पतीची हत्या करून मृतदेह संडासच्या टाकीत फेकला, हत्येच्या 9 वर्षांनंतर पत्नीचं बिंग असं फुटलं

    • Author, थंगदुराई कुमारमंडपम
    • Role, बीबीसी तामिळ प्रतिनिधी

नऊ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका व्यक्तीची कवटी सांडपाण्याची टाकी साफ करताना सापडली आहे. या घटनेने तामिळनाडूतील शिवगंगा जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

शिवाय त्या व्यक्तीची हत्या करून त्याचा मृतदेह सांडपाण्याच्या टाकीत टाकणारी व्यक्ती देखील याच परिसरात राहत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

शिवगंगा जिल्ह्यातील देवकोट्टई येथील गंबर स्ट्रीट जवळ राहणाऱ्या एका घरमालकाने सांडपाण्याची टाकी साफ करण्यासाठी काही लोकांना बोलावलं. ही टाकी शोषखड्ड्याप्रमाणे काम करते.

या खडड्यातील सांडपाणी उपसत असताना टाकीत एक कवटी तरंगताना दिसली. घाबरलेल्या घरमालकाने तातडीने सांडपाणी उपसणे बंद केले आणि देवकोट्टई नगर पोलीस ठाण्यात याची माहिती दिली.

यानंतर देवकोट्टाई नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सरवणन यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी सांडपाण्याच्या टाकीत शोधमोहीम सुरू केली.

या खडड्यातील उरलेलं सांडपाणी उपसण्यासाठी मोठा पंप मागविण्यात आला. त्याद्वारे उरलेलं सांडपाणी उपसण्यात आलं. त्यानंतर आणखी काही पुरावे मिळाले.

सांडपाण्याच्या टाकीतून मानवी कवटीशिवाय काही हाडेही सापडली. याशिवाय, त्याच्या हाताला बांधलेली दोरी, शर्ट सापडले आहेत.

पोलिसांनी हा मानवी सांगाडा ताब्यात घेऊन तपासणीसाठी पाठवून दिला.

घरमालकाने त्याचा आणि कवटीचा काहीही संबंध नसल्याचं सांगितल्यावर पोलिसांनी शेजारी पाजारी चौकशी सुरू केली.

त्यानंतर त्या घरात आठ वर्षांपूर्वी एक महिला राहत असल्याचं पोलिसांना समजलं. त्या महिलेचा पती एकदा बाहेरगावी गेला तो कधी परतलाच नाही असं पत्नीने शेजाऱ्यांना सांगितलं होतं. तीच माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली.

हा प्रकार कळताच पोलिसांनी महिलेचा शोध सुरू केला. तेव्हा ती महिला त्याच परिसरात राहत असल्याचं समजलं. पोलिसांनी तिला शोधून तिची चौकशी सुरू केली.

सुकांती या महिलेने जशी गोष्ट शेजाऱ्यांना सांगितली होती, तशीच गोष्ट पोलिसांनाही सांगितली.

तिने पोलिसांना सांगितलं की, तिचा नवरा कोईम्बतूरला गेला असून तेथील एका बाईसोबत राहतो. आणि तो वेळोवेळी खर्चासाठी पैसे पाठवतो.

मात्र पोलिसांनी त्यावर विश्वास ठेवण्यास नकार दिला. त्यांनी सुकांती विषयी तपास करायला सुरुवात केली. पोलिसी खाक्या दाखवल्यावर सुकांतीने पोलिसांना काही धक्कादायक माहिती सांगितली.

सांडपाण्याच्या टाकीत सापडलेली ती कवटी आपल्या पतीचीच असल्याचं तिने मान्य केलं. त्यात सापडलेली हाडं, शर्ट हे तिच्या पतीचे असून तिने स्वत: पतीचा मृतदेह सांडपाण्याच्या टाकीत फेकल्याचं पोलिसांजवळ कबूल केलं.

अधिक तपास करण्यासाठी त्याच्या मृत्यूच्या दिवशी काय घडलं हे जाणून घेणं गरजेचं होतं.

तसा तपास पोलिसांनी सुरू केला.

या प्रकरणी आम्ही मृत पांडियन यांची बहीण सुधा यांच्याशी संपर्क केला.

त्यांनी बीबीसी तमिळला सांगितलं की, "माझा भाऊ बेपत्ता होऊन 8 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्याने घर सोडल्यानंतर सहा महिन्यांनी मी देवकोट्टाई पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी भावाची पत्नी सुकांती हिला चौकशीसाठी बोलावलं तेव्हा तिने आपल्या जबाबात सांगितलं होतं की, तिचा नवरा कोईम्बतूर येथील एका महिलेसोबत राहत असून तो वेळोवेळी तिला खर्चासाठी पैसे पाठवत असतो.

त्यावेळी सुकांतीने पोलिसांना जी माहिती दिली होती त्यावर सुधाला कायम शंका होती.

सुधा सांगतात, "त्या दिवशी माझ्या भावाने जो शर्ट घातला होता, तो शर्ट आज सांडपाण्याच्या टाकीतून काढलेल्या सांगाड्यासोबत सापडला. त्या दिवशी मीच त्याला दारापर्यंत सोडलं होतं."

तसेच त्यांनी भावाच्या हातावर बांधलेली लाल दोरी सांडपाण्याच्या टाकीत सापडली. त्यामुळे तो आपला भाऊच असल्याचं सुधा यांनी पोलिसांना सांगितलं.

आपल्या हरवलेल्या भावाबद्दल नेहमीच संशय घेणाऱ्या सुधा आणखी काही शंका उपस्थित करतात.

"माझा भाऊ लठ्ठ होता. त्यामुळे त्याच्या पत्नीने एकटीने मृतदेह पाण्यात टाकला असण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे पोलिसांनी तपास करून यामागील लोकांचा शोध घ्यावा," असं सुधा म्हणतात.

या प्रकरणावर बोलताना मृताचे सावत्र वडील सिद्धप्पा शेखर म्हणाले की, त्यांनाही पांडियन बेपत्ता झाल्याबद्दल शंका होती.

त्यांनी बीबीसी तमिळशी बोलताना सांगितलं की, "मी माझ्या नातेवाईकांना 6 वर्षांपूर्वी सांगितलं होतं की, सुकांती हिने माझ्या मुलाला मारून नदीत फेकून दिलं आहे. पण मला दारूचं व्यसन असल्याने कोणीही माझं ऐकलं नाही."

ते पुढे म्हणाले की, "घराच्या सांडपाण्याच्या टाकीतून हाडं आणि कवटी काढली तेव्हा माझ्या सुनेने आम्हाला याची माहिती दिली. मग आम्ही तिथे गेलो आणि तो पांडियन असल्याचं सांगितलं."

पोलिसांनी हत्येचा तपास करून यामागे असलेल्यांना अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली.

हत्या कशी केली?

पोलीस निरीक्षक सरवणन यांनी बीबीसी तमिळशी बोलताना पांडियनचा मृत्यू कसा झाला आणि मृत्यूच्या दिवशी काय घडलं ते सविस्तरपणे सांगितलं.

त्यांनी सांगितलं की, ज्या घरामध्ये सांडपाण्याची टाकी होती ते घर चार मजली असून त्याचे मूळ मालक सिरलन चेन्नई येथे राहत होते.

"सिरलनने तीन मजले भाड्याने दिले आहेत. सुकांती आणि तिचा नवरा पांडियन याच घरात राहत होते."

यावेळी त्यांनी घरातील सांडपाण्याची टाकी साफ करायला सुरुवात केली तेव्हा त्यांना कवटी, हाडे, शर्ट सापडले.

"या घरात गेल्या 9 वर्षांपासून राहत असलेला पांडियन हा एक रहस्यमय व्यक्ती असल्याचं तपासात समोर आलंय."

सुकांतीने (39) शेजारी राहणाऱ्या महिलेला सांगितलं होतं की, तिचा नवरा पांडियन (43) ड्रायव्हर असून गेल्या 6 महिन्यांपासून तो कामावर न जाता घरीच राहत होता. तो दारू पिऊन सुकांतीशी भांडण करायचा तिला मारायचा.

"1 मे 2014 रोजी, ज्या दिवशी पांडियनचा मृत्यू झाला त्या दिवशी संध्याकाळी 6 च्या सुमारास दोघा पती- पत्नीमध्ये वाद झाला. त्यात पांडियनने सुकांतीला मारहाण केली."

सरवणन पुढे सांगतात, या प्रकरणात सुकांती घराजवळच असलेल्या आपल्या आईच्या घरी निघाली. तिने बाहेर जाण्याचा प्रयत्न करताच पांडियनने तिला अडवलं.

याचा सुकांतीला राग आला आणि तिने रागाच्या भरात पांडियनला बाजूला ढकललं. इतक्यात तो शेजारच्या खांबाला धडकला आणि खाली पडला.

"सुकांती त्याच्याकडे न बघता तिच्या आईच्या घरी गेली आणि काही तासांनंतर जेव्हा ती परत आली, तेव्हा पांडियन त्याच ठिकाणी स्थिर होता."

सुकांतीने पोलिसांना सांगितलं की, "मी जवळ जाऊन त्याचा श्वास सुरू आहे का ते पाहिलं पण तो मरण पावला होता."

यानंतर सुकांतीने जवळील सांडपाण्याच्या टाकीचे झाकण उघडून पतीचा मृतदेह आत ढकलून पुन्हा झाकण बंद केलं. तपासात असंही समोर आलंय की, सहा महिन्यांनंतर तिने ते घर सोडलं आणि जवळच राहायला गेली. ती शिवणकामाचा व्यवसाय करत होती.

पांडियन-सुकांती दाम्पत्याला 16 वर्षांची मुलगी आणि 10 वर्षांचा मुलगा आहे.

पोलीस तपासात सुकांतीने खुनाची कबुली दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिला मदुराई मध्यवर्ती कारागृहात ठेवलं आहे.

यावर इन्स्पेक्टर सरवणन म्हणाले की, आम्ही याचा आणखीन तपास करत आहोत.

शिवगंगाचे एसपी अरविंद यांनी 24 तासांत आरोपींना अटक करणाऱ्या पोलिसांचं कौतुक केलं आहे.

या प्रकरणाबाबत बीबीसी तमिळशी बोलताना ते म्हणाले, "हाडाच्या सापळ्यावरून गुन्हेगाराला शोधणं खूप अवघड आणि आव्हानात्मक काम आहे. देवकोट्टई पोलिसांनी हे प्रकरण अत्यंत नाजूकपणे हाताळलं आणि 24 तासांच्या आत गुन्हेगाराला जेरबंद केलं."

या प्रकरणात काम करणाऱ्या पोलास अधिकाऱ्यांचं कौतुक होत आहे. या हत्येमागे आणखी कोणी आहे का, याचा तपास पोलीस करत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)