लिबिया : चक्रीवादळ आणि धरणफुटी एकाचवेळी, 20 हजार जणांच्या मृत्यूची भीती

लीबिया पूर

फोटो स्रोत, REUTERS/Esam Omran Al-Fetori

    • Author, ल्युसी फ्लेमिंग
    • Role, बीबीसी न्यूज

लिबियामध्ये चक्रीवादळ आणि धरणफुटी यांच्यामुळे हाहाकार माजला आहे. येथील डर्ना या शहरात मृतांचा आकडा 2300 ची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती एका मंत्र्याने बीबीसीला दिली.

या दुर्घटनेत हजारो नागरिक अजूनही बेपत्ता असून एकूण मृत्यूची आकडेवारी ही 20 हजार इतकी असू शकते, अशी भीती वर्तवली जात आहे.

“मी जे पाहिलं त्यामुळे मला धक्का बसला. ही तर त्सुनामीसारखी परिस्थिती आहे,” हिशम चिक्वॉट यांनी ही माहिती दिली.

डर्ना येथे लोकसंख्या 1 लाखाच्या आसपास आहे. दोन धरणं फुटल्याने आणि चार पूल कोसळल्याने हे शहर पाण्याखाली गेलं आहे.

लिबिया

फोटो स्रोत, AFP

डॅनिअल असं या चक्रीवादळाचं नाव आहे. हे वादळ रविवारी लिबायात आलं. बेनघाझी, सुझा आणि अल-मर्ज या पूर्वेकडील शहरांनासुद्धा या वादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे.

डर्ना येथील दक्षिण भागातील एक धरण फुटल्याने शहरातला बहुतांश भाग पाण्याखाली गेला आहे अशी माहिती चिक्वॉट यांनी बीबीसी न्यूजअवरला दिली आहे.

“बराचसा भाग उद्धवस्त झाला आहे. पीडितांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ती दर तासाला वाढत आहे. सध्या 1500 लोकांचा मृत्यू झाला आहे. 2000 लोक बेपत्ता आहेत. आमच्याकडे एकदम ठोस आकडा नाही पण हे खूप मोठं संकट आहे.” ते म्हणाले. या धरणाची बऱ्याच काळापासून देखभाल झाली नसल्याची माहितीही त्यांनी दिली.

तत्पूर्वी या शहराचा एक चतुर्थांश भाग दिसेनासा झाल्याची माहिती त्यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिली.

तामेर रामदान हे International Federation of Red Cross and Red Crescent Socities (IFRC) चे अध्यक्ष आहेत. मृतांचा आकडा प्रचंड असल्याचं त्यांनी सांगितलं.

ट्युनिशिया येथून व्हीडिओ लिंकवरून बोलताना ते म्हणाले, “आमच्या टीम्स प्रत्यक्ष परिस्थितीचं अवलोकन करत आहेत. आत्ता आमच्याकडे ठोस आकडा नाही. आतापर्यंत 10 हजार लोक बेपत्ता आहेत.”

लिबिया

फोटो स्रोत, AFP

पूर्वेसारखंच मिश्राता या पश्चिमेकडील शहराला देखील या पुराचा फटका बसला आहे.

लिबियामध्ये 2011 मध्ये गदाफी यांची सत्ता उलथवल्यावर आणि हत्या करण्यात आल्यानंतर राजकीय उलथापालथ सुरू आहे. त्यामुळे तिथे सरकारचं विभाजन झालं आहे.

एक अंतरिम सरकार, एक राजधानीतलं सरकार आणि एक पूर्वेकडलं सरकार अशी तीन सरकारं तिथे आहेत.

तिथल्या स्थानिक पत्रकारांच्या मते या परिस्थितीमुळे तिथे बचावकार्याला अतिशय अडचणी येत आहेत.

“तिथे कोणतीही बचावपथकं नाहीत. कोणीही प्रशिक्षित व्यक्ती नाहीत. गेल्या 12 वर्षांपासून तिथे फक्त युद्धजन्य परिस्थिती आहे,” त्यांनी बीबीसीला सांगितलं.

“लिबियामध्ये दोन सरकारं आहेत. त्यामुळे तिथे येणाऱ्या मदतीचा वेग कमी झाला आहे. लोक मदतीसाठी याचना करत आहेत पण मदत येत नाहीये.”

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)