थोडं नाही तर जास्त चाला, चालण्याच्या व्यायामाचा हृदयाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो?

    • Author, मिशेल रॉबर्ट्स
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

लहानसं अंतर पायी फिरण्याऐवजी दररोज लांबचा फेरफटका मारला किंवा जास्त अंतर पायी चाललं, तर ते तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी अधिक चांगलं असतं.

विशेषत: तुम्ही जर फारसा व्यायाम करत नसाल तर अशा जास्त चालण्याचा तुम्हाला फायदा होतो.

ॲनल्स ऑफ इंटर्नल मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या नव्या संशोधनात हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

या संशोधनात म्हटलं आहे की, न थांबता सलग किमान 15 मिनिटं चालणं योग्य असतं. म्हणजे यात साधारण 1,500 पावलं चालली जातात. त्यामुळे तुमच्या हृदयाला चांगला व्यायाम होतो.

अनेकजण दररोज 10,000 पावलं चालण्याचं उद्दिष्ट ठेवतात. मात्र ही संख्या एका जपानी पेडोमीटरच्या जाहिरातीतून आली आहे. ही काही वैज्ञानिक संख्या नाही.

पेडोमीटर हे किती अंतर पायी चालण्यात आलं आहे याची मोजदाद पावलं मोजून करतं.

तरीही तज्ज्ञ या गोष्टीशी सहमत आहेत की जास्त चालणं सामान्यपणे तुमच्या आरोग्यासाठी चांगलं असतं.

काय आहे नवं संशोधन?

नव्या संशोधनात युकेमधील 40 ते 79 वर्षे वयोगटातील 33,560 वयस्कांचा अभ्यास करण्यात आला.

हे सर्वजण दररोज 8000 पेक्षा कमी पावलं चालत होते.

ते किती वेळ चालत होते (स्टेप-काउंटरनं आठवड्यात मोजलेलं अंतर) यानुसार त्यांचे वेगवेगळे गट करण्यात आले होते.

  • 5 मिनिटांपेक्षा कमी (43 टक्के)
  • 5 ते 10 मिनिटं (33.5 टक्के)
  • 10 ते 15 मिनिटं (15.5 टक्के)
  • 15 मिनिटं किंवा त्यापेक्षा अधिक (8 टक्के)

सिडनी विद्यापीठ आणि स्पेनमधील युनिव्हर्सिदाद युरोपियामधील संशोधकांनी या लोकांच्या आरोग्याचा आठ वर्षे मागोवा घेतला आणि अभ्यास केला.

जे लोक थोडा वेळ पायी चालत होते त्यांच्या तुलनेत जे लोक जास्त वेळ चालत होते त्यांच्यामध्ये हृदयाच्या समस्यांचा धोका कमी होता.

अगदी जे सर्वात सक्रिय होते म्हणजे जे दररोज 5,000 पावलांपेक्षा कमी चालतात त्यांच्यामध्येही जास्त वेळ किंवा जास्त अंतर चालल्यामुळे मोठा फरक पडला.

त्यांना असलेला हृदयरोगाचा धोका आणि मृत्यूचा धोका लक्षणीयरित्या कमी झाला. ते आधीपासूनच तंदुरुस्त होते का, हे अभ्यासातून पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही.

मात्र, ती व्यक्ती धूम्रपान करत होती का, लठ्ठ होती का किंवा त्या व्यक्तीला उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या होती का यासारख्या घटकांचा विचार करून संशोधकांनी त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.

किती चालता याबरोबरच कसं चालता ते महत्त्वाचं

तुम्ही किती चालता यावर नाही तर तुम्ही कसं चालता यावरही लक्ष केंद्रित करा.

संशोधकांचं म्हणणं आहे की तुम्ही किती चालता हेच फक्त महत्त्वाचं नाही. तुम्ही कसं चालता यामुळंही फरक पडतो.

एकाच वेळी जास्त वेळ चालल्यामुळे, मग तुम्ही एकूणच जास्त चालत नसाल तरी तुमच्या हृदयाला त्याचा फायदा किंवा मदत होते.

जास्त वेळ चालण्यासाठी वेळ काढणं यासारख्या छोट्या बदलांमुळं मोठा फरक पडू शकतो, असं संशोधक म्हणतात.

प्राध्यापक इमॅन्युएल स्टॅमाटाकिस सह-प्रमुख संशोधक आहेत. ते म्हणाले, आपला सर्व भर हा किती पावलं चालण्यात आली किंवा एकूण किती चाललो यावर असतो.

मात्र आपण चालण्याच्या पॅटर्नच्या महत्त्वाच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करतो. उदाहरणार्थ कशाप्रकारे चाललं जातं, हे महत्त्वाचं असतं.

"या अभ्यासातून दिसून येतं की, जे लोक शारीरिकदृष्ट्या खूपच निष्क्रिय आहेत, असे लोक त्यांच्या हृदयाच्या आरोग्याला मिळणारे फायदे वाढवू शकतात.

त्यांनी जास्त वेळ चालता यावं म्हणून त्यांच्या चालण्याच्या पॅटर्न किंवा पद्धतीत बदल केला तरी त्यांच्या हृदयाला फायदा होऊ शकतो. जेव्हा शक्य असेल तेव्हा त्यांनी किमान 10-15 मिनिटं चालल्यास फायदा होऊ शकतो."

प्राध्यापक केविन मॅककॉनवे ओपन युनिव्हर्सिर्टीमध्ये अप्लाईड स्टॅटिस्टिक्सचे एमिरेटस प्राध्यापक आहेत.

प्राध्यापक केविन म्हणाले, अभ्यासातून चालणं आणि हृदयाचं चांगलं आरोग्य यामध्ये संबंध असल्याचं दिसून आलं आहे. मात्र चालण्यामुळे ही सुधारणा घडून येते असं थेटपणे सिद्ध होत नाही.

नॅशनल हेल्थ सर्व्हिस म्हणजे एनएचएस आठवड्यातून 150 मिनिटांच्या मध्यम स्वरूपाच्या शारीरिक हालचालींची शिफारस करतं. उदाहरणार्थ जलद चालणं, ते आठवडाभराच्या कालावधीत समानरितीनं करण्यात यावं.

शारीरिक हालचाली अत्यंत महत्त्वाच्या

65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या प्रौढांनी दररोज हालचाली करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

मग ती घराभोवतीची किरकोळ किंवा हलक्या स्वरुपाची हालचाल असली तरी चालेल, असा सल्ला त्यात देण्यात आला आहे.

एमिली मॅकग्राथ ब्रिटिश हार्ट फाउंडेशनमध्ये हृदयरोगाच्या वरिष्ठ परिचारिका आहेत.

एमिली म्हणाल्या की, "व्यायामामुळं प्रत्येकाला आनंदी आणि निरोगी आयुष्य जगण्यास मदत होते.

जर तुम्हाला हृदयरोग आणि रक्ताभिसरणाचे आजार असतील, तर व्यायामामुळे तुम्हाला त्या आजारांचं व्यवस्थापन करण्यास आणि एकंदरित बरं वाटण्यास मदत होऊ शकते."

त्या पुढे म्हणतात, "सुरुवातीला तुम्हाला अधिक सक्रिय होणं किंवा अधिक शारीरिक हालचाली करणं कठीण वाटू शकतं.

मात्र जसजसे दिवस जातील तसतसं तुमच्या शरीराला या हालचालींची सवय होत जाईल आणि ते करणं अधिक सोपं होत जाईल."

"सुरुवातीला तुम्हाला फक्त छोटे बदल किंवा सुधारणा दिसतील. मात्र त्यांचा एकत्रित परिणाम होत जातो आणि तुमच्या हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी ते महत्त्वाचं ठरतं."

चालताना सुरक्षेबाबत कोणती काळजी घ्यावी?

जर तुम्ही रात्रीच्या वेळेस किंवा कमी प्रकाशात चालत असाल किंवा सायकल चालवत असाल, तर रस्ता वापरणाऱ्या इतरांसाठी तुमची दृश्यमानता वाढवण्यासाठी तुम्ही परावर्तित होणारे कपडे वापरावे किंवा टॉर्च किंवा हेडलॅम्पचा वापर करावा.

तुमच्या सभोवतालच्या गोष्टींविषयी सतर्क आणि सावध राहा.

जर उपलब्ध असतील तर खास नियुक्त केलेल्या लेन किंवा मार्गांचा वापर करा. रस्ता ओलांडताना त्यासाठी नियुक्त केलेल्या विशिष्ट जागीच तो ओलांडा.

कारण तिथं रस्त्यावरील रहदारी लक्षात येते आणि वाहनांना लोकं रस्ता ओलांडणार असल्याची जागा माहिती असते.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.