वर्ल्ड सिकल सेल अवेअरनेस डे : आदिवासींमध्ये या आजाराचं प्रमाण जास्त का?

    • Author, सुशीला सिंह
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

आपल्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर अशक्तपणा, थकवा, चिडचिड आदी गोष्टी जाणवतात. आणि बऱ्याचदा आपण याबाबत ऐकलेलं, वाचलेलं असतं. पण रक्ताशीच संबंधित असलेल्या सिकलसेल अॅनिमिया बद्दल किती जणांनी ऐकलंय?

खरंतर सिकलसेल अॅनिमिया हा अनुवांशिक आजार आहे. दरवर्षी 19 जून हा जागतिक सिकलसेल जागरूकता दिवस म्हणून साजरा केला जातो.

गुजरातच्या तापी जिल्ह्यातील एका खेड्यात राहणारी 22 वर्षीय स्वाती या आजाराने त्रस्त आहेत. स्वातीच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना सिकलसेल अॅनिमिया आहे.

बीबीसीशी बोलताना त्या सांगतात, माझ्या कुटुंबात पाच जण आहेत. आणि त्या सगळ्यांना हा आजार आहे. सातवी, आठवीत असताना त्यांना या आजाराविषयी समजलं.

त्या सांगतात, "लहानपणी माझे हातपाय सतत दुखायचे. वर्षातून एकदा तर रुग्णालयात दाखल होऊन रक्त चढवावं लागायचं. मागच्या दोन वर्षांपासून या आजारावर औषधोपचार सुरू केल्याने मला आता सारखं सारखं रुग्णालयात जावं लागत नाही."

स्वातीचे वडील विजय गमित सांगतात की, तिच्या या आजारपणामुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढलाय. बऱ्याचदा उपचारांसाठी पैसे हवे असल्याने नातेवाईकांपुढे हात पसरावे लागतात, त्यामुळे त्यांनाही लाज वाटते.

स्वाती गुजरातमध्ये ज्या भागात राहतात तो आदिवासीबहुल जिल्हा आहे. भारताच्या आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या माहितीनुसार, हा आजार जास्त करून आदिवासी लोकांमध्ये आढळतो. अनुसूचित जमातींमधील 86 मधल्या एकाला जन्मापासून सिकलसेल हा आजार असतो.

या आजारामुळे शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम करणाऱ्या लाल रक्तपेशींवर परिणाम होतो.

याचं कार्य नीट पार पडलं नाही तर मात्र विविध आजार आणि मृत्यूची शक्यता वाढते.

हेमॅटोलॉजिस्ट डॉ. भार्गव या आजाराविषयी सांगतात की, प्रत्येक व्यक्तीच्या रक्तात लाल रक्तपेशी असतात ज्या आकाराने गोल लवचिक आणि मऊ असतात. हा आजार झालेल्या लोकांच्या या पेशी इंग्रजी C अक्षराचा आकार घेतात. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो.

"यानंतर या सिकल पेशी संपू लागतात, ज्यामुळे लाल रक्तपेशी कमी होऊन शरीराचा ऑक्सिजन पुरवठा कमी होऊ लागतो. त्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या आणि आजार होतात.

सिकलसेलमुळे होणाऱ्या समस्या

  • रक्ताची कमतरता
  • फुप्फुस, हृदय, डोळे आणि मस्तिष्कावर परिणाम
  • शरीराची वाढ खुंटते
  • छातीत संसर्ग
  • सांधेदुखी
  • सतत ताप येणे

आदिवासीबहुल भागात आजाराचं कारण

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, नायजेरिया आणि काँगोनंतर भारतात सिकलसेल अॅनिमियाग्रस्त लोकांचं प्रमाण जास्त आहे. थोडक्यात भारत या आजाराच्या प्रकरणांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.

दुसरीकडे भारतातील आदिवासीबहुल भागात या आजाराचं प्रमाण जास्त आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, भारतात 8.6 टक्के आदिवासी लोकसंख्या आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आदिवासींच्या आरोग्यासाठी एक विशेष समिती स्थापन केली होती. या समितीने सिकलसेलचा दहा विशेष आजारांच्या यादीत समावेश केला आहे.

या समितीच्या संशोधनात असंही आढळून आलंय की, ज्या निवासी भागात मलेरियाची समस्या आहे त्या भागात सिकल सेल अॅनिमियाचं प्रमाण अधिक आहे.

यावर डॉ. अतुल देसाई सांगतात की, "साध्या शब्दात सांगायचं तर हजारो वर्षांपूर्वी जंगलात राहणाऱ्या लोकांमध्ये मलेरियाचं प्रमाण जास्त होतं. मात्र वारंवार मलेरिया होत असल्याने या आजाराविरुद्ध त्यांच्यात प्रतिकारशक्ती निर्माण झाली."

"यामुळे अनुवांशिक पातळीवर रासायनिक बदल झाले. यातून शरीरात दोष निर्माण होऊन शरीरात सिकलसेल्स तयार होऊ लागल्या."

हा आजार आदिवासींपुरता मर्यादित नाही

मागील 32 वर्षांपासून तापी जिल्ह्यातील आदिवासींमध्ये सिकलसेल अॅनिमिया आणि आदिवासींच्या पोषणावर काम करणारे आयुर्वेदाचे डॉ. अतुल देसाई सांगतात की, हा आजार आता आदिवासींपुरताच मर्यादित राहिलेला नाही.

आदिवासींमध्ये सिकलसेल अॅनिमियाचं प्रमाण जास्त असण्यामागे आणखीन एक कारण असल्याचं फोर्टिस हॉस्पिटलचे हेमॅटोलॉजिस्ट डॉ. राहुल भार्गव सांगतात.

त्यांच्या मते, "आदिवासी समुदायात आपापसात लग्न केली जातात. जर आई किंवा वडीलांपैकी कोणाएकाला सिकलसेलचा आजार असेल तर मुलांना हा आजार होण्याची शक्यता असते. म्हणजेच जनुकं तिथल्या तिथे फिरत राहतात."

सोबतच ते सांगतात की, "लोक नोकरीच्या शोधात एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करतात. लोकसंख्येच्या स्थलांतरामुळे आंतरराज्यीय विवाहांचं प्रमाणही वाढलंय. त्यामुळे दोन व्यक्तींमधील जनुकं देखील स्थलांतरित होतात. त्यामुळे केवळ आदिवासीच नाही तर शहरी लोकांमध्येही सिकलसेल अॅनिमियाची प्रकरणं समोर येत आहेत.

सरकारी मिशन

2023-24 अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं होतं की, 2047 पर्यंत सिकलसेल अॅनिमिया संपविण्यासाठी सरकारी मिशन अंतर्गत काम केलं जाईल.

सोबतच या मिशनच्या माध्यमातून राष्ट्रीय सिकलसेल रोग नियंत्रण कार्यक्रम राबवून लोकांमध्ये सिकलसेल आजाराबाबत जनजागृती केली जाईल. शिवाय या आजाराची तपासणीही मोठ्या प्रमाणावर करून घेण्याचं म्हटलं गेलं होतं.

डॉक्टर सांगतात की, ज्याप्रमाणे आपण लग्नापूर्वी जन्म पत्रिका पाहतो त्याचप्रमाणे रक्त तपासणीही केली पाहिजे. जेणेकरून स्त्री किंवा पुरुषामध्ये कोणाला सिकल सेल ट्रेट असेल तर लगेचच समजेल.

डॉ. राहुल भार्गव म्हणतात, "जर एखादी स्त्री गरोदर असेल तर 9 ते 12 आठवड्यांदरम्यान तिची रक्तचाचणी करायला हवी. जर एखाद्या महिलेमध्ये सिकलसेल ट्रेट आढळून आला तर गर्भासाठी कोणतीही समस्या निर्माण होत नाही, मात्र जर हा आजार असेल तर मात्र गर्भपात करणं योग्य राहील.'

अशा मुलाला जन्म दिल्यास त्याला खूप समस्या निर्माण होऊ शकतात असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्यामुळे गर्भपात करावा असा सल्ला डॉक्टर देतात.

स्वतःची काळजी कशी घ्याल ?

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार,

  • सिकलसेल आजारग्रस्त लोकांनी जास्तीत जास्त पाणी (किमान 10-15 ग्लास) प्यावं
  • दररोज फॉलिक ऍसिडची गोळी घ्यावी (5 मिग्रॅ)
  • मादक पदार्थाचं सेवन टाळावं
  • संतुलित आहार घ्यावा
  • उलट्या होत असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा
  • दर तीन महिन्यांनी हिमोग्लोबिन आणि पांढऱ्या रक्त पेशींची चाचणी करून घ्यावी

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)