You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आशिया कपमधील दोन दशकांचा विजयरथ भारतीय महिला क्रिकेट टीम कायम ठेवेल?
- Author, संजय किशोर
- Role, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार
तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण गेल्या 20 वर्षांपासून भारतीय महिला क्रिकेट संघाचा आशिया कपवर दबदबा राहिला आहे. या विक्रमामुळे पुरुष संघालाही त्यांचा हेवा वाटेल.
आज रविवारी (28 जुलै) हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली आठव्यांदा आशिया कप जिंकण्यासाठी भारतीय महिला संघ सज्ज झालीय.
एकदिवसीय आणि T-20 असे दोन्ही फॉरमॅट एकत्र केले तर हा नववा महिला आशिया कप आहे.
पहिले चार महिला आशिया कप एकदिवसीय स्वरूपात खेळले गेले, तर 2012 पासून स्पर्धेचे स्वरूप बदलून टी-20 असे करण्यात आले.
विशेष म्हणजे प्रत्येक वेळी भारतीय महिला टीम अंतिम फेरीत पोहोचली आहे.
फक्त 2018 मध्येच भारतीय महिलांना विजेतेपद पटकावता आलं नाही. त्यावेळी बांगलादेशच्या महिला टीमने बाजी मारली होती.
2022 मध्ये झालेल्या शेवटच्या टी-20 आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा 8 विकेट्सच्या मोठ्या फरकाने दारूण पराभव केला होता.
यंदाही अंतिम सामना श्रीलंका विरुद्ध भारत असा होणार आहे.
श्रीलंकेची टीम मागच्या पराभवाचा बदला घेऊन पहिले विजेतेपद पटकावू शकेल का, हे आता पाहावं लागणार आहे.
पण एकूण भारतीय महिलांचा परफॉर्मन्स पाहता श्रीलंका त्यांना हरवू शकेल असं वाटत नाही.
भारतीय टीमची यंदाही दमदार कामगिरी
यंदाच्या आशिया कप स्पर्धेत भारताने दमदार कामगिरी केली. महिला संघाने जवळजवळ एकतर्फी विजय मिळवले आहेत.
भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी सलग चार सामने जिंकून अंतिम फेरी गाठली आहे.
श्रीलंकेची कॅप्टन चमारी अथापट्टूच्या जबरदस्त कामगिरीमुळे श्रीलंकेचा संघही फायनलमध्ये पोहोचला आहे. पण यजमान संघाचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास सोपा राहिलेला नाही.
सेमीफायनलमध्ये भारताने बांगलादेशचा 54 बॉलमध्ये 10 विकेट राखून पराभव केला.
वेगवान गोलंदाज रेणुका सिंग आणि फिरकीपटू राधा यादवने प्रत्येकी तीन बळी घेतले.
स्मृती मंधाना 55 रन्स करून नाबाद राहिली आणि शफाली वर्मा 26 रन्स करून नाबाद राहिली.
पाकिस्तानने सेमीफायनलमध्ये श्रीलंकेला कडवी झुंज दिली. पाकिस्तानच्या 140 रन्सचा पाठलाग करण्यात पाकिस्तान संघ अपयशी ठरला आणि श्रीलंकेने एक चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. याआधी भारताने पाकिस्तानचा सात गडी राखून पराभव केला होता.
तर UAE संघाचा भारताने 78 रन्सने पराभव केला. नेपाळवरही 82 रन्सनी विजय मिळवला. तर बांगलादेशचा 10 विकेट राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
यजमान श्रीलंकेचा संघही अपराजित असूनही फायनलमध्ये त्यांची भारतासोबत टक्कर होणार आहे.
पहिल्या फळीची मजबूत कामगिरी
भारताच्या पहिल्या फळीतील फलंदाज आणि गोलंदाजांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने कोणत्याही संघाला वर्चस्व गाजवू दिलेलं नाही.
आशिया कपमध्ये सलामीवीर स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा यांनी 140 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 100 हून अधिक धावा केल्या आहेत.
तसंच, या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये त्या श्रीलंकेच्या कर्णधारानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
आशिया कपच्याआधी दक्षिण आफ्रिकेसोबतच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत मंधानाने दोन शतके आणि एका अर्धशतकासह 103 च्या स्ट्राइक रेटने 343 धावा केल्या. कसोटीतही शतक झळकावले.
आशिया कपमध्येही तिचा फॉर्म कायम आहे. तिने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 45 धावांची आणि बांगलादेशविरुद्धच्या उपांत्य फेरीत 55 धावांची नाबाद खेळी खेळली आहे.
तिने आतापर्यंत चार सामन्यांत 143 च्या स्ट्राईक रेटने 113 धावा केल्या आहेत.
भारतीय टीमच्या पहिल्या फळीतील फलंदाजांनी उत्तम कामगिरी दाखवल्याने इतर फलंदाजांवरील दडपण कमी झाले आहे.
स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा या दोघी मैदानात जास्तवेळ टिकल्याने कॅप्टन हरमनप्रीत कौर आणि जेमिमाह रॉड्रिग्जला फलंदाजीसाठी कमी वेळा यावं लागलं.
हरमनप्रीतला तीनपैकी दोन सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली आहे.
गोलंदाजीतही शानदार प्रदर्शन
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दीप्ती शर्मा आणि रेणुका सिंग यांनी आपल्या गोलंदाजीने प्रत्येक आव्हानाचा यशस्वीपणे सामना केला आहे.
दीप्तीने टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक नऊ विकेट घेतल्या आहेत. तर रेणुका सिंग सात विकेट्ससह सर्वात यशस्वी गोलंदाजांमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे.
फिरकी गोलंदाज राधिका यादवच्या चेंडूवर फलंदाज मोठे फटके मारतात आणि विकेट गमावतात. राधिकाने या टूर्नामेंटमध्ये सहा विकेट घेतल्या आहेत.
श्रीलंकेची कॅप्टन अथापट्टूची विकेट महत्त्वाची
श्रीलंकेची कॅप्टन चामारी अथापट्टूने तिच्या वैयक्तिक कामगिरीने संघाच्या विजयाची पटकथा लिहिली आहे.
अथापट्टूने 148.17 च्या स्ट्राइक रेटने स्पर्धेत सर्वाधिक 243 धावा केल्या आहेत.
तिने आतापर्यंत एक शतक, एक अर्धशतक आणि 49 धावांची एक नाबाद खेळी खेळली आहे.
मात्र, तिच्याशिवाय श्रींलकेच्या टीममध्ये अन्य कोणत्याही फलंदाजाला 100 धावा करता आल्या नाहीत.
दुसऱ्या स्थानावर रश्मी गुणरत्ने आहे. तिने 91 धावा केल्या आहेत.
श्रीलंकेच्या गोलंदाजीतही तीच परिस्थिती आहे. ऑफस्पिनर कविशा दिलहरीने सात विकेट्स घेतल्या आहेत, तर उर्वरित गोलंदाजांची कामगिरी निराशाजनक आहे.
कशी असेल भारत-श्रीलंकेची लढत?
दोन्ही संघांमधील विक्रमांचा विचार करता भारताने 24 पैकी 19 सामने जिंकले आहेत, तर श्रीलंकेने केवळ चारवेळा विजय मिळवला आहे. एक सामना रद्द करावा लागला.
आशिया कपमध्ये दोन्ही संघांमध्ये चार वेळा सामना झाला असून प्रत्येक वेळी टीम इंडियाने बाजी मारली आहे.
आशिया कपपूर्वी श्रीलंकेचा घरच्या मैदानावर तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत वेस्ट इंडिजकडून 2-1 असा पराभव झाला होता.
त्याआधी मार्चमध्ये श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेचा 2-1 असा पराभव केला होता. टी-20 पात्रता फेरीतील सहा सामने जिंकून श्रीलंकेने ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विश्वचषकात स्थान पक्के केले आहे.
भारतीय संघाने जानेवारीत तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाचा 2-1 ने पराभव केला होता.
बांगलादेशचा 5-0 ने पराभव झाला आणि दक्षिण आफ्रिकेसोबतची टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली.
श्रीलंकेची अथापट्टू विरूद्ध भारताची दीप्ती
श्रीलंकेची कॅप्टन आणि सलामीची फलंदाज चामारी अथापट्टू भारताविरुद्ध तिचा फॉर्म कायम राखून तिचे पहिले आशिया कप विजेतेपद जिंकण्याच्या तयारीत आहे.
तर दुसरीकडे आतापर्यंत नऊ विकेट घेतलेल्या भारताच्या दीप्ती शर्मासमोर अथापट्टूला लवकर बाद करण्याचे सर्वात मोठे आव्हान असेल.
अथापट्टू याआधी चार सामन्यांत केवळ दोन वेळा बाद झाली आहे. तर उर्वरित दोन सामन्यांत ती नाबाद राहिलीय.
सेमीफायनल फेरीत पाकिस्तानच्या सादिया इक्बालने तिची विकेट घेतली. याआधी तर बांगलादेशच्या नाहिदा अख्तरने तिची विकेट घेतली.
या स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या 24 सामन्यांपैकी दुसऱ्या डावात पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या संघाने नऊ सामने जिंकले आहेत.
त्यामुळे नाणेफेकीची भूमिका आताही महत्त्वाची राहू शकते.
आशिया कपचा इतिहास
पहिला महिला आशिया कप 2004 मध्ये खेळला गेला. त्यावेळी या स्पर्धेत फक्त भारत आणि श्रीलंकेचे संघ सहभागी झाले होते. भारताने ही पाच सामन्यांची स्पर्धा 5-0 अशी जिंकली होती.
यानंतर भारताने सलग तीन वेळा (2005, 2006, 2008) श्रीलंकेचा पराभव करून एकदिवसीय आशिया चषक विजेतेपद पटकावले.
2012 पासून महिला आशिया चषक T- 20 फॉरमॅटमध्ये खेळवला जाऊ लागला.
भारताने वनडे फॉरमॅटमधील चारही आशिया कप जिंकले. तर आपल्या संघाने चारपैकी तीन T-20 स्पर्धा जिंकल्या आहेत.
2018 मध्ये भारतीय संघ बांगलादेशकडून फायनलमध्ये पराभूत झाला होता.