ख्रिस हिपकिन्स होणार न्यूझीलंडचे नवे पंतप्रधान

फोटो स्रोत, Getty Images
- Author, टिफनी टर्नबुल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
न्यूझीलंडमध्ये मजूर पक्षाचे खासदार ख्रिस हिपकिन्स यांची पंतप्रधानदी निवड निश्चित झाली आहे.
न्यूझीलंड च्या देशाच्या प्रमुखपदाच्या शर्यतीत ते एकमेव दावेदार आहेत. त्यामुळे त्यांची निवड निश्चित आहे.
हिपकिन्स पहिल्यांदा 2008 मध्ये खासदार झाले होते. नोव्हेंबर 2020 मध्ये त्यांना कोरोना व्यवस्थापन मंत्री म्हणून नेमण्यात आलं होतं.
त्याआधी गुरुवारी जेसिंडा अर्डन यांनी हे पद सोडण्याची घोषणा केली होती. त्यांच्या मते या पदासाठी योगदान देण्यासारखं त्यांच्याकडे काहीही उरलेलं नाही.
हिपकिन्स किती काळ या पदावर राहतील याची शाश्वती नाही. कारण ऑक्टोबर महिन्यात तिथे निवडणुका होणार आहे. जर मजूर पक्षाचा पराभव झाला तर त्यांना फक्त आठ महिन्यांचा कार्यकाळ मिळेल.
44 वर्षीय हिपकिन्स सध्या गृह, शिक्षण आणि लोकसेवा मंत्री आहेत. पंतप्रधान होण्याआधी रविवारी त्यांनी संसदेत मजूर पक्षाच्या औपचारिक समर्थनाची गरज भासेल.
त्यांना पाठिंबा मिळाला तर अर्डन औपचारिकरित्या 7 फेब्रुवारीला त्या राजीनामा देतील. त्यानंतर हिपकिन्स यांची निवड होईल.

फोटो स्रोत, Reuters
'मी पंतप्रधान पदावर कायम राहिले तर देशाला धोका दिल्यासारखं होईल'
न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन आपल्या पदावरून पुढच्या महिन्यात पायउतार होणार आहेत. याची घोषणा करताना त्या म्हणाल्या की, “देशाचं नेतृत्व करण्याची आणखी क्षमता त्यांच्यात उरलेली नाही.”
याबद्द्ल बोलताना त्यांचा गळा भरून आला आणि 6 वर्षं पंतप्रधान असण्याचा मोठा परिणाम त्यांच्या आयुष्यावर झाला हेही त्यांनी सांगितलं.
7 फेब्रुवारीच्या आधीच त्या लेबर पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायउतार होतील. त्यांच्या जागी पक्षाचा नवा नेता कोण असेल हे ठरवण्यासाठी पक्षात मतदान होईल.
या वर्षी 14 ऑक्टोबरला न्यूझीलंडमध्ये सार्वत्रिक निवडणुका आहेत.
त्या म्हणाल्या, “या पदावर पुढे काम करण्यासाठी, या पदाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी माझ्यात ताकद असेल असं मला वाटलं होतं पण दुर्दैवाने ते त्राण माझ्यात उरलेलं नाही. असं असतानाही मी या पदावर कायम राहिले तर देशाला धोका दिल्यासारखं होईल.”
जेसिंडा आर्डन 2017 साली वयाच्या 37 व्या वर्षी न्यूझीलंडच्या पंतप्रधान बनल्या. त्या जगातल्या सर्वांत कमी वयाच्या राष्ट्रप्रमुख ठरल्या.
एका वर्षांनी त्या जगातल्या दुसऱ्या अशा राष्ट्रप्रमुख ठरल्या ज्यांनी पदावर असताना बाळाला जन्म दिला आहे. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांनीही पदावर असताना बाळाला जन्म दिला होता.
त्यांनी न्यूझीलंडला कोव्हिड-19 ची साथ, त्यानंतर आलेली मंदी आणि ख्राईस्टचर्च इथे मशिदीवर झालेला कट्टरवादी हल्ला आणि व्हाईट आयलंड ज्वालामुखीचा स्फोट या सगळ्या अडचणींमधून मार्ग काढत पुढे नेलं.
“तुमच्या देशाचं शांततेच्या काळात नेतृत्व करणं आणि अशा मोठ्या संकटांसमयी नेतृत्व करणं यात खूप फरक आहे,” असंही त्या पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.
“या घटना... ही संकटं खूप थकवणारी होती. त्यांचा आवाका प्रचंड मोठा होता आणि सतत एकामागून एक काहीतरी चालू होतं. माझ्या कारकिर्दीत एकही क्षण असा आला नाही जेव्हा आम्ही शांतपणे सरकार चालवतोय असं वाटलं.”
2020 साली झालेल्या निवडणुकांमध्ये जेसिंडा आर्डन यांनी मोठ्या मताधिक्याने आपल्या पक्षाला जिंकवून दिलं होतं. पण गेल्या काही महिन्यात त्यांची देशांतर्गत लोकप्रियता घटली आहे असं जनमत चाचण्यांमधून दिसून आलं आहे.
पण जेसिंडा आर्डन यांनी म्हटलं की येत्या निवडणुकीत त्यांचा पक्ष जिंकणार नाही या भीतीने त्या राजीनामा देत नाहीयेत तर पक्ष जिंकेल याची त्यांना खात्री आहे म्हणून त्या राजीनामा देत आहेत.
“आता कोणीतरी ताज्या दमाचा नेता हवा इथे,” त्या म्हणाल्या.

फोटो स्रोत, Getty Images
पक्षाचे उपनेते ग्रँट रॉबर्टसन यांनी म्हटलंय की ते नेतेपदाची निवडणूक लढवणार नाहीत. जर एका उमेदवाराला पक्षाच्या सदस्यांनी दोन तृतीयांश मताधिक्याने निवडलं नाही तर पक्षाच्या कोअर कमिटीकडे हा विषय जाईल.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानिज यांनी जेसिंडा आर्डन यांचं कौतुक करत म्हटलं की त्या एक बुद्धीमान, शक्तीशाली आणि सहृदयी नेत्या आहेत.
“जेसिंडा यांनी न्यूझीलंडच्या भल्यासाठी जोरदार काम केलं. त्या अनेक जणांसाठी प्रेरणास्रोत ठरल्यात आणि माझ्या खूप चांगल्या स्नेही आहेत,” अँथनी अल्बानिज यांनी ट्विटरवर लिहिलं.
आर्डन यांनी पंतप्रधान असताना क्लायमेट चेंज, गरीबांना सरकारी घरं आणि लहान मुलांना गरिबीतून बाहेर काढणं अशा गोष्टींवर यशस्वीपणे काम केलं.
पण त्या म्हणाल्या, “माझी अशा आहे न्यूझीलंडचे नागरिक मला एक अशी व्यक्ती म्हणून ओळखतील जिने नेहमीच दयाळू राहण्याचा प्रयत्न केला.”
“मला आशा आहे की न्यूझीलंडच्या रहिवासी दयाळू पण कणखर, दुसऱ्यांना समजून घेणारे पण ठाम निर्णय घेणारे, आशावादी पण लक्ष्य साध्य करणारे ही मुल्यं आत्मसात करतील. तुम्ही स्वतःच तुमच्या आयुष्याचं नेतृत्व करू शकता, एक नेता बनू शकता – असा नेता ज्याला कधी पायउतार व्हायचं ते कळेल.”
कोण आहेत जेसिंडा आर्डन?
जेसिंडा मॉर्मन पंथाच्या आहेत. त्यांचं बालपण न्यूझीलंडमधल्या एका लहानशा शहरात गेलं. त्यांचा जन्म 1980 साली ऑकलंडपासून 2 तासांच्या अंतरावर असणाऱ्या हॅमिल्टन शहरात झाला.
त्यांचे वडील एक पोलीस अधिकारी होते तर त्यांच्या आई एका शाळेत स्वयंपाकी म्हणून काम करायच्या.
या लहान शहरात मोठं होताना त्यांनी गरिबी पाहिली, अनुभवली. याच अनुभवांनी त्यांची राजकीय जाण घडवली असं त्या म्हणतात. 17 व्या वर्षी त्या लेबर पक्षाच्या सदस्य बनल्या.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ वाईकाटोमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी कम्युनिकेश स्टडीज इन पॉलिटिक्स अँड पब्लिक रिलेशन या विषयात पदवी घेतली.
त्यानंतर आर्डन हेलन क्लार्क यांच्यासाठी काम करू लागल्या. हेलन क्लार्क त्यावेळी न्यूझीलंडच्या पंतप्रधान होत्या.
2006 साली त्या यूकेच्या कॅबिनेट ऑफिससाठी काम करायला लागल्या. त्यावेळी यूकेचे तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर त्यांच्यानंतर येणाऱ्या गॉर्डन ब्राऊन यांच्या हातात सूत्रं देत होते.
2008 साली त्या न्यूझीलंडमध्ये परत आल्या आणि खासदार म्हणून निवडून आल्या. त्यांनी गरिबी निर्मुलनाचं विधेयक आणलं आणि लावून धरलं. त्यांनी लहान मुलांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले आणि समलैंगिक हक्कांची पाठीराखण केली.
2017 साली न्यूझीलंडमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार होत्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल, या निवडणुकांच्या फक्त 7 आठवडे आधी जेसिंडा आर्डन यांनी पक्षाची धुरा सांभाळली होती.
त्यावेळी लेबर पक्षाला फारशी मतं मिळतील असं वाटत नव्हतं, ते जिंकण्याची तर अजिबातच शक्यता नव्हती.
पण जेसिंडा आर्डन यांनी कमाल करून दाखवली. निवडणूक झाल्यानंतर लेबर पक्षाला दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मतं मिळाली. न्यूझीलंडच्या प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन सिस्टिम अंतर्गत जेसिंडा यांना युतीचं सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली.
2018 साली त्या पुन्हा चर्चेत आल्या. त्यांनी बाळाला जन्म दिला होता. त्यांचे पार्टनर टीव्ही होस्ट क्लार्क गेयफर्ड यांनी नोकरी सोडून पूर्ण वेळ बाळाला सांभाळण्याचा निर्णय घेतला याचंही खूप कौतूक झालं.
पण जेसिंडा यांनी म्हटलं होतं की मी सुपरवूमन नाहीये, कोणाही स्त्रीकडून तशी अपेक्षा केली जाऊ शकत नाही. माझा पार्टनर बाळाला सांभाळतोय म्हणून मला देश चालवता येतोय. आपण कधीच महिलांनी सुपरवूमन व्हावं अशी अपेक्षा करू शकत नाही.
मार्च 2019 साली न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्च इथे मशिदीवर हल्ला झाला ज्यात 51 लोकांचा जीव गेला. हे प्रकरण ज्या संवेदनशीलतेने जेसिंडा आर्डन यांनी हाताळलं त्याबद्दल त्यांचं खूप कौतुक झालं.
अर्थात त्यांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक झालं असंही नाही. त्यांच्या आर्थिक धोरणांमुळे त्यांच्या देशातले अनेक नागरिक त्यांच्यावर नाराज होते हेही खरं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








