जास्त नाही, फक्त 7,000 पावलं चाललं तरीही आरोग्याला फायदा, नवं संशोधन काय आहे?

    • Author, जोश एल्गिन
    • Role, बीबीसी न्यूज

नवीन संशोधनातून असं समोर आलं आहे की, दररोज फक्त 7,000 पावलं चालल्यास मेंदूची कार्यक्षमता वाढते आणि गंभीर आजारांचा धोका कमी होऊ शकतो.

याआधी जसं 10,000 पावलांचं लक्ष्य सांगितलं जायचं, तसं करणं प्रत्येकासाठी शक्य नसलं तरी 7,000 पावलंही आरोग्य सुधारण्यासाठी एक सोपी आणि प्रभावी पद्धत ठरू शकते.

दररोज 7,000 पावलं चालल्याने आपल्या मेंदूची कार्यक्षमता वाढते आणि विविध आजारांपासून बचाव होतो, असं एका अभ्यासातून समोर आलं आहे.

गंभीर आजारांचा धोका कमी

10,000 पावलांच्या तुलनेत 7,000 पावलं चालणं हे कधीही जास्त शक्य आणि सोपं लक्ष्य वाटतं, असं यात म्हटलं आहे.

लॅन्सेट पब्लिक हेल्थ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात असं आढळून आलं आहे की, दररोज 7,000 पावलं चालल्याने कॅन्सर, डिमेन्शिया आणि हृदयविकार यांसारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होतो.

संशोधक सांगतात की, या निष्कर्षांमुळे अधिक लोकांना रोजची पावलं मोजण्याची सवय लागेल आणि त्यामुळे त्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी मदतही होईल.

मुख्य संशोधक लेखिका डॉ. मेलोडी डिंग म्हणतात, "आपल्याला असं वाटतं की रोज 10,000 पावलं चालणं गरजेचं आहे, परंतु यामागं खरं तर कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही."

दहा हजार पावलं म्हणजे साधारणपणे पाच मैल किंवा आठ किलोमीटर चालणं होतं. पण ही अचूक लांबी प्रत्येकासाठी वेगळी असते, कारण पावलांची लांबी माणसाची उंची, लिंग आणि चालण्याच्या वेगावर अवलंबून असते. जे जलद किंवा वेगानं चालतात, त्यांची पावलं थोडी मोठी असतात.

हा तर मार्केटिंग फंडा!

10,000 पावलांचा आकडा 1960 च्या दशकात जपानमध्ये झालेल्या एका मार्केटिंग मोहिमेमुळे प्रसिद्ध झाला.

1964 च्या टोकियो ऑलिम्पिकपूर्वी 'मन्पो-केई' नावाचं एक पेडोमीटर बाजारात आलं, ज्याचा अर्थच '10,000 स्टेप मीटर' असा होतो.

डॉ. डिंग म्हणतात की. हा, 10,000 पावलांचा आकडा मूळ संदर्भातून वेगळा काढला गेला आणि तो एक अनौपचारिक नियम बनला. आजही अनेक फिटनेस अ‍ॅप्स आणि उपकरणं याच आकड्याची शिफारस करतात.

'द लॅन्सेट' च्या अभ्यासात जगभरातील 1,60,000 हून अधिक प्रौढांच्या आरोग्य व चालण्याच्या सवयींविषयीचे मागील संशोधन आणि डेटाचे विश्लेषण केले.

जे लोक दिवसातून फक्त 2,000 पावले चालत होते, त्यांच्याशी तुलना करता, दररोज 7,000 पावले चालणाऱ्यांना पुढील आजारांचा धोका कमी असल्याचं आढळून आलं:

  • हृदयविकाराचा धोका 25 टक्क्यांनी कमी होतो.
  • कर्करोगाचा धोका 6 टक्क्यांनी कमी होतो.
  • डिमेन्शिया (स्मृतीभंश) होण्याचा धोका 38 टक्क्यांनी कमी होतो.
  • डिप्रेशनचा (नैराश्य) धोका 22 टक्क्यांनी कमी होतो.

परंतु, संशोधक सांगतात की काही आकडे अचूक नसू शकतात. कारण ते फार कमी अभ्यासांवर आधारित आहेत.

एकूणच या अभ्यासात असं आढळलं की, दिवसाला साधारण 4,000 पावलं चालणं हे फक्त 2,000 पावलं चालण्याच्या तुलनेत आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरतं.

अनेक आजारांसाठी 7,000 पावलांपर्यंत चालल्यावर फायदा होतो आणि त्यानंतर तो जरा स्थिर होतो, पण हृदयासाठी जास्त चालल्यास आणखी फायदा होतो.

बहुतांश व्यायाम मार्गदर्शक नियम पावलं मोजण्यावर नाही, तर व्यायामासाठी किती वेळ दिला जातो यावर लक्ष ठेवतात.

कमी चालणं झाल्याचं टेन्शन घेऊ नका

उदाहरणार्थ, जागतिक आरोग्य संघटनेनुसार (डब्ल्यूएचओ) प्रौढांनी दर आठवड्याला किमान 150 मिनिटे मध्यम स्वरूपाचा किंवा 75 मिनिटे जोरदार व्यायाम करावा.

डॉ. डिंग म्हणतात की, हा सल्ला काही लोकांना समजून घेणं कधी कधी कठीण वाटू शकतं, पण तरीही हा नियम खूप महत्त्वाचा आहे.

त्या म्हणतात, "सगळेच लोक चालू शकत नाहीत. काही पोहतात, सायकल चालवतात किंवा काहींना शारीरिक अडचणी असतात, त्यामुळे त्यांच्यासाठी पावलं मोजणं शक्य होत नाही."

परंतु, त्या म्हणतात की, लोकांनी दिवसभर थोडं थोडं चालावं यासाठी पावलं मोजण्याचा सल्ला एक 'अतिरिक्त' मार्गदर्शन म्हणून दिला जाऊ शकतो. यामुळे लोकांना दिवसभरात शरीर सक्रिय ठेवण्याची सवय लागेल.

ब्रुनेल युनिव्हर्सिटी लंडनमधील आरोग्य तज्ज्ञ डॉ. डॅनियल बेली म्हणतात की, हे संशोधन "दिवसाला 10,000 पावलं टाकणं गरजेचं आहे" या गैरसमजाला आव्हान देतं.

डॉ. बेली म्हणतात, "10,000 पावलं चालणं हे सक्रिय लोकांसाठी योग्य आहे, पण इतरांसाठी 5,000 ते 7,000 पावलं हे एक अधिक सोपं आणि सहज गाठता येणारं लक्ष्य ठरू शकतं."

पोर्ट्समथ विद्यापीठाचे डॉ. अँड्र्यू स्कॉट म्हणतात की, नक्की किती पावलं चालावीत हे महत्त्वाचं नाही.

ते म्हणतात, 'जास्त चालणं नेहमीच चांगलं असतं'. प्रत्येक दिवशी किती पावलं चाललो हे गृहित धरून टेन्शन घेण्याची गरज नाही. खास करून जेव्हा चालणं कमी होतं त्या दिवशी.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)