मूत्रमार्गाच्या संसर्गाची लक्षणं काय? महिलांमध्ये ही समस्या अधिक का असते?

    • Author, अंजली दास
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

मूत्राशयात सूज येण्याला वैद्यकीय भाषेत 'सिस्टिटिस' म्हणतात. याला युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजेच यूटीआय असे म्हणतात, जे बहुतेक प्रकरणांमध्ये संसर्गामुळे किंवा जीवाणूंमुळे पसरलेल्या संसर्गामुळे होते.

अमेरिकेत दरवर्षी मूत्रमार्गातील संसर्गाची सुमारे 2.5 लाख प्रकरणे नोंदवली जातात.

जगभरात सुमारे 1.5 कोटी लोक यावर उपचार घेतात.

जेव्हा मूत्राशय (मूत्रमार्ग) आणि त्याची नळी (ट्रॅक्ट) संक्रमित होतात तेव्हा असे होते.

युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (यूटीआय) हा एक अतिशय सामान्य आजार आहे जो कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकतो.नवजात शिशुपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच याचा त्रास होऊ शकतो.

महिला त्यांच्या आरोग्याची काळजी घेत नाहीत का?

एका संशोधनानुसार, महिलांना तिच्या आयुष्यात 'यूटीआय' संसर्ग होण्याची शक्यता 60% असते, तर पुरुषांमध्ये हे प्रमाण फक्त 13% असते.

43 वर्षीय रेणू (नाव बदलले आहे) गृहिणी आहे. ती सांगते की, अनेकदा घरातील कामात व्यस्त असल्याने आणि दररोजच्या धावपळीमध्ये तिला तिच्या तब्येतीची काळजी घेता येत नाही.

नवरा डेहराडूनमध्ये प्राध्यापक असून महिन्यातून एकदा किंवा दोनदाच येतो.

रेणू म्हणते, "मला अनेकदा पोटदुखी व्हायची पण ती जास्त काळ टिकत नसे, म्हणून मी डॉक्टरांकडे गेले नाही."

"एक दिवस, पोटदुखीबरोबरच, मला लघवी करताना जळजळ होऊ लागली. लघवीत थोडेसे रक्तही आले. घाबरून मी ताबडतोब हॉस्पिटलमध्ये गेले. डॉक्टरांनी मला काही तपासण्या करायला सांगितल्या आणि औषधे लिहून दिली. "

औषधांमुळे तिला बराच आराम मिळाला पण काही महिन्यांनंतर ही लक्षणे पुन्हा दिसू लागली. यावेळी रेणूने (नाव बदलले आहे) घरगुती उपचारांनी स्वतःला बरे करण्याचा निर्णय घेतला आणि तिच्या दिनक्रमात योग आणि प्राणायामचा समावेश केला.

असिमा या 37 वर्षांच्या शालेय शिक्षिका आहेत.

त्या म्हणतात, "शिक्षकांच्या नोकरीच्या व्यस्त वेळापत्रकात तुम्ही कधी कधी तुमच्या शरीराकडे दुर्लक्ष करता. त्याशिवाय, शाळेतील स्वच्छतागृहाची स्थिती चांगली नाही."

शाळेत असताना एके दिवशी त्यांना पोटात खूप दुखू लागले.

त्या दिवसाची आठवण सांगताना त्या म्हणतात, "सुरुवातीला वेदना कमी झाल्या होत्या पण काही वेळाने ते असह्य झाले. मी ताबडतोब अर्ध्या दिवसाची रजा घेऊन डॉक्टरांकडे गेले. तेव्हा कळले की मला 'यूटीआय' आहे. डॉक्टरांनी मला 5 दिवसांची औषधे दिली. त्याने मला बरं वाटलं."

महिलांमध्ये 'यूटीआय'ची समस्या अधिक का आहे?

युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजेच यूटीआय तेव्हाच होतं जेव्हा मूत्राशयाची थैली किंवा नळी जिवाणूंमुळे संसर्गित होते.

हा संसर्ग स्त्री आणि पुरुष दोघांनाही होऊ शकतो. परंतु, पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये 'यूटीआय' होण्याचं प्रमाण अधिक आहे.

ग्रेटर नोएडा येथील शारदा मेडिकल कॉलेजचे वरिष्ठ निवासी डॉ. तनुज लावनिया याविषयी तपशीलवार माहिती देताना सांगितलं की, "खरं तर, पुरुषांपेक्षा स्त्रियांना सिस्टिटिस होण्याची शक्यता जास्त असते कारण त्यांच्या मूत्रमार्गाचा आकार (जिथून लघवी बाहेर येते) पुरुषांपेक्षा लहान (अंदाजे 20 सेंटीमीटर) असतो. तो सुमारे 4.8 ते 5.1 सेंटीमीटर इतका असतो."

त्या सांगतात, "जेव्हा एखाद्या महिलेला जीवाणूंचा संसर्ग होतो, तेव्हा मूत्राशयात जीवाणू जाण्याची शक्यता वाढते. कारण मूत्रमार्ग लहान असतो, तिथपर्यंत पोहोचणे सोपे होते आणि म्हणूनच पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये यूटीआयचे प्रमाण अधिक आहे."

डॉ. तनुज म्हणतात, "किमान 10 टक्के महिलांना एकदाच सिस्टिटिसचा त्रास होतो. त्यांपैकी निम्म्या महिलांना तो पुन्हा झाल्याचे दिसून आले आहे."

युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या सेंटर फॉर यूरोलॉजिकल बायोलॉजीच्या प्रमुख जेनिफर रॉन म्हणतात, "जर यूटीआयकडे दुर्लक्ष केले गेले, तर संसर्ग मूत्रपिंडापर्यंत पसरू शकतो. यूटीआय सामान्यपणे इ-कोली जिवाणूच्या संसर्गामुळे होतो. इतर अनेक जीवाणूदेखील संसर्गास कारणीभूत ठरू शकतात."

यूटीआयची लक्षणे

डॉक्टर तनुज सांगतात की महिलांमध्ये याची अनेक लक्षणे असू शकतात.

  • वारंवार लघवीला जाण्याची इच्छा
  • लघवी करताना जळजळ होणे किंवा तीव्र वेदना होणे
  • लघवी करताना योनीमार्गाच्या त्वचेवर जळजळ होणे
  • लघवीमधून रक्तस्त्राव
  • ज्या स्त्रिया याकडे दीर्घकाळ दुर्लक्ष करतात त्यांच्यामध्ये उच्च ताप हे देखील एक लक्षण असू शकते.

डॉक्टर कोणत्या चाचण्या करायला सांगतात?

डॉक्टर तनुज म्हणतात, कोणत्याही वैद्यकीय चौकशीत, जर आमच्या लक्षात आलं की एखाद्या महिलेला यूटीआय आहे, तर आम्ही तिला लघवीची तपासणी करण्यास सांगतो. यूरिन रूटीन माइक्रोस्कोपी आणि यूरिन कल्चर सेंसिटिविटी चाचणी आम्ही करण्यास सांगतो.

डॉक्टर तनुज याचे कारण सांगतात, "रूटीन मायक्रोस्कोपीद्वारे हे संक्रमण जीवाणू किंवा बुरशीमुळे झाले आहे की नाही हे पाहिले जाते. तर कल्चर सेंसिटिविटीच्या माध्यमातून ते कोणत्या जीवाणूमुळे झाले आहे हे कळते, जेणेकरून त्याच्याशी संबंधित औषधे दिली जाऊ शकतात."

कोणत्या महिलांना संसर्ग होण्याची अधिक शक्यता असते?

डॉक्टर तनुज म्हणतात, "यूटीआय जरी सर्व वयोगटांमध्ये दिसून येत असला तरी, विवाहित महिलांमध्ये याचे प्रमाण सर्वाधिक दिसून येते."

त्या असेही म्हणाल्या, "ज्या महिला कमी पाणी पितात त्यांना हे होण्याची शक्यता जास्त असते. ज्या महिला जास्त वेळ लघवी रोखून धरतात त्यांच्यामध्ये हे घडते कारण यामुळे जीवाणूंना जमा होण्याची संधी मिळते." त्या 'यूटीआय' होण्याची इतर कारणे देखील सांगतात.

  • ज्या महिला शौचालयात जेटचा जास्त वापर करतात
  • ज्या महिला स्वच्छतेसाठी रासायनिक उत्पादने वापरतात
  • ज्या महिला स्वच्छतेची पूर्ण काळजी घेत नाहीत
  • ज्या महिला अंर्तवस्त्रं वारंवार बदलत नाहीत
  • ज्या महिलांना मधुमेह आहे त्यांना या संसर्गाचा धोका जास्त असतो
  • गरोदरपणात यूटीआय संसर्ग होण्याची शक्यता देखील वाढते
  • रजोनिवृत्तीनंतरही यूटीआय संसर्ग होऊ शकतो कारण योनीमध्ये अनुकूल जीवाणूंची संख्या कमी होते

जर यूटीआय संसर्ग वारंवार होत असेल तर?

जर एखाद्या महिलेला यूटीआय संसर्ग वारंवार होत असेल तर त्याचे कारण काय असू शकते?

डॉक्टर तनुज सांगतात, "ज्या महिलांना वारंवार 'यूटीआय'चा संसर्ग होत असेल त्यांना इतर चाचण्या कराव्या लागतात. अल्ट्रासाऊंड केले जाते. मूत्रपिंड आणि मूत्रपिंडाची नळी (मूत्रवाहिनी) व्यवस्थित आहे की नाही हे पाहिलं जातं. मुतखडा किंवा युरेटरमध्ये मुतखडा असेल आणि तो तिथे अडकला असेल त्याकारणानेही लघवीचा संसर्ग होऊ शकतो."

अशा परिस्थितीत यूरोलॉजिस्टचाही सल्ला घ्यावा लागू शकतो, असं त्या म्हणतात.

डॉ. तनुज सांगतात की, 'यूटीआय'ची कोणतीही लक्षणे दिसल्यास महिलांनी स्त्रीरोगतज्ञाकडे जावे. त्यांनी सल्ला दिला तरच इतर डॉक्टरांकडे जा.

यूटीआय वृद्धांना त्रासदायक ठरतं

जेनिफर रॉन म्हणतात की, दरवर्षी सुमारे 15 दशलक्ष लोकांना यूटीआयचा संसर्ग होते. त्या सांगतात की वयोवृद्ध पुरूषांमध्ये याचे प्रमाण सर्वाधिक आढळून येतं.

त्या म्हणतात, "वाढत्या वयानुसार लघवी करताना जळजळ होणे, ताप येणे, पाठीच्या खालच्या भागात दुखणे, लघवीला दुर्गंधी येणे इ लक्षणे पाहावयास मिळतात."

याचे कारण सांगताना डॉ. तनुज म्हणतात, "पुरुषांच्या प्रोस्टेट ग्रंथीचा आकार वाढला, तर मूत्राशयावर दाब पडतो. त्यामुळे मूत्राशयातून लघवीचा प्रवाह कमी होतो. अशा स्थितीत लघवीचा प्रवाह कमी होतो आणि त्यांना यूटीआय होण्याची शक्यता वाढते."

त्या म्हणतात, "महिलांपेक्षा पुरुषांमध्ये यूटीआय अधिक गंभीर समस्या आहे. अशा पुरुषांनाही रुग्णालयात दाखल करावे लागू शकते."

वृद्ध महिलांबाबत त्या म्हणतात की जेव्हा जेव्हा अशी लक्षणे दिसतात तेव्हा त्यांनी वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत आणि ज्या चाचण्या करण्यास सांगितले जाईल त्या नक्की करून घ्याव्यात.

'यूटीआय' टाळण्यासाठी काय करावे?

डॉक्टर तनुज म्हणतात की, वैद्यकीय सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नका. तसेच, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहाराकडे लक्ष देण्याचा सल्ला त्या देतात आणि 'यूटीआय' टाळण्यासाठी काय केले पाहिजे हे त्या सांगतात.

  • भरपूर पाणी प्या. किमान दोन ते तीन लिटर पाणी प्या.
  • संभोग करताना निरोधचा वापर अवश्य करा.
  • ज्या महिलांना निरोध वापरता येत नाही त्यांनी संभोग केल्यानंतर ताबडतोब लघवी करावी आणि त्यांचे खाजगी भाग पाण्याने धुवावेत.
  • योनी स्वच्छतेची उत्पादने वापरणे थांबवा.
  • सार्वजनिक शौचालयाचा वापर करण्यापूर्वी, टॉयलेट सीट पाण्याने स्वच्छ करा.

हेही वाचलंत का?

बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता