रिझर्व्ह बँकेने निरक्षर महिलांना बँकेचा परवाना नाकारला, महिलांनी अधिकाऱ्यांनाच गणित घातलं आणि मग...

    • Author, अमृता दुर्वे
    • Role, बीबीसी मराठी

"ही बँक महिलांसाठी सुरू झाली...आमच्या सभासद महिला आहेत...आणि आमच्या बायलॉजमध्ये लिहीलंय की आम्ही फक्त महिलांनाच कर्ज देऊ शकतो..."

माण देशी महिला सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी संचालक रेखा कुलकर्णी अवघ्या तीन ओळींमध्ये बँकेच्या कामकाजाचं सार सांगतात. 

25 वर्षांपूर्वी म्हसवडमध्ये सुरू झालेल्या या बँकेच्या आज महाराष्ट्रात 8 शाखा आहेत.

माण देशी महिला सहकारी बँक

साताऱ्यापासून 80 किलोमीटरवरच्या दुष्काळी माण तालुक्यातलं गाव - म्हसवड.

इथल्या विजय सिन्हांशी लग्न करून मुंबईच्या चेतना सिन्हा गावात रहायला आल्या तेव्हा परिस्थिती अगदीच वेगळी होती. घरामध्ये संडासही नव्हते, दिवसातून एकदा येणारी एसटी हे संपर्काचं साधन. 

विजय सिन्हा या भागातल्या गावांमध्ये समाजकार्य करत होते. या दुष्काळी भागात बहुतांश लोक रोजगार हमीच्या कामाला जात. काम होतं दगड फोडण्याचं. त्या काळात कैद्यांना दिलं जाणारं काम गावातले स्त्री-पुरुष इतर रोजगार नाही, म्हणून करताना पाहून चेतना सिन्हांना धक्काच बसला. 

यातच मदत मागायला आलेल्या कांतबाई साळुंकेने चेतनाताईंच्या मनात एक नवीन विचार रुजवला.

कांताबाई साळुंकेंचा धंदा शेतीसाठीची लोखंडी अवजारं तयार करण्याचा. रस्त्याच्या कडेलाच पाल ठोकून कुटुंबाचा मुक्काम...

कुटुंबात 6 मुली, 5 मुलगे आणि दारुडा नवरा. बाजूला काढून ठेवलेला पैसा घरात टिकत नव्हता, म्हणून कांताबाईंना बँकेत खातं काढायचं होतं.

चेतना सिन्हा कांताबाईंना घेऊन बँकेत गेल्या. पण म्हसवडमध्ये तेव्हा असलेल्या दोन्ही बँकांनी कांताबाईंचं खातं घ्यायला नकार दिला.

कारण कांताबाईंना 5 आणि 10 रुपये भरत पैसे साठवायचे होते, आणि हे खातं आम्हाला परवडणार नाही, असं बँकांचं म्हणणं होतं.

इथेच पहिल्यांदा चेतना सिन्हांच्या मनात बँक सुरू करण्याचा विचार आला. 

त्या सांगतात, "मला वाटलं हे माझं काम आहे. या खेड्यातल्या महिलांना बचतीची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. त्या सरकारी योजना किंवा मदत मागत नाहीत. त्यांना त्यांचा पैसा सुरक्षित ठेवायला बँक खातं हवंय. त्यासाठी त्यांची बँक का सुरू करू नये? आणि मी रिझर्व्ह बँकेत गेले."

फेटाळलेला अर्ज आणि प्रौढ साक्षरता मोहीम

महिलांची बँक सुरू करण्यासाठी चेतना सिन्हांनी केलेला पहिला अर्ज रिझर्व्ह बँकेने फेटाळला. कारण बँकेच्या प्रमोटर असणाऱ्या महिला निरक्षर होत्या. प्रमोटर्सच्या सह्या असतात तिथे या महिलांच्या अंगठ्याचे ठसे होते.

निराश झालेल्या चेतना सिन्हा म्हसवडला परतल्या. अर्ज का फेटाळला गेला याचं कारण त्यांनी महिलांना सांगितलं आणि गावतल्या महिलांनी त्यावर लगेच तोडगा काढला. 

चेतना सिन्हा म्हणतात, "या महिला मला म्हणाल्या तू का रडतेस? आम्ही लिहायला - वाचायला शिकू आणि आपण पुन्हा अर्ज करू. आम्ही लगेच गावागावांत प्रौढ साक्षरता वर्ग सुरू केले. दिवसभर शेतात - घरात - दगड फोडण्याचं काम करूनही संध्याकाळी या बायका उत्साहाने शिकायला यायच्या. मी आणि माझी सहकारी रुख्साना, आम्ही दोघी एका गावातून दुसऱ्या गावात जायचो."

बँकेसाठीचं सुरुवातीचं भागभांडवल उभं करण्यासाठीदेखील असाच गावातल्या महिलांनी पुढाकार घेतला. मजुरी करणाऱ्या बायकांनी 500 रुपये भरत बँकेचे शेअर्स घेतले.

बँकिंग लायसन्ससाठी पुन्हा अर्ज करण्यात आला, तेव्हा चेतना सिन्हा एकट्या गेल्या नाहीत. त्यांच्यासोबत म्हसवड आणि परिसरातल्या गावांतल्या 15 महिला होत्या. 

"या महिला अधिकाऱ्यांना म्हणाल्या, आम्हाला लिहीता - वाचता येत नाही, पण मोजता येतं. तुम्ही आम्हाला कोणत्याही रकमेवरचं व्याज मोजायला सांगा. आणि त्याचवेळी तुमच्या अधिकाऱ्यांनाही हेच गणित कॅलक्युलेटरशिवाय करायला सांगा. पाहू कोण जिंकतं..." चेतना सिन्हा सांगतात. 

बँकेला लायसन्स मिळालं आणि कामकाजाला सुरुवात झाली.

या बँकेत महिला आणि पुरुष दोघांनाही खातं काढता येतं, पण कर्ज फक्त महिलांनाच काढता येतं.

उत्पन्न मिळवून देणारं कर्ज

बँकेकडून कर्ज घेताना ते शक्यतो अशा गोष्टींसाठी घ्या, ज्यातून उत्पन्न निर्माण होईल, पैसा मिळेल असा विचार बँकेने महिलांमध्ये रुजवला. आ

ज या भागातल्या अनेक महिलांनी कर्ज काढून स्वतःच्या नावावर शेतजमीन घेतली, गाय - म्हैस - बकऱ्या - कोंबड्यांचं पालन सुरू केलं. कुणी मंडईत भाजी विकायचा व्यवसाय सुरू केला, तर कुणी स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू केला.

बनगरवाडीच्या नकुसा दोलताडेंचं बालपण हलाखीत गेलं. पाचवी मुलगी जन्मली म्हणून आईवडिलांनी नाव ठेवलं - नकुसा. गरिबीमुळे बहिणींना भूक भागवण्यासाठी भाकरी मागून आणावी लागे.

पण लग्नानंतर नकुसा दोलताडेंनी नवऱ्याच्या सोबतीने संसार उभा केला. बँकेकडून पहिलं कर्ज घेऊन त्यांनी खासगी कर्ज फेडलं.

मग पुढे लहान - मोठी कर्जं घेत आणि फेडत आणि त्यांच्या नावावर साडेतीन एकर जमीन आहे. घरही त्या आणि नवरा अशा दोघांच्या नावावर आहे.

काही दिवस त्यांनी बचतगट चालवला, फेडरेशनच्या संचालक झाल्या, माण देशी बँकेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने म्हसवडबाहेर फिरूनही आल्या.

लेकी, सुनांनी घरी बसून न राहता घराबाहेर पडून काहीतरी करावं, असं त्यांना वाटतं. नातीलाही चांगलं शिकवणार असल्याचं त्या सांगतात. 

त्या म्हणतात, "मी कष्ट केले, त्याचं फळ मला मिळालं. माझी सुधारणा झाली. असं केलं तर काही होतं, तसं केलं तर काय होतं... बाहेर फिरल्यावर काय होतं आणि निव्वळ घरात राहिलं तर काय होतं, हे कळलं."

मुलाकडून आता स्कुटी चालवायला शिकून घेणार असल्याचं नकुसा दोलताडे सांगतात.

सावकार आणि चिटफंडचा विळखा

बँकेच्या आधी आपण सावकाराकडून कर्ज घेत असल्याचं बहुतांश महिलांनी सांगितलं. बँकेकडून सावकारापेक्षा कमी दरात कर्ज मिळू शकतं हे समजल्यावर बहुतांश महिला या पर्यायाकडे वळल्या.

घरातून पाठिंबा मिळाला नाही तर एकमेकींसाठी गॅरेंटर राहण्याचा, ग्रुप लोनचा पर्यायही बँकेने महिलांना दिला आहे.

बँकेत केलेली बचत आणि गुंतवणूक सुरक्षित हा विचारही महिलांच्या मनात पक्का बसलाय.

सुनंदा फडतरे म्हसवडच्या मंडईत भाजीपाला विकतात. माल घेण्यासाठी पूर्वी त्या सावकाराकडून पैसे घ्यायच्या. पण त्या व्याजाचा बोजा व्हायला लागला आणि त्या बँकेकडे वळल्या.

चिटफंड योजनेच्या आमिषांना भुलून त्यांनी त्यात पैसे गुंतवले, आणि गमावले. यातून मोठा धडा घेतल्याचं त्या सांगतात.

"लई पैसे गेले माझे...आता नाही बाबा. आता बँकेतच असतात माझे पैसे..." सुनंदाताईंचा एक नातू आठवीला तर दुसरा दहावीला आहे.

दोन्ही मुलांसाठी त्यांनी बँकेच्या विविध योजनांमध्ये पैसे गुंतवले आहेत. सुनेच्या आणि स्वतःच्या भविष्यासाठीही त्यांनी ठेवी केल्या आहे.

बँकेने त्यांना एकीकडे आर्थिक स्थैर्य दिलंच, पण म्हसवडबाहेरचं जगही दाखवलं.

कौन बनेगा करोडपतीच्या एका भागात चेतना सिन्हांना आमंत्रित करण्यात आलं तेव्हा त्यांच्यासोबत माण देशी बँकेच्या महिलांनाही आमंत्रण होतं.

मुंबईत ओबेरॉय हॉटेलमधला मुक्काम आणि अमिताभ बच्चन यांची भेट याबद्दल सुनंदा फडतरे एकदम खुशीत सांगतात,

"बच्चनला भेटून आलो की.... केबीसीमध्ये सेल्फी काढली, हातात हात दिला..."

दिल्लीची वारी, पहिल्यांदाच विमानातून केलेला प्रवास हा अनुभवही त्यांना बँकेमुळेच मिळाला.

आता अमेरिकेला जाण्याचं आपलं स्वप्न असल्याचं सुनंदा फडतरे सांगतात.

डिजीटल व्यवहार, डोअरस्टेप बँकिंग

ग्रामीण दुर्गम, दुष्काळी भागातल्या महिलांना बँकेशी जोडायचं असेल तर या सेवा त्यांच्यापर्यंत, त्यांच्या दारात पोहोचवणं गरजेचं असल्याचं माण देशी बँकेने हेरलंय.

महिलांना त्यांच्या गावात - शेतावर जाऊन सेवा देण्यासाठी बँकेने - बँकिंग करस्पाँडंट्सची नेमणूक केली आहे.

या बँक सखी वस्त्यांवर जाऊन कागदपत्रं भरून घेणं, ठेवी वा कर्जाचे हप्ते स्वीकारणं हे काम करतातच, पण आता बँकेने मायक्रो ATM सेवाही सुरू केलीय. म्हणजे काय, तर ग्राहक या बँक सखींकडून तिथल्या तिथे ठराविक रक्कम बँकेतून काढू शकतात. या व्यवहाराचा त्यांना लगेच SMS अलर्टही मिळतो.

रुपाली शिंदेचा चामड्याच्या पारंपरिक वाद्यांचा व्यवसाय आहे. घरामध्ये चामड्याचा व्यवसाय होताच. त्यातून प्रेरणा घेत त्यांनी ढोलकी, डमरू, डफ यांसारखी वाद्यं तयार करायला सुरुवात केली.

पण हा व्यवसाय करताना एकदा फसवणूक झाली, आणि रुपाली शिंदेनी मोठा धडा घेतला. केलेल्या व्यवहाराची कोणतीच पावती वा नोंद नसल्याने रुपाली शिंदेचे पैसे बुडले.

तेव्हापासून त्या डिजीटल व्यवहारांकडे वळल्या. हे व्यवहार करणं किती सोयीचं आहे हे लॉकडाऊनच्या काळात प्रकर्षाने लक्षात आलं. मग त्यांनी बँकेसाठीही ही साक्षरता निर्माण करण्याच्या मोहीमेत पुढाकार घेतला.

बँकेची व्हॅन गावागावांत जाते आणि महिलांना आर्थिक साक्षरतेचे धडे देते. ATM मधून पैसे कसे काढायचे, PIN ची गोपनीयता, UPI चा वापर या सगळ्यांबाबतचं प्रशिक्षण महिलांना देण्यात येतं.

डिजीटल जगातली आव्हानं

जगातली पहिली महिला डिजीटल बँक होण्याचं माण देशी महिला बँकेचं स्वप्न आहे. पण या मार्गात अडचणी आणि आव्हानंही आहेत. मुख्य आव्हान आहे ग्रामीण ग्राहकाच्या अडचणींवर टेक्नॉलॉजीतून उत्तरं शोधण्याचं.

चेतना सिन्हा म्हणतात, "टेक्नॉलॉजी शहरांकडे आहे आणि इथल्या ग्रामीण भागांतल्या लोकांना काय हवंय ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणं कठीण आहे. म्हणजे आज ऑनलाईन व्यवहार केल्यानंतर SMS येतो. पण आमच्या महिलांचं म्हणणं आहे की Voice SMS यायला हवा. म्हणजे काय व्यवहार झाला हे ऐकता आलं पाहिजे, कारण त्यांना वाचता येत नाही.

अशा गोष्टी लक्षात घेऊन त्यानुसार सोल्यूशन्स तयार करायला हवीत. दुसरी गोष्ट म्हणजे आता अशा उद्दिष्टांनी सुरू झालेल्या बँकेत सोशल इन्व्हेस्टमेंट यायला हवी. म्हणजे असे गुंतवणूकदार यायला हवेत जे सामाजिक बदल घडवण्यासाठी पैसे गुंतवतील.

"ग्रामीण भागांतल्या महिलांमध्ये खूप नॉलेज आहे. हे ज्ञान जगापर्यंत पोहोचवणारी युनिव्हर्सिटी इथे व्हायला हवी. जी सांगेल की इथल्या महिलांनी बँकेचं स्वप्न पाहिलं, ते साकार केलं आणि ती बँक आज उभी आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)