मुअम्मर गद्दाफी : आपल्या सुरक्षेसाठी 'या' हुकूमशहाने बाळगला होता सुंदर-कुमारिका अंगरक्षकांचा ताफा

मुअम्मर गद्दाफी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मुअम्मर गद्दाफी
    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी

"जर ब्रिटनच्या महाराणी पन्नास वर्षांहून अधिक आणि थायलंडचा राजा 68 वर्षं राज्य करू शकतात, तर मी का नाही?"

असा प्रश्न विचारणाऱ्या कर्नल मुअम्मर गद्दाफीनं लिबियावर तब्बल 42 वर्षं राज्य केलं.

गद्दाफी जेव्हा सत्तेवर आला तेव्हा व्हिएतनाम युद्ध सुरू होतं, माणसानं चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं होतं आणि अमेरिकेचे राष्ट्रपती होते रिचर्ड निक्सन. तेव्हापासून गद्दाफी सत्तेवरून पायउतार होईपर्यंत अमेरिकेनं सात राष्ट्राध्यक्ष आणि ब्रिटनने आठ पंतप्रधान पाहिले.

2011 मध्ये लिबियात झालेल्या उठावात गद्दाफीची सत्ता उलथवून लावली गेली. पण 1969 साली सत्तेवर आलेल्या या हुकूमशहानं एकेकाळी निरंकुश सत्ता राबवली होती.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन त्याचा उल्लेख 'मॅड डॉग' असा करायचे. त्याचं युनिक स्टाईल स्टेटमेंट, सदैव सोबत असलेलं महिला अंगरक्षकांचं पथक, स्वतःच्या सुरक्षेबाबत असलेली अनैसर्गिक भीती...अशा अनेक गोष्टींच्या बातम्या बनल्या होत्या.

लिबियाची राजकीय सत्ता आणि त्याअनुषंगाने तिथल्या तेलसाठ्यांवर नियंत्रण मिळवणाऱ्या गद्दाफीचा हा सगळा प्रवास कसा होता? रक्ताचा एक थेंबही न सांडता लिबियात सत्तांतर घडवणारा गद्दाफी, स्वतःला नवीन राजकीय तत्वज्ञानाचा प्रणेता मानणारा गद्दाफी ते हुकूमशहा गद्दाफी ही 42 वर्षांची वाटचाल होती कशी?

लिबियातील लष्करी उठाव

1969 साली लिबियामध्ये लष्करी उठाव झाला. या उठावात रक्ताचा थेंबही न सांडता लिबियाचा राजा इदरीस याची सत्ता उलथवली गेली.

त्यावेळी लिबियाची राजधानी त्रिपोलीमध्ये राहणारे अशर शम्सी यांनी सांगितलं होतं, "मी गाढ झोपेत होतो. माझ्या बहिणीनं मला जागं केलं- ऊठ, ऊठ. लष्करानं बंड केलंय. मी रेडिओ सुरू केला. त्यावर देशभक्तीपर गाणी वाजत होती आणि जोरजोरात घोषणाबाजी सुरू होती. मी कपडे करून बाहेर गेलो.

लिबियाचं महत्त्वपूर्ण स्थान
फोटो कॅप्शन, लिबियाचं महत्त्वपूर्ण स्थान

जेव्हा मी सिटी सेंटरला पोहोचलो, तेव्हा बरेचसे लोक रस्त्यांवर जमा झाले होते. ते लोक लिबिया आणि क्रांतीच्या घोषणा देत होते. सत्ता नेमकी कोणाला मिळाली आहे, हेच लोकांना माहीत नव्हतं. नेमकं काय झालंय हे जाणून घेण्याची उत्सुकता मलाही होती."

जवळपास आठवड्यानंतर लिबियातील लोकांना कळलं की, या उठावाचं नेतृत्व 27 वर्षांच्या मुअम्मर गद्दाफीनं केलं होतं. आकर्षक आणि रुबाबदार व्यक्तिमत्त्वाचा गद्दाफी तेव्हा एक लष्करी अधिकारी होता.

इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष गमाल अब्दुल नासेर यांना तो मानायचा. (या लष्करी उठावानंतर त्याने नासर यांच्याप्रमाणेच आपला लष्करी हुद्दा कॅप्टनवरून कर्नल केला होता...त्यानं स्वतःच स्वतःला बढती दिली होती.)

सत्तेवर आल्यानंतर गद्दाफीचं प्राधान्य हे पाश्चात्य देशांच्या आर्थिक वर्चस्वाचा वारसा झुगारून लावणं हा होता.

इजिप्तचे दुसरे राष्ट्राध्यक्ष गमाल अब्देल नासर यांच्याबरोबर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इजिप्तचे दुसरे राष्ट्राध्यक्ष गमाल अब्देल नासर यांच्याबरोबर

इजिप्तमध्ये नासरसाठी सुवेझ कालवा हे त्या वारशाचं मूर्त रूप होतं, तर गद्दाफीसाठी होतं...तेल.

लिबियामध्ये 1950च्या शेवटी तेलाचे प्रचंड साठे सापडले होते. पण जमिनीतून हे तेल काढण्याची मक्तेदारी होती परदेशी पेट्रोलियम कंपन्यांची. या कंपन्या त्यांच्या देशातील ग्राहकांच्या फायद्याचा विचार करून तेलाच्या किमती ठरवायच्या आणि महसूलातला निम्मा वाटा स्वतःकडं ठेवून फायदाही लुटायच्या.

गद्दाफीनं या कंपन्यांसोबत नव्यानं करार करण्याची मागणी केली आणि जर त्यांनी हे ऐकलं नाही तर या कंपन्यांचं उत्पादन बंद केलं जाईल अशी थेट धमकीही दिली.

सुएझ कालवा
फोटो कॅप्शन, सुएझ कालवा

त्यानं या कंपनीच्या अधिकाऱ्यांना थेट सुनावलं, "जे लोक 5 हजार वर्षं तेलाशिवाय राहिले आहेत, ते आपले न्याय्य अधिकार मिळवण्यासाठी अजून काही काळही तेलाशिवाय राहू शकतात."

त्याच्या या धमकावणीचा परिणाम झाला आणि लिबिया हा पहिला असा देश ठरला, ज्याला स्वतःच्या देशातल्या तेलातून मिळणाऱ्या आर्थिक फायद्यामध्ये हिस्सा मिळायला लागला. लिबियाचा हाच धडा इतर तेल उत्पादक देशांनीही गिरवला आणि 1970 नंतर अरब देशातील 'पेट्रो बूम' सुरू झाली.

गद्दाफीची राजवट

1970 साली गद्दाफीनं त्याचं राजकीय तत्त्वज्ञान मांडणारं प्रसिद्ध 'ग्रीन बुक' प्रसिद्ध केलं.

गद्दाफी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 'कर्नल' मुअम्मर गद्दाफी

आपण आपली स्वतंत्र राजकीय थिअरी मांडत आहोत, असं भासविणाऱ्या गद्दाफीनं सुरूवातीला आपण व्यक्तिपूजेच्या विरोधात आहोत, हेच ठासून सांगितलं. पण हळूहळू तो स्वतःचं स्वतःच्या प्रेमात असलेला निरंकुश हुकूमशाह बनत गेला.

गद्दाफीचं चरित्र लिहिणाऱ्या डेव्हिड ब्लंडी आणि अँड्र्यू लिसेट यांनी आपल्या गद्दाफी अँड लिबियन रिव्होल्यूशन या पुस्तकात लिहिलंय, 'गद्दाफी जेव्हा पहिल्यांदा सत्तेवर आले तेव्हा एका जुन्या खटारा 'फोक्स वॅगन'मध्ये फिरायचे. तो आणि त्याची पत्नी तिथल्या सुपर मार्केटमध्ये स्वतः खरेदी करायचे. मात्र नंतर हे सगळं बदलत गेलं.

नंतर जेव्हा तो 'अजीजिया बॅरेक्स'मधून निघायचा तेव्हा हत्यारबंद गाड्यांचा ताफा दोन वेगवेगळ्या दिशांना सुसाट सुटायचा. एक ताफा असा असायचा ज्यामध्ये स्वतः गद्दाफी असायचा आणि दुसरा असायचा इतरांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी...तिच परिस्थिती हवाई प्रवासाचीही असायची. दोन विमानं उड्डाणं करायची. ज्या विमानातून गद्दाफीला प्रवास करायचा असायचा, ते दोन तासांनंतर उतरवलं जायचंय.'

गद्दाफी

फोटो स्रोत, Getty Images

'या उतरलेल्या विमानात मग गद्दाफी बसायचा. या सगळ्या कसरतीचा हेतू हा असायचा की, जर विमानात एखादा बॉम्ब वगैरे ठेवला असेल तर तो गद्दाफी विमानात बसण्याआधीच त्याचा स्फोट होईल आणि गद्दाफीला कोणताही धोका राहणार नाही. एकदा त्यांनी ट्यूनिशियामध्ये संदेश पाठवला की, तो तिथे कारमधून पोहोचेल. तिथलं सगळं मंत्रिमंडळ हे त्यांच्या स्वागतासाठी सीमेवर पोहोचलं. नंतर कळलं की, गद्दाफी सुरक्षेच्या कारणांमुळे विमानानं ट्युनिसला पोहोचले.'

"जेव्हा ते विमान उतरण्याआधी हवाई अड्ड्यावरील कंट्रोल रूमनं विचारलं की, विमानात कोण आहे? तेव्हा पायलटनं गद्दाफीचं नाव घेतलं नाही. एवढंच सांगितलं- आमच्या विमानात एक अति महत्त्वपूर्ण व्यक्ती आहे."

स्वतःच्या सुरक्षेबद्दलचा विक्षिप्तपणा

प्रत्येकच राष्ट्रप्रमुखाच्या सुरक्षेची काळजी घेतली जातच असते, पण गद्दाफी आपल्या सुरक्षेबद्दल अतिजागरूक असायचा. त्याची ही दक्षता नंतर नंतर विक्षिप्तपणाच्या पातळीपर्यंत पोहोचली होती.

लिंड्सी हिल्सम यांनी आपल्या 'सँड स्टॉर्म-लिबिया इन द टाइम ऑफ रिव्होल्यूशन' या पुस्तकात लिहितात, "2009 साली अमेरिकेचे राजदूत जीन क्रेंट्ज यांनी एका राजनयिक बैठकीत गद्दाफीच्या युक्रेनियन नर्स गेलिना कोलोत्निस्कावर ते कसे अवलंबून आहेत, याचा उल्लेख केला होता. गेलीना गद्दाफीची प्रेयसी आहे, असंही म्हटलं जायचं."

राजधानी त्रिपोली मधल्या घरात

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राजधानी त्रिपोली मधल्या घरात

"गद्दाफी ज्या गोष्टीला हात लावणार असेल ती निर्जंतुक केली गेली असेल याची काळजी ती घ्यायची. त्यांच्या खुर्चीवर कीटकनाशकही फवारले जायचे आणि त्याचा मायक्रोफोनही निर्जंतुक केला जायचा."

"गद्दाफी जेव्हा परदेशात जायचा तेव्हा हॉटेलमध्ये आपल्यासोबत नेलेल्या चादरीच अंथरायचा.

त्याच्याबद्दलची अशीच एक गोष्टही गाजली होती- जेव्हा गद्दाफी एका मोठ्या अरब नेत्याला भेटायला गेला, तेव्हा त्याच्याशी हस्तांदोलन करण्यापूर्वी त्याने पांढऱ्या रंगाचा ग्लोव्ह घातला...स्वतःला कोणताही संसर्ग होऊ नये म्हणून."

गद्दाफीचा महिला अंगरक्षकांचा ताफा

गद्दाफीची स्वतःची जीवनशैली ग्लॅमरस होतीच. त्याच्या या प्रतिमेत भर टाकायचा त्याचा महिला अंगरक्षकांचा ताफा...

गद्दाफीचा हा 'फक्त महिलां'चा अंगरक्षकांचा ताफा 'अॅमेझोनियन गार्ड' म्हणून ओळखला जायचा. हे त्यांचं अधिकृत नाव नव्हतं...तर पाश्चिमात्य जगातील पत्रकारांनी त्यांना हे नाव दिलं होतं.

गद्दाफीच्या महिला अंगरक्षक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गद्दाफीच्या अंगरक्षक

या बायकांची निवड गद्दाफी स्वतः करायचा आणि या सगळ्यांनी कुमारिका असणं गरजेचं होतं.

लिबियात जेव्हा बायका सार्वजनिक ठिकाणी वावरताना हिजाब घालून फिरायच्या, त्यावेळी गद्दाफीच्या या सुरक्षारक्षक लिपस्टिक लावून, उंच टाचांचे शूज, दागिने घालून असायच्या.

पण या देखणेपणा, नजाकतीसोबतच त्यांना मार्शल आर्ट्स आणि शस्त्रास्त्रं चालवण्याचं अतिशय कठोर प्रशिक्षण घ्यावं लागायचं. त्यासाठी स्पेशल अॅकेडमीही होती.

अधिकृपणे या गार्डमध्ये समावेश होण्याआधी त्यांना त्यांच्या सगळ्या प्रशिक्षणाचं प्रात्यक्षिक द्यावं लागायचं...ज्यामध्ये फायटर जेट्स आणि समोरासमोरच्या लढाईचा समावेश होता.

अर्थात, या हॉलिवूडच्या सिनेमात शोभणाऱ्या ब्रिगेडची काळी बाजूही होती.

गद्दाफी आणि यासर अराफात

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गद्दाफी आणि यासर अराफात

जेव्हा जनतेचा उठाव सुरू झाल्यानंतर गद्दाफी अज्ञातवासात गेला, तेव्हा त्याच्या याच महिला अंगरक्षकांपैकी अनेक जणींनी समोर येत आपल्यावर बलात्कार झाल्याचा आरोप केला.

बेनगाझीमधल्या मानसशास्त्रज्ञ सेहम सेर्जेव्हा या अॅमेझोनियन गार्डपैकी काही जणांशी बोलल्या होत्या. त्यांपैकी काहीजणींनी सांगितलं की, त्यांच्यावर अगदी वीस जणांनीही बलात्कार केला होता...कधीकधी तर हा अत्याचार मुलं आणि पतीसमोर झाले. एका अठरा वर्षांच्या मुलीने आपल्यावर वडिलांसमोर बलात्कार झाल्याचं सांगितलं होतं.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षानं म्हटलं होतं 'मॅड डॉग'

1986 मध्ये बर्लिनमधल्या एका नाइट क्लबमध्ये स्फोट झाला. हा क्लब बर्लिवमधल्या अमेरिकर सैनिकांकडून वापरला जायचा. या स्फोटात दोन सैनिक आणि एक नागरिक मारला गेला. अनेक जण जखमी झाले. यामागे लिबियन एजंट्सचा हात असल्याचं म्हटलं गेलं.

युगांडाचे नेते इदी अमिन दादा यांच्याबरोबर मुअम्मर गद्दाफी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, युगांडाचे नेते इदी अमिन दादा यांच्याबरोबर मुअम्मर गद्दाफी

गद्दाफीनं त्याच्या कारकिर्दीत लिबियातल्या आणि लिबियाबाहेरच्याही अनेक कट्टरतावादी गटांना फंडिंग केलं होतं. पण या हल्ल्यामागे लिबियाच असल्याचा कोणताही ठोस पुरावा नव्हता.

त्यामुळे बर्लिनमधल्या या स्फोटानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी त्रिपोली आणि बेनगाझीमध्ये हवाई हल्ले केले.

या हल्ल्यांचा उद्देश हा 'मध्य आशियातल्या पिसाळलेल्या कुत्र्याला' (mad dog of the Middle East) ठार करणं हा होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन गद्दाफीला याच नावानं बोलवायचे.

या हल्ल्यात गद्दाफीची दत्तक घेतलेली मुलगी मारली गेली.

त्यानंतर 21 सप्टेंबर 1988 साली झालेल्या एका घटनेनंतर गद्दाफीची जगभर बदनामी झाली.

फ्रँकफर्टवरून डेट्रॉइटला जाणाऱ्या पॅन-अॅम विमानात स्कॉटलंडमधल्या लॉकरबी इथं हवेत असतानाच स्फोट झाला. या स्फोटात 243 लोक मारले गेले.

गद्दाफी

फोटो स्रोत, AFP

नंतर झालेल्या चौकशीतून या स्फोटात लिबियाचा हात असल्याचं समोर आलं.

अबू सलीम जेलमधला गोळीबार ज्यात 1270 लोक मारले गेले

ज्या देशाची सत्ता गद्दाफीनं बंड करून हस्तगत केली होती, तिथल्या त्याच्या राजवटीच्या क्रौर्याचे किस्सेही हळूहळू बाहेर येऊ लागले.

आपल्या विरोधकांना सार्वजनिक ठिकाणी फासावर लटकवलं जाऊ लागलं.

त्याकाळी त्रिपोलीमध्ये राहणाऱ्या बाशेश शेखावी यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं होतं, "एक दिवस आम्ही जेव्हा विद्यापीठात पोहोचलो, तेव्हा त्याच्या प्रवेशद्वारावर चार लोकांना फासावर लटकवलं होतं.

मुअम्मर गद्दाफी

फोटो स्रोत, Getty Images

मी आजतागायत ते दृश्य विसरू शकलो नाही. विद्यापीठाच्या गेटवर एक मोठं पोस्टर लागलं होतं, त्यावर काही विद्यार्थ्यांनी रातोरात काळं फासलं. गद्दाफीनं ठरवलं की, या विद्यार्थ्यांना धडा शिकवायला हवा. त्यांनी या मुलांना गेटवरच फासावर लटकवलं गेलं."

1996 मध्ये गद्दाफीच्या सैनिकांनी त्रिपोलीतल्या अबू सलीम तुरुंगातल्या कैद्यांना एकत्र करून त्यांच्यावर गोळ्या चालवल्या. 'ह्यूमन राइट्स वॉच'ने या गोळीबारात 1270 कैदी मारले गेले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कैद्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या मृत्यूबद्दल कळवलं नाही.

14 वर्षं या कैद्यांचे नातेवाईक तुरुंगात जात होते, पण त्यांना कधीही कोणी हे सांगितलं नाही की, तुमची व्यक्ती आता या जगात नाही.

प्रभावशाली महिलांबद्दल होता आदर

खूप कमी लोकांना हे माहिती आहे की, गद्दाफींना जगातील प्रभावशाली महिलांबद्दल अतिशय आदर होता.

लिंडसी हिल्सन त्यांच्या पुस्तकात लिहितात, "एकदा त्यांनी एका इंटरव्ह्यूच्या शेवटी महिला पत्रकाराला म्हटलं होतं- तुम्ही अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री मेडलीन अलब्राइट यांच्यापर्यंत माझा एक संदेश देऊ शकता का?"

या संदेशात म्हटलं होतं की, माझ तुमच्यावर प्रेम आहे. जर तुम्हालाही माझ्याबद्दल हेच वाटत असेल तर तुम्ही पुढच्यावेळी टेलिव्हिजनवर येताना हिरव्या रंगाचा पोशाख घालून या.

कोंडोलिसा राइस यांच्यासोबत मुअम्मर गद्दाफी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कोंडोलिसा राइस यांच्यासोबत मुअम्मर गद्दाफी

जॉर्ज बुश यांच्या कार्यकाळात परराष्ट्र मंत्री असलेल्या कोंडोलिसा राइस यांचाही गद्दाफींवर प्रभाव होता. त्यांच्या अपरोक्ष त्यांचा उल्लेख ते 'माय आफ्रिकन प्रिन्सेस' असाच करायचे.

राइस यांनी आपल्या 'नो हायर ऑनर' या पुस्तकात लिहिलं आहे, "गद्दाफी त्यांच्या पाहुण्यांना एका विशेष तंबूत भेटायचे. पण 2008 साली जेव्हा मी त्यांना तंबूत भेटायला नकार दिला, तेव्हा ते मला त्यांच्या घरी घेऊन गेले. तिथे मला जगभरातील नेत्यांसोबतचा माझ्या फोटोंचा त्यांनी केलेला संग्रह दाखवला. मी ते फोटो पाहात होते, तेव्हा त्यांनी म्युझिक सिस्टीमवर एक इंग्रजी गाणं लावलं- ब्लॅक फ्लॉअर इन द व्हाइट हाऊस."

भारतासोबतचे संबंध

भारतासोबत कर्नल गद्दाफीचे संबंध हे एकसारखे राहिले नाहीत. ते कधी चांगले असायचे, तर कधी वाईट.

गद्दाफी आणि फ्रान्सचे तत्कालीन अध्यक्ष जॅक शिरॅक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गद्दाफी आणि फ्रान्सचे तत्कालीन अध्यक्ष जॅक शिरॅक

गद्दाफी कधी भारतात आले नाहीत, पण 1983 साली दिल्लीमध्ये झालेल्या अलिप्ततावादी राष्ट्रांच्या संमेलनात भाग घेण्यासाठी गद्दाफीने आपल्या दुसऱ्या क्रमांकाच्या सहकाऱ्याला दिल्लीला पाठवलं.

ते इथं आल्यावर एका वादात अडकले होते. ज्येष्ठ पत्रकार केपी नायर यांनी 'टेलिग्राफ़' या वर्तमानपत्रात लिहिलं की, संमेलनात भाग घेतल्यानंतर अहदेल सलाम जालौद हैदराबादला गेले, तिथे त्यांनी 'प्रोटोकॉल' तर तोडलाच, पण स्वतःची सुरक्षाही धोक्यात घातली. जेव्हा त्यांचा ताफा चार मीनारसमोर पोहोचला, तेव्हा ते कारमधून उतरून नाचायला लागले.

"त्यांचा हा फोटो भारतीय वर्तमानपत्रात छापला गेला. भारत आणि लिबियाचे संबंध बिघडायला सुरुवात झाली. पण गद्दाफींना माहीत होतं की, इंदिरा गांधींचं मन कसं वळवायचं. त्यांची दुसरी पत्नी सफिया फरकाश अल ब्रजाई यांना इंदिरा गांधींशी बोलणी करण्यासाठी दिल्लीला पाठवलं."

गद्दाफी कुटुंबियांसोबत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गद्दाफी कुटुंबियांसोबत

जेव्हा गद्दाफींची पत्नी दिल्लीला आली, तेव्हा लिबियामध्ये अर्जुन असरानी भारताचे राजदूत होते.

अर्जुन असरानी तेव्हाची आठवण सांगताना म्हणतात, "माझी पत्नी मिसेस गद्दाफींना सोडण्यासाठी त्रिपोलीच्या विमानतळावर गेली. त्यांनी तिला परत आल्यावर तुम्हाला भेटेन असं सांगितलं. गद्दाफींची पत्नी जेव्हा दिल्लीत पोहोचल्या, तेव्हा त्यांना राष्ट्रपती भवनात थांबविण्यात आलं. जेव्हा त्या इंदिरा गांधींना भेटल्या तेव्हा त्यांनी सांगितलं- जोपर्यंत मी तुम्हाला लिबियाला येण्यासाठी तयार करत नाही, तोपर्यंत लिबियात परत येऊ नको असं माझ्या पत्नीने मला सांगितलं आहे. बऱ्याच विचारानंतर इंदिरा गांधींनी लिबियाला जाण्याचं आमंत्रण स्वीकारलं."

"जेव्हा परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी मला विचारलं की, या बदल्यात आपण लिबियाकडून काही मागू शकतो का? तेव्हा त्यांनी म्हटलं की- दोन भारतीय मजूर हे केवळ पाच ग्रॅम अफू बाळगण्याच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. कारण तिथले कायदे कठोर आहेत. जर मिसेस गद्दाफींनी प्रयत्न केले तर त्यांना माफीच्या आधारे सोडलं जाऊ शकतं. सफिया गद्दाफी जेव्हा लिबियात पोहोचल्या, त्याचक्षणी त्या दोन भारतीय मजुरांना सोडण्यात आलं."

गद्दाफीचा शेवट

गद्दाफीची प्रतिमा जगभरात कशी होती, यापेक्षाही लिबियातील लोकांच्या नजरेतही गद्दाफी काय होता, हे महत्त्वाचं आहे.

संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत

लिबियाच्या लोकांसाठी गद्दाफीचा सर्वांत मोठा गुन्हा हा परदेशातील कारवाया आणि भ्रष्टाचारात देशाचा पैसा उडवणं हा होता.

2010 साली लिबियाची लोकसंख्या सहा दशलक्ष होती आणि केवळ तेलातून मिळणारं त्यांचं वार्षिक उत्पन्ना होतं 32 अब्ज अमेरिकन डॉलर्स.

लिबियातल्या बहुसंख्य लोकांना असं वाटत होतं की, या उत्पन्नाच्या तुलनेत आपली जीवनशैली मात्र मागासलेल्या लोकांप्रमाणेच आहे. बेरोजगारीचा दर हा 30 टक्के किंवा त्यापेक्षा जास्तच होता.

लिबियामधल्या समाजवादामुळे लोकांना मोफत शिक्षण, आरोग्यसुविधा, सवलतीच्या दरात घरं, वाहतूक वगैरे मिळाली. पण सर्वसामान्यांचं उत्पन्न हे अतिशय कमी होतं आणि परकीय गुंतवणुकीतून आलेला नफा हा ठराविक वर्गाच्याच हातात असायचा.

गद्दाफी

फोटो स्रोत, Getty Images

1999 साली गद्दाफीनं लॉकरबी इथं झालेल्या स्फोटांची जबाबदारी घेतली. 2003 साली जेव्हा अमेरिकेनं इराकविरोधात युद्ध पुकारलं तेव्हा लिबियानं आपण आपला आण्विक आणि जैविक अस्त्रांचा कार्यक्रम सोडून देत असल्याचं जाहीर केलं. त्याच्या या दोन्ही कृती अतिशय चक्रावून टाकणाऱ्या होत्या.

त्याच्या राजवटीच्या शेवटच्या वर्षामध्ये गद्दाफीच्या राजकीय वारशाचा प्रश्न निर्माण झाला. त्याची दोन्ही मुलं खुलेआम एकमेकांसमोर उभी ठाकली आणि वडिलांनी आपल्यालाच निवडावं म्हणून एकमेकांशी स्पर्धा करायला लागले.

पण 2010 ते 2012 च्या काळात जेव्हा ट्यूनिशियातून हुकूमशाहीविरोधातली 'अरब स्प्रिंग' सुरू झाली , तेव्हा लिबियन जनताही गद्दाफीच्या चाळीस वर्षांच्या राजवटीविरोधात उभी राहिली.

लिबियातील उठावाची पहिली काही दृश्यं बेनगाझीमधून समोर आली...इथले तरूण शासकीय इमारतीसमोरचा हिरवा पुतळा पाडत होते. हा तोच पुतळा होता, जो क्रांतिनंतर गद्दाफीनं लिहिलेल्या 'ग्रीन बुक'मधल्या तत्वांचं प्रतीक होता.

विमानातून उतरताना गद्दाफी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दमास्कस विमानतळावर विमानातून उतरताना गद्दाफी, मागे महिला अधिकारी

या उठावाचं लोण शहराशहरांत पसरत गेलं. लोक गद्दाफीचे पोस्टर फाडायला लागले आणि तो सत्तेवरून पायउतार व्हावेत म्हणून जोर धरायला लागले. गद्दाफीला विरोध करणारे नॅशनल ट्रान्सिशनल कौन्सिलच्या (NTC) नावाखाली एकत्र आले.

ज्यावेळेस राजधानी त्रिपोली पडली, तेव्हा गद्दाफी लपून बसला...त्याही स्थितीत त्याचा दावा होता की, 'माझे' लोक माझ्या पाठीशी आहेत आणि या घुसखोरांविरोधात आपल्याला लवकरच यश मिळेल.

सलग 42 वर्षं राज्य करणाऱ्या हुकुमशहाची प्रतिमा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सलग 42 वर्षं राज्य करणाऱ्या हुकुमशहाची प्रतिमा बंडखोरांनी फक्त धुळीस मिळवली नाही तर त्याच्या मृत्यूनंतरच ते शांत झाले.

पण असं काही झालं नाही आणि त्याची हुकूमशाही राजवट कोसळली... NTC ला जेव्हा गद्दाफी सापडला तेव्हा तो एका भुयारात दडला होता.... 20 ऑक्टोबर 2011 ला गद्दाफीचा मृत्यू झाला...त्याचा मृत्यू नेमका कसा झाला हे कळलंच नाही...तो चकमकीत मारला गेला की त्याला मृत्यूदंड सुनावला गेला? त्याला रस्त्यावर खेचून आणलं आणि जमावानं त्याची हत्या केली? या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)