'गाझामध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या हत्या प्रकरणात चूक झाली', इस्रायलच्या लष्कराची कबुली

वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला

फोटो स्रोत, Palestinian Red Crescent Society

    • Author, डॅन जॉन्सन
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

दक्षिण गाझामध्ये 23 मार्च रोजी 15 आपत्कालीन कर्मचाऱ्यांची हत्या झाली होती. या प्रकरणात इस्रायलच्या सैनिकांनी चूक केल्याचं इस्रायलच्या लष्करानं मान्य केलं आहे. त्याचवेळी यातील काही जण हमासबरोबर संलग्न असलेले होते, असा दावाही करण्यात आला आहे.

पॅलिस्टिनी रेड क्रेसेंट सोसायटी (पीआरसीएस) च्या रुग्णवाहिका, संयुक्त राष्ट्रांची एक कार आणि गाझाच्या सिव्हिल डिफेन्सच्या अग्निशमन विभागाचा ट्रक असलेल्या ताफ्यावर राफाजवळ हल्ला झाला होता.

इस्रायलने सुरुवातीला असं म्हटलं होतं की, अंधारात हेडलाईट्स किंवा फ्लॅशिंग लाईट्सशिवाय हा ताफा संशयास्पदपणे जवळ येत असल्याचं दिसल्यानं हल्ला केला होता.

तसंच वाहनांच्या हालचालींबाबत लष्कराला माहिती दिलेली नव्हती किंवा समन्वय साधलेला नव्हता, असा दावाही करण्यात आला आहे.

हल्ल्यात मृत्यू झालेल्या एका आपत्कालीन कर्मचाऱ्यानं या घटनेचा व्हीडिओ मोबाईलमध्ये चित्रित केला होता. त्या फुटेजमध्ये काही जखमींना मदत करण्यासाठी जाणाऱ्या या वाहनांचे लाईट सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

30 मार्च रोजी मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले.

फोटो स्रोत, Anadolu via Getty Images

फोटो कॅप्शन, पॅलिस्टिनी रेड क्रेसेंट सोसायटीच्या कर्मचाऱ्यांचे मृतदेह 30 मार्च रोजी रुग्णालयात आणण्यात आले. त्यावेळी सहकाऱ्यांना दुःख अनावर झाले.

हा व्हीडिओ न्यू यॉर्क टाईम्सने शेअर केलेला आहे. त्यात पहाटेच्या वेळी वाहने थांबल्यानंतर कोणत्याही प्रकारचा इशारा किंवा पूर्वसूचना न देता अचानक गोळीबार सुरू झाल्याचं दिसत आहे.

हे फुटेज जवळपास पाच मिनिटांचं आहे. त्यात इस्रायलच्या सैनिकांचे वाहनांकडे येत असल्याचे आवाज येत असताना रेफत रडवान नावाचा एक कर्मचारी अखेरची प्रार्थना करताना ऐकू येत आहे.

शनिवारी सायंकाळी इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) च्या एका अधिकाऱ्याने पत्रकारांशी बोलताना म्हटलं की, सैनिकांनी त्यापूर्वी हमासच्या तीन सदस्यांना घेऊन जाणाऱ्या एका कारवरही गोळीबार केला होता.

व्हीडिओ फुटेजमुळे समोर आले तथ्य

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

या घटनेनंतर ज्यावेळी त्याठिकाणी रुग्णवाहिका आल्या, तेव्हा हवाई देखरेखीखाली जमिनीवर असलेल्या सैनिकांना ताफा संशयास्पदपणे पुढे येत असल्याचं दिसल्याचं सांगण्यात आलं.

रुग्णवाहिका हमासच्या गाडीजवळ थांबल्या, तेव्हा सैनिकांनी धोका असल्याचं समजून गोळीबार केला. पण प्रत्यक्षात या आपत्कालीन पथकातील कोणताही सदस्य सशस्त्र असल्याचा कोणताही पुरावा नसताना हा गोळीबार करण्यात आला.

इस्रायलने लाईट नसलेली वाहन येत असल्याचा त्यांचा पूर्वीचा दावा चुकीचा असल्याचं मान्य केलं आहे. संबंधित सैन्यानं तशी माहिती दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

व्हीडिओ फुटेजमध्ये वाहनांवर स्पष्टपणे चिन्हं असल्याचं आणि पथकातील कर्मचाऱ्यांनी योग्य गणवेश परिधान केल्याचं दिसत होतं.

सैनिकांनी 15 मृत कामगारांचे मृतदेह वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी वाळूमध्ये पुरले असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. रस्ता मोकळा करण्यासाठी दुसऱ्या दिवशी वाहने हलवून तीही मृतदेहांसारकी पुरण्यात आल्याचं सांगण्यात आलं.

संयुक्त राष्ट्रांसह, आंतरराष्ट्रीय संस्थांना या भागात जाण्यासाठी सुरक्षित मार्ग सापडू शकला नाही, किंवा त्यांचं ठिकाण समजलं नाही, त्यामुळं जवळपास एका आठवड्यानंतर हा प्रकार समोर आला.

संयुक्त राष्ट्रांचे अदिकारी जोनाथन व्हाईट यांनी रुग्णवाहिका आणि संयुक्त राष्ट्राचे गाडीही नष्ट करून पुरण्यात आली होती, असं सांगितलं.

फोटो स्रोत, Jonathan Whittall/OCHA

फोटो कॅप्शन, संयुक्त राष्ट्रांचे अदिकारी जोनाथन व्हाईट यांनी रुग्णवाहिका आणि संयुक्त राष्ट्राचे गाडीही नष्ट करून पुरण्यात आली होती, असं सांगितलं.

जेव्हा एका मदत पथकाला हे मृतदेह सापडले तेव्हा त्यांना रेफत रडवानचा मोबाईल फोनही सापडला, त्यामध्ये घटनेचे फुटेज होते.

यापैकी सहा जणांचा संबंध हमासशी होता, असं आयडीएफचं म्हणणं आहे. पण त्यांनी त्याबाबतचा कोणताही पुरावा दिलेला नाही. सैनिकांनी गोळीबार केला तेव्हा ते नि:शस्त्र होते हेही आयडीएफनं मान्य केलं आहे.

लष्करी अधिकाऱ्यांनी कोणालाही बेड्या घातल्या नव्हत्या असं सांगितलं. तसंच कोणालाही जवळून गोळ्या घातल्या नसल्याचंही म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी बचावलेल्या एका कर्मचाऱ्यानं बीबीसीी बोलताना म्हटलं होतं की, रुग्णवाहिकांचे लाईट सुरू होते तसंच त्यांच्यापैकी कोणाचाही दहशतवादी गटाशी संबंधही नव्हता.

आयडीएफने घटनेचा सखोल तपास करण्याचं आश्वासन दिलं आहे. तसंच घटनांचा क्रम आणि परिस्थिती कशी हाताळली हेही समजून घेणार असल्याचं म्हटलं आहे.

रेड क्रेसेंट आणि इतर अनेक आंतरराष्ट्रीय संस्था या प्रकरणी स्वतंत्र चौकशीची मागणी करत आहेत.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.