'अभिनेत्रीबरोबर अफेअर करता येणार नाही', अलिखित नियम मोडणारे दोन दिग्गज ते प्रभात स्टुडिओच्या लयाची कहाणी

    • Author, यासिर उस्मान
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

आज चित्रपट आपल्या आयुष्यात जो आनंद निर्माण करत आहेत, त्यामागे अनेकांचे परिश्रम, अनेकांची आयुष्यं खर्ची पडली आहेत. अनेक संस्थांच्या योगदानातून हे रुपेरी जग उभं राहिलं आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया घालणारी अशीच एक संस्था म्हणजे प्रभात स्टुडिओ आणि या स्टुडिओतील चित्रपटांद्वारे आपल्या आयुष्यात आनंदाची पेरणी करणारे दिग्दर्शक म्हणजे व्ही. शातांराम.

या प्रभात स्टुडिओमध्ये घडलेले दोन दिग्गज म्हणजे देव आनंद आणि गुरु दत्त. अशी ही एक अव्याहत शृंखला आहे. प्रभातच्या या अद्भूत प्रवासाविषयी...

गोष्ट तशी जुनी आहे. मात्र तुम्हाला आश्चर्य वाटावी अशीच आहे. हॉलीवूडमधील स्टुडिओ संस्कृती आपल्याला माहित असते. तिथे हे स्टुडिओ किंवा कंपन्या चित्रपटांची निर्मिती करतात.

मात्र 1930 च्याही आधी भारतीय चित्रपटसृष्टीत हॉलीवूडसारखा स्टुडिओ संस्कृतीचा पाया घातला गेला होता.

त्यावेळेस चित्रपट क्षेत्र संघटित आणि व्यावसायिक स्वरुपाचं होतं. त्यामध्ये तंत्रज्ञ, संगीतकार, गीतकार, पटकथा लेखक आणि इतकंच काय अभिनेता-अभिनेत्रींपर्यंत सर्वजण पगारी असायचे.

आपण अशाच एका ऐतिहासिक स्टुडिओची कहाणी जाणून घेणार आहोत. या स्टुडिओचं नाव आहे प्रभात फिल्म कंपनी.

अर्थात प्रभात फिल्म कंपनीचं नाव, चित्रपट महर्षी व्ही. शांताराम यांच्या नावाबरोबरच आठवलं जातं. तसंच प्रभात नाव आणखी एका गोष्टीसाठी आठवलं जातं. ते म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज देव आनंद आणि गुरु दत्त.

दोघांनी त्यांच्या करियरची सुरुवात प्रभात फिल्म कंपनीतूनच केली होती. मात्र प्रभात फिल्म कंपनीचा वारसा यापेक्षा कितीतरी मोठा आहे.

त्या काळाची जरा कल्पना करून पाहा. जेव्हा भारतात चित्रपटांचा जन्म होत होता. कोणीतरी पहिल्यांदा कॅमेरा हाती धरला होता, पहिल्यांदा एखादी कथा रुपेरी पडद्यावर जिवंत झाली होती आणि जेव्हा स्वप्नांची दुनिया रुपेरी पडद्यावर साकारण्याची इच्छा निर्माण झाली होती.

भारतीय चित्रपटसृष्टीच्या या अद्भूत प्रवासाची सुरुवात करण्यामध्ये दोन नावं सर्वात महत्त्वाची होती. दादासाहेब फाळके आणि बाबूराव पेंटर. दोघेही मराठी होते ही उल्लेखनीय गोष्ट आहे.

1913 मध्ये दादासाहेब फाळके यांनी 'राजा हरिश्चंद्र' हा पहिला भारतीय चित्रपट बनवून चित्रपट सृष्टीचा पाया घातला होता.

तर अप्रतिम चित्रकार आणि तंत्रज्ञ असलेल्या बाबूराव पेंटर यांनी दादासाहेब फाळकेंकडून प्रेरणा घेत 'सैरंध्री' आणि 'सिंहगड' सारख्या चित्रपटांमधून भव्य सेट, नेत्रदिपक लायटिंग आणि सुंदर दृश्यांची परंपरा सुरू केली होती. एकप्रकारे त्यांनी भारतीय मूकपटांचं सौंदर्यशास्त्रच निर्माण केलं होतं.

या दोन्ही महान व्यक्तिमत्वांनी चित्रपटसृष्टीची जी बीजं रोवली, त्यातूनच पुढे प्रभात फिल्म कंपनीसारखी प्रतिष्ठित स्टुडिओ संस्कृती जन्माला आली, रुजली आणि वाढली.

दादासाहेब फाळके यांचा कोणी वारसदार नव्हता. बाबूराव पेंटर यांनी त्या काळातील काही प्रतिष्ठित व्यक्तिमत्वांना प्रशिक्षण दिलं होतं. बाबूराव पेंटर यांच्या चार शिष्यांनी त्यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीतून वेगळं होत, एक नवी फिल्म कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता.

हे चार शिष्य म्हणजे - केशवराव धायबर, विष्णुपंत दामले, शेख फत्तेलाल आणि व्ही. शांताराम. मात्र त्यांच्याकडे पैशांची कमतरता होती. त्यामुळे त्यांनी कोल्हापूरचे प्रसिद्ध सराफ सीताराम कुलकर्णी यांना पाचवा भागीदार म्हणून सोबत घेतलं.

मग 15,000 रुपयांच्या भांडवलानिशी 1 जून 1929 ला कोल्हापूरच्या मंगळवार पेठेत एका नव्या फिल्म कंपनीची सुरुवात करण्यात आली. त्या कंपनीचं नाव होतं, प्रभात फिल्म कंपनी.

विष्णुपंत दामले कंपनीचे तांत्रिक स्तंभ होते. तर केशवराव धायबर तांत्रिक आणि साऊंड इंजिनीअरिंगचे जाणकार होते. एस. फत्तेलाल उत्तम कला दिग्दर्शक होते. असं असलं तरी पुढे या तिघांनीदेखील कंपनीसाठी चित्रपटांचं दिग्दर्शन केलं.

मात्र सुरुवातीच्या काळात सर्जनशील नियंत्रण आणि दिग्दर्शनाची जबाबादारी व्ही. शांताराम यांनीच सांभाळली होती. तेच पुढे प्रभात फिल्म कंपनी आणि भारतातील महान फिल्ममेकर म्हणून नावाजले गेले.

कंपनीचे सुरुवातीचे 6 चित्रपट हे मूकपट होते. त्यांचं दिग्दर्शन व्ही. शांताराम यांनी केलं होतं. पहिला चित्रपट होता भगवान कृष्ण आणि कंस यांच्यावर आधारित 'गोपाल कृष्ण'. 1929 मध्ये आलेला हा चित्रपट खूप हिट झाला होता.

यानंतर व्ही. शांताराम यांनी बनवलेला मोठा चित्रपट म्हणजे उदयकाल (1931). छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची कहाणी यात होती.

शिवाजी महाराजांच्या भूमिकेत स्वत: व्ही. शांताराम होते. आजच्या काळात तानाजी, पृथ्वीराज आणि अलीकडच्याच ब्लॉकबस्टर छावा चित्रपटाची चर्चा सर्वत्र होते आहे.

मात्र इथे ही गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे की, जवळपास 100 वर्षांपूर्वी मूकपटांच्या माध्यमातून प्रभात फिल्म कंपनी आणि व्ही. शांतारामसारखे चित्रपटकार भारतीय संस्कृती आणि इतिहास रुपेरी पडद्यावर मांडत होते.

चित्रपट क्षेत्रात खरी क्रांती झाली ती आवाजामुळे. बोलपटांचं आगमन या क्षेत्रासाठी गेमचेंजर ठरलं.

1931 मध्ये भारतातील पहिला बोलपट, 'आलमआरा' प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं दिग्दर्शन आर्देशीर इराणी यांनी केलं होतं.

प्रभात फिल्म कंपनीच्या भागीदारांनी देखील निर्णय घेतला की, बोलपटांमध्येच चित्रपट क्षेत्राचं भवितव्य आहे. पुढच्याच वर्षी प्रभात फिल्म कंपनीनं पहिला मराठी बोलपट 'अयोध्येचा राजा' प्रदर्शित केला.

राजा हरिश्चंद्राच्या पौराणिक कथेवर हा चित्रपट आधारित होता. या चित्रपटाची कथा, 1913 मध्ये दादासाहेब फाळके यांनी बनवलेल्या राजा हरिश्चंद्र या मूकपटाचीच कथा होती.

प्रभात फिल्म कंपनीचा हा चित्रपट मराठीबरोबरच हिंदीमध्येही बनवण्यात आला होता. हिंदीत चित्रपटाचं नाव 'अयोध्या के राजा' असं होतं.

मराठी आणि हिंदी चित्रपटांचं चित्रीकरण एकत्रच करण्यात आलं होतं. म्हणजे आधी मराठी दृश्याचं चित्रीकरण व्हायचं आणि त्यानंतर मग त्याच सेटवर हिंदी दृश्याचं चित्रीकरण व्हायचं. हा भारतातील दोन भाषांमध्ये बनलेला पहिला बोलपट ठरला.

प्रभात फिल्म कंपनीवर अभ्यास करणारे बहुतांश लोक मानतात की, या स्टुडिओच्या सर्जनशील कामाचा विचार करता, व्ही. शांताराम हेच त्याचे शिल्पकार होते. ते वन-मॅन आर्मी होते.

दिग्दर्शनाबरोबरच व्ही. शांताराम यांना स्टुडिओच्या पायाभूत सुविधा आणि एडिटिंग, सिनेमॅटोग्राफी, अभिनेत्यांचं प्रशिक्षण आणि पोशाख या विविध विभागांचं सखोल ज्ञान होतं.

बोलपटांचं आगमन झाल्यानंतर पहिल्या वर्षी आठ मराठी बोलपटांची निर्मिती झाली. त्यातील तीन प्रभात फिल्म कंपनीचे होते. ते म्हणजे अयोध्येचा राजा, अग्निकंकण आणि माया मच्छिंद्र. या तिन्ही चित्रपटांचे दिग्दर्शक व्ही. शांतारामच होते.

त्यांनी निर्णय घेतला की, रंगीत चित्रपटांची निर्मिती करायची आणि त्याची प्रक्रिया जर्मनीत होईल.

महाभारतातील कीचक वधावर आधारित या चित्रपटाचं नाव होतं, सैरंध्री. या रंगीत चित्रपटाचं चित्रीकरण प्रभात स्टुडिओत झालं होतं. त्यानंतर चित्रपटाच्या कलर प्रोसेसिंगसाठी व्ही. शांताराम चित्रपटांची रिळं घेऊन जर्मनीतील प्रसिद्ध उफा स्टुडिओमध्ये गेले.

मात्र जर्मन स्टुडिओच्या वागणुकीबद्दल व्ही. शांताराम समाधानी नव्हते. चित्रपटाची प्रोसेसिंग त्यांच्या मनासारखी झाली नाही. त्यामुळे मग चित्रपट कृष्णधवल (ब्लॅक अँड व्हाईट) स्वरुपातच प्रदर्शित करावा लागला होता.

अधिक चांगल्या पायाभूत सुविधा, विस्ताराच्या योजना आणि सुविधांची उपलब्धता लक्षात घेत 1933 मध्ये प्रभात फिल्म कंपनी पुण्यात स्थलांतरित झाली. भौगोलिकदृष्ट्या पुणे कोल्हापूरपेक्षा मुंबईला जवळ आहे.

एक वर्षानंतर पुण्यात 11 एकरांमध्ये पसरलेला विशाल प्रभात स्टुडिओ तयार झाला. विष्णुपंत दामले यांनी मोठे परिश्रम घेत भूमिगत वायरिंग, वातानुकूलित संपादन कक्ष आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण असा स्टुडिओ तयार केला. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या हा भारतातील सर्वोत्तम स्टुडिओ बनला.

याच स्टुडिओमधून प्रभात कंपनीनं भारतातील सुरुवातीच्या काळातील काही प्रसिद्ध चित्रपटांची निर्मिती केली. पुढची 8 वर्षे प्रभात फिल्म कंपनीचं सुवर्णयुग होतं. या स्टुडिओतील साऊंडप्रूफ टिनच्या स्टुडिओमध्ये ज्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती झाली, तो चित्रपट होता - अमृत मंथन (1934).

मानव आणि पशुबळीची पार्श्वभूमी असलेल्या कथेवर हा चित्रपट बनला होता. हा चित्रपट अंधश्रद्धा आणि धार्मिक कट्टरतेच्या विरुद्ध संदेश देतो. अमृत मंथन चित्रपट हा भारतातील पहिला सिल्व्हर जुबिली चित्रपट ठरला.

यानंतर पुढचा चित्रपट पुरुषप्रधान व्यवस्थेच्या विरोधातील एका महिलेच्या लढ्यावर आधारित होता. चित्रपट नाव होतं, अमर ज्योति (1936).

1930 च्या दशकाच्या मध्यापर्यंत देशात मूकपट हळूहळू बंद झाले. बोलपट चित्रपटसृष्टीच्या केंद्रस्थानी आले. प्रभात फिल्म कंपनीनं देखील ही बाब ओळखली. प्रभात फिल्म कंपनी देशातील "बिग थ्री" स्टुडिओंच्या श्रेणींमध्ये गणली जाऊ लागली.

यात कलकत्त्यातील (आजचं कोलकाता) न्यू थिएटर आणि मुंबईतील बॉम्बे टॉकीज सारख्या प्रतिष्ठित स्टुडिओचा समावेश होता.

व्ही. शांताराम, प्रभात फिल्म कंपनीतील सर्वात मोठं नाव होते. मात्र कंपनीतील इतर भागीदार देखील मागे नव्हते. प्रभात फिल्म कंपनीचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट 1936 मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट होता, 'संत तुकाराम'.

प्रभातचा हा सर्वात यशस्वी चित्रपट ठरला. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे प्रभात फिल्म कंपनीच्या या सर्वात यशस्वी चित्रपटाचं दिग्दर्शन व्ही. शांताराम यांनी नाही तर विष्णु दामले आणि शेख फत्तेलाल यांनी केलं होतं.

1937 मध्ये व्हेनिस चित्रपट महोत्सवात त्या वर्षाच्या तीन सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक म्हणून या चित्रपटाला सन्मानित करण्यात आलं होतं.

1937 नंतर प्रभातच्या चित्रपटांमधून एक नवा सूर उमटू लागला. तो म्हणजे चित्रपटातून फक्त मनोरंजन नाही तर समाजाला आरसा दाखवण्याचा आणि बदलाचा सूर. या सामाजिक चित्रपटांची मूळं कुठेतरी राष्ट्रवादी स्वातंत्र्य चळवळीशी जोडलेली होती.

1936 मध्ये बॉम्बे टॉकीजचा अछूत कन्या हा चित्रपट यशस्वी झाला. त्याच्या यशानं दाखवून दिलं की समाजातील वास्तव दाखवणारे चित्रपट फक्त प्रेक्षकांना अंतर्मुखच करत नाहीत, तर व्यावसायिकदृष्ट्या यशस्वीदेखील होतात.

1937 ते 1941 दरम्यान व्ही. शांताराम यांनी ज्या तीन चित्रपटांचं दिग्दर्शन केलं, त्यातून त्यांनी हे सिद्ध केलं की त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील महान चित्रपटकार का मानलं जातं.

त्यांनी हे तिन्ही चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये बनवले. हे चित्रपट आहेत, कुंकू/दुनिया ना माने (1937), माणूस/आदमी (1939), शेजारी/पडोसी (1941). भारतीय समाजातील ज्वलंत विषयांवरील अतिशय प्रभावी असे हे चित्रपट होते.

कुंकू/दुनिया ना माने चित्रपटात स्त्री स्वांतत्र्यासाठी आवाज उठवणाऱ्या एका महिलेची कहाणी होती. ही महिला वयानं खूप मोठ्या असलेल्या पुरुषाशी लग्न करण्यास नकार देते.

माणूस/आदमी चित्रपटात वेश्या आणि पोलीस हवालदारामधील संवेदनशील आणि गुंतागुंतीची प्रेमकहाणी मांडण्यात आली होती.

तर शेजारी/पडोसी चित्रपट म्हणजे दोन शेजाऱ्यांची कथा होती. यात एक हिंदू आहे आणि दुसरा मुस्लीम. समाजातील सांप्रदायिक, जातीय सलोख्याची आवश्यकता या चित्रपटात प्रभावी पद्धतीनं मांडण्यात आली होती.

दुर्दैवानं प्रभात फिल्म कंपनीसाठी हा व्ही. शांताराम यांचा शेवटचा चित्रपट ठरला. त्यासाठी कारण ठरलं एक प्रेम कहाणी.

कंपनीत सामाजिक जबाबदारी फक्त चित्रपटांमध्येच नाही, तर खऱ्या आयुष्यात देखील आवश्यक होती.

त्या काळी चित्रपटांबद्दल समाजात फारसं चांगलं बोललं जात नसे. चित्रपटसृष्टीबद्दल लोकांमध्ये फारसं चांगलं मत नव्हतं.

मात्र प्रभात फिल्म कंपनीनं मध्यमवर्गाच्या सामाजिक निकष आणि मूल्यांचं पालन करत एक स्वच्छ प्रतिमेची संस्था म्हणून प्रतिमा निर्माण करण्यासाठी खूप मेहनत केली.

देशातील इतर फिल्म कंपन्यांपेक्षा प्रभात वेगळी मानली जायची. विशेषकरून अभिनेत्री आणि महिला कर्मचाऱ्यांसाठी प्रभात ही चांगली आणि सुरक्षित जागा मानली जायची. तिथे अतिशय शिस्तबद्धपणे काम होत असे आणि नियम अतिशय कडक होते.

स्टुडिओमध्ये महिला कलाकार आणि त्यांच्या सहकलाकारांबरोबरील वैयक्तिक संबंधांना पूर्ण मनाई होती. जेणेकरून कामाच्या ठिकाणचं वातावरण नेहमीच प्रतिष्ठेचं राहावं.

स्टुडिओचा एक अलिखित नियम होता. तो म्हणजे कंपनीतील कोणताही भागीदार कोणत्याही अभिनेत्रीबरोबर अफेअर करू शकत नव्हता.

विशेष बाब म्हणजे हे सर्व नियम फक्त प्रभात फिल्म कंपनीच्या कर्मचाऱ्यांवरच नाही, तर त्यांच्या मालकांना देखील लागू होत होते. कंपनीचे स्टार दिग्दर्शक आणि अभिनेते व्ही. शांताराम यांच्यावरदेखील हे नियम लागू होते. कंपनी विखुरण्यास या नियमाचाही मोठा हातभार लागला.

प्रभात फिल्म कंपनीवर 'प्रभात फेरी' नावाचा प्रसिद्ध माहितीपट बनलेला आहे. या माहितीपटात फिल्म आर्काइव्हिस्ट आणि नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडियाचे (एनएफएआय) संस्थापक आणि माजी संचालक पी. के. नायर यांनी याबद्दल सांगितलं होतं.

ते म्हणाले होते, "स्टुडिओच्या तळ्याजवळचा झोपाळा ऐतिहासिक आहे. कारण तिथूनच व्ही. शांताराम आणि जयश्री यांच्यातील रोमांसची सुरुवात झाली होती. स्टुडिओच्या भागीदारांमध्ये हा अलिखित नियम होता की, अभिनेत्रीबरोबर अफेअर करता येणार नाही. जर तसं झालं तर स्टुडिओ सोडावा लागणार होता."

"आधी केशवराव धायबर यांच्याबरोबर असं झालं. केशवराव अग्निकंकण चित्रपटातील नायिका नलिनी टोरकट यांच्या प्रेमात पडले. त्यामुळे त्यांना स्टुडिओ सोडावा लागला."

"स्टुडिओ सोडणारे दुसरे व्यक्ती होते व्ही. शांताराम. कारण व्ही. शांताराम शेजारी चित्रपटाची नायिका जयश्री (त्यांचा पहिला चित्रपट) हिच्या प्रेमात पडले होते."

"साहजिकच व्ही. शांताराम यांना एकतर प्रेम सोडावं लागणार होतं किंवा स्टुडिओ. त्यामुळे त्यांना स्टुडिओ सोडावा लागला."

अर्थात अशीही चर्चा होती की व्ही. शांताराम यांना त्यांचा स्वतंत्र बॅनर उभा करायचा होता. म्हणून 1942 मध्ये त्यांनी प्रभात फिल्म कंपनीला रामराम ठोकला आणि मुंबईला गेले.

प्रभात फिल्म कंपनीसाठी हा खूप मोठा धक्का होता. व्ही. शांताराम कंपनीचे प्रमुख आधारस्तंभ होते. कंपनीच्या बहुतांश यशस्वी चित्रपटांचं दिग्दर्शन त्यांनीच केलं होतं.

पी. के. नायर म्हणाले होते, "कंपनी अस्ताला जाण्यामागचं हे एक मोठं कारण होतं. व्ही. शांताराम निघून गेल्यावर प्रभातला उतरती कळा लागली. त्यांची जागा घेणारा कंपनीला कोणीही सापडला नाही. प्रत्येक तंत्रज्ञानावर याचा मानसिक परिणाम झाला."

व्ही. शांताराम मुंबईला गेले आणि त्यांनी 'राजकमल कलामंदिर' या बॅनरची स्थापना केली. दुसरीकडे प्रभात फिल्म कंपनी सांभाळणारे दामले खूपच आजारी पडले. प्रभातमधील काही कर्मचाऱ्यांना व्ही. शांताराम यांनी त्यांच्या नव्या कंपनीत नोकरी दिली.

1944 मध्ये प्रभात कंपनीचा शेवटचा यशस्वी चित्रपट 'राम शास्त्री' प्रदर्शित झाला. याच वर्षी गुरु दत्त, नृत्य दिग्दर्शक आणि सहाय्यक दिग्दर्शक म्हणून प्रभात कंपनीत नोकरीला लागले.

प्रसिद्ध अभिनेते देव आनंद देखील त्यावेळेस पुण्यातच होते. कारण प्रभात कंपनीच्या 'हम एक है' (1946) या चित्रपटातून ते नायक म्हणून कारकिर्दीची सुरुवात करत होते.

अर्थात, तोपर्यंत प्रभात फिल्म कंपनीचं सुवर्ण युग संपलं होतं. देव आनंद आणि गुरु दत्त यांची मैत्री याच स्टुडिओमध्ये झाली होती. काही काळानं दोघेही मुंबईत आले आणि पुढे ते दोघेही हिंदी चित्रपटसृष्टीतील महान कलाकार झाले.

1946 येईपर्यंत प्रभात फिल्म कंपनीसमोर अस्तित्वाचं संकट निर्माण झालं. अर्थात त्यासाठी मुख्य टीम विखुरणं आणि कंपनीचं आर्थिक संकट देखील कारणीभूत होतं. मात्र अनेक वर्षे ज्या स्टुडिओ व्यवस्थेनं भारतीय चित्रपटसृष्टीला दिशा दाखवली होती, ती व्यवस्था संपुष्टात येण्याची सुरुवात झाली होती.

पाहता पाहता, मोठी नावं प्रभात सोडून जाऊ लागली. जे कलाकार या कंपनीचा कणा होते, ते देखील आता वेगळी वाट धरू लागले.

पी. के. नायर यांनी स्टुडिओच्या शेवटच्या वर्षांबद्दल सांगितलं, "कंपनी पूर्णपणे बंबइया (मुंबईत तयार होणारे चित्रपट) चित्रपट बनवण्यावर भर देऊ लागली होती. ते पूर्णपणे व्यावसायिक चित्रपट होते."

"अर्थात अशा चित्रपटांची निर्मिती ते मनापासून करत नव्हते. असं ते निव्वळ कंपनीचं अस्तित्व टिकावं म्हणून करत होते. मात्र ते चित्रपट चालले नाहीत."

काळ बदलत होता आणि बदल नेहमीच सोपे नसतात. मोठे स्टुडिओ, जे कधीकाळी स्वयंपूर्णतेचा अभिमान बाळगायचे, ते आता मोठ्या खर्चाच्या ओझ्याखाली दबून जाऊ लागले.

आर्थिक दबाव वाढल्याचा परिणाम चित्रपटांच्या कथा आणि गुणवत्तेवर देखील पडू लागला. प्रभातचा सुवर्णकाळ आता संपला होता. अखेर, 13 ऑक्टोबर 1953 ला प्रभात फिल्म स्टुडिओचे दरवाजे बंद झाले.

आज प्रभात स्टुडिओचा एक मोठा भाग एफटीआयआयचा कॅम्पस झाला आहे. स्टुडिओच्या एका भागात संग्रहालय देखील आहे. या संग्रहालयात प्रभात फिल्म कंपनीच्या आठवणी जतन करून ठेवण्यात आल्या आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)