You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महिला टी 20 वर्ल्ड कप 2024 : भारताचा पाकिस्तानवर सहा विकेट राखून विजय
दुबईत सुरू असलेल्या महिलांच्या टी 20 विश्वचषकात भारतीय संघाने पाकिस्तानचा सहा विकेट राखून पराभव केला आहे.
विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध दारुण पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पारंपरिक प्रतिस्पर्धी असणाऱ्या पाकिस्तानवर विजय मिळवून या स्पर्धेतील पहिला विजय भारतीय संघाने मिळवला आहे.
फातिमा सनाच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात पाकिस्तानच्या संघाला 8 विकेट गमावून 105 धावा करता आल्या.
कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघांने 4 विकेट गमावत पाकिस्तानवर सहज विजय मिळवला.
पाकिस्तानच्या पहिल्या डावात भारतीय गोलंदाज अरुंधती रेड्डी तिच्या 4 ओव्हर्समध्ये 19 धावा देऊन पाकिस्तानच्या 3 फलंदाजांना बाद केलं.
पाकिस्तानच्या चारच फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली. कर्नाटकची युवा गोलंदाज श्रेयांका पाटीलने 2 विकेट घेतल्या. तर आशा शोभना, रेणुका सिंग आणि दीप्ती शर्मा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
पाकिस्तानने ठेवलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने सावध सुरुवात केली.
भारताची स्टार फलंदाज स्मृती मंधाना स्वस्तात तंबूत परतली मात्र आक्रमक सलामीवीर शेफाली वर्मा, मागच्या वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी केलेली जेमिमा रॉड्रिग्ज आणि स्वतः कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव केला.
भारतीय संघाचे पुढील सामने कधी आहेत?
भारताचा पुढील सामना श्रीलंकेविरुद्ध 9 ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यानंतर 13 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध भारतीय संघ मैदानात उतरेल.
20 ऑक्टोबर रोजी दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर टी 20 विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला जाईल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया एकाच गटात
भारत ज्या गटात आहे त्या गटात चुरशीची टक्कर बघायला मिळणार आहे.
'अ' गटात असलेल्या भारतासमोर ऑस्ट्रेलियासोबतच न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंकेचं आव्हान असणार आहे. तर 'ब' गटात इंग्लंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि स्कॉटलंड या संघांचा समावेश आहे.
एका गटातील संघ एकमेकांशी राऊंड रॉबिन पद्धतीने म्हणजेच प्रत्येकी एक वेळा भिडतील. त्यानंतर प्रत्येक गटात पहिल्या दोन स्थानावर असलेले संघ उपांत्य फेरीत जातील.
उपांत्य फेरीचे सामने 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी तर अंतिम सामना 20 ऑक्टोबरला होणार आहे.
विश्वचषकातील ऑस्ट्रेलिया संघाची स्थिती
टी 20 विश्वचषकातील ऑस्ट्रेलिया महिला संघाची कामगिरी वर्चस्वाचे नवीन मापदंड प्रस्थापित करणारी राहिलेली आहे.
2009 सालापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना महिला टी 20 विश्वचषक भरवत आहे.
आत्तापर्यंत झालेल्या 8 महिला टी 20 विश्वचषकांपैकी 6 विश्वचषक एकट्या ऑस्ट्रेलियाच्या ताब्यात आहे. मागचे तिन्ही टी 20 विश्वचषक ऑस्ट्रेलियानं जिंकले आहेत.
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघ आणि विजेतेपद हे जणू ठरलेलं समीकरण आहे.
विजेतेपद पटकावण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या या रेकॉर्डच्या जवळपासही कोणी फिरकू शकलेलं नाही. 8 पैकी तब्बल 6 विश्वचषक एकट्या ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहेत.
2007 साली इग्लंड आणि 2016 साली वेस्ट इंडिज यांनी पटकवलेलं विजेतेपद वगळता प्रत्येक वेळा ऑस्ट्रेलियानं टी 20 विश्वचषकावर आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलेलं आहे.
त्यामुळे यावेळीही ऑस्ट्रेलियाला विजेतेपदाचा प्रमुख दावेदार मानलं जाणं सहाजिकच आहे. टी 20 विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाची कामगिरी स्वप्नवत आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)