वादळामुळे वणवा भडकला आणि अख्खं शहर बेचिराख झालं

हवाई

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, संकलन - जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

पॅसिफिक महासागरातला स्वर्ग. अमेरिकेच्या हवाई द्वीपसमूहाची हीच ओळख मानली जाते. पण पर्यटकांची आवडती ही बेटं आता तिथे भडकलेल्या वणव्यामुळे चर्चेत आहेत.

हवाईच्या माऊई बेटावरचं लहायना हे अख्खं शहर या वणव्यात बेचिराख झालं आहे.

एका वादळामुळे ही आग कशी भडकली, त्यातून आपण काय शिकू शकतो, जाणून घेऊया.

वादळानं वणवा असा भडकला

कुठलाही वणवा भडकण्यासाठी तीन गोष्टींची आवश्यकता असते.

पहिलं म्हणजे इंधन अर्थात लाकूड, सुकं गवत, सुकलेला पाला, अशा जळणाऱ्या गोष्टी.

दुसरं म्हणजे ठिणगी जी मानवी किंवा नैसर्गिक कारणांनी पडलेली असू शकते.

तिसरं म्हणजे वारा, ज्यामुळे आग आणखी पेट घेते.

हवाई बेटांवरची ही विनाशकारी आग नेमकी कशामुळे लागली, याचा तपास अजून सुरू आहे.

पण हा वणवा कोरडं, उष्ण वातावरण आणि वादळी वारे यांमुळ जास्त पसरला आहे, यावर बहुतांश तज्ज्ञांचं एकमत झालंय.

हवाईमध्ये 2008 पासून पावसाचं प्रमाण कमी होत गेलं आहे आणि यंदा तिथे 80 टक्के भाग नेहमीपेक्षा जास्त कोरडा आहे अशी माहिती यूएस ड्रॉट मॉनिटर या अमेरिकेतल्या दुष्काळावर नजर ठेवणाऱ्या संस्थेनं दिली आहे.

हवाई

कोरड्या, उष्ण वातावरणात झाडांमधली आणि जंगलातली ओल शोषून घेतली जाते. त्यामुळे ती लवकर पेट घेतात.

म्हणूनच उन्हाळ्याच्या दिवसांत किंवा कोरड्या वातावरणात वणवे जास्त भडकण्याची शक्यता जास्त असते.

हवाईमध्ये एकीकडे हवा एवढी कोरडी झालेली असतानाच हरिकेन डोरा या चक्रीवादळामुळे हवाईत वाऱ्यांनीही वेग घेतला होता.

हे हरिकेन डोरा इतकं ताकदवान आहे, की त्यानं आता आंतरराष्ट्रीय डेटलाईन ओलांडून पश्चिम पॅसिफिक महासागरात प्रवेश केला आहे, म्हणजेच हरिकेनचं आता टायफूनमध्ये रुपांतर झालंय.

हवाई

खरंतर हे वादळ हवाईच्या दक्षिणेला 1,100 किलोमीटर दूरवरून गेलं तरीही या परिसरात ताशी 100 किलोमीटरहून अधिक वेगानं वाऱ्याचे झोत वाहात होते.

त्याचा अंदाज NOAA च्या उपग्रहानं टिपलेल्या व्हीडियोतून येतो.

हवाईमध्ये केवढं नुकसान झालं आहे?

4-5 ऑगस्टपासून हवाईच्या माऊई या सर्वांत मोठ्या बेटावर लहान-मोठे वणवे पेटले.

8 ऑगस्टला लहायना या ऐतिहासिक शहराजवळ पहिल्यांदा वणवा पेटला. ही आग एवढ्या वेगानं पसरली की अख्खं शहर बेचिराख झालं.

हवाई

हवाईत आगीसाठी रेड फ्लॅग वॉर्निंग देण्यात आली होती, पण अनेकांना सुरक्षित जागी पोहोचण्याचा वेळही मिळाला नाही.

एरवी संकटकाळी वॉर्निंग देणारे भोंगे इथे वाजलेच नाहीत.

या आगीत 90 हून अधिक जणांचा मृत्यू झालाय. शेकडो घरं, गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

लहायनामधल्या 150 वर्ष जुन्या वडाच्या झाडाचंही आगीनं नुकसान झालंय.

हवाई

जगभरात वणव्यांचं प्रमाण का वाढलं?

खरंतर हवाईत एवढे मोठे वणवे भडकण्याच्या घटना नेहमी घडत नाहीत. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे किंवा वीज पडून आग लागली, तरी ती अशी आक्राळविक्राळ होऊन वेगानं पसरणं हेही क्वचितच घडतं.

पण अलीकडच्या काही दशकांत इथे आग लागण्याचं आणि ती पसरण्याचं प्रमाण वाढल्याचं तज्ज्ञ सांगतात.

बरं हे फक्त हवाईतच होतंय असं नाही. जुलै 2023 मध्ये ग्रीसमध्येही मोठे वणवे पेटले होते. तिथे यंदा उष्णतेच्या विक्रमी लाटांची नोंद झाली होती आणि त्यानं या वणव्यात भर पडली.

हवाई

त्याआधी मार्चमध्ये भारतात गोव्यातल्या महादेईच्या जंगलातही मोठा वणवा पेटला होता. या प्रत्येक आगीमागची कारणं वेगवेगळी आहेत.

काही घटनांमागे मानवी हात असण्याचीही शक्यता आहे. पण उष्ण आणि कोरड्या हवामानामुळे हे सगळे वणवे वेगानं पसरल्याचं दिसलं.

आता दुष्काळाचं प्रमाण असो वा वाऱ्यांचा वेग या दोन्ही गोष्टींचा थेट संबंध हवामान बदलाशी आहे.

जगभरात तापमान वाढतंय, तसं उष्णतेच्या लाटांचं प्रमाण वाढतंय. परिणामी वणवे वेगानं पसरण्याचा धोका वाढतो आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार हवामान बदलाचे परिणाम जसे तीव्र होत जातील तसं वणव्यांचा धोका 50 टक्क्यांनी वाढेल. अगदी आर्क्टिक प्रदेशातही मोठे वणवे भडकू लागले आहेत.

जिथे आजवर एवढे मोठे वणवे पेटले नव्हते, तिथेही हा धोका निर्माण होत असल्याचं तज्ज्ञ सांगतात. आणि हीच गोष्ट जगातल्या प्रत्येकानं लक्षात ठेवायला हवी. अशा कुठल्याही संकटाचा सामना करण्याची तयारी ठेवायला हवी.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)