दातांचं दुखणं कायमचं थांबवण्यासाठी 'या' 7 गोष्टी टाळा

    • Author, सिराज
    • Role, बीबीसी तमिळ

दातांचं आरोग्य आपल्या एकूण शारीरिक आरोग्याचे द्योतक असतं. परंतु, काही सामान्य दैनंदिन सवयी दातांच्या आणि तोंडाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतात.

काही सवयी आपल्या दातांच्या आरोग्यावर कसा परिणाम करू शकतात, याबद्दल जाणून घेणं महत्त्वाचं आहे. या सवयींबद्दल आपण अधिक जाणून घेऊया आणि त्यापासून बचाव कसा करावा, हे पाहूया.

जागतिक आरोग संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मते जगभरात सुमारे 350 कोटी लोकांना तोंडाच्या स्वच्छतेशी संबंधित आजारांचा त्रास होतो.

पण, तुम्ही जर विचाराल की "मी तर रोज दात घासतो, दातांची काळजी घ्यायला आणि तोंडाची स्वच्छता राखायला इतकसं पुरेसं नाही का?" तर उत्तर आहे, हो, हे पुरेसं नाही.

आपण दररोज नकळत करत असलेल्या काही गोष्टींमुळं आपल्या दातांना गंभीर नुकसान पोहोचतं. त्यापैकी काही सवयी तुम्हाला आश्चर्यचकितही करू शकतात. या लेखात याचीच सविस्तर चर्चा केली आहे.

1. खूप जास्त दाब देऊन दात घासणे

काही लोकांना सकाळी उठल्यावर 5 ते 10 मिनिटे वेळ घेऊन, भरपूर दाब देऊन दात घासण्याची सवय असते. दात व्यवस्थित स्वच्छ व्हावेत म्हणूनच जोरात घासले पाहिजेत, असा त्यांचा विश्वास असतो. घासून झाल्यावर आरशात पाहून दात स्वच्छ झालेत का हेही ते तपासून पाहतात.

पण खरं तर अशा प्रकारे जोरात दात घासणं धोकादायक ठरू शकतं, असं दंत शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. धारिणी सांगतात.

"जोरात दात घासल्याने किंवा जास्त वेळ घासल्याने सर्व जंतू नष्ट होतात, असा समज चुकीचा आहे. प्रत्यक्षात तुम्ही दात घासायची पद्धतच महत्त्वाची असते.

वरखाली किंवा एकाच बाजूने घासणं हे दातांना हानीकारक ठरतं. वर्तुळाकार हालचालीने, हळूवार दात घासले पाहिजेत," असं त्या सांगतात.

जास्त दाब दिल्यामुळे दातांवरील इनॅमल झिजू शकतात आणि हिरड्यांना त्रास होऊ शकतो, असं धारिणी सांगतात.

"जर हे सतत झालं, तर कालांतराने हिरड्या झिजून दातांची मुळे उघडी पडायला लागतात. त्यामुळे दातांची संवेदनशीलता (सेन्सिटिव्हिटी) वाढण्याची समस्याही निर्माण होऊ शकते," असा इशारा त्या देतात.

"सॉफ्ट" किंवा "अल्ट्रा-सॉफ्ट" ब्रिस्टल ब्रशची शिफारस करताना त्या म्हणतात की, "2-3 मिनिटं दात घासणं पुरेसं आहे. पण एका दिवशी दोन वेळा दात घासावेत आणि वाटाण्याच्या दाण्याएवढी पेस्ट देखील पुरेशी आहे."

2. दातांचा साधन किंवा उपकरण म्हणून वापर करणे

दातांनी बाटलीचं झाकण उघडणं, दातांनी पाकिट फाडणं आणि नखं चावणं या सर्वांमुळे कालांतराने तुमच्या दातांचे मोठे नुकसान होऊ शकते, असे दंत शल्यचिकित्सक आणि इम्प्लांटोलॉजिस्ट डॉ. अभिनव सांगतात.

"दात अन्न चावण्यासाठी असतात. हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. दात हे कात्री, ब्लेड, कटर किंवा बाटली उघडण्याच्या उपकरणांचा पर्याय नाही. दातांचा वापर साधन म्हणून केल्याने त्याला तडे जाऊ शकतात आणि कधीकधी ते तुटू देखील शकतात." असा इशारा डॉ. अभिनव देतात.

नखं चावण्याचे धोके स्पष्ट करताना डॉ. अभिनव सांगतात, "खूप लोकांना नखं चावण्याची सवय असते. त्यामुळं दातांचा आकार बदलू शकतो. जास्त दाब देऊन नखं चावल्याने जबड्याचेही नुकसान होऊ शकते."

3. वारंवार कॉफी/चहा आणि शीतपेय पिणं

खूप लोक सतत सोडा, फळांचा रस, कॉफी, चहा किंवा शीतपेय पितात. त्यांच्या उच्च आम्लतेमुळे पांढरे दात हळूहळू खराब होतात, असं दंत शल्यचिकित्सक डॉ. धारिणी सांगतात.

बाटलीमध्ये बंद असलेली शीतपेयं, कॉफी आणि चहा यामध्ये असलेली जास्त साखर, कॅफिन आदींमुळे पांढऱ्या दातांचे नुकसान होते, असं त्या सांगतात.

"अत्यधिक सोडा असलेली शीतपेयं, कॉफी/चहा पिणे शरीरातील पाणी कमी करू शकते (डिहायड्रेशन). याचा परिणाम म्हणजे लाळ कमी होते.

लाळ ही तोंडाच्या स्वच्छतेसाठी महत्त्वाची असते, ती दातांचे विकार आणि हिरड्यांचे आजार रोखते. ती कमी झाल्यास, केवळ दातांचे नुकसानच नाही तर पचनाच्या समस्या देखील उद्भवू शकतात," असं डॉ. धारिणी यांनी सांगितलं.

अशा प्रकारचे पेये पिऊन झाल्यावर तोंड स्वच्छ धुऊन घेणं खूप महत्त्वाचं आहे. पाणी देखील जास्त पिऊन घ्यावे," असं डॉ. धारिणी सुचवतात.

4. वारंवार काहीतरी खात राहणं

"सतत काहीतरी खात राहिल्याने, पातळ अन्नकण दातांमध्ये अडकून राहतात. त्यामुळे बॅक्टेरियाची वाढ झपाट्याने होते. यामुळे दातांमध्ये पोकळी आणि भेगा निर्माण होण्याचा धोका वाढतो," असं डॉ. धारिणी यांनी सांगितलं.

त्या म्हणतात की, यावर उपाय म्हणजे, दिवसातून फक्त एकदाच आणि तेही मर्यादित प्रमाणातच स्नॅक्स खाणं.

त्या म्हणाल्या, "त्यातही कमी साखर असलेले स्नॅक्स खाल्लं तर आणखी चांगलं. जास्त साखर ही केवळ शरीराच्या इतर भागांसाठीच नव्हे, तर दातांसाठीही धोकादायक आहे. खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यावं किंवा माउथवॉशने तोंड स्वच्छ करावं."

5. दात कुरकुरणे / दात खाणं

राग आला की दात घट्ट चावणे किंवा दात खाणं हे सामान्य आहे, पण यामुळं दातांची निश्चितच हानी होते, असं डॉ. अभिनव यांनी सांगितलं.

ते म्हणतात की, तणाव, मानसिक दडपण यांसारख्या मानसिक कारणांमुळेही दात कुरतडण्याची किंवा खाण्याची सवय लागू शकते.

"काही लोक झोपेतसुद्धा दात कुरतडतात किंवा खातात... त्यामुळं,

- दात कमकुवत होतात,

- त्यांचा आकार/ स्वरूप बदलतो,

- दातांमध्ये संवेदनशीलता वाढते, दातदुखी जाणवते

- त्यामुळे जबड्यातही वेदना होऊ शकतात

एका टप्प्यावर तोंड उघडणं किंवा बंद करणं सुद्धा वेदना निर्माण करू शकतं. दंततज्ज्ञांचा सल्ला घेऊन 'डेंटल नाईटगार्ड' वापरणं हा एक उपाय ठरू शकतो, असं डॉ. अभिनव सांगतात.

6. धूम्रपान/तंबाखूचा वापर

"धूम्रपान करणाऱ्यांना तोंड द्यावी लागणारी पहिली समस्या म्हणजे दातांवर डाग पडणे. त्यानंतर, तोंडाची दुर्गंधी, हिरड्या कमकुवत होणं आणि तोंडाच्या कर्करोगाचा धोका वाढतो," असा इशारा डॉ. धारिणी देतात.

"धूम्रपान किंवा तंबाखू सेवनामुळं दात गमावण्याची स्थिती देखील निर्माण होऊ शकते. परंतु, उपचार घेतल्यानंतरही धूम्रपान करणं हे उपचारांच्या परिणामांना मर्यादा घालेल," असं त्या सांगतात.

तंबाखूचे सेवन किंवा धुम्रपान सोडल्याने तोंडाची स्वच्छता आणि एकूण आरोग्यात मोठ्या प्रमाणात सुधारणा होते, असं त्या म्हणतात.

7. दंतचिकित्सकांचा सल्ला न घेणं

दात दुखत असेल तरच दंतचिकित्सकाकडे जाऊन उपचार घेणं हा विचार चुकीचा आहे, असं डॉ. धारिणी म्हणतात.

जर आपल्या हाताचे हाड तुटले तर आपण त्यावर योग्य उपचारासाठी डॉक्टरांकडे जाऊन उपचार करतो. पण दातांचं मात्र असं नसतं.

दातांचा कसाही वापर करा, जर शेवटी समस्या उद्भवली तर ते काढून कृत्रिम दात बसवून घेतले तरी चालेल, असा विचार लोक करतात," असं धारिणी म्हणाल्या.

त्या म्हणतात, "लोकांनी हे समजून घेणं आवश्यक आहे की, जर एक दात काढला तर कालांतराने त्याचा इतर दातांवरही परिणाम होईल."

"दात किडणे, हिरड्यांचे संसर्ग आणि तोंडाचा कर्करोग कोणत्याही लक्षणांशिवाय हळूहळू वाढू शकतो," असा इशारा देताना डॉ. धारिणी म्हणतात की, "फक्त दात घासणं किंवा स्वच्छ करणं पुरेसं नाही. कारण, दातांचे आरोग्य संपूर्ण शारीरिक आरोग्याचे संकेत आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)