अनिश गवांदे : भारतातील राजकीय पक्षाचे पहिले गे राष्ट्रीय प्रवक्ते, असा आहे प्रवास

फोटो स्रोत, X/@anishgawande
- Author, अमृता दुर्वे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अनिश गवांदे यांची राष्ट्रीय प्रवक्तेपदी निवड केली आहे.
भारतीय राजकारणात कोणत्याही राजकीय पक्षाने पहिल्यांदाच एका गे व्यक्तीची राष्ट्रीय प्रवक्तेपदी निवड केली आहे.
अनिश गवांदे यांच्या लैंगिक ओळखीमुळे त्यांच्या निवडीची चर्चा होत असली तरीही मुंबईत जन्मलेल्या अनिश गवांदे यांची खरी ओळख त्यापेक्षा अधिक मोठी आणि विस्तारित आहे.
राजकारण आणि राजकीय नेते यांच्याबाबत असणाऱ्या पारंपरिक समजुतीला छेद देत, मुंबईच्या अनिश गवांदे यांनी राष्ट्रीय प्रवक्तेपदापर्यंतचा प्रवास कसा केला?
जगभरात नावाजलेल्या कोलंबिया, ऑक्सफर्ड आणि पश्चिम आफ्रिकेतील फ्रँकोफोन विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर, मुंबईच्या अनिशला भारतात का यावं वाटलं?
भारतीय राजकारणात विविध लिंगभावाच्या व्यक्तींसाठी काही बदल होत आहेत का?
अनिश गवांदे स्वतःच्या राजकारणाबाबत काय विचार करतात?
या आणि अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं त्यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत दिली. बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी अमृता दुर्वे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.


'लैंगिक ओळखीमुळे राजकारण शक्य नसल्याचं वाटायचं'
प्रश्न : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी अनिश गवांदे यांची निवड करण्यात आली आहे. तुझा कौटुंबिक इतिहास सक्रिय राजकारणाचा नाही. असं असताना तू तुझी लैंगिक ओळख जाहीर करून, पक्षामध्ये या पदावरती आला आहेस. कोणता विचार करून तू हा निर्णय घेतला होतास?
अनिश : हा विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहेच. पण त्यामागे 10 वर्षांची कहाणी आहे. 2014 ला जेव्हा मी शाळेत होतो, तेव्हापासून राजकारणाची आवड होती. मला नेहमीच हे माहीत होतं की, राजकारणात काहीतरी तर करून दाखवायचंच आहे.
तेव्हा मी माझी ओळख सार्वजनिक केलेली नव्हती. त्यावेळी मला असं वाटायचं की स्वतःची लैंगिक ओळख सार्वजनिक करून, राजकारणात उतरणं शक्य नाही. पण, 2019 च्या निवडणुकीत मिलिंद देवरा आणि अशोक चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांसोबत काम करण्याची मला संधी मिळाली.
आता 2024 च्या निवडणुकीत माझे दोन मेंटॉर पक्ष बदलून वेगळीकडे गेले, पण विचारधारा ठाम ठेवून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गेलो.
तिथे मी माझ्यासाठी संधी मागितली आणि तिथे मला सुप्रिया ताई आणि पवार साहेबांनी संधी दिली. त्यावेळी मला लक्षात आलं की, राजकारणात जर काही बदल करायचे असतील, तर प्रत्यक्ष राजकारणात उतरून ते करावं लागेल आणि म्हणून मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील झालो. मी त्यांचा आभारी आहे की त्यांनी सरळ माझी राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून निवड केली.

फोटो स्रोत, X/@anishgawande
प्रश्न : तू तुझी लैंगिक ओळख उघड केलेली आहेस. तू गे आहेस. असं असताना तुला ही संधी मिळणं हे तुझ्यासाठी किंवा समुदायासाठी किती महत्त्वाचं आहे?
अनिश : माझी नियुक्ती झाल्यानंतरच्या एका आठवड्यात मला किमान 200 ते 300 कॉल आले असतील. संपूर्ण देशातून मला हे कॉल्स आणि त्यात लोकांनी मला सांगितलं, की तुझ्याकडे बघून आमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. तुझ्या उदाहरणावरून आम्ही प्रेरित झालो आहोत, आम्हीदेखील राजकारणात काहीतरी करू शकतो, असं आम्हाला वाटतं.
पण इथे मला हेही सांगायचं आहे की, माझ्या पक्षाने मला राष्ट्रीय प्रवक्तेपदाची जबाबदारी दिलेली आहे.
माझी लैंगिक ओळख हा त्या कामाचा एक भाग आहे. मला त्या ओळखीला माझ्या रस्त्यातले अडचण न मानून, ते वास्तव आहे याचा स्वीकार करून. माझ्या पक्षाने जो निर्णय घेतला आहे त्यासाठी मी त्यांचा कृतज्ञ राहीन. आणि म्हणून मला असं वाटतं की त्या दृष्टीने भारतातल्या राजकारणाचा दर्जा सुधारला आहे.
सुप्रिया ताई देखील म्हणतात की, मला 'महिला खासदार' म्हणू नका. आधी मी एक खासदार आहे आणि मी एक महिला देखील आहे. माझ्याही बाबतीत मला असं वाटतं की, माझ्या लैंगिक ओळखीपेक्षा ही जबाबदारी मोठी आहे.
आजच्या राजकारणात तुम्हाला अशा नेतृत्वाची आज गरज आहे, जे दाखवून देईल, की तुम्ही कुठून आला आहात? तुमचं कुटुंब राजकारणात आहे की नाही? याचा काहीही फरक पडत नाही. तुमच्यातले गुण बघून तुम्हाला संधी दिली जाईल. जर तिथे तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकला नाहीत तर तीच संधी नाकारली देखील जाईल.

फोटो स्रोत, X/@anishgawande
'LGBTQIA+ चळवळीला राजकीय ओळखीची गरज'
प्रश्न :तू आजवर ज्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचे प्रयत्न करत आलास. 2019ला तू तुझ्या दोन साथीदारांसोबत मिळून एक 'पिंक लिस्ट' तयार केली होतीस. ज्यामध्ये अशा राजकीय नेत्यांची यादी होती ज्यांनी LGBTQIA+ समुदायाचे प्रश्न मांडले. त्यांच्या काही मागण्यांना समर्थन दिलं होतं. हे राजकारणाशी संबंधित काम होतं. पण थेट राजकारणातलं नव्हतं. आता तू स्वतः राजकारणात उडी घेतली आहेस. तर मग आता समुदायासाठी काही गोष्टी करण्याचा मानस आहे का?
अनिश : आज आपल्याला समानतेच्या विचारधारेला पुढे न्यायची गरज आहे. LGBTQIA+ समुदायाच्या हक्कांचा प्रश्न हा मानवी हक्कांचा प्रश्न समजून त्यावर काम केलं पाहिजे. या मानसिकतेने LGBTQIA+ समुदायाच्या हक्कांसाठी काम करण्याची गरज आहे.
आज आपल्याकडे LGBTQIA+ समुदायाच्या जोडप्यांना कसलीही शासकीय मान्यता नाही. तुम्ही लग्न करू शकत नाही, तुमच्या नात्याला अधिकृत परवानगी दिली जात नाही, तुम्हाला एकत्र मिळून घर घ्यायचं असेल तर बऱ्याच अडचणी येतात, एवढंच नाही तुमचा जोडीदार दवाखान्यात उपचार घेत असेल तर तुम्हाला त्याला बघण्याची परवानगी मिळत नाही, कारण तुमच्या नात्याला अधिकृतरित्या मान्यता नसते. अशा भरपूर मुद्द्यांवर काम करणं गरजेचं आहे.
आमच्या पक्षाने मी पक्षात येण्यापूर्वी देखील या मुद्द्यांवर आवाज उठवला आहे. आणि आता मी आल्यानंतर देखील पक्ष या मुद्द्यांवर पुढाकार घेईलच.
आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात एक LGBTQIA+ आघाडी आहे. या समुदायासमोर एखादी अडचण आली तर दरवेळी न्यायालयाचं दार ठोठावणं हा एकच उपाय असू शकत नाही. या सामाजिक चळवळीला एक राजकीय ओळख निर्माण करणं गरजेचं आहे.
ती ओळख हळूहळू निर्माण होईलही, पण याबाबतीत आणखी बरंच काम होणं बाकी आहे. आज आपल्याला एका वैविध्यपूर्ण नेतृत्वाची गरज आहे. कारण आपला देश वैविध्यपूर्ण आहे.

प्रश्न : तू आता एका प्रमुख राजकीय पक्षात प्रवेश केला आहेस. कधीतरी असं वाटतं का की पक्षाबाहेर राहून सर्वच पक्षांशी सौहार्दाचे संबंध ठेवून, समुदायाच्या सबलीकरणासाठी प्रयत्न करणं गरजेचं होतं?
अनिश : नाही, मला असं वाटत नाही. कारण, महाराष्ट्राच्या राजकारणाची एक विशेष बाब म्हणजे, तुम्ही कोणत्याही पक्षात असलात तरी, तुम्ही सामाजिक मुद्द्यांवर चर्चेसाठी सगळ्याच पक्षांसोबत बसू शकता. याआधी देखील, राजकीय नसलेल्या सामाजिक मुद्द्यांवर सर्व पक्ष एकत्र आलेले आपण बघितले आहेत. अलीकडच्या राजकारणात संपूर्ण देशात जो बदल घडला आहे, की तुम्ही भाजपमध्ये असाल तर केवळ भाजपचेच मुद्दे मांडायचे, इतर पक्षात असाल तर त्याच पक्षाचे मुद्दे मांडायचे. हे चुकीचं आहे आणि त्यातही बदल व्हायला हवा.
प्रश्न : सध्या तुमच्या पक्षासाठी वेगळे मुद्दे महत्त्वाचे आहेत. त्यांच्या अस्तित्वाची लढाई सुरू आहे. हे सगळे मुद्दे असताना, येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये तू ज्या समुदायाचे प्रश्न मांडतो आहेस. त्या प्रश्नांना जागा मिळेल किंवा त्यांना तेवढंच महत्त्व दिलं जाईल?
अनिश : पक्षाचं प्राधान्य सगळ्याच गोष्टींना असतं. पण, माझ्यासाठी हे महत्त्वाचं आहे की माझा पक्ष अशी एखादी संरचना (फ्रेमवर्क) बनवू शकतो का? की ज्यामध्ये सगळ्या वर्गांना न्याय दिला जाऊ शकेल. आता, 'शिव-फुले-शाहू-आंबेडकर' ही विचारधारा बघितली तर असं लक्षात येईल की ही एक पुरोगामी विचारधारा आहे. ज्यामध्ये जाती, लिंग, लिंगभाव आणि इतर सगळ्याच उपेक्षित घटकांसाठी सामाजिक न्यायाची शक्यता निर्माण होते. यामुळे ती विचारधारा पुढे नेणं खूप गरजेचं आहे. आज आपल्याला आपल्या राजकीय कल्पनाशक्तीचा विस्तार करण्याची गरज आहे. तसं केलं तर त्यात सगळेच मुद्दे येतील, न्यायाचा समावेश होईल.
'दस साल से मैदान में है हम, हम कहाँ डरते है इससे?'
प्रश्न : सध्याच्या भारतीय राजकारणात अतिशय वैयक्तिक टीका केली जाते. राजकारणात काही वाक्प्रचार खूप रुळलेले आहेत, जसे की, बरेच राजकारणी म्हणतात की, 'आम्ही मर्द आहोत', 'आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत.' असे वाक्प्रचार सर्रास वापरले जातात, यातून कुणीतरी दुखावत असेल याचं भान देखील राहत नाही. हे भविष्यात तुझ्यासोबत देखील घडू शकतं, तुझ्यावर देखील अतिशय वैयक्तिक टीका होऊ शकते. याबाबत तुला काय वाटतं?
अनिश : 'दस साल से मैदान में है हम, हम कहाँ डरते है इससे?' मागच्या 10 वर्षात तुमची कातडी जाड झालेली असते, त्यामुळे अशा गोष्टींचा फरक पडत नाही. तुम्ही राजकारणात उतरणार असाल तर तुम्हाला हे ठाऊक असायला पाहिजे की बदल जेव्हा घडतो तेव्हा तो हळूहळू घडतो. हा बदल घडत असताना तुमच्याकडे भरपूर संयम असायला हवा. मी राजकारणात आल्याने उद्यापासून राजकारण बदलेल असं मला बिलकुल वाटत नाही.

फोटो स्रोत, X/@anishgawande
तुमच्याकडे तुमच्या वास्तवाबाबत आणि तुम्ही मिळवलेल्या गोष्टींबाबत एक नम्रता असायला हवी. तुम्ही जे काही करत आहात ती एकदम छोटी छोटी पावलं आहेत, याचं भान तुमच्याकडे असायला हवं. त्यामुळे जे माझ्यावर अशी वैयक्तिक टीका झाली तर मला दोन गोष्टी माहीत आहेत.
पहिली म्हणजे माझ्या पक्षाचा मला पूर्ण पाठिंबा आहे, त्यामुळे मला भीती वाटण्याची काही गरज नाही. दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्याने तुमच्यावर वैयक्तिक तिला केली तर तिचं उत्तर तुम्ही देखील वैयक्तिक टीका करूनच दिलं पाहिजे असं नाही. यात बदल होणं गरजेचं आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.












