'विवस्त्र केलं, लैंगिक अत्याचार केला अन् इलेक्ट्रिक शॉक दिला'; इस्रायलच्या कोठडीत पॅलेस्टिनींच्या छळाचे गंभीर आरोप

- Author, ॲलिस कडी
- Role, बीबीसी न्यूज
(सूचना : या लेखातील काही वर्णन तुम्हाला विचलित करू शकतात.)
इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील संघर्षाचा फटका दोन्ही देशातील नागरिकांना बसत आहे.
इस्रायलच्या तुरुंगातून बाहेर आल्यानंतर गाझामध्ये आलेल्या पॅलेस्टिनी कैद्यांनी बीबीसीला त्यांच्यावर ओढावलेल्या दुर्दैवी प्रसंगाची माहिती दिली. इस्रायली लष्कर आणि तुरुंगातील अधिकाऱ्यांनी आम्हाला वाईट वागणूक तर दिलीच, पण आमचा अतोनात छळही केल्याचं या कैद्यांनी सांगितलं.
कैद्यांच्या या खुलाशामुळं इस्रायली तुरुंगात आणि लष्करी बराकमध्ये पॅलेस्टिनींना अमानवी वागणूक दिली जात असल्याच्या आरोपांना आणखी बळ मिळालं आहे.
36 वर्षीय मोहम्मद अबू तविला हे एक मेकॅनिक आहेत. त्यांच्या अंगावर केमिकल टाकून त्यांना पेटवण्यात आलं. ही आग विझविण्यासाठी अबू तविला अक्षरशः तडफडत होते.
इस्रायलवर हमासने मोठा हल्ला केला होता. तेव्हा गाझामध्ये अटक करण्यात आलेल्या पाच पॅलेस्टिनींच्या बीबीसीने दीर्घ मुलाखती घेतल्या आहेत. त्या हल्ल्यात 1200 इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला होता आणि 251 जणांना ओलीस ठेवण्यात आलं होतं.
काय म्हणाले कैदी?
या कैद्यांना इस्रायलच्या एका वादग्रस्त कायद्यानुसार कोणत्याही खटल्याशिवाय तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. हा कायदा इस्रायलच्या सुरक्षेसाठी धोका मानल्या जाणाऱ्यांना लागू होतो.
कैद्यांनी सांगितलं की, त्यांच्यावर हमासशी संबंध असल्याचा आरोप करत इस्रायली ओलीस आणि गाझामधील गुप्त भुयारांबद्दल त्यांना माहिती विचारली. परंतु इस्रायली अधिकाऱ्यांना त्यांच्याविरोधात कोणतेही पुरावे मिळाले नाहीत.
यामुळंच हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धविराम करारानुसार त्यांची सुटका करण्यात आली.
या करारांतर्गत सुटका करण्यात आलेले काही लोक इस्रायली नागरिकांच्या हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगत होते. परंतु, बीबीसीला मुलाखती देणाऱ्या कैद्यांवर असे कोणतेही आरोप नव्हते.
या संदर्भात आम्ही इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) आणि इस्रायली जेल सर्व्हिस (आयपीएस) यांना देखील विचारलं की, या लोकांविरुद्ध काही खटले होते का, परंतु आम्हाला त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
कैद्यांच्या जबाबांनुसार, त्यांना विवस्त्र करुन, डोळ्यांवर पट्टी आणि हात बांधून मारहाण करण्यात येत असत.
काहींनी सांगितलं की, त्यांना विजेचे झटके देण्यात आले, कुत्र्यांसमोर उभे करुन घाबरवलं गेलं, त्यांना वैद्यकीय उपचार नाकारले. काहींनी तर त्यांच्यासमोर इतर कैद्यांचा मृत्यूही पाहिला आहे.
एका कैद्यानं तर त्याच्यासमोर दुसऱ्या कैद्यावर लैंगिक अत्याचार होताना पाहिल्याचं सांगितलं.
बीबीसीने इस्रायली सैन्य दलाला कैद्यांच्या आरोपांबद्दल विचारलं असता, त्यांनी 'आम्ही कैद्यांच्या संघटित छळाचे आरोप पूर्णपणे नाकारतो' असं उत्तर दिलं.
बीबीसीने उल्लेख केलेल्या प्रकरणांची संबंधित अधिकाऱ्यांकडून चौकशी करणार असल्याचं लष्करानं म्हटलं आहे.
"इतर आरोपांमध्ये कैद्यांची ओळख पटलेली नाही किंवा त्यांच्याकडे कोणतीही ठोस माहिती नाही. त्यामुळं त्यांची चौकशी करणं शक्य नाही," असं लष्करानं म्हटलं आहे.
लष्करानं असंही म्हटलं आहे की, इस्रायल संरक्षण दल आपल्या मूल्यांच्या विरुद्ध असलेल्या अशा बाबी अतिशय गांभीर्याने घेतं. कैद्यांना अन्यायकारक वागणूक किंवा गैरसोय होत असल्याच्या तक्रारी संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवून योग्य ती कारवाई केली जाते.
दुसरीकडे, कोठडीत असलेल्या कोणत्याही कैद्यासोबत गैरवर्तन केले जात असल्याची माहिती नाही, असं इस्रायली जेल सर्व्हिसनं (आयपीएस) म्हटलं आहे.
कैद्यांनी वर्णन केलेल्या परिस्थितीवरुन लक्षात येतं की, हे आंतरराष्ट्रीय आणि इस्रायली दोन्ही कायद्यांचं पूर्णपणे उल्लंघन आहे, असं ब्रिटनच्या ब्रिस्टल विद्यापीठाशी संबंधित डॉ. लॉरेन्स हिल कॉथॉर्न म्हणाले.
अटकेनंतरच सुरू झाला होता हिंसाचार
बीबीसीने मुलाखत घेतलेल्या पाच पॅलेस्टिनी कैद्यांना या वर्षाच्या सुरुवातीला युद्धविराम करारानुसार इस्रायली तुरुंगातून सोडण्यात आलं होतं.
हे पाच लोक सुमारे 1,900 पॅलेस्टिनी कैदी आणि बंदिवानांमध्ये सामील होते ज्यांना 33 इस्रायली ओलिसांच्या बदल्यात सोडण्यात आलं होतं.
सुटका करण्यात आलेल्या इस्रायली नागरिकांपैकी 25 जिवंत होते, तर आठ जणांचा मृत्यू झाला होता.
हमासच्या बंदिवासात असताना आमचा छळ करण्यात आला, उपासमार करण्यात आली आणि धमकावण्यात आलं, असा दावा मुक्त झालेल्या इस्रायलींनी केला.
इस्रायलमधून सुटका झालेल्या पाच पॅलेस्टिनींनी अशाच परिस्थितीचं वर्णन केलं. त्यांनी सांगितलं की, त्यांना गाझा येथून अटक करुन इस्रायलला नेण्यात आलं. जिथं सुरुवातीला त्यांना लष्करी बराकमध्ये ठेवण्यात आलं. नंतर तुरुंगात नेण्यात आलं आणि अनेक महिन्यांनंतर त्यांना गाझाला परत पाठवण्यात आलं.
इतर कैद्यांनीही त्यांना मारहाण करणं, उपाशी ठेवणं, आजारी पडल्यावर औषधं न देण्यासारख्या गोष्टी सांगितल्या.
जुलै 2024 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या अहवालात असं म्हटलं आहे की, पॅलेस्टिनी कैद्यांना विवस्त्र करण्यात आलं, अन्न आणि पाणी दिलं नाही, झोपू देण्यात आलं नाही, विजेचे झटके देण्यात आले, सिगारेटने चटके देण्यात आले आणि त्यांच्यावर कुत्रे सोडण्यात आले.
गेल्या महिन्यात, संयुक्त राष्ट्रांच्या तज्ज्ञांच्या आणखी एका अहवालात लैंगिक छळ आणि बलात्काराच्या घटनांवर चर्चा करण्यात आली होती. इस्रायली सैन्याकडून लैंगिक हिंसाचार किंवा लैंगिक हिंसाचाराची धमकी देणं ही 'सामान्य वृत्ती' बनली आहे, असं या अहवालात म्हटलं आहे.
इस्रायलने हे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावत त्यांना 'निराधार' ठरवलं होतं.
इस्रायल परदेशी पत्रकारांना गाझाला स्वतंत्रपणे भेट देऊ देत नाही, म्हणून बीबीसीने फोन, मेसेज आणि स्थानिक पत्रकारांच्या मदतीने कैद्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत.
या पाच जणांनी सांगितलं की, अटकेच्या वेळीच त्यांच्यावर हिंसाचार सुरू झाला होता. त्यांना विवस्त्र करून, डोळ्यांवर पट्टी बांधून मारहाण करण्यात आली.
'आग विझविण्यासाठी मी अक्षरशः तडफडत होतो'
(सूचना: खालील छायाचित्र वाचकांचे लक्ष विचलित करु शकते.)
अनेक दिवस माझा छळ करण्यात आल्याचे मोहम्मद अबू तविलांनी सांगितलं.
त्यांनी सांगितलं की, मार्च 2024 मध्ये माझ्या अटकेनंतर इस्रायली सैनिकांनी मला जवळच्या इमारतीत नेलं, जेथे मला तीन दिवस एकटं ठेवलं होतं. मला सतत सैनिकांच्या चौकशी आणि हिंसेचा सामना करावा लागला.
तविला म्हणाले, "एकदा सैनिकांनी एका भांड्यात साफसफाईसाठी वापरलेलं रसायन मिसळलं आणि माझ्या डोक्यावर ओतलं.
यानंतर मला ठोसे मारले, त्यामुळं मी खाली पडलो आणि माझ्या डोळ्याला दुखापत झाली.
इस्रायली सैनिकांनी माझ्या जखमी डोळ्यावर कापड बांधलं, ज्यामुळं वेदना आणखी वाढल्या. सैनिकांनी माझं शरीरही पेटवलं.

"मला जाळण्यासाठी त्यांनी माझ्या कंबरेवर सुगंधी स्प्रे आणि लायटरचा वापर केला. आग विझविण्यासाठी मी एखाद्या प्राण्यासारखा धडपडत होतो. त्यानंतर त्यांनी मला वारंवार बंदुकीचे बट आणि लाकडी दांडक्यानं मारलं आणि वारंवार माझ्या शरीराला ते टोचवत होते."
"ते माझ्या डोक्यावर अॅसिड ओतायचे आणि जेव्हा मी खुर्चीवर बसत तेव्हा हे अॅसिड माझ्या संपूर्ण शरीरावर वाहायचं."
तविला म्हणतात की, शेवटी सैनिकांनी माझ्या अंगावर पाणी ओतलं आणि नंतर मला इस्रायलला नेलं जिथे रुग्णालयात उपचार करण्यात आले. तेथे त्वचा प्रत्यारोपण करण्यात आली.
'पलंगावर विवस्त्र बांधलं, शौचालयाचीही सुविधा दिली नाही'
त्यांच्यावर बहुतेक उपचार इस्रायलच्या दक्षिणेकडील प्रदेशात बीर शबाजवळ असलेल्या 'सदी तीमान' नावाच्या लष्करी तळावरील फील्ड हॉस्पिटलमध्ये झाल्याचे अबू तविला यांनी सांगितले.
"मला विवस्त्र अवस्थेत पलंगावर बांधण्यात आलं होतं आणि शौचालयाची सुविधा न देता फक्त नॅपी घालण्यासाठी दिली", असं ते म्हणाले.
कैदी रुग्णांना साखळदंडांनी बांधणं आणि त्यांना नॅपी घालायला देणं ही सामान्य गोष्ट आहे, असं या रुग्णालयात काम करणाऱ्या इस्रायली डॉक्टरांनी यापूर्वीही बीबीसीला सांगितलं होतं.
तविलांनी सांगितलं की, शरीरातील काही भाग जळाल्याने होणाऱ्या वेदना इतक्या त्रासदायक होत्या की अचानक झोपेतून जाग यायची. बीबीसी अबू तविलांवरील हल्ल्याचा प्रत्यक्षदर्शी असलेल्या कोणत्याही व्यक्तीशी बोलू शकली नाही.

अबू तविलांच्या डोळ्यांवर केमिकलचा परिणाम दिसत होता. त्यामुळं त्यांच्या डोळ्याभोवतीच्या त्वचेचं मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्याचा दुजोरा एका नेत्ररोगतज्ज्ञांनी बीबीसीला दिला. गाझावरुन परतल्यावर याच डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली होती.
अबू तविलांची दृष्टी कमकुवत होत असल्याचं या डॉक्टरांनी सांगितलं.
बीबीसीने अबू तविलांच्या जखमांची छायाचित्रं आणि मुलाखतीत त्यांनी दिलेली माहिती अनेक ब्रिटिश डॉक्टरांना शेअर केली. त्यांनी जखम आणि लक्षणं अबू तविलांनी सांगितलेल्या माहितीशी जुळते, असं म्हटलं.
परंतु, केवळ छायाचित्रं पाहून या दुखापतींची कारणं स्पष्ट करता येणार नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
आयडीएफनं अबू तविलांच्या आरोपांना थेट प्रतिसाद दिला नाही. फक्त एवढंच सांगितलं की, त्यांच्या मूल्यांच्या विरोधात जाणारे कोणतेही प्रकरण ते गांभीर्याने घेतात.
अहमद अबू सैफ: 'तुम्ही आमच्या मुलांसोबत जे केलं ते आम्ही तुमच्या मुलांबरोबर करणार'
बीबीसीने संवाद साधलेल्या दुसऱ्या पॅलेस्टिनीनेही अटकेच्या वेळी त्याच्यासोबतच्या वाईट वागणुकीची माहिती दिली.
अब्दुल करीम मुश्ताहा हे 33 वर्षांचे असून ते पोल्ट्री फार्ममध्ये काम करतात. ते म्हणाले, "इस्रायली सैनिकांनी आम्हाला बेड्या घातल्या आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. मला पाण्याचा एक घोटही दिला नाही."
त्यांनी सांगितलं की, नोव्हेंबर 2023 मध्ये, जेव्हा ते इस्रायलच्या आदेशानुसार आपल्या कुटुंबासह परिसर सोडून जात होते, तेव्हा त्यांना चेक पोस्टवर अटक करण्यात आली.
तुरुंगात मुश्ताहा यांना भेटलेल्या एका वकिलानं आपल्या अहवालात लिहिलं, 'तुरुंगात पाठवण्यापूर्वी अब्दुल करीम मुश्ताहा यांना मारहाण करण्यात आली आणि विवस्त्र करून अपमानित करण्यात आलं.'
दोन कैद्यांनी सांगितलं की, त्यांना थंडीत तासंतास बाहेर उभं केलं. इतर दोन कैद्यांनी सांगितलं की, इस्रायली सैनिकांनी त्यांचे पैसे आणि सर्व सामान हिसकावून घेतले.

लष्कराने या आरोपांना आपल्या 'कायदा आणि मूल्यांच्या विरुद्ध' म्हटलं. घटनेची अधिक माहिती मिळताच तपास करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं.
अब्दुल करीम मुश्ताहासह सर्व कैद्यांनी सांगितलं की, त्यांना इस्रायली लष्करी छावणी 'सदी तीमान' येथे नेण्यात आलं. जिथे अबू तविला यांच्यावरही एका फील्ड हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.
एका कैद्याने सुरक्षेच्या भीतीने आपलं नाव प्रसिद्ध न करण्यास सांगितलं. त्यामुळं आम्ही त्याचं नाव उमर ठेवलं आहे.
त्या लष्करी छावणीत नेत असतानाही इस्रायली सैनिकांनी वाईट वागणूक दिल्याचे उमरनं सांगितलं.
तो म्हणाला की, इस्रायली सैनिक माझ्यावर आणि इतर कैद्यांवर थुंकले. त्यांनी आमच्याबद्दल अपशब्द वापरले आणि शिवीगाळही केली.
हमासचा नेता याह्या सिनवार याच्याबाबत इस्रायली लष्कराचा दावा आहे की, तो ऑक्टोबर 2014 च्या हल्ल्याचा सूत्रधार होता आणि पाच महिन्यांपूर्वी इस्रायलच्या कारवाईत तो मारला गेला.
"त्यांनी आम्हाला एक ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकवले, ज्यामध्ये आम्हाला सांगण्यात आलं की, 'तुम्ही (हमासनं) आमच्या मुलांसोबत जे केलं तेच आम्ही तुमच्या मुलांसोबत करू," असं उमर यांनी सांगितलं.
'आम्हाला बेड्या बांधून आमच्यावर कुत्रे सोडत'
आम्ही ज्या तीन लोकांशी बोललो त्यांनी आरोप केला की, कुत्र्यांचा वापर सदी तीमान आणि इतर डिटेंशन सेंटरमध्ये कैद्यांना धमकवण्यासाठी केला जात होता.
अबू तविला हे डिटेंशन बराकीमध्ये कैद होते आणि तेथे त्यांच्यावर उपचारही केले जात असत.
ते म्हणाले, "जेव्हा आम्हाला बराकमधून दवाखान्यात किंवा चौकशी कक्षात नेलं जात असे, तेव्हा आम्हाला मारहाण केली जायची. आम्हाला बेड्या बांधल्या जायच्या आणि आमच्यावर कुत्रे सोडले जायचे."
या आरोपांवर इस्रायली सैन्यानं उत्तर दिलं की, 'कैद्यांना इजा करण्यासाठी कुत्र्यांचा वापर प्रतिबंधित आहे.'
कैदेत ठेवण्यात आलेल्या लोकांमध्ये धोकादायक दहशतवादी असल्याचा दावाही इस्रायली लष्कराने केला होता.
"आम्हाला पहाटे पाच ते रात्री दहापर्यंत गुडघ्यावर बसावं लागत,", असं अबू तविला यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
आणखी एक कैदी हम्मादनं सांगितलं की, बराकमध्ये झालेल्या हाणामारीदरम्यान आमचे डोके, डोळे आणि कान यांना लक्ष्य केले जात.
हम्मादनं म्हटलं की, इस्रायली सैनिकांच्या हिंसाचारामुळे माझे कान आणि कंबरेला इजा झाली होती. माझ्या छातीच्या फासळ्यांनाही दुखापत झाली होती.
हम्मादच्या या आरोपांवर इस्रायली लष्करानं कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
'कुत्रे, लाठ्या आणि इलेक्ट्रिक गन'
मुश्ताहा म्हणाले, "प्रत्येक कैद्याला सांगण्यात येत की, तुम्ही दहशतवादी आहात. कैद्यांना 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यात भाग घेतल्याची कबुली देण्यास सांगण्यात येत. चौकशीदरम्यान त्यांच्यावर हमासशी संबंध असल्याचा आरोप करण्यात येत असत."
रात्रभर आमची चौकशी सुरू असत, असंही त्यांनी सांगितलं.

"आमचे हात बांधून कित्येक तास उलटं टांगत असत आणि या दरम्यान आम्ही विवस्त्र असत. आम्हाला थंडी वाजत आहे, असं जेव्हा आम्ही त्यांना म्हणत तेव्हा ते आमच्या अंगावर थंड पाण्याने भरलेली बादली टाकत आणि त्यावर पुन्हा पंखा चालू करत असत."
"आम्ही सूर्यही पाहू शकत नव्हतो, काहीही पाहू शकत नसत," असं उमरनं सांगितलं.
इस्रायली लष्कराचं म्हणणं आहे की, त्यांची स्वतःची 'निरीक्षण प्रक्रिया' आहे. ज्यात क्लोज-सर्किट कॅमेऱ्यांचा समावेश आहे. ही नजरबंदी केंद्रे इस्रायली लष्करी आदेश आणि कायद्यानुसार चालविली जातात की नाही हे या माध्यमातून निश्चित केले जाते.
'त्यांनी मुलांना विवस्त्र करत लाजीरवाणं कृत्य केलं'
केत्सियोत तुरुंगात कैद्यांचा लैंगिक छळ झाल्याचं पाहिल्याचं उमरनं सांगितलं.
उमरने बीबीसीला सांगितलं, "त्यांनी काही मुलांचे कपडे काढले आणि त्यांच्याबरोबर लाजीरवाणी कृत्यं केली. त्यांनी त्या मुलांना एकमेकांशी लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं. मी ते माझ्या डोळ्यांनी पाहिलं."
बीबीसीला या आरोपांबाबतचा दुसरा कोणताही अहवाल मिळालेला नाही.

फोटो स्रोत, Getty Images
पण इस्रायलच्या तुरुंगात पॅलेस्टिनींच्या स्थितीवर लक्ष ठेवणाऱ्या एका पॅलेस्टिनी संघटनेचं म्हणणं आहे की, 'या तुरुंगात कैद्यांचं लैंगिक शोषण होणं ही सामान्य बाब आहे.'
कैद्यांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांबाबत बीबीसीने इस्रायली जेल सर्व्हिसला माहिती दिली. लैंगिक छळाचे आरोप किंवा तुरुंगात कैद्यांना दिल्या जाणाऱ्या खराब वागणुकीबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचं त्यांनी उत्तर दिलं.
कारागृहातील प्रशिक्षित गार्ड्स मानवी हक्कांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतात, असा दावा त्यांनी केला.
ते म्हणाले, "तुम्ही केलेल्या आरोपांची आम्हाला माहिती नाही आणि आमच्याकडे असलेल्या माहितीनुसार असं कोणतंही काम झालेलं नाही."

मुश्ताहा म्हणाले की, त्यांचं डोके दरवाज्यावर धडकवलं गेलं, गुप्तांगालाही दुखापत करण्यात आली.
मुश्ताहा सांगतात, "ते आम्हाला विवस्त्र करून आमच्या संवेदनशील भागांवर मारायचे आणि आमची टर उडवायचे."
उमर म्हणाला की, जेव्हा कैदी वैद्यकीय उपचाराची मागणी करत तेव्हा त्यांच्यावर भयानक हिंसाचार केला जात असत.
अनेक कैद्यांनी सांगितलं की, त्यांच्या ताब्यात असताना खूप कमी अन्न आणि पाणी दिले जात असत.
मुश्ताहा म्हणाले, "तुरुंगात माझं अन्न अनेकदा पिंजऱ्यासारख्या भागाच्या बाहेर ठेवले जायचे. ते अन्न मांजर आणि पक्षी आधी खायचे आणि शेवटी मला ते खायला मिळत असत.''

इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेड क्रॉस (आयसीआरसी) तुरुंगातून परत आलेल्या कैद्यांची मुलाखत घेते. रेड क्रॉसच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सुटका झालेल्या लोकांच्या गोपनीयतेमुळे ते भाष्य करू शकत नाहीत.
आयसीआरसीनं बीबीसीला सांगितलं की, आम्ही कैद्यांबाबत खूप चिंतेत आहोत. आम्हाला सर्व डिटेंशन सेंटरमध्ये प्रवेश हवा आहे.
आयसीआरसीला 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर इस्रायली बंदी केंद्रांमध्ये प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











