You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'हेल्दी ड्रिंक'ची सवय तुमच्या दातांचं नुकसान करतेय का? तज्ज्ञांनी दिला 'हा' सल्ला
- Author, नाझनीन मोतमेदी
- Role, बीबीसी पर्शियन
आपण अनेकदा आरोग्यासाठी फायदेशीर समजून काही पेय किंवा ड्रिंक्स घेतो. पण त्यांचा आपल्या दातांवर काय परिणाम होतो, हे आपण कधी लक्षातच घेत नाही. अॅसिडिक ड्रिंक्स आणि फूड्समुळे दातांच्या बाहेरील थर (इनॅमल) हळूहळू झिजत जातो.
हल्ली लोक थंड पेय म्हणजे कोल्ड्रिंक्सऐवजी फळ घालून बनवलेलं पाणी किंवा संत्र्याच्या रसाचा ग्लास हेच आरोग्यदायी पर्याय समजतात.
परंतु, शास्त्रज्ञांनी असं शोधून काढलं आहे की, अशा प्रकारचे पेय आपल्या दातांना असा त्रास देऊ शकतात, जे कधी बरंच होऊ शकत नाही.
ब्रिटनच्या किंग्स कॉलेज लंडन (केसीएल) मधील संशोधकांना असं लक्षात आलं आहे की, पेय पिण्याची वेळ आणि पद्धत योग्य असेल तर दातांना होणारं नुकसान बरंच कमी करता येऊ शकतं.
मी माझी तपासणी करून घेण्यासाठी या टीमला भेटले आणि माझ्या दातांची तपासणी करून घेतली.
आम्ही लहान असताना आम्हाला नेहमी सांगितलं जायचं की, दातांमध्ये छोटी-छोटी छिद्रं (कॅव्हिटी) होऊ शकतात, म्हणून काळजी घ्या.
आपल्याला असं सांगितलं जायचं की, मिठाई आणि चॉकलेट खाल्ल्यामुळे आपलं हास्य खराब होऊ शकतं. कारण जेव्हा आपण गोड खातो, तेव्हा दातांवर असलेले जंतू तोंडात उरलेल्या साखरेवर वाढतात, आणि त्यामुळे दातांमध्ये छिद्रं (कॅव्हिटी) होऊ लागतात.
जोपर्यंत ही छिद्रं खूप मोठी नसतात, तोपर्यंत ती सहसा फिलिंग करून दुरुस्त करता येतात.
परंतु, दातांचा बाह्य थर पातळ होणं (ज्याला 'टुथ इरोजन' म्हणजे दातांची झीज म्हणतात) ही वेगळी गोष्ट असते. खाण्या-पिण्याच्या गोष्टींमध्ये असलेले आम्ल (अॅसिड) दाताच्या सगळ्यात बाहेरच्या थरावर म्हणजे इनॅमलवर हल्ला करतात आणि तो थर हळूहळू झिजू लागतात म्हणजेच पातळ होऊ लागतात.
त्याचबरोबर, इनॅमलखाली असलेला डेंटिन थरही या आम्लामुळे खराब होतो. इनॅमल हा थर आपल्या दातांच्या नाजूक आतील भागांचं संरक्षण करत असतो.
पण इनॅमल सतत अॅसिड आणि साखरेच्या संपर्कात राहिले, तर ते फार काळ टिकत नाही. एकदा इनॅमल पातळ झाले किंवा नष्ट झाले, तर ते पुन्हा तयार होत नाही.
किंग्स कॉलेज लंडनमधील दातांच्या बाह्य थरावर संशोधन करणारे तज्ज्ञ आणि डेंटल सर्जन डॉ. पॉलिविओस चरालांबुस सांगतात, "जेव्हा इनॅमलचा वारंवार आंबट (अॅसिड) आणि गोड पदार्थांशी संपर्क येतो, तेव्हा दातांचा बाह्य थर हळूहळू पातळ होऊ लागतो."
ते पुढे सांगतात, "जर इनॅमलचं नुकसान वेळेत थांबवलं नाही, तर दातांवर डाग पडणं, तडे/भेगा जाणं, कडे तुटणं किंवा खडबडीतपणा जाणवणं, थंड किंवा गरम पदार्थांमुळे झिणझिण्या येणं किंवा वेदना होणं, तसेच दात पारदर्शक दिसू लागणं अशा अनेक समस्या उद्भवू शकतात."
पेय कसं आणि केव्हा प्यावं?
डॉ. चरालांबुस यांनी माझ्या तोंडात संत्र्याचा रस तीन वेगवेगळ्या पद्धतीनं पिताना अॅसिड किती आहे (पीएच लेव्हल) याची चाचणी केली.
दात सुरक्षित ठेवण्यासाठी तोंडातील पीएच साधारणपणे 7 म्हणजेच नॅचरल (समतोल) असणं गरजेचं असतं.
- संत्र्याचा रस थेट प्यायल्यावर तोंडातला पीएच घसरून 4.7 वर आला आणि तो परत सामान्य होण्यासाठी 18 सेकंद लागले.
- रस 10 सेकंद तोंडात धरून ठेवल्याने अॅसिडिटी आणखी वाढली आणि पीएच परत सामान्य होण्यासाठी जवळपास पाचपट जास्त वेळ लागला.
- रस तोंडात फिरवल्यावर पीएच खूपच खाली जाऊन 3 पर्यंत पोहोचला आणि तो परत सामान्य होण्यासाठी 30 पट जास्त वेळ लागला.
कोणतं पेय सर्वात जास्त नुकसान करतं?
या प्रयोगातून हे स्पष्ट झालं की, आंबट (अॅसिडिक) ड्रिंक तोंडात धरून ठेवणं किंवा फिरवत पिणं, दातांसाठी जास्त हानिकारक ठरतं. कारण असं केल्यामुळे त्या आंबट ड्रिंकचा दातांशी जास्त वेळ आणि अधिक थेट संपर्क होतो.
डॉ. चरालांबुस म्हणतात, "दात सुरक्षित ठेवायचे असतील तर आंबट (अॅसिडिक) पेय तोंडात जास्त वेळ ठेवू नका. स्ट्रॉचा वापर केला तर पेय थेट घशात जाईल आणि दातांशी कमी संपर्क होईल.
संशोधनात असंही दिसून आलं की, स्ट्रॉने कोल्डड्रिंक्स पिल्यास दातांचा पृष्ठभाग (थर) झपाट्याने खराब होण्याचा धोका कमी होतो."
केसीएलच्या टीमने असं पाहिलं की, जेवणादरम्यान आंबट (अॅसिडिक) अन्न किंवा ड्रिंक घेतल्याने दातांचा थर (इनॅमल) पातळ होण्याचा सर्वात मोठा धोका असतो.
जे लोक दिवसातून दोनदा जेवणाच्या वेळेत सॉफ्ट ड्रिंक, लिंबूपाणी किंवा गरम चहा सारखं आंबट पेय पीत होते, त्यांच्यामध्ये दातांचा थर मध्यम ते गंभीर पातळीवर पातळ होण्याची शक्यता 11 पटीहून अधिक होती.
तेच पेय जेव्हा जेवणासोबत घेतलं गेलं, तेव्हा दातांचा थर पातळ होण्याचा धोका निम्म्यावर आला होता.
म्हणून जर तुम्ही हे पेय योग्य वेळी पिलं म्हणजे जेवणासोबत, जेवणाच्या अगोदर किंवा नंतर तर तुमचे दात अधिक सुरक्षित राहू शकतात.
केसीएलच्या टीमनं पाहिलं की, वेगवेगळ्या चार ड्रिंक्सचा दातांवर काय परिणाम होतो. त्यांनी दातांवरचा बाहेरचा थर (इनॅमल) संत्र्याचा रस, कोला, ताक आणि फळांच्या चहामध्ये बुडवून ठेवले.
साधारण एका तासानंतर दातांवर जे नुकसान दिसलं, ते असं होतं की जणू कुणी दोन दिवस रोज तीन-तीन ग्लास हे ड्रिंक प्यायलं असावं. मायक्रोस्कोपमधून पाहिल्यावर दाताचा थर पातळ झालेल्या काळ्या रेषेसारखा दिसत होता.
हे परिणाम आश्चर्यकारक होते. दातांचं सगळ्यात जास्त नुकसान कोल्डड्रिंकने केलं. त्यानंतर संत्र्याच्या रसाचा नंबर लागला, मग लाल बेरीच्या चहाचा. सगळ्यात कमी नुकसान ताकानं केलं. ते दातांसाठी सगळ्यात सौम्य ठरलं.
आयर्न (ताक) हे एक पेय आहे जे पाकिस्तान, लेबनॉन, सीरिया, तुर्की, इराण आणि आर्मेनिया अशा अनेक देशांमध्ये खूप आवडीनं प्यायलं जातं.
कोणत्या खाद्यपदार्थांमुळे दातांचं सर्वाधिक नुकसान होतं?
आंबट पदार्थ आणि पेय दातांवरचा थर पातळ करू शकतात. बहुतांश फळांमध्ये काही प्रमाणात आम्ल (अॅसिड) असतं.
- आंबट (अॅसिडिक) खाण्यापिण्याच्या पदार्थांची काही उदाहरणं:
- मिरची
- टोमॅटो आणि टोमॅट सॉस (केचप)
- किमची
- सॉकरक्रॉट
- व्हिनेगर आणि लोणचे (विशेषतः अॅपल सायडर व्हिनेगर)
- फ्रूट स्क्वॅश (फळांचा रस मिसळून बनवलेलं पेय)
- पाण्यात लिंबू टाकून बनवलेलं फ्लेवर्ड पाणी
- बेरी टी, रोजहिप, आलं आणि लिंबूसारखी चव असलेले फ्लेवर्ड चहा
- बहुतांश अल्कोहॉलिक ड्रिंक्स
- सॉफ्ट ड्रिंक्स (शुगर फ्री असले तरी ते साखर असलेल्या पेयाइतकंच हानिकारक असतात)
आपल्यासमोर आव्हान असं आहे की, यापैकी बऱ्याच खाण्या-पिण्याच्या गोष्टी आरोग्यासाठी फायदेशीरही असतात.
परंतु, या गोष्टी हुशारीने वापरायला हव्यात, जेणेकरून तुमच्या दातांना इजा होणार नाही.
- जेवणाच्या शेवटी पनीर, दही किंवा दूध यासारख्या कॅल्शियमयुक्त गोष्टी खा. या गोष्टी तोंडातील आम्लपणा कमी करण्यात मदत करतात.
- शुगर-फ्री च्युइंगम चघळा. त्यामुळे तोंडात लाळ जास्त बनेल आणि दातांचं संरक्षण होईल.
- फ्रूट टी न घेता ब्लॅक टी प्या. त्यामुळे दातांचा बाहेरचा थर पातळ होण्याचा धोका कमी होतो.
- लिंबू किंवा संत्र्याऐवजी काकडी, पुदिना किंवा रोजमेरी घालून फ्लेवर्ड पाणी तयार करा.
दातांवरचा थर पातळ होणं ही गोष्ट किती सामान्य आहे?
दंततज्ज्ञ सांगतात की, आता दातांचा थर पातळ होणं किंवा कमकुवत होणं ही समस्या जगभरात खूप सामान्य बनली आहे आणि ती वेगाने वाढत आहे.
किंग्स कॉलेज लंडनच्या डेंटल इन्स्टिट्यूटमधील प्रोस्थोडॉन्टिक्स विभागाचे प्रमुख डॉ. डेव्हिड बार्टलेट यांनी 2013 मध्ये केलेल्या अभ्यासानुसार, युरोपमधील 18 ते 35 वयोगटातील सुमारे 30 टक्के तरुण मध्यम ते गंभीर स्तरापर्यंत दातांचा थर पातळ होण्याच्या समस्येने त्रस्त होते.
याच्या तुलनेत, सहा अरब देशांमधील 18 ते 35 वयोगटातील याच वयोगटातील 2,924 लोकांवर करण्यात आलेल्या एका नव्या अभ्यासात ही समस्या युरोपपेक्षा जास्त प्रमाणात आढळली.
प्रत्येक देशात ही समस्या वेगळी दिसली. ओमानमध्ये सर्वात जास्त 60.7 टक्के लोकांना ही अडचण होती. सौदी अरेबियामध्ये 57.1 टक्के, यूएईमध्ये 49.3 टक्के, इजिप्तमध्ये 32.9 टक्के, कुवेतमध्ये 31.5 टक्के आणि जॉर्डनमध्ये 16.5 टक्के लोकांना दातांचा थर पातळ होण्याची समस्या होती.
दातांवरचा थर किती पातळ असणं सामान्य मानलं जातं?
डॉ. चरालांबुस म्हणतात, "वय वाढत गेलं की दात थोडेफार झिजतातच. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण जर आपण काळजी घेतली नाही, तर आपली खाण्याची पद्धत, सवयी किंवा काही आजार (जसं की आम्लपित्त) यामुळे दात लवकर झिजू शकतात."
डेंटिस्ट दातांचं नुकसान किती झालं आहे हे तपासण्यासाठी एक खास गाइड वापरतात.
याचे परिणाम कधी-कधी काळजीचं कारण बनू शकतात, कारण एकदा दातांचा बाहेरील थर (इनॅमल) घासला किंवा झिजला गेला की तो पुन्हा येत नाही. म्हणून दात झिजण्याआधीच त्याचं संरक्षण करणं हाच सगळ्यात चांगला उपाय आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)