सिम्बायोसेक्श्युअल अट्रॅक्शन : ही नवी लैंगिक ओळख नेमकी काय आहे?

प्रतिकात्मक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी

मानवाच्या लैंगिक ओळखीबाबत अनेक नवीन गोष्टींचा उलगडा गेल्या काही काळात झाला आहे. असाच एक नवीन उलगडा एका संशोधनातून समोर आला आहे. हा उलगडा म्हणजे सिम्बायोसेक्श्युअल अट्रॅक्शन (Symbiosexual Attraction) संदर्भातील.

एखाद्या व्यक्तीला आनंदी नात्यामध्ये असलेल्या दोन किंवा अधिक व्यक्तींप्रती एक प्रकारचं आकर्षण निर्माण होतं असं संशोधनामध्ये आढळून आलं आहे. हे आकर्षण म्हणजेच सिम्बायोसेक्श्युअल अट्रॅक्शन.

कॅलिफोर्नियामधील इन्स्टिट्यूट ऑफ इंटेग्रस स्टडिजमधील ह्युमन सेक्श्युयालिटी विभागातील सॅली जॉन्स्टन यांनी याबाबत संशोधन केलं आहे. त्याबाबतचा शोधनिबंध स्प्रिंगर जर्नलनं अलीकडेच प्रकाशित केला आहे.

हा शोधनिबंध प्रसिद्ध झाल्यानंतर इंटरनेटवर Symbiosexual Attraction बाबत चर्चा सुरू झाली. इंटरनेटवर सध्या Symbiosexual Attraction हा शब्द मोठ्या प्रमाणात सर्चही केला जात आहे. ही संकल्पना काय आहे, त्याचा अर्थ काय हे आपण या लेखातून समजून घेऊ.

संशोधनातून हे समोर आलं की, अनेकांना अशा प्रकारच्या आकर्षणाचा अनुभव होतो. लैंगिक ओळखींच्या संदर्भात सध्या सुरू असलेल्या अभ्यासात यातून आढळलेले निष्कर्ष महत्त्वाचे ठरल्याचंही समोर आलं.

पण, हे आकर्षण नेमकं कशाप्रकारचं असतं. त्यामुळं भावनात्मक किंवा इतर पातळीवर जाणवणारे बदल नेमके कसे असतात, अशा काही प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न या संशोधनाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

सिम्बायोसेक्श्युअल अट्रॅक्शन म्हणजे नेमके काय?

एका वाक्यात सांगायचे झाल्यास एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या एखाद्या व्यक्तीबद्दल नव्हे तर जोडप्याबद्दल वाटणारे आकर्षण म्हणजे सिम्बायोसेक्श्युअल अट्रॅक्शन.

डॉ. सागर मुंदडा हे मानसोपचार तज्ज्ञ आणि सेक्सॉलॉजिस्ट आहेत. 'सिम्बायोसेक्श्युअल अट्रॅक्शन' ही संकल्पना नेमकी काय आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीने केला.

डॉ. मुंदडा यांच्या मते, एखाद्या जोडप्याबद्दल वाटणारं हे आकर्षण असतं. म्हणजे त्या जोडप्यामध्ये असलेलं नातं, त्यांच्या नात्यामधली ऊर्जा, त्यांच्यातील प्रेमसंबंध याबाबतचं हे आकर्षण असतं.

प्रतिकात्मक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

अशा प्रकारचं आकर्षण असलेल्यांना या जोप्यांमधील नातं, ऊर्जा, प्रेमसंबंध पाहून उत्साह वाटत असतो आणि त्यात आपणही सहभागी व्हावं त्या नात्यात आपला समावेश व्हावा अशी त्यांची इच्छा असते, असं ते म्हणाले.

"तसंच त्या जोडप्यातील कोणत्याही एका व्यक्तीबरोबर त्यांना जोडलं जायचं नसतं. कारण ते त्यांच्यातील कोणत्याही एका व्यक्तीकडं नव्हे तर जोडप्याकडं किंवा त्या नात्याकडं आकर्षित होत असतात," असंही त्यांनी सांगितलं.

आकर्षणानुसार ठरते पातळी

"ही संकल्पना आता चर्चेतही येऊ लागली असली तरी, कदाचित अनेक वर्षांपासून ती समाजात असावी. फक्त आता त्याला एक ओळख मिळाली आहे," असंही मुंदडा म्हणाले.

अगदी साध्या भाषेत सांगायचं तर लोक सहज म्हणतात की, 'अमुक एखादं कपल किती चांगलं आहे'. 'मला ते कपल खूप आवडतं'. त्याचा जर अतिरेक झाला आणि आपण स्वतःदेखील त्या नात्यात तिसरा व्यक्ती म्हणून सहभागी असावं असं वाटणं म्हणजेच हे सिम्बायोसेक्श्युअल अट्रॅक्शन.

प्रतिकात्मक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

दोघांच्या समावेशानं नात्यात निर्माण झालेली जी ऊर्जा आहे, ती ऊर्जा अनुभवायची इच्छा अशाप्रकारचे आकर्षण असलेल्यांमद्ये असते.

हे नातं कोणत्या पातळीपर्यंत असावं हे संबंधित व्यक्तींवरच अवलंबून असतं. पण नात्याबद्दल आकर्षण असलं तरी त्यात कुठं तरी शारीरिक आकर्षण हा भागही असतोच, असंही मुंदडा यांनी सांगितलं.

अशी समोर आली संकल्पना

सिम्बायोसेक्श्युअल अट्रॅक्शन या शब्दाचा किंवा संकल्पनेचा उल्लेख सर्वात आधी 'सोसायटी फॉर द साइंटिफिक स्टडी ऑफ सेक्श्युअॅलिटी कॉन्फरन्स'मध्ये एका पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये करण्यात आला होता.

त्याठिकाणी याचा उल्लेख नात्यात असलेल्या व्यक्तींप्रती असलेलं रोमँटिक किंवा लैंगिक आकर्षण अशा अर्थाने केला होता.

त्यानंतर याचा अधिक स्पष्टपणे अर्थ लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानुसार यात एखाद्या नात्याप्रती किंवा त्या व्यक्तींच्या नात्यामध्ये निर्माण झालेल्या ऊर्जेमुळं आकर्षण निर्माण होत असतं. त्यामुळं बायसेक्श्युयालिटी किंवा पॅनसेक्श्युयालिटीपेक्षा हे आकर्षण वेगळं ठरतं.

प्रतिकात्मक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

सॅली जॉन्स्टन यांना त्यांच्या संशोधनादरम्यान काही लेख, डेटिंग अ‍ॅप, चर्चा, यातूनही सिम्बायोसेक्श्युअल अट्रॅक्शन संदर्भात काही पुरावे आढळले.

पण ही संकल्पना समोर आलेली असली, तरी यावर हवं तेवढं संशोधन मात्र झालेलं नसल्याचं जॉनस्टन यांनी त्यांच्या संशोधनात म्हटलं आहे.

अनेकप्रकारचे पैलू असलेल्या या आकर्षणाच्या संदर्भात संशोधन करताना त्यांना इच्छा, लैंगिकता याबरोबरच याविषयी समाजाच्या दृष्टिकोनाचाही विचार करावा लागला.

पण लैंगिकतेसंदर्भातील अशा प्रकारच्या विषयांचं संशोधन होणं अत्यंत गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. या संशोधनासाठी त्यांनी द प्लेजर स्टडी या संशोधनासाठी गोळा करण्यात आलेल्या माहितीचा वापर केला.

'द प्लेजर स्टडी'मध्ये लैंगिक ओळख आणि आणि लैंगिक आनंद यातील संबंधावर चर्चा करण्यात आली होती. यामध्ये संशोधनात सहभागी झालेल्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांच्या उत्तरांवरून जॉनस्टन यांनी त्यांचं संशोधन केलं.

संशोधनात नेमके काय आढळले?

संशोधनातील माहितीचा अभ्यास केल्यानंतर लोकांना अशाप्रकारचे 'सिम्बायोसेक्श्युअल अट्रॅक्शन' जाणवत असल्याचे ठोस पुरावे सॅली जॉन्स्टन यांना मिळाले. द प्लेजर स्टडी साठीच्या संशोधनात सहभागी झालेल्यांच्या मुलाखतींमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे याबाबत अंदाज बांधता आला.

'द प्लेजर स्टडी'मध्ये सहभागी झालेल्या 373 जणांपैकी 145 जणांनी त्यांना नात्यामध्ये असलेल्या इतर व्यक्तींप्रती आकर्षण जाणवल्याचं त्यांनी सांगितलं. हे प्रमाण सहभागी झालेल्यांच्या 38.9 टक्के एवढं होतं.

त्यांना विशेषतः जोडप्यांबाबत हे आकर्षण निर्माण झालं होतं.

सर्वेक्षणादरम्यान ज्यांनी अशाप्रकारचं आकर्षण निर्माण झाल्याचं सांगितलं होतं. त्या सर्वांनी मुलाखतींमध्येही त्याला दुजोरा दिला.

प्रतिकात्मक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ज्यांना अशाप्रकारचं आकर्षण निर्माण झालं होतं ते विविध वयोगटातील (21-40) आणि जगभरातील विविध भौगोलिक परिस्थितीतील होते.

मुलाखतींमध्ये त्या सर्वांनी त्यांना कशाप्रकारे आकर्षण निर्माण झालं, त्यादरम्यानची त्यांची नेमकी स्थिती, आकर्षणादरम्यान आलेला अनुभव याचं वर्णनही केलं.

एका व्यक्तीबद्दल निर्माण होणारं आकर्षण आणि जोपड्याबाबत निर्माण होणारं आकर्षण यामध्ये असलेला मुख्य फरक काय होता, हेही या संशोधनात सहभागी झालेल्यांनी सांगितलं.

जोडप्यांमध्ये होणारी चर्चा, त्यांचं एकमेकांबरोबर असलेलं वर्तन, एकमेकांसाठी असलेली काळजी आणि त्यामुळं जाणवणारी ऊर्जा ही त्यांच्या आकर्षणाची मुख्य केंद्रं होती.

याचं विश्लेषण करताना डॉ. मुंदडा म्हणाले की, "अशा प्रकारे सिम्बायोसेक्श्युअल अट्रॅक्शन असणाऱ्याला केवळ नात्याबद्दल आकर्षण आहे, की ते शारीरिक किंवा भावनिक पातळीपर्यंत पोहोचलं आहे, हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असतो. पण ज्या जोपड्याबाबत आकर्षण आहे, त्या दोघांच्या बरोबरच्या आपणही असावं आणि तसंच तिघांचं नातं निर्माण व्हावं, ही त्यामागणी सर्वांत महत्त्वाची भावना असते."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)