अॅडॉल्फ हिटलरने त्याच्या पक्षासाठी स्वस्तिकचं चिन्ह का निवडलं?

फोटो स्रोत, Alamy
- Author, जॉनी विल्किस
- Role, बीबीसी हिस्टरी
प्राचीन काळापासून स्वस्तिक हे एक महत्त्वाचं धार्मिक चिन्ह राहिलेलं आहे. काही धर्मांमध्ये स्वस्तिक हे नशीब, अमर्याद सृजन, असीम यश आणि सूर्य यांचं चिन्ह महत्त्व मानलं जातं.
पण नाझी पक्षाने हे चिन्ह का वापरलं?
पवित्र स्वस्तिकामधील स्थित्यंतर एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपासून सुरू झालं, असं इतिहासकार माइल्स रसेल यांनी लिहिलं आहे. तुर्कस्तानातील हिसार्लिक इथे पुरातत्त्वीय उत्खननात स्वस्तिक सापडलं, तेव्हापासून ही स्थित्यंतराची कहाणी सुरू झाली.
जर्मन पुरातत्त्वज्ञ हेनरिख श्लिएमान यांच्या मते ट्रॉयचं युद्ध या भागात झालं.
तिथे विविध मानवनिर्मित वस्तूंवर स्वस्तिकाचं चिन्ह असल्याचं श्लिएमान यांना दिसलं. सहाव्या शतकातील जर्मन मातीच्या भांड्यांवर याचसारखं चिन्ह असल्याचंही त्यांनी केलेल्या निरीक्षणात आढळलं. धर्मपूर्व काळातील हे एक महत्त्वाचं सार्वत्रिक ऐतिहासिक चिन्ह होतं, असं मत श्लिएमान मांडतात.
दुर्दैवाने याच दरम्यान अस्तित्वात आलेल्या जर्मनीतील काही अकादमिक अभ्यासकांनी व राष्ट्रवाद्यांनी ही संकल्पना पुढे नेली. युरोपात व आशियामध्ये स्वस्तिकाचा प्रसार होण्याला आर्यांचा महान वंश जबाबदार आहे, असं मानलं जाऊ लागलं.
1920च्या दशकारंभी स्वस्तिक हे जर्मन राइशचं (जर्मन साम्राज्याचं) चिन्ह झालं. वंशभेदाच्या संकल्पनेशी जोडल्या केलेल्या स्वस्तिकाला पाश्चात्त्य राष्ट्रांमध्ये आज तीव्र विरोध होतो. पण पूर्वेकडील हिंदू व बौद्ध समुदायांमध्ये हे चिन्ह धार्मिक कारणांमुळे लोकप्रिय आहे.
प्रदीर्घ इतिहास असलेलं स्वस्तिक या धर्मांमध्ये चांगल्या नशिबाचं व श्रद्धेचं प्रतीक म्हणून वापरलं जातं. पण विसाव्या शतकात स्वस्तिक हे द्वेष आणि भयाचं चिन्ह झालं होतं. हे कसं काय घडलं?
तुर्कस्तानात हिसार्लिक इथलं ट्रॉय शहर
ग्रीक पुराणकथांमध्ये ट्रॉय शहर कुठे आहे हे शोधण्यात हेनरिख श्लेइमन यांना रस होता. होमरच्या महाकाव्यांमधून आपल्याला या शहराच्या काही खुणा सापडतील, असं त्यांना वाटत होतं.

फोटो स्रोत, STEVEN HELLER
होमरच्या 'इलियड' या ग्रंथापासून त्यांनी 1868 साली भूमध्य समुद्राचा शोध घ्यायला सुरुवात केली. या शोधाला अनेक वर्षं झाली तरी काही हाती न लागल्यामुळे त्यांनी प्रयत्न थांबवण्याचा निर्णय घेतला.
त्याच वेळी हौशी ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ फ्रँक काल्वर्ट यांनी श्लिएमान यांना एक सल्ला दिला. तुर्कस्तानातील एजिअन किनारपट्टीवरील हिसार्लिक या भागात चर खणून पाहावं, असं काल्वर्ट यांनी सुचवलं.
श्लिएमान यांनी 1870च्या दशकात या जागेवर उत्खनन सुरू केलं. त्यातून हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास समोर आला आणि ट्रॉयचं प्राचीन शहर इथे असल्याचं जाहीर करण्यात आलं.
स्वस्तिक - एक धार्मिक चिन्ह
पण श्लिएमान यांनी आधी कल्पना केलेल्या ट्रॉय शहरापेक्षा उत्खननातून समोर आलेला इतिहास वेगळा होता. इथे मोठ्या प्रमाणात सोन्याचे, चांदीचे व काश्याचे दागिने सापडले. हे त्यांच्या अपेक्षेपेक्षा खूपच जास्त होतं.
इथे त्यांना क्रॉससारखं एक वळणदार चिन्ह सापडलं आणि त्याची 1800 विवरणं सापडली.
श्लिएमान यांच्या संशोधनाचे निष्कर्ष व्यापक प्रमाणात पसरले. अनेकांनी स्वस्तिक हे धार्मिक चिन्ह म्हणून अनुसरायला सुरुवात केली. युरोपात व उत्तर अमेरिकेत सर्वत्र हे चिन्ह आढळलं.
जाहिरातींमध्येसुद्धा स्वस्तिक दिसू लागलं, बांधकामांदरम्यान स्वस्तिकासमोर प्रार्थना होऊ लागली, पदकं आणि पट्ट्यांवरही स्वस्तिक अवतरलं. आइस हॉकीपासून ते बास्केटबॉलपर्यंत, विविध खेळांमधील संघांची नावं स्वस्तिकावरून ठेवली जाऊ लागली. हे चिन्ह नशिबाची व यशाची खूण ठरलं.
त्याच वेळी स्वस्तिकाच्या प्रदीर्घ इतिहासाने जर्मन राष्ट्रवाद्यांचंही लक्ष वेधून घेतलं. आपण 'आर्य' या उच्च वंशाचे आहोत, अशा कल्पित मांडणीवर जर्मनांचा विश्वास बसू लागला. ही धारणा विसाव्या शतकापर्यंत टिकून होती.
त्या वेळी नाझी पक्षाचा उदयोन्मुख नेता असणाऱ्या अॅडॉल्फ हिटलरासुद्धा हा सिद्धान्त आवडला. कालांतराने या सिद्धान्ताने आणखी भयंकर रूप घेतलं.

फोटो स्रोत, Getty Images
हिटलरने त्याच्या पक्षाचं व चळवळीचं चिन्ह म्हणून 1920 साली स्वस्तिकाचा स्वीकार केला. त्यामुळे हे द्वेषाचं, भयाचं, वंशभेदाचं, जनसंहाराचं आणि दुष्ट प्रवृत्तीचंही चिन्ह झालं.
काहीच वर्षांमध्ये पवित्र स्वस्तिकाच्या नावाला काहीसा बट्टा लागला. हजारो वर्षं अनेक संस्कृतींसाठी एक महत्त्वाचा आधार असणारे हे चिन्ह आता विपरित अर्थाने ओळखलं जाऊ लागलं. वास्तविक स्वस्तिक हा शब्द संस्कृतमधून आलेला असून 'भरभराट होवो' असा त्याचा अर्थ होतो.
स्वस्तिकाचा इतिहास काय आहे?
स्वस्तिकाचा इतिहास सुमारे 15 हजार वर्षांचा आहे. युक्रेनमध्ये 1908 साली सापडलेल्या एका हस्तिदंताच्या खेळण्यावर स्वस्तिकासारख्या खुणा होत्या. हे चिन्ह कदाचित सुफलतेसाठीसुद्धा वापरलं जात असावं, असा संशोधकांचा अंदाज आहे.
स्वस्तिकाची रचना पहिल्यांदा कशी वापरात आली, याबद्दल खात्रीने काही सांगता येत नसलं, तरी एक सुंदर भौमितिक आकार म्हणून स्वस्तिक वापरात आलं. पूर्व युरोपातील काही निओलिथिक कालखंडातील संस्कृतींमध्येसुद्धा स्वस्तिक सापडतं. या संस्कृती सुमारे सात हजार वर्षं जुन्या आहेत.
इल्यिरन संस्कृतीमध्ये सूर्याचं चिन्ह म्हणून स्वस्तिकाचा वापर होतो. मेसोपोटमियातील नाण्यांवरसुद्धा स्वस्तिक आढळतं. ग्रीसमध्ये भांड्यांवर आणि कपड्यांवर स्वस्तिक असायचं.

फोटो स्रोत, Alamy
रोममधील नक्षीदार खडकांवरसुद्धा स्वस्तिक होतं. लंडनमध्ये 1857 साली सापडलेल्या लोहयुगातील बॅटेरसी शिल्डवर 27 स्वस्तिकं आहेत.
परंतु, त्या आधी, सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी ब्रिटिनमधील योर्कशायर आमि इल्कली मूर इथे ही चिन्हं सापडली होती.
ख्रिस्ती धर्मात स्वस्तिकाचं स्थान
युरोपात सर्वत्र स्वस्तिक वापरलं जात होतं, याचे पुरावे आहेत. गॅमाडियन व फिफ्लोट अशीही नावं त्यासाठी वापरली जात. काही वेळा त्याचं धार्मिक चिन्ह म्हणून चित्रण झाल्याचंही दिसतं.
ख्रिस्ती चित्रांमध्ये येशूला क्रूसावर चढवतानाचा प्रसंग म्हणजे मृत्यूवर त्याने मिळवलेला विजय मानला जातो. परंतु, डाव्या बाजूला असणारं स्वस्तिक म्हणजे हातोडा असल्याचंही वर्णन केलं जातं.
मध्ययुगातील प्रसिद्ध चिन्ह असलेलं स्वस्तिक बाराव्या शतकांमधील चर्चवरील आकृत्यांमध्येसुद्धा स्पष्टपणे दिसतं. ऑस्ट्रियातील लांबाख आबे या शाळेत हिटलर शिकला, तिथल्या खडकांवर स्वस्तिकाचं चिन्ह होतं.
उत्तर आफ्रिकेतील अनेक संस्कृतींमध्ये हे चिन्ह आढळतं. आधुनिक इथिओपियातील, तसंच दक्षिण व मध्य अमेरिकेतील मयान, आझ्तेक व कुना सभ्यतांमधील चर्चच्या खिडक्यांवरील नक्षीकामातसुद्धा स्वस्तिक दिसतं.
दक्षिण व उत्तर अमेरिकेतील नवाजो, होपी व पास्माक्वोदी यांसारख्या आदिवासी जमातींनीसुद्धा हे चिन्ह स्वीकारलं.

फोटो स्रोत, Alamy
अनेक धर्मांमध्ये स्वस्तिकाचा वापर होतो. हाँगकाँगमधील 'टेन थाउजन्ड बुद्ध आश्रमा'मध्ये बुद्धाच्या छातीपाशी एक लहानसं स्वस्तिक ठेवलेलं आहे.
हिंदू संस्कृती आणि स्वस्तिक
ख्रिस्तपूर्व काळापासून हिंदू लोक स्वस्तिकाला पूजनीय मानत आले आहेत
आशिया खंडाचं स्वस्तिक चिन्हाशी खूपच दीर्घ नातं आहे. विशेषतः भारतातील हिंदू, बौद्ध व जैन धर्मियांमध्ये हजारो वर्षांपासून स्वस्तिक हे एक पवित्र चिन्ह मानलं जातं.
जैन लोक स्वस्तिक हे 24 तीर्थंकरांपैकी एक मानतात. बौद्ध लोक स्वस्तिकाला बुद्धाच्या पायाचा ठसा मानतात. हिंदूंच्या धारणेनुसार उजव्या बाजूचं स्वस्तिक सूर्याचं व सुदैवाचं प्रतीक असतं. ही धारणा ख्रिस्तपूर्व पाचशे वर्षांपासून प्रचलित आहे.
गृहप्रवेश, प्रसाद, सणसमारंभ, हिशोबाच्या चोपड्या अशा विविध ठिकाणी आणि प्रसंगी हे चिन्ह वापरलं जातं.
उजव्या बाजूचं स्वस्तिक रात्रीचं आणि कालिका या देवीचं प्रतीक मानलं जातं. नाझींमुळे पाश्चात्त्य राष्ट्रांमध्ये स्वस्तिक कुप्रसिद्ध झालं असलं, तरी पूर्वेकडे या चिन्हाला खूप अध्यात्मिक महत्त्व आहे.
हेनरिख श्लिएमान यांनी 1870च्या दशकात ट्रॉय इथे स्वस्तिक शोधल्यापासून या चिन्हाचा हजारो वर्षांचा प्रवास उलगडला. या प्रवासात हे चिन्ह श्रद्धेचं व सुदैवाचं प्रतीक मानलं गेल्याचं दिसतं. पण आधुनिक काळात नाझी विचारसरणीमुळे हे द्वेषाचं चिन्ह ठरलं.
श्लिएमान यांचे सहकारी एमिल-लुई बरनॉफ यांना स्वस्तिक हे चिन्ह भारतात अस्तित्वात असल्याचं माहीत होतं, त्यामुळे त्यांनी ऋग्वेदाचा अभ्यास केला. त्यामुळे स्वस्तिकाशी आर्यांचा संबंध जोडला गेला.
गोऱ्या वंशाने भारतासारखे प्रदेश जिंकले आणि सोबत स्वस्तिक चिन्ह आणलं, असं सांगितलं गेलं. स्वस्तिक या शब्दाप्रमाणे आर्य हा शब्दसुद्धा संस्कृतमधून आला आहे. जर्मनीत सहाव्या शतकातील मातीच्या भांड्यांवरसुद्धा स्वस्तिक सापडलं आहे. इतिहासकारांनी व अभ्यासकांनी संस्कृत व जर्मनमधील साधर्म्याचं विश्लेषण केलं असून आर्य जर्मनीहून आले नसल्याचा निर्वाळा दिला आहे.
पण 'आर्य' या संस्कृत शब्दाचा अर्थ 'सन्माननीय वा महान' असा होत असल्यामुळे हा 'शुद्ध' वंश असल्याचा गैरसमज पसरला.
वास्तविक हा भेद केवळ सामाजिक व भाषिक पातळीवरचा आहे, त्यात विशिष्ट वंशाचा काही संबंध नाही. पण एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून आर्यांच्या अस्तित्वाचा सिद्धान्त लोकप्रिय होत गेला.

फोटो स्रोत, REUTERS/STRINGER/FILE
जर्मन एकीकरणाच्या काळात 1871 साली श्लिएमान ट्रॉय शहराचा शोध घेत होते. त्याच वेळी जर्मनीमध्ये राष्ट्रवादाचा उदय झाला आणि जर्मन लोक आर्य वंशीय असल्याची कल्पना दृढमूल होत गेली.
आपण उच्चवंशीय आहोत याचा पुरावा म्हणून जर्मन राष्ट्रवाद्यांनी ट्रॉयमध्ये स्वस्तिक सापडल्याचा संदर्भ वापरला. युरोपात व उत्तर अमेरिकेत स्वस्तिकाचा पूर्वीपासून वापर होत असला, तरी या घडामोडींमुळे ते जर्मन राष्ट्रवादाचं व ज्यूविरोधी गटांचं चिन्ह झालं.
हिटलरने स्वस्तिकाची निवड का केली?
त्या काळात अॅडॉल्फ हिटलर राजकीयदृष्ट्या घडत होता. नाझी चळवळीच्या सक्षम भवितव्याचं चिन्ह शोधत असताना त्याला स्वस्तिकाचा पर्याय चांगला वाटला.
हिटलरला या चिन्हाचा इतिहास माहीत होता आणि नाझी आदर्शांना यातून ऐतिहासिक पाया लाभेल हे त्याने ओळखलं होतं.
जर्मनीचा ख्रिस्ती इतिहास आणि त्याच्याशी असलेल ज्यू संदर्भ बळकट करण्यात हिटलरला अपयश आलं. त्यामुळे हिटलरला एक वेगळं चिन्ह हवं होतं. या चिन्हाद्वारे त्याने जर्मन श्रेष्ठ गौरवंशीय असल्याचा सिद्धान्त मांडला.
1920 साली स्वस्तिक हे नाझी पक्षाचं चिन्ह झालं. या झेंड्याचं डिझाइन आपण स्वतः केलं होतं, असा हिटलरचा दावा होता. या झेंड्यावर लाल, पांढरा आणि काळा हे रंग होते. जर्मन साम्राज्यवादी ध्वजाशी साधर्म्य सांगणारा हा झेंडा होता. जर्मनीचा भूतकाळ भविष्यकाळाशी जोडण्याचा प्रयत्न हिटलर यातून करत होता.
या रंगांना त्याने नवीन अर्थ जोडले. हिटलरने 1925 साली 'माइन काम्फ' या आत्मचरित्रात लिहिलं की, "लाल रंग सामाजिक चळवळीचा निर्देश करतो, पांढरा रंग राष्ट्रवादाचा आहे, तर स्वस्तिक आर्य योद्ध्याचं लक्ष्य आहे."

फोटो स्रोत, Getty Images
न्युरेम्बर्गमध्ये 15 सप्टेंबर 1935 रोजी झालेल्या सभेदरम्यान हा झेंडा राष्ट्रध्वज म्हणून जाहीर करण्यात आला. त्याच दिवशी जर्मनांनी ज्यूंसोबत आंतरविवाह करण्याला बंदी घातली. केवळ जर्मन वंशाचे लोकच साम्राज्याचे नागरिक असतील, असा कायदा मंजूर करण्यात आला.
स्वस्तिक हे चिन्ह धार्मिक व सामाजिक-सांस्कृतिक संदर्भापासून वेगळं करण्याचा कार्यक्रम अशा रितीने पूर्णत्वास गेला. आता नाझी कार्यक्रमाच्या दुष्ट प्रवृत्तीचं प्रतीक म्हणून स्वस्तिक समोर येऊ लागलं. या चिन्हाच्या छत्राखाली अनेक क्रूर कृत्यं, अत्याचार आणि युद्धं झाली. होलोकॉस्टमध्ये (छळछावण्या) सुमारे सहा कोटी लोक मारले गेले.
जंगलांमधील स्वस्तिक
नाझी प्रचारतंत्राचे प्रतिध्वनी जंगलांमध्येसुद्धा उमटले होते. 1992 साली जर्मन लँडस्केपिंग कंपनीसाठी काम करणाऱ्या एका अभियंत्याला सिंचनप्रकल्पासाठी आकाशातून काढलेल्या छायाचित्रांची तपासणी करताना ब्रँडेनबर्गच्या जंगलात काहीतरी वेगळ्या खुणा दिसल्या.
या भागात 140 लार्च झाडं होती आणि त्यांच्या भोवती हिरव्या पाइन वृक्षांचं आच्छादन होतं. मोसमी हवामानामुळे ही छाडं पिवळसर झाली होती. वरून पाहताना हे सर्व स्वस्तिकाच्या आकाराचं दिसत होतं. हा योगायोग नव्हता. नाझी प्रचारतंत्राचा भाग म्हणून बागकामाचाही वापर केला जात होता. हिटलर सत्तेत आला तेव्हा त्याच्या समर्थकांनी 1930 च्या दशकात ही झाडं लावली. या 'वनातील स्वस्तिका'ने अनेक दशकं स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवलं, कारण केवळ शरद ऋतूमध्ये तिथल्या झाडांचा रंग बदलतो.
या भागात स्वस्तिक प्रदर्शनावर बंदी असली, तरी या जागेवरचं स्वस्तिक केवळ थोडं खालून उडणाऱ्या विमानांनाच दिसतं. त्यानंतर सरकारने इथली बहुतांश लार्च झाडं काढून टाकली, जेणेकरून नव-नाझी गटांसाठी हे जंगल यात्रास्थळ होऊ नये.

फोटो स्रोत, Alamy
अशाच प्रकारची जागा १९७०या दशकात हेस्से इथे सापडली होती. इथली झाडं १९३३ हा आकडा दाखवणारी होती (हिटलर 1933 साली जर्मनीचा चँसेलर झाला).
किरगिजिस्तानमधील एका टेकडीवर १८० मीटर रुंदीचं एक मोठं स्वस्तिक २००६ साली सापडलं. सोव्हिएत संघाच्या हाती सापडलेल्या जर्मन युद्धकैद्यांनी हे केलं असावं.
दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीत स्वस्तिकाच्या जाहीर प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली. पाश्चात्त्य राष्ट्रांमध्ये स्वस्तिकाला विरोध असला तरी उजव्या विचारसरणीचं आणि गोऱ्यांच्या वर्चस्वाचं प्रतीक म्हणून त्याचा वापर अजूनही होतो.
अमेरिकेत स्वस्तिक चिन्हावर बंदी आहे. तरीही, अलीकडच्या काळात अमेरिकेत स्वस्तिक काढलेले झेंडे फडकताना दिसले आहेत. 2017 साली व्हर्जिनियातील शार्लट्सव्हिले इथे नव-नाझी गटांच्या मोर्च्यातसुद्धा हे झेंडे दिसले.

फोटो स्रोत, Getty Images
भारतीय उपखंडात बहुतांश ठिकाणी स्वस्तिक दिसतं. मंदिरांच्या प्रवेशद्वारापासून ते टॅक्सीपर्यंत अनेक ठिकाणी हे चिन्ह समारंभांची आणि उत्सवांची खूण म्हणून वापरलं जातं. हिंदू, बौद्ध व जैन यांच्यासाठी स्वस्तिक पूजनीय आहे.
दिवाळीमध्ये हिंदू धर्मीय स्वस्तिकाच्या रांगोळ्या काढतात.
जर्मन राजकारण्यांनी २००७ साली युरोपीय संघात सर्वत्र स्वस्तिकावर बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडू पाहिला, तेव्हा हिंदूंनी या कृतीला तीव्र विरोध केला.
स्वस्तिक हे चिन्ह हिटलरच्या समर्थकांकडून परत घेणं शक्य आहे का? हे चिन्ह पुन्हा काबीज केल्याने हिटलरच्या कल्पनेतील 'थर्ड राइश'चा (जर्मन साम्राज्याचा) उद्देश आणि त्यातील द्वेषवृत्ती पराभूत होईल का?
प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात- चांगली आणि वाईट. या दोन्हीचा आपल्या इतिहासाशी, वर्तमानाशी आणि भविष्याशी संबंध असतो. एकातून माणसातील दुष्टवृत्ती दिसते, तर दुसऱ्यातून माणसाची थोरवी दिसते, हेच या निमित्ताने लक्षात ठेवण्यासारखं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








