You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोव्हिएत युनियनने जेव्हा 269 प्रवासी असलेलं कोरियाचं विमान हवेतच नष्ट केलं...
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
31 ऑगस्ट 1983 च्या रात्री न्यूयॉर्कच्या जॉन एफ केनेडी विमानतळावर 23 वर्षीय निळ्या डोळ्यांची तरुणी एलिस एफराएमसन एब्ट हिने कोरियन एअरलाईन्सच्या सोल इथं जाणाऱ्या फ्लाईट 007 मध्ये बसण्याआधी वडील हाँस एफराएसन एब्ट यांना मिठी मारली.
हे विमान इंधन भरण्यासाठी अलास्कामध्ये एनकोरेजमध्ये थांबलं, तेव्हा एलिस वडिलांशी फोनवर बोलली. या विमानातील 61 अमेरिकन प्रवाशांमध्ये अमेरिकन काँग्रेसचे सदस्य लॅरी मॅक्डोनल्डही होते.
जेव्हा विमानाने सकाळी 4 वाजता एनकोरेजहून सोलच्या दिशेनं निघालं, त्यानंतर वैमानिकाने विमानाला ऑटोपायलट मोडवर टाकलं. वैमानिकांच्या गटाला अजिबात माहित नव्हतं की, ऑटोपायलट मोड काम करत नाहीय.
थोड्या वेळानं विमान आपल्या नियोजित मार्गावरून भरटकलं आणि सेव्हियत संघाच्या क्षेत्राच्या दिशेनं जाऊ लागलं. सोल जाण्याऐवजी विमान आता 245 डिग्री अंशात वळून तीरच्य दिशेने सेव्हियत संघाच्या पूर्वेकडील किनाऱ्याकडे जाऊ लागलं.
थोड्या वेळानं प्रवाशांना एडरेस सिस्टमवर एका वैमानिकाचा आवाज ऐकायला आला की, 'नमस्कार, आपण तीन तासात सोलच्या गिंपो आंतराष्ट्रीय विमानतळावर उतरू. आता सोलमध्ये सकाळचे तीन वाजले आहेत. विमान उतरण्याआधी आपण सगळे नाश्ता करू.'
मात्र, हे विमान सोलमध्ये कधीच उतरलं नाही.
कोरियन विमान नियोजित मार्गवरून 200 किमी भरकटला
26 मिनिटांनंतर विमानाचे कॅप्टन चुन बयंग इन यांनी 'इमर्जन्सी डिसेंट'ची घोषणा केली आणि विमानातील सगळ्यांना आपलं ऑक्सिजन मास्क परिधान करण्याची सूचना दिली. विमान जेव्हा सोव्हिएत युनियनच्या सीमेजवळ पोहोचलं, तेव्हा सोव्हिएत लष्करी तळांवरून या विमानावर नजर ठेवण्यास सुरुवात झाली.
या भागात अमेरिकेचं हेरगिरी करणारं बोईंग आरसी 135 विमान पहिल्यापासूनच फिरत होतं. ते विमान अगदी बिनलष्करी विमान दिसत होतं.
त्यावर इलेक्ट्रॉनिक टोही गिअर लावण्यात आले होते आणि हे विमान प्रवासी विमानांच्या मार्गाजवळच फिरत होतं. जोपर्यंत कोरियन एअरलाईन्सचं फ्लाईट 007 सोव्हिएत युनियनच्या सीमेच्या जवळ पोहोचलं, तेव्हा ते नियोजित मार्गापासून 200 किलोमीटर दूर पोहोचलं होतं.
रशियाच्या डोलिन्स्क सोकोल विमानतळाच्या कमांडरनी तातडीने दोन सुखोई एसयू 15 लढाऊ विमानं या विमानाला रोखण्यासाठी पाठवली.
सेव्हियत वैमानिक कर्नल गेनाडी ओसीपोविच यांनी 1988 मध्ये दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, "मी बोईंग 747 च्या विमानाला पाहू शकत होतो, ज्यात डबल डेकर खिडक्या होत्या. लष्करी मालवाहू विमानांना अशा प्रकारच्या खिडक्या नसतात. माझ्या मनात शंका आली की, हे कुठ्या प्रकारचे विमान आहे? मात्र, माझ्याकडे विचार करण्यासाठी वेळ नव्हता.
मला माझं काम करायचं होतं. मी त्या विमानाच्या वैमानिकाला आंतरराष्ट्रीय कोडचा सिग्नल देऊन सांगू लागलो की, त्याने आमच्या हवाई हद्दीचं उल्लंघन केलंय. मात्र, त्याच्याकडून काहीच उत्तर आलं नाही."
अमेरिकन टोही विमान आरसी 135 आधीपासूनच सक्रीय
सोव्हिएत लेफ्टनंट वेलेन्टिन वेरेनिकोव यांनी सांगितलं की, सोव्हिएत वायूसेनेनं चमकणाऱ्या ट्रेसर्स फायर करून कोरियन वैमानिकाला सतर्क करण्याचा प्रयत्न केला.
हवाई क्षेत्राविषयक जाणकार पीटर ग्रियर यांनी 1 जानेवारी 2013 रोजी एअरफोर्स मॅगझिनमध्ये 'द डेथ ऑफ कोरियन एअरलाईन्स फ्लाईट 007' नावाचा लेख लिहिलाय.
यात ते लिहितात, "जवळपास त्याच वेळी अमेरिकन वायूसेनेचं आरसी-135 विमानही त्याच भागात घिरट्या घालत होतं. टोही इलेक्ट्रॉनिक उपकरणांनी युक्त या विमानावर कामचाकटा भागात सेव्हियत रक्षण व्यवस्थेची हेरगिरी करण्याची जबाबदारी देण्यात आली होती."
"या प्रकारच्या अभियानांमध्ये अमेरिकन विमान सोव्हिएत सीमेजवळ जात असत. मात्र, ते सतर्कता बाळगत असत की, सीमा पार केली जाणार नाही. अशाच एका वेली सोव्हिएत एअर ट्राफिक कंट्रोलरचा गैरसमज झाला की, कोरियन प्रवासी विमान सुद्धा अमेरिकेचं हेरगिरी करणारं विमान आहे.
सोव्हिएत संघाने या विमानाला इंटरसेप्ट करण्यासाठी चार मिग 23 विमान पाठवले. मात्र, या विमानांमध्ये पुरेसं इंधन नव्हतं. त्यामुळे त्यांना पुन्हा आपल्या तळांवर परतावं लागलं."
कोरियन विमानातून रेडिओद्वारे संपर्क केल्यावर दोन वेगवेगळे वक्तव्य
तिकडे 007 च्या कॉकपिटमध्ये वैमानिकांना याचा अंदाज नव्हता की, सोव्हिएत विमानही त्यांच्यासोबत उडत आहेत. सुरुवातीला कोरियन विमान कामचाकटाच्या क्षेत्राला पार करत आंतरराष्ट्रीय समुद्री भागात आलं. मात्र, जेव्हा दुसऱ्यांदा सोव्हिएत नियंत्रणाच्या क्षेत्रात घुसलं, तेव्हा सोव्हिएत वायूसेनेला वाटलं की, हे विमान एखाद्या लष्करी मोहिमेचा भाग आहे.
सोव्हिएत वायूसेना याआधीच या भागात अमेरिकन नौसेनेच्या जहाजांच्या सरावामुळे त्रस्त होती आणि त्याच दिवशी त्या भागात काही मिसाईल्सचं परीक्षणही केलं जाणार होता. त्यामुळे सोव्हिएत सैन्य 'पहिलं शूट करा, नंतर प्रश्न विचारा' या मोडमध्ये गेले होते.
नंतर आंतरराष्ट्रीय हवाई उड्डाण संघटनेच्या अहवालात म्हटलंय की, "सोव्हिएत विमानांनी कोरियन विमानाला रेडिओवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला नाही. सोव्हिएत वैमानिकांनी बिनलष्करी विमानाला इंटरसेप्ट करण्यासाठी आयसीएओच्या सूचनांचं पालन केलं नाही."
मात्र, सोव्हिएत वैमानिकांचं म्हणणं होतं की, त्यांनी इमर्जन्सीसाठी रिझर्व्ह रेडिओ फ्रिक्वेन्सींवर कोरियन विमानशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, कोरियन विमानांच्या कॉकपिटमध्ये त्यावेळी कुणीच ते ऐकत नव्हतं.
जेव्हा टोकियोच्या एअर ट्राफिक कंट्रोलने कोरियन विमानाला 35 हजार फूटांच्या उंचीवर जाण्यासाठी सांगितलं आणि त्यांनी त्याचं पालन केलं, तेव्हा सोव्हिएत अधिकाऱ्यांना काहीच शंका राहिली नाही की, हे विमान त्यांच्या विमानांपासून बचावासाठी वरच्या दिशेला जात आहे आणि त्याचवेळी ठरलं की, या विमानाला सोव्हिएत सीमेच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही.
ओसीपोविच सांगतात की, "मला विमानाला नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले होते. मी माझं लक्ष्य पूर्ण केलं."
एका सेव्हियत कमांडरने नंतर स्वीकारलं की, त्यांना त्या विमानाला कुठल्याही स्थितीत पाडण्याचे आदेश होते. मग ते सोव्हिएत सीमेच्या बाहेर निघून आंतरराष्ट्रीय सीमेअंतर्गत गेले तरी चालेल.
मिसाईल लागल्यानंतर कोरियन विमान 12 मिनिटांपर्यंत उडत राहिलं...
9 सप्टेंबरला मार्शल निकोलाई ओगरकोव्ह यांनी मॉस्कोमध्ये पत्रकार परिषद घेऊन स्वीकारलं की, "एका विमानाला सोव्हिएत क्षेत्रात पाडलं गेलं आहे, कारण त्याला पाडण्याशिवाय आमच्याकडे काहीच पर्याय नव्हता. मग ते विमान आरसी 135 असो वा बोईंग 747 असो, हे विमान निश्चित पद्धतीने लष्करी मिशनवर होते."
त्यानंतर सोव्हिएत संघाने कधीही बाहेरील जगाला सांगितलं नाही की, त्यांनी विमानाचे अवशेष, फ्लाईट डेटा रेकॉर्डर किंवा मृत्युमुखी पडलेल्यांचे प्रेतं मिळाली की नाही.
या विमानातील प्रवाशांच्या नातेवाईकांना कधीच मृतदेह हाती लागले नाहीत. जेव्हा शीतयुद्ध संपलं, तेव्हा सोव्हिएत संघाचं विघटन झालं. त्यानंतर 007 फ्लाईटबद्दल काही माहिती समोर आली.
1992 मध्ये उच्चस्तरीय बैठक झाली. त्यानतर कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरमधील संवाद जारी करण्यात आलं. त्यानंतर लोकांना पहिल्यांदा कळलं की, कोरियन विमान हवेतच नष्ट झालं होतं.
टोकियोच्या वेळेनार सकाळी 3 वाजून 26 मिनिटांनी ओसीपोविच यांनी दोन हवेतच मारा करणाऱ्या एए-3 मिसाईल कोरियन विमानावर डागल्या. सेव्हियत मिसाईलचे काही तुकडे विमानाच्या मागच्या भागात लागले होते, ज्यावरून विमानाचे चार हायड्रोलिक सिस्टममधील तीन नष्ट झाले होते. मात्र, तरीही केबिनमध्ये प्रेशर कमी झालं नव्हतं आणि विमानाच्या चारही इंजिनांनी उड्डाण सुरूच ठेवलं होतं.
ओसीपोविच यांनी खाली कंट्रोल रूमला संदेश पाठवला होत की, 'द टार्गेट इंज डिस्ट्रॉईड'. मात्र, विमान तोपर्यंत नष्ठ झालं नव्हतं. विमान मिसाईलच्या माऱ्यानंतरही पुढची 12 मिनिटं उडत राहिलं होतं. वैमानिकांनी विमानावर नियंत्रण ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न केला.
मात्र, विमाना सखालीनच्या पश्चिममध्ये मोनेरॉन द्वीपच्या जवळील समुद्रात कोसळलं होतं आणि त्यातील सर्व प्रवासी समुद्रात बुडून मृत्युमुखी पडले.
विमान 1600 फूट खाली गेलं
मात्र, 12 मिनिटांपर्यंत संकटाशी झुंज दिल्यानंतरही कोरियन विमानानं कुठलाही 'मे डे' संकेत पाठवले नव्हते.
सेमर हर्श त्यांच्या 'द टार्गेट इज डिस्ट्रॉईड' या पुस्तकात लिहितात की, "मिसाईल हल्ल्याच्या 40 सेकंदांनंतर फ्लाईट 007 ने टोकियो एअर ट्रॅफिक कंट्रोलला संदेश पाठवला होता, ज्यातील काही शब्द नीट ऐकू येत होते. रॅपिड कंप्रेशन... एंड डिसेंडिंग टू वन झिरो थाऊजंड, म्हणजेच आम्ही विमानाला एक हजार फूटांवर घेऊन जात आहोत, जिथे प्रवाशी डिप्रेशराइज्ड हवेत श्वास घेऊ शकतात."
मात्र, विमानावर मिसाईलनं हल्ला झाल्याचं माहित होतं की नाही, याबाबतचे संकेत त्यात नव्हते. जपानच्या रडार ट्रॅकिंगद्वारे लक्षात येतं की, केएएल 007 पुढच्या चार मिनिटांपर्यंत 16 हजार फूट खाली आलं होतं. त्या उंचीवर वैमानिकानं विमानाच्या वेगाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र, तोपर्यंत विमान त्याच्या नियंत्रणाच्या बाहेर गेलं होतं. शेवटच्या टप्प्यात वैमानिक इंजिनच्या शक्तीचा वापर करून संकट टाळण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, तोपर्यत फार उशीर झाला होता.
अमेरिकेनं कठोर शब्दात नोंदवला निषेध
जेव्हा विमान पाडल्याची बातमी अमेरिकेत पोहोचली, तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी या घटनेला 'नरसंहार' आणि 'मानवतेविरोधातील गुन्हा' म्हटलं. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉर्ज शुल्ट्ज यांनी पत्रकार परिषद घेऊन सेव्हियतच्या कारवाईचा निषेध नोंदवला.
राष्ट्रपती रोनाल्ड रेगन यांनी देशाला संबोधून संदेश प्रसारित केला आणि त्यात त्यांनी सेव्हियत वैमानिक ओसीपोविच यांची ऑडिओ टेप ऐकवली, ज्यात ते सांगत होते की, विमानाचा पेटता दिवा दिसत होता.
त्यानंतर तातडीने सोव्हिएत राजनैतिक अधिकाऱ्यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालायत जाऊन जॉर्ज शुल्ट्झ यांना सांगितलं की, त्यांनी विमानला सोव्हिएत क्षेत्रात येऊ नये असा इशारा दिला होता.
त्यानंतर विमान दुर्घटनाग्रस्त झाला. सोव्हिएत नेते युरी आँद्रोव्ह यांनी उलटा आरोप अमेरिकेवरच केला की, अमेरिकेनं कोरियन विमानाचा वापर हेरगिरीसाठी केला. ही घटना शीतयुद्धाच्या अखेरच्या टप्प्यात सर्वात भयंकर घटना मानली गेली. प्रश्न उपस्थित होतो की, सेव्हियत संघाच्या मिसाईल्सनी या प्रवासी विमानाला का निशाणा बनवलं?
पीटर ग्रियर यांनी त्यांच्या 'द डेथ ऑफ कोरियन एअरलाईन फ्लाईट 007' मध्ये लिहिलंय की, "नॅशनल सिक्युरिटी एजन्सीला इंटरसेप्टवरून कळलं की, सोव्हिएत संघाने वास्तवात या विमानाला एक हेरगिरी करणारं विमान आरसी-135 समजलं. कारण हे विमान त्याच काळात सखालिनच्या किनारी भागात घिरट्या घालत होतं."
हेरगिरी विषयक इतिहासकार मॅथ्यू एम. एड यांचंही म्हणणं आहे की, त्या दिवसांमध्ये सोव्हिएत वायू संरक्षण व्यवस्थेचा स्तर खालावला होता.
एड यांनी त्यांच्या 'द सिक्रेट सेंटरी'मध्ये लिहिलंय की, "केएएल विमानाला पाडल्यानंतर सर्वात मोठी गोष्ट समोर आली ती म्हणजे सोव्हिएत हवाई सुरक्षा व्यवस्थेचं काम अत्यंत वाईट होतं."
अनेक कॉन्स्परन्सी थियरी समोर
या घटनेच्या 30 वर्षांनंतर घटनेशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली. मात्र, एका प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही, की त्या घटनेतील मृतदेहांचं काय झालं?
रशिया दावा करते की, त्यांना एकही मृतदेह सापडला नाही. या दरम्यान आलेल्या काही कॉन्स्पिरन्सी थियरीमध्ये म्हटलं गेलंय की, सेव्हियत संघाने या विमानामधील प्रवाशांना वाचवलं होतं आणि अनेक वर्षे त्यांना ओलीस ठेवलं.
2001 मध्ये प्रकाशित झालेल्या बर्ट शलॉसबर्ग यांच्या 'रेस्क्यू 007'मध्ये दावा करण्यात आला की, या प्रवाशांना सायबेरियाच्या तुरुंगात बंद ठेवलेलं पाहण्यात आलं होतं.
मात्र, फ्लाईट 007 मधील प्रवाशांची पुढे काही दशकं प्रतिनिधित्त्व करणारी वकील हुआनीता मडोल यांचं म्हणणं आहे की, अनेक लोक या थिअरीवर विश्वास ठेवू इच्छित आहेत, मात्र या थिअरीला दुजोरा देणारे पुरावे सापडत नाहीत.
दुसऱ्या एका थिअरीत म्हटलंय की, सेव्हियत लोकांनी जाणीवपूर्वक मृतदेह नष्ट केलं. जेणेकरून घटनेचे कुठलेही पुरावे सापडू नयेत. मात्र, मडोल म्हणतात, हे सर्व केवळ अंदाज आहेत.
वैमानिकाची चूक
नागरी उड्डाण संघटनेच्या अहवालात या घटनेसाठी कोरियन एअरलाईन्सच्या वैमानिकाला दोषी ठरवण्यात आलं. मात्र, वैमानिक चुन ब्युंग इन अनुभवी वैमानिक होते आणि 1972 पासून कोरियन एअरलाईन्सचे विमान ते उडवत होते.
प्रसिद्ध पत्रकार सेमर एम हर्ष त्यांच्या 'द टार्गेट इज डिस्ट्रॉईड'मध्ये लिहितात की, "त्यांचा सेफ्टी रेकॉर्ड चांगला होता. याआधी ते तीनवेळा दक्षिण कोरियन राष्ट्राध्यक्ष चुन दू ह्यान यांच्या सरकारी प्रवासाचे बॅकअप पायलट म्हणून निवडले गेले होते.
कॅप्टन चुन एनकोरेज आणि सोल यादरम्यान 83 वेळा फ्लाईटचं सारथ्य केलं होतं. त्यांचे साथीदार पायलट सन डॉन्ह ह्रिन यांचं वय 47 होत आणि ते आधीच्या चार वर्षांपासून कोरियन एअरलाईन्ससोबत होते आणि बोईंग 747 विमानावर 3500 तास त्यांनी घालवले होते."
ऑटोपायलटमध्ये गडबड
कॉकपिट इन्फर्मेशन सिस्टमच्या नासाचे माजी विशेषज्ज्ञ आसफ देगानी यांनी त्यांच्या 'टेमिंग एचएएल डिझायनिंग इंटरफसेज बियाँड 2001' मध्ये लिहिलंय की, "ऑटोपायलट बहुतेक हेडिंग मोडमधअये होतं.
ही सेटिंग विमानाच्या मॅग्नेटिक कम्पासनुसार उड्डाणाचे आदेश दिले होते, ज्याची अधिक उचीवर गेल्यावर शुद्धता 15 टक्क्यांनी बदलू शकते. असं म्हटलं जातं की, या ऑटोपायलट मोडच्या कारणामुळेच विमान सेव्हियत हवाई क्षेत्रात जाऊन पोहोचलं."
"जर कम्प्युटराईज्ड इनरशियल नेव्हिगेशन सिस्टम (INS) अंतर्गत ऑटोपायलटवर विमान उडत असतं तर विमानानं दुसरा मार्ग निवडला असता. ते सोव्हिएत हवाई सीमेवळ जरूर पोहोचलं असतं, मात्र सीमेच्या आता घुसलं नसतं. कदाचित कोरियन एअरलाईन्सचे पायलटकडून चूक झाली की ते समजत राहिले, आयएनएस मोडमध्येच विमान उडतंय."
बोईंग 747 ऑटोपायलट मोडमध्ये उडत असताना यासाराखी समस्या आली नव्हती. अशाप्रकारच्या घटना त्यापूर्वी अनेकदा घडल्या होत्या, ज्यावेळी आयएनएस नेव्हिगेशन मोड निवडला गेला. मात्र, तरीही आयएनएसने सिस्टमने काम केलं नाही.
मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांची स्मरणार्थ स्मारक
या घटनेच्या पाच वर्षांनंतर याच प्रकारच्या घटनेत अमेरिकेच्या यूएसएस विंसेनेस विमानाने तेहराहून दुबईला जताना इराण एअरच्या एअरबस ए-300 विमानाला पाडलं होतं.
अमेरिकेच्या नौसेनेने चुकीने या विमानाला लढाऊ जेट समजून त्याला निशाणा केला. या घटनेत 290 प्रवासी आणि वैमानिक मारले गेले. केएएल विमान दुर्घटनेत मारले गेलेल्या लोकांचं सन्मानानं रशियाच्या सखालिन द्वीपवर एक छोटं स्मारक बांधलं गेलं.
याच प्रकराचे जपानमध्ये वक्कानाईमध्येही त्यांच्या आठवणीत 90 फूट उंच मीनार बांधली गेली, जिथे समुद्र किनाऱ्यावर वाहून आलेल्या त्यांच्या काही वस्तूही ठेवण्यात आल्या होत्या.
या मीनारमध्ये मृत्युमुखी पडलेल्या 269 जणांची आठवण पांढऱ्या दगडावर 269 आणि काळ्या संगमरवावर 2 तुकडे लावण्यात आले आहेत,ज्यावर सर्व प्रवाशांची नावं लिहिण्यात आली आहेत.
कोरियन विमान 007 चे अवशेष आता सखालीनजवळील समुद्रात आहेत, जे अजूनही सापडले नाहीत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)