणि जर्मनीमध्ये तर चर्चेत राहिली. मात्र भारतात हे चित्रपट चालले नाहीत. त्यामुळे हिमांशु रॉय निराश झाले.

अर्थात 'ए थ्रो ऑफ डायस' (हिंदीतील नाव 'प्रपंच पाश') या तिसऱ्या चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळेस काही महत्त्वाच्या घटना घडल्या. त्यामुळे हिमांशु रॉय यांचं आयुष्य आणि करियरला कलाटणी मिळाली.

हिमांशु रॉय यांच्या आयुष्यात आल्या देविका राणी

लंडनच्या एका आर्ट स्टुडिओमध्ये फॅब्रिक डिझायनर म्हणून काम करणाऱ्या देविका राणी यांच्याशी हिमांशु रॉय यांची भेट झाली. देविका राणी पाश्चात्य जीवनपद्धतीत रुळलेल्या होत्या. त्या रवींद्रनाथ टागोरांच्या कुटुंबाशी संबंधित होत्या. मात्र नऊ वर्षांच्या असल्यापासूनच त्या इंग्लंडमध्ये राहत होत्या.

बिनधास्त, स्पष्टवक्त्या आणि ग्लॅमरस देविका, पहिल्याच भेटीत हिमांशु रॉय यांना आवडल्या. हिमांशु रॉय यांनी त्यांना 'ए थ्रो ऑफ डायस'च्या सेट डिपार्टमेंटमध्ये काम करण्यास सांगितलं.

हिमांशु रॉय यांचं लग्न आधीच झालेलं होतं. त्यांच्या पत्नीचं नाव मॅरी हॅनलिन होतं. त्या जर्मन होत्या. तसंच एक अभिनेत्री आणि डान्सरदेखील होत्या. मात्र चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळेस हिमांशु रॉय आणि देविका प्रेमात पडले आणि 1929 मध्ये या दोघांनी लग्न केलं.

देविका राणी वयानं हिमांशु रॉय यांच्यापेक्षा जवळपास 15 वर्षांनी लहान होत्या. याच चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळेस हिमांशु यांच्या वैयक्तिक आयुष्याबरोबरच चित्रपटांच्या दुनियेत देखील एक मोठी घटना घडली. हॉलीवूडमध्ये जगातील पहिला बोलपट 'द जॅज सिंग' प्रदर्शित झाला होता.

'कर्मा' आणि किसिंग सीन

आता बोलपटांचा जमाना सुरू झाला होता. हिमांशु रॉय यांनी 'कर्मा' हा त्यांचा पुढील चित्रपट दोन भाषांमध्ये (हिंदी आणि इंग्रजी) तयार करण्याचा निर्णय घेतला. तोपर्यंत युरोपात हिमांशु रॉय यांनी नाव कमावलं होतं. मात्र त्यांच्या चित्रपटांना अजून भारतात यश मिळालं नव्हतं.

कर्मा चित्रपटाद्वारे त्यांना त्यावेळच्या बॉम्बे फिल्म इंडस्ट्रीला हे दाखवून द्यायचं होतं की भारतीय कथेवर आधारित चित्रपटदेखील हॉलीवूडच्या दर्जाचा असू शकतो.

'कर्मा' चित्रपटात देविका राणी यांना नायिका म्हणून घेण्यात आलं. मात्र देविका यांचा हा पहिलाच चित्रपट, हिरो म्हणून हिमांशु रॉय यांचा शेवटचा चित्रपट ठरला.

या चित्रपटात हे दोघं दोन शेजारी राज्यांच्या राज्यकर्त्यांच्या भूमिकेत होते. हे दोन्ही राज्यकर्ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. या चित्रपटात या दोघांचा एक सीन खूपच चर्चेत आला होता. आता तर तो चित्रपटांच्या इतिहास नोंदवला गेलेला सीन झाला आहे. तो होता किसिंग सीन.

या किसिंग सीनला हिंदी चित्रपटांमधील पहिला 'लिप लॉक' आणि हिंदी चित्रपटांमधील 'सर्वात प्रदीर्घ किसिंग सीन' म्हटलं जातं. मात्र या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. त्या काळात भारतावर इंग्रजांचं राज्य होतं. त्या काळातील इतर काही चित्रपटांमध्येदेखील किसिंग सीन होते.

कर्मा चित्रपटाचं बहुतांश चित्रीकरण भारतात झालं. मात्र चित्रपट पूर्ण होण्यासाठी दोन वर्षांहून अधिक वेळ लागला. कारण या चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळेसच जागतिक मंदी म्हणजे ग्रेट डिप्रेशन आलं होतं. परिणामी संपूर्ण जगच आर्थिक संकटात सापडलं होतं.

शेवटी, मे 1933 मध्ये इंग्रजीतील कर्मा चित्रपटाचा प्रीमियर लंडनमध्ये झाला. हा चित्रपट फारसा चालला नाही. मात्र देविका राणी यांचं सौंदर्य आणि त्यांच्या इंग्रजी उच्चारणाचं खूप कौतुक झालं.

मग त्याच वर्षी नाझी पक्ष सत्तेत आला. त्यामुळे हिमांशु रॉय यांच्या जर्मनीतील चित्रपट नेटवर्कवर परिणाम झाला. म्हणून मग हिमांशु रॉय यांनी निर्णय घेतला की आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या निर्मितीऐवजी, भारतातील चित्रपटांच्या मार्केटवर लक्ष केंद्रित करायचं.

1933 च्या शेवटी, हिमांशु रॉय आणि देविका राणी भारतात परतले. येताना ते हिंदीत तयार केलेला 'कर्मा' चित्रपटाची रिळं देखील घेऊन आले. 27 जानेवारी 1934 ला 'कर्मा' हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला आणि तिकिटबारीवर साफ आपटला.

हॉलीवूडच्या दर्जाच्या 'बॉम्बे टॉकीज'ची उभारणी

इकडे भारतात आतापर्यंत पुण्यात प्रभात फिल्म कंपनी आणि कोलकात्यात न्यू थिएटर्ससारखे स्टुडिओ सुरू झाले होते. हिमांशु रॉय यांचं स्वप्न होतं की मुंबईत हॉलीवूडसारखा मोठा स्टुडिओ बनवावा. तो स्टुडिओ चित्रपट उद्योगाचं केंद्र व्हावा.

चित्रपटांच्या निर्मितीसाठी भांडवलाची समस्या नेहमीच असायची. बहुतांश पैसे पारंपारिक सावकारांकडून घेतले जात. त्यांच्या अटी अतिशय कडक असायच्या आणि त्यांना चित्रपट व्यवसाय कळतही नसे.

हिमांशु रॉय यांना वाटत होतं की चित्रपट निर्मितीला एक संघटित आणि व्यावसायिक स्वरुप देण्यात यावं. यामुळे भांडवल उभारण्यासाठी अधिक विश्वासू आणि अधिकृत मार्गांचा वापर करता येईल.

प्रश्न फक्त पैशांचा नव्हता. त्यांना चित्रपट उद्योगाला एक क्रिएटिव्ह बिझनेस म्हणून समाजात मानसन्मान मिळवून द्यायचा होता.

या जिद्दीतून स्टुडिओसाठी जमीन शोधण्याचं काम सुरू झालं. अखेर त्यावेळच्या मुंबईबाहेर असणाऱ्या मालाड भागात ही जमीन सापडली. मुंबईतील मोठे व्यावसायिक राजनारायण दूबे यांनी त्यात पैसा लावला.

मग स्टुडिओची उभारणी सुरू झाली. साउंडप्रूफ शूटिंग फ्लोअर, एडिटिंग रुम्स आणि प्रिव्ह्यू थिएटर मॉडर्न स्टुडिओ असणारा एक आधुनिक स्टुडिओ तयार झाला. त्या स्टुडिओला नाव देण्यात आलं, 'बॉम्बे टॉकीज लिमिटेड'.

निरंजन पॉलदेखील या स्टुडिओच्या संस्थापक टीमचा महत्त्वाचा भाग होते.

देशातील सर्वात आधुनिक फिल्म स्टुडिओ बनवण्याचं स्वप्नं पूर्ण करताना, बॉम्बे टॉकीजनं जर्मनीतून आधुनिक उपकरणं आणली. तसंच जर्मनीतील आणि ब्रिटनमधील या क्षेत्रातील तंत्रज्ञांनादेखील स्टुडिओत घेतलं.

त्यात सिनेमॅटोग्राफर जोसेफ वीर्शिंग, आर्ट डायरेक्टर कार्ल वॉन स्प्रेट्टी आणि दिग्दर्शक फ्रँज ऑस्टेन यांचा समावेश होता.

हॉलीवूडप्रमाणेच हिमांशु आणि देविका क्रिएटिव्ह म्हणजे कलात्मक कामावर लक्ष द्यायचे. तर वित्तीय बाबी आणि व्यवसाय पाहण्यासाठी वेगळी टीम होती. त्याची जबाबदारी राजनारायण दूबे यांच्यावर होती.

मग असं ठरवण्यात आलं की बॉम्बे टॉकीजच्या चित्रपटांमध्ये देविका राणी याच नायिका असतील. मात्र पहिल्याच चित्रपटातून स्कॅंडल निर्माण झालं.

'जवानी की हवा' आणि देविका राणींचं 'स्कँडल'

बॉम्बे टॉकीजचा पहिला चित्रपट एक थ्रिलर मर्डर-मिस्ट्री होता. चित्रपटाचं नाव होतं, 'जवानी की हवा'. चित्रपटाचे हिरो होते अतिशय देखणे, नजमुल हसन. त्यांची निवड स्वत: हिमांशु रॉय यांनीच केली होती.

भाईचंद पटेल यांनी 'टॉप 20: सुपरस्टार्स ऑफ इंडियन सिनेमा' हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात ते लिहितात, "हसन एक उंचपुरा आणि देखण्या व्यक्तिमत्वाचा तरुण होता. त्यांचा संबंध लखनौच्या नवाबी घराण्याशी होता. बॉम्बे टॉकीजनं त्यांच्याबरोबर अनेक चित्रपटांसाठी करार केला होता."

स्टुडिओ स्थापन करण्याच्या जिद्दीत हिमांशु रॉय नेहमीच वेगवेगळ्या कामांमध्ये व्यग्र असायचे. त्याचवेळेला स्टुडिओमध्ये अफवा पसरली की देविका राणी यांचं अफेयर सुरू आहे.

भाईचंद पटेल लिहितात, "निरंजन पॉल यांचा आरोप आहे की जवानी की हवा या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळेस देविका राणी यांची सहकलाकार नजमुल हसन यांच्याशी जवळीक वाढली होती."

मुंबईतून गायब झालेले देविका-नजमुल सापडले कोलकात्यात

'जवानी की हवा' हा चित्रपट 1935 मध्ये प्रदर्शित झाला. देविका-नजमुल यांची जोडी हिट झाली. याच जोडीला घेऊन मग 'जीवन नैया' या पुढील चित्रपटाचं चित्रीकरण देखील सुरू करण्यात आलं.

मात्र चित्रीकरण सुरू असतानाच अचानक देविका आणि नजमुल गायब झाले. नजमुल हसन यांच्याबरोबर देविका कोलकात्यात आहे हे माहित झाल्यावर मोठी चर्चा निर्माण झाली.

शेवटी हे दोघे कोलकात्यातील ग्रँड हॉटेलमध्ये सापडले. देविका स्टुडिओची मोठी नायिका होती. हिमांशु रॉय यांचे सहकारी शशाधर मुखर्जी यांनी कसंतरी देविका राणी यांचं मन वळवलं आणि त्यांना घेऊन परत आले.

मात्र त्यानंतर हिमांशु रॉय आणि देविका राणी यांच्यातील नातं आधीसारखं राहिलं नाही. नजमुल हसन यांना नोकरीतून काढून टाकण्यात आलं. इतकंच नाही तर त्यांच्यावर चित्रीत करण्यात आलेली रीळंदेखील नष्ट करण्यात आली.

मग 'जीवन नैया' चित्रपटासाठी एका नव्या हिरोचा शोध सुरू झाला आणि त्यातून एक नवा इतिहास घडला.

'किस्मत'मधून जन्माला आला हिंदी सिनेमाचा पहिला 'स्टार'

बॉम्बे टॉकीजमध्ये एक लॅब टेक्नीशियन काम करत होते. मात्र हिमांशु रॉय यांनी त्यांना हिरो म्हणून चित्रपटात घ्यायचं ठरवल्यावर त्याचं नशीब एकदम पालटलं. त्या लॅब टेक्नीशियनचं नाव होतं कुमुदलाल कुंजीलाल गांगुली.

चित्रपटात हिरो म्हणून घेण्याचं ठरल्यावर कुमुदलाल कुंजीलाल गांगुली यांचं नाव बदलून ठेवण्यात आलं अशोक कुमार. हा निर्णय अतिशय ऐतिहासिक ठरला. आगामी काळात अशोक कुमार हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिले 'स्टार' बनले.

1936 मध्ये आलेला 'जीवन नैया' चित्रपट चालला. मात्र 'अछूत कन्या' या बॉम्बे टॉकीजच्या पुढील चित्रपटानं प्रचंड यश मिळवलं. दलित मुलगी आणि ब्राह्मण मुलाची ही दु:खद कहाणी होती. या चित्रपटानं अशोक कुमार हिरो म्हणून प्रस्थापित झाले.

देविका-अशोक कुमार या जोडीनं अनेक चित्रपट केले. मात्र 'अछूत कन्या' या त्यांचा सर्वात यशस्वी चित्रपट मानला जातो.

बॉम्बे टॉकीजनं दरवर्षी जवळपास तीन चित्रपटांची निर्मिती करण्याचं नियोजन केलं. जवळपास 400 कर्मचारी आणि सर्वोत्तम तांत्रिक उपकरणं यांच्या मदतीनं ते दरवर्षी हिट चित्रपटांची निर्मिती करत होते.

इतर भारतीय स्टुडिओच्या तुलनेत बॉम्बे टॉकीजचे चित्रपट तांत्रिकदृष्ट्या उत्तम असायचे. त्यांच्यात एक खास चमक होती. त्यातून हॉलीवूडच्या एमजीएम स्टुडिओच्या चित्रपटांची आठवण यायची.

ज्याप्रमाणे हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ग्रेटा गार्बो यांना रुपेरी पडद्यावर दाखवलं जायचं, त्याच दिमाखात देविका राणी यांना देखील रुपेरी पडद्यावर सादर केलं जायचं.

बॉम्बे टॉकीजला बसले मोठे धक्के

1939 मध्ये बॉम्बे टॉकीजला अचानक धक्का बसला. दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं. त्यामुळे ब्रिटिश सरकारनं भारतातील जर्मन तंत्रज्ञांसह जोसेफ विर्शिंग आणि स्टुडिओसाठी 16 चित्रपटांचं दिग्दर्शन करणाऱ्या फ्रँज ऑस्टेन यांना भारतातून माघारी बोलावलं.

इतकंच नाही तर, अनेक जर्मन कर्मचाऱ्यांना अटक करून इंग्रज सरकारनं त्यांना एक कॅम्पमध्ये कैदेत ठेवलं. त्यामुळे बॉम्बे टॉकीजचे चित्रपट ज्या तांत्रिक उत्कष्टतेसाठी नावाजले जात होते, त्या तांत्रिक गुणवत्तेवर मोठा फटका बसला होता.

नवी टीम तयार करण्याचं काम आणि सातत्यानं चित्रपटांची निर्मिती करण्याच्या तणावामुळे हिमांशु रॉय यांचं नर्व्हस ब्रेकडाउन झालं. दुर्दैवानं 16 मे 1940 ला वयाच्या अवघ्या 48 व्या वर्षी हिमांशु रॉय यांचं निधन झालं.

हिमांशु रॉय यांच्या मृत्यूनं देविका राणी हादरून गेल्या. मात्र स्टुडिओदेखील सांभाळायचा होता. आता बॉम्बे टॉकीजची धुरा 'द फर्स्ट लेडी ऑफ इंडियन सिनेमा' म्हणवल्या जाणाऱ्या देविका राणी यांना देण्यात आली.

हिंदी सिनेमाच्या ट्रेंडसेटर

त्या काळात भारतात एका महिलेनं फिल्म स्टुडिओ चालवणं हे खूपच धाडसाचं काम होतं. मात्र हिमांशु रॉय यांच्या मृत्यूनंतर बॉम्बे टॉकीजमध्ये दोन गट पडले होते. त्यांच्यात सत्ता संघर्ष सुरू झाला होता. त्यामुळे देविका राणी यांच्यासमोर खूप आव्हानं निर्माण झाली होती.

देविका राणी या सर्वांना तोंड देत निग्रहानं काम करत होत्या. त्यांनी बसंत आणि किस्मत सारख्या सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली.

देविका राणी यांनी धुरा सांभाळल्यानंतरच्या काळातच बॉम्बे टॉकीजनं त्यांच्या सर्वात यशस्वी आणि भारतातील पहिल्या ब्लॉकबस्टर चित्रपटाची निर्मिती केली. तो चित्रपट होता 'किस्मत' (1943).

ज्ञान मुखर्जी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. कोलकात्याच्या रॉक्सी सिनेमामध्ये हा चित्रपट तीन वर्षांहून अधिक दिवस चालला होता. यावरून चित्रपटाचं तुफान यश लक्षात येतं. या चित्रपटानं बॉलीवूडमध्ये अनेक नवे ट्रेंड सुरू केले.

पहिल्यांदाच एखाद्या हिंदी सिनेमात मुख्य पात्राला म्हणजे नायकाला (अशोक कुमार) एक चोर आणि अँटी हिरो म्हणून दाखवण्यात आलं होतं.

त्याचबरोबर 'लॉस्ट अँड फाउंड' (वेगळं होणं किंवा हरवणं आणि मग एकत्र येणं) हे जे हिंदी चित्रपटांचा यशस्वी आणि आवडतं सूत्र आहे, त्या कथासूत्रानं तयार झालेल्या सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये 'किस्मत'चा समावेश होतो.

यात हिरोची लहानपणी त्याच्या आई-वडिलांपासून ताटातूट होते आणि शेवटी मग ते पुन्हा एकत्र येतात. किस्मत चित्रपटानंतर कित्येक दशकं या कथासूत्राचा वापर हिंदी चित्रपटांमध्ये करण्यात आला.

'किस्मत' चित्रपटातील 'दूर हटो ऐ दुनियावालों हिंदुस्तान हमारा है' हे हिट गाणं आजदेखील लोकप्रिय आहे.

अशोक कुमार यांचं देविका राणीविरोधात बंड

याच वर्षी देविका राणी यांनी 'हमारी बात'(1943) या त्यांच्या शेवटच्या चित्रपटात अभिनय केला. यात एक नवीन अभिनेता राज कपूरनं एक छोटीशी भूमिका केली होती.

बॉम्बे टॉकीजनं फक्त अशोक कुमार हाच स्टार दिला नाही. तर बॉम्बे टॉकीजच्या प्रमुख म्हणून देविका राणी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला दिलीप कुमार आणि मधुबाला सारखे अद्भतू कलाकार देखील दिले. मात्र त्यांच्यासमोर अडचणी वाढतच गेल्या.

अनेक मुद्द्यांवरून अशोक कुमार हे ज्ञान मुखर्जी आणि शशीधर मुखर्जी यांच्यासोबत एकत्र आले. त्यांनी देविका राणी यांच्याविरोधात बंड केलं. मग त्यांनी बॉम्बे टॉकीज सोडून 'फिल्मिस्तान' नावानं एक नवा स्टुडिओ सुरू केला.

या संकटांमधून देविका राणी सावरू शकल्या नाहीत. 1945 मध्ये देविका राणी यांनी बॉम्बे टॉकीजमधील त्यांच्या मालकीचे शेअर्स विकले आणि रशियन चित्रकार स्वेतोस्लाव रोएरिख यांच्याशी लग्न केलं. मग चित्रपटसृष्टीला रामराम ठोकून त्या बंगळूरूला निघून गेल्या.

देविका राणी यांना भारतीय सिनेमा जगतातील दादासाहेब फाळके या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 9 मार्च 1994 ला बंगळूरूमध्ये देविका राणी यांचं निधन झालं.

बॉम्बे टॉकीजचा शेवट

देविका राणी बॉम्बे टॉकीजमधून बाहेर पडल्यानंतर अशोक कुमार आणि इतर काही जुने लोक बॉम्बे टॉकीजमध्ये परत आले.

त्यानंतर मजबूर (1948), जिद्दी (1948) आणि महल (1949) सारख्या काही यशस्वी चित्रपटांची देखील निर्मिती झाली. मात्र बॉम्बे टॉकीजला त्याचं गतवैभव आणि प्रतिष्ठा पुन्हा मिळू शकली नाही.

1954 मध्ये निर्मिती झालेला 'बादबान' हा बॉम्बे टॉकीजचा शेवटचा चित्रपट ठरला. 2023 मध्ये प्राइम व्हिडिओवर आलेल्या आणि हिट झालेल्या 'जुबिली' या वेबसेरीजच्या कहाणीतील अनेक किस्से बॉम्बे टॉकीजच्या इतिहासातूनच घेण्यात आले होते.

20 वर्षांच्या चित्रपट क्षेत्रातील प्रवासात बॉम्बे टॉकीजनं एकूण 40 चित्रपटांची निर्मिती केली. कित्येक मोठे स्टार निर्माण केले.

त्याही पलीकडे, तांत्रिक कौशल्याचा आणि कथेच्या सादरीकरणाच्या फिल्मी शैलीचा जो पाया बॉम्बे टॉकीज घातला, तो आजही भारतीय चित्रपटांचा एक महत्त्वाचा भाग आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.