You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
C-17 ग्लोबमास्टर : परदेशात अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेचं सारथी
2023 सालाची नुकतीच सुरुवात झाली होती. दिल्लीला लागून हिंडनमध्ये भारतीय हवाई दलाचा एअर बेस आहे. या एअर बेसवर हँगर्स, एअरस्ट्रिप आणि टेक्निकल गोष्टींची नियमित तपासणी सुरू होती.
तारीख होती 6 जानेवारी. तुर्कस्तानमध्ये भीषण भूकंप आला होता. या भूकंपाच्या बातम्यांनी जग हादरून गेलं होतं. असा भीषण भूकंप गेल्या अनेक दशकात झाला नसल्याचं म्हटलं जात होतं.
भारत सरकारने या आपत्तीबद्दल दु:ख व्यक्त करताना म्हटलं होतं की, "भारत कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी तयार आहे."
याच दरम्यान तयारी सुरू झाली होती. हिंडन एअरबेसवर काम करणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे, "आपल्याकडे सर्वात मोठे, सर्वोत्कृष्ट मालवाहक आणि रेस्क्यू करणारी C17 विमानं आहेत. कोणतंही लहान मिशन असो वा मोठं मिशन, हे विमान नेहमीच तयार असतं."
एकाबाजूला विमाने तयार होती, तर दुसरीकडे एनडीआरएफची टीम सुद्धा उड्डाण करायला सज्ज झाली होती. यांच्यानंतर मेडिकल टीम जाईल असं ठरलं.
दुसर्याच दिवशी भारताचं C17 विमान तुर्कस्तानच्या दिशेने झेपावलं. यात कित्येक टन मशिनरी, एनडीआरएफचे 46 कर्मचारी, तीन वरिष्ठ अधिकारी आणि एक डॉग स्क्वॉड होतं.
पुढचे कित्येक दिवस 'ऑपरेशन दोस्त' सुरूच होतं. यात भारतीय लष्कराच्या C-17 विमानांनी हजारो टनाची मदत सामग्री, डॉक्टरांची एक मोठी टीम, ऑपरेशन थिएटर, अनेक ट्रक, गाड्या असं सामान घेऊन तुर्कीच्या दिशेने डझनाच्यावर उड्डाणं केली.
C-17 ग्लोबमास्टर
दोन दिवसांपूर्वीही भारतीय हवाई दलाच्या C-17 ग्लोबमास्टर विमानाने सुदानमधून अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढलं आणि त्यांना हिंडन एअरबेसवर सुरक्षितपणे आणलं.
यात खास गोष्ट काय असेल तर हवाई दलाच्या एकमेव महिला पायलट 'हर राज कौर बोपराय' यांनी या मोहिमेत भाग घेऊन भारतीय हवाई दलाचं सर्वात मोठं विमान C17 ग्लोबमास्टर उडवलं.
2013 साली अमेरिकेकडून या C-17 ग्लोबमास्टर विमानाची खरेदी करण्यात आली. त्यावेळी 10 विमानांची किंमत पाच अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी होती. हे जहाज एका उड्डाणात 80 टन वजन उचलू शकतं. शिवाय 150 सशस्त्र सैनिकांना जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात नेऊ शकतं.
भारतीय हवाई दलाचे निवृत्त विंग कमांडर के एस बिश्त यांच्या मते, "हवाई दलात जेव्हा या विमानांची एंट्री झाली तेव्हा लष्करी टँक, जड आर्टिलरी सीमा भागात पोहोचवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती."
"त्यांची खासियत म्हणजे ते छोट्या धावपट्टीवर उतरू शकतात आणि सहज टेक ऑफ करू शकतात."
हवाई दलाचे तत्कालीन प्रमुख एनएके ब्राउन म्हणाले होते, "C-17 ग्लोबमास्टर कार्गो विमानाच्या येण्याने उत्तर आणि ईशान्येकडील सीमा आणखी मजबूत होतील."
C-17 ग्लोबमास्टरमध्ये विशेष असं काय आहे?
ऑगस्ट 2021 मध्येही C17 ग्लोबमास्टरने अशीच अभूतपूर्व कामगिरी केली होती. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये अडकलेल्या शेकडो भारतीय आणि अफगाण नागरिकांची सुटका केली होती.
अमेरिकेत तयार झालेल्या या विमानाच्या काही गोष्टी अतिशय खास आहेत. त्यामुळे हे विमान जगातील इतर मालवाहू विमानांपेक्षा आणखीन उजवं ठरतं.
- 53 मीटर लांबी आणि विंग्जसहित 51 मीटर रुंदी असलेलं हे विमान जगातील सर्वात मोठं विमान आहे.
- हे विमान 28,000 फूट उंचीवरून उड्डाण करू शकतं. एकदा इंधन भरल्यानंतर ते 2,400 मैल म्हणजेच 3,862 किलोमीटरपर्यंतचा प्रवास करतं.
- हे विमान 3,500 मीटरच्या छोट्या हवाईपट्टीवर देखील उतरवता येतं आणि त्याच्या क्रूमध्ये तीन सदस्य असतात.
भारतीय लष्कराने C-17 ग्लोबमास्टरचा जो सदुपयोग केलाय, त्यावर अमेरिकेने भारताचं कौतुक केलंय.
यूएस एअर फोर्सचे मेजर जनरल ज्युलियन चीटर यांनी फेब्रुवारीमध्ये म्हटलं होतं की, "भारताने ऑपरेशन दोस्तच्या माध्यमातून तुर्की आणि सीरियाला जी मदत केली आहे ती अत्यंत वाखणाण्याजोगी आहे. त्यांच्या C17 ग्लोबमास्टर विमानांनीही यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे."
C-17 ग्लोबमास्टर पुरेसे आहेत का?
भारतीय हवाई दल सध्या अमेरिकन आणि रशियन मालवाहू विमानांवर अवलंबून आहे.
अमेरिकेचं बोईंग C-17 ग्लोबमास्टर, अमेरिकेचं लॉकहीड मार्टिन C-130J, रशियाचं Ilyushin IL-76s आणि Antonov AN-32 ही विमानं भारतीय लष्कर आणि सीमेवर तैनात असलेल्या लाखो सैनिकांना रसद पुरवतात. ल
पण तज्ञांच्या मते, पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर लष्कराच्या गरजा वाढत आहेत.
डिफेन्स एक्सपर्ट मारूफ रझा म्हणतात की, "भारतीय सैन्याने चीन सीमेवर आपली रसद वाढवली पाहिजे आणि यामध्ये हवाई दलाची मालवाहू विमानं महत्त्वाची भूमिका बजावतील. कारण कमी वेळात आवश्यक आणि मोठ्या गरजा भागवण्यात त्यांची मदत होईल."
शिवाय लष्करापुढे आणखीन एक मोठं आव्हान आहे. ते म्हणजे, हवाई दलातील बहुतेक रशियन मालवाहू विमानं ही 1980 किंवा 90 च्या दशकाच्या सुरुवातीला खरेदी केलेली आहेत. आता त्यांच्या देखभालीचा खर्च जास्त आणि वेळखाऊ आहे.
भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग) यांच्या 2015 च्या अहवालातही आणखी मालवाहू विमानांची गरज असल्याचं म्हटलं होतं.
पण सध्या तरी एकामागून एक सुरू असलेल्या रेस्क्यू मिशनमध्ये भारताचा C17 ग्लोबमास्टर वरील विश्वास वाढल्याचं दिसतंय.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)