इस्रायलनेच तयार केले होते हिजबुल्लाहला विकलेले लेबनॉन स्फोटातील पेजर, हेराने काय सांगितले?

फोटो स्रोत, HOUSSAM SHBARO/ANADOLU VIA GETTY IMAGES
- Author, रफी बर्ग
- Role, बीबीसी प्रतिनिधी
मोसाद या इस्रायलच्या गुप्तहेर संस्थेबद्दल बरंच बोललं आणि लिहिलं गेलं आहे. हमास आणि हिजबुल्लाहबरोबरच्या संघर्षात मोसादनं महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
खासकरून हिजबुल्लाहच्या सैनिकांच्या हाती असणाऱ्या पेजर आणि वॉक-टॉकीमध्ये स्फोट घडवून इस्रायलनं जगभरात खळबळ उडवून दिली होती.
याआधी अशाप्रकारचा हल्ला आणि तोही इतक्या व्यापक स्वरुपात कधीही झाला नव्हता. हा हल्ला मोसादनं कसा घडवून आणला, त्यासाठी कसं जाळं तयार करण्यात आलं आणि हिजबुल्लाहला त्यात कसं अडकवण्यात आलं याबद्दल.
हिजबुल्लाह या लेबनॉनमधील सशस्त्र शिया संघटनेचे सैनिक गेल्या दहा वर्षांपासून वॉकी-टॉकीचा वापर करत होते. मात्र, त्यांना या गोष्टीची जराही कल्पना नव्हती की, या उपकरणांचं उत्पादन इस्रायलनंच केलं असून एक दिवस ते याचा वापर त्यांच्याच विरोधात नक्की करतील.
ज्या वॉकी-टॉकीचा वापर करून ते एकमेकांना संपर्क करत आहेत, त्याच्यात काही बदल करण्यात आले आहेत आणि कोणत्याही क्षणी त्यांचं रुपांतर स्फोटकांमध्ये होऊ शकतं, याचा हिजबुल्लाहला अजिबात अंदाज नव्हता.
या गोष्टीची माहिती मोसाद या इस्रायलची गुप्तहेर संघटनेच्या दोन माजी एजंट किंवा गुप्तहेरांकडून मिळाली आहे.
सप्टेंबर 2024 मध्ये लेबनॉनमध्ये पेजर्स आणि वॉकी-टॉकीमध्ये साखळी स्फोट झाले. ते अत्यंत धक्कादायक होते. या स्फोटांमध्ये अनेकांचा मृत्यू झाला आणि शेकडो लोक जखमी झाले.


सीबीएस हे अमेरिकेतील बीबीसीचं सहकारी नेटवर्क आहे. मोसादच्या दोन माजी गुप्तहेरांनी सीबीएसला सांगितलं की, मोसाद या इस्रायलच्या गुप्तहेर संस्थेनं हिजबुल्लाहला कसं चकवलं.
बदल केलेले किंवा छेडछाड केलेले हजारो वॉकी-टॉकी आणि पेजर्स कशाप्रकारे हिजबुल्लाहला विकण्यात आले होते. महत्त्वाचं म्हणजे, तोपर्यंत हिजबुल्लाह या गोष्टीची अजिबात माहिती नव्हती की, हे वॉकी-टॉकी आणि पेजर्स इस्रायलमध्ये बनवण्यात आले आहेत.
17 सप्टेंबर 2024 ला लेबनॉनमध्ये हजारो पेजर्सचे एकापाठोपाठ साखळी स्फोट करण्यात आले होते. ज्या भागाला हिजबुल्लाहचा बालेकिल्ला मानलं जातं, त्याच भागात स्फोट झाले होते.
या स्फोटांमध्ये पेजर्सचा वापर करणाऱ्या अनेकांचा मृत्यू झाला होता, तसंच अनेकजण जखमी झाले होते. त्याचबरोबर या स्फोटांमुळे या भागात भीती आणि दहशत पसरली.
याच्या एक दिवसानंतर लेबनॉनमध्ये याच प्रकारे वॉकी-टॉकीचे स्फोट झाले. यामध्येही अनेकजणांचा मृत्यू झाला आणि शेकडो जखमी झाले.
लेबनॉनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यांमध्ये 42 जण मारले गेले आणि हजारो जखमी झाले. दोन महिन्यांनी या स्फोटांची जबाबदारी इस्रायलनं घेतली होती.
लेबनॉनच्या अधिकाऱ्यांनुसार, इस्रायलच्या बेंजामिन नेतन्याहू सरकारनं सांगितलं की या हल्ल्यांमध्ये त्यांनी फक्त हिजबुल्लाहच्या सैनिकांना लक्ष्य केलं होतं. मात्र, वस्तुस्थिती तशी नाही. कारण या स्फोटांमध्ये सर्वसामान्य लोक देखील मारले गेले.
"बनावट कंपनी बनवून फसवलं"
मायकल हे या दोन गुप्तहेरांपैकी एक आहेत. त्यांनी सीबीएसला सांगितलं की, वॉकी-टॉकीमध्ये वापरल्या जाणाऱ्या बॅटऱ्यांमध्ये मोसादनं एक स्फोट घडवणारं उपकरण लपवलं होतं. वॉकी-टॉकीचा वापर करताना ते सहसा शर्टाच्या वरच्या खिशात किंवा खिशाजवळ ठेवलं जातं.
मायकल म्हणाले की हिजबुल्लाहनं दहा वर्षांपूर्वी "चांगल्या किंमतीला" जवळपास 16 हजार वॉकी-टॉकी विकत घेतले होते. त्यांनी ज्या कंपनीकडून हे वॉकी-टॉकी विकत घेतले होते, ती बनावट कंपनी होती.
मायकलनं पुढे सांगितलं की, "आमच्याकडे अशी जबरदस्त क्षमता आहे की आम्ही अनेक प्रकारच्या परदेशी कंपन्या बनवू शकतो आणि तुम्हाला हे कधीच कळणार देखील नाही की प्रत्यक्षात या कंपन्या इस्रायलमध्ये बनल्या आहेत."
"पुरवठा साखळीची विश्वासार्हता वाढवण्यासाठी आम्ही त्या मूळ बनावट कंपनीबरोबर आणखी बनावट कंपन्यांचं जाळं विणतो. जेणेकरून त्या कंपनीला विविध मालाचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यामुळे सत्य उघड होत नाही."
"आम्ही एक बनावट किंवा खोटं जग उभं करतो. आम्ही एक जागतिक प्रॉडक्शन कंपनी आहोत, असं भासवतो. आम्ही एक कथा तयार करतो, त्याचं दिग्दर्शन करतो, त्याची निर्मिती करतो, हे सर्व जगच आमच्यासाठी व्यासपीठ आहे."
सीबीएसचं म्हणणं आहे की, दोन वर्षांपूर्वी या मोहिमेची व्याप्ती वाढवण्यात आली. यामध्ये पेजर्सचाही समावेश करण्यात आला. त्यांना "बीपर्स" म्हणतात.
मोसादनं सांगितलं की, त्यावेळेस हिजबुल्लाह गोल्ड अपोलो नावाच्या एका तैवानच्या कंपनीकडून पेजर विकत घेत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती.
त्यानंतर त्यांनी या कंपनीच्या नावावर म्हणजे गोल्ड अपोलो नावानं एक बनावट कंपनी तयार केली. ही कंपनी पेजर्सची जोडणी करण्याचं काम करायची. या जोडणी प्रक्रियेत पेजरमध्ये स्फोटकं पेरली जायची.
सीबीएसच्या बातमीनुसार, या पेजर्सचा वापर करणाऱ्यांचं नुकसान करण्यासाठी जितक्या स्फोटकांची आवश्यकता होती तितकीच स्फोटकं मोसादनं या उपकरणांमध्ये भरली होती.
गॅब्रिएल हे मोसादचे आणखी एक गुप्तहेर आहेत. त्यांनी सांगितलं की, "या स्फोटकांद्वारे कमीत कमी नुकसान व्हावं याची खातरमजा करण्यासाठी आम्ही प्रत्येक गोष्टीची बारकाईनं चाचणी केली होती."

फोटो स्रोत, Reuters
मोसादच्या माजी गुप्तहेरांनी सांगितलं की, मोसादनं या पेजर्ससाठी एक विशिष्ट रिंगटोनही निवडली. ही रिंगटोन पटकन ऐकू यायची. जेणेकरून ज्याच्या हातात पेजर असेल त्यानं पेजरवर आलेला संदेश अर्जंट असल्याचं मानून लगेच तो पाहावा.
गॅब्रिएल यांनी सांगितलं की, या पेजर्सची वैशिष्ट्ये सांगणाऱ्या जाहिराती आणि पत्रकं मोसादनं बनवली आणि त्यांना ऑनलाईन शेअर केलं. जेणेकरून हिजबुल्लाहला जाळ्यात ओढता यावं.
ते म्हणतात की, "त्यांनी जरी आमच्याकडून वस्तू विकत घेतल्या असत्या तरी त्यांच्या हे अजिबात लक्षात आलं नसतं की, प्रत्यक्षात ते मोसादकडूनच वस्तू विकत घेत आहेत."
"आम्ही द ट्रूमॅन शो सारखंच काहीतरी बनवलं होतं. ज्यात पडद्यामागे सर्व गोष्टींवर आमचंच नियंत्रण होतं आणि त्यातील पात्रांना या गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती की, त्यांच्याबरोबर काय घडतं आहे."
1998 मध्ये 'द ट्रूमॅन शो' नावाचा एक अमेरिकन चित्रपट आला होता. या चित्रपटात ट्रूमॅन नावाचं पात्र होतं. या पात्राला वाटतं असतं की, तो सर्वसामान्य आयुष्य जगतो आहे. मात्र प्रत्यक्षात त्याच्या प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवलं जात असतं आणि त्याची त्याला जराही कल्पना नसते.
सीबीएसनुसार, सप्टेंबर 2024 पर्यंत अशा प्रकारे छेडछाड करण्यात आलेले किंवा स्फोटकं दडवलेले 5 हजार पेजर्स हिजबुल्लाहनं विकत घेतले होते.
या दोन्ही गुप्तहेरांचं म्हणणं होतं की जेव्हा मोसादला वाटलं की हिजबुल्लाहाच्या हालचाली संशयास्पद झाल्या आहेत तेव्हा या उपकरणांमध्ये स्फोट करण्यात आले.
या सर्व स्फोटांमुळे संपूर्ण लेबनॉन मध्ये दहशत पसरली, भीतीचं वातावरण निर्माण झालं. कारण हे स्फोट एकापाठोपाठ एक रस्त्यांपासून सुपर मार्केटपर्यंत सर्वत्र होत होते.
हॉस्पिटलमध्ये जखमींच्या संख्येत अचानक वाढ झाली. हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेल्या अनेकांच्या शरीराच्या स्फोटामुळे चिंधड्या उडाल्या होत्या.
गॅब्रिएल यांनी सांगितलं की लेबनॉन मध्ये अशी "जोरदार अफवा" होती की त्यावेळेस हिजबल्लाहचे नेते हसन नसरल्लाह यांच्या समोर या स्फोटांमध्ये अनेकजणांचा मृत्यू झाला आहे. नंतर इस्रायलनं बैरूतवर केलेल्या एका हवाई हल्ल्यात हसन नसरल्लाह यांचा देखील मृत्यू झाला होता.
स्फोटामुळे हिजबुल्लाहला मोठी हानी
लेबनॉनमध्ये वॉक-टॉकी आणि पेजर्सचे स्फोट अशावेळी झाले, जेव्हा हिजबुल्लाह लेबनॉनच्या दक्षिण सीमेला लागून इस्रायलच्या प्रदेशावर आणि इस्रायल लेबनॉनच्या दक्षिण भागात हल्ले करत होतं.
7 ऑक्टोबर 2023 ला हमासनं इस्रायलच्या दक्षिण भागात अनेक ठिकाणी हल्ले केले. त्याच्या एक दिवसानंतर इस्रायलच्या उत्तरेकडील सीमेच्या भागात हिजबुल्लाहनं हल्ले करण्यात सुरूवात केली होती.
या हल्ल्यांमधून हिजबुल्लाह सावरत असतानाच इस्रायलनं त्याच्या तळांवर जोरदार हल्ले सुरू केले होते. त्यानंतर इस्रायलच्या सैन्यानं जमिनीवरून देखील लेबनॉनवर हल्ला चढवण्यास सुरूवात केली होती.
इस्रायल आणि हिजबुल्लाहमध्ये 26 नोव्हेंबर 2024 ला शस्त्रसंधी झाली.

फोटो स्रोत, MORTEZA NIKOUBAZL/NURPHOTO VIA GETTY IMAGES
लेबनॉननं पेजर आणि वॉकी-टॉकीद्वारे करण्यात आलेल्या हल्ल्यांचा कडक शब्दात निषेध केला होता. तर संयुक्त राष्ट्रसंघाचे मानवाधिकार प्रमुख वोल्कर तुर्क म्हणाले की, या हल्ल्यांनी त्यांना "घाबरवलं" आहे.
ते म्हणाले की, या हल्ल्यांसाठी जी पद्धत वापरण्यात आली होती ती, "आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्यांचं उल्लंघन" करणारी होती.
तर संयुक्त राष्ट्रसंघाचे मानवाधिकार प्रमुख अँटोनियो गुटेरेश यांनी हे हल्ले म्हणजे युद्धकाळात केलेले गुन्हे असल्याचं म्हटलं.
ते म्हणाले की, "वॉक-टॉकी आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये स्फोट करून लेबनॉनच्या नागरिकांना जाणूनबुजून आणि अंदाधुंद स्वरुपात लक्ष्य केलं गेलं, ही बाब संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायासाठी धोक्याची घंटा ठरली पाहिजे."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











