रश्मी ठाकरेंचे 19 बंगले कुठे गेले? किरीट सोमय्यांचा सवाल, #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज सकाळी वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट यांच्यावर प्रकाशित झालेल्या बातम्याचा थोडक्यात आढावा.
1. रश्मी ठाकरेंचे 19 बंगले कुठे गेले? किरीट सोमय्यांचा सवाल
रश्मी उद्धव ठाकरे यांचे कोर्लई गावात 19 बंगले असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे.
"आम्हाला आतापर्यंत येथे बंगले आहेत, असं सांगण्यात येत होतं. लेखी उत्तरं सुद्धा तशीच होती. त्यानंतर आम्ही ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली. तर संबंधित ठिकाणी बंगले नाहीत, असं सांगण्यात येतं आहे. त्यामुळे सदर जागेवरील बंगल्यांचं काय झालं? याची चौकशी करावी,” अशा आशयाची तक्रार सोमय्यांनी पोलिसांकडे केली आहे.
ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.
किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
“सोमय्यांनी यापूर्वी जे आरोप केले होते, ते सिद्ध करायला लावा, ते तुमच्या लॉंड्रीत कसे स्वच्छ झाले? ते आधी सांगा…, मग दुसऱ्यांवर आरोप करा,” अशी खोचक टीका अरविंद सावंतांनी केली.
2. आजपासून राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर
राज्यभरातील निवासी डॉक्टरांकडून आजपासून संपाची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटनेने पुकारलेल्या या संपानंतर राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टर आज संपावर असणार आहे.
दरम्यान, आज सकाळी 8 वाजल्यापासून निवासी डॉक्टर्स राज्यातील शासकीय व पालिका महाविद्यालयात निदर्शने करणार असल्याची माहिती निवासी डॉक्टर संघटनेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे या संपाचा फटका रुग्णांना बसण्याची शक्यता आहे.
ही बातमी एबीपी माझाने दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
अनेकदा मागणी करून देखील मुख्यमंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप निवासी डॉक्टर संघटनेकडून करण्यात आला आहे. तर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी निवासी डॉक्टरांकडून आज राज्यभरातील शासकीय रुग्णालयात निदर्शने केली जाणार आहे.
3. बेरोजगारी दरात वाढ, डिसेंबरमध्ये बेरोजगारीचा दर 8.30%
देशात बेरोजगारीचा दर डिसेंबर 2022 मध्ये वाढून 8.30 टक्क्यांवर पोहोचला आहे. तो 16 महिन्यांत सर्वाधिक आहे. यापूर्वी ऑगस्ट 2011 मध्ये बेरोजगारी दर 8.32% होता. डिसेंबर 2011 मध्ये तो 7.11% आणि नोव्हेंबर 2022 मध्ये 8% होता.
ही बातमी दिव्य मराठीने दिली आहे.
प्रामुख्याने शहरी भागांत बेरोजगारी दर वाढल्याने ही वाढ झाली आहे. डिसेंबरमध्ये शहरी भागात बेरोजगारी दर 10.09 टक्क्यांवर पोहोचला.
महाराष्ट्रात हाच दर 3.1 % एवढा आहे.
4. भाजपने पंकजा मुंडेंना डावललं? कार्यक्रमपत्रिकेत नाव नाही
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा भाजपकडून डावलण्यात येत असल्याचं दिसून येत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाच्या पत्रिकेत पंकजा मुंडे यांचं नाव नाही.
ही बातमी सकाळने दिली आहे.

फोटो स्रोत, FACEBOOK/PANKAJA MUNDE
तसंच या आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व पालकमंत्री अतुल सावे यांच्यासह शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांनी सुरू केलेल्या व्यसनमुक्ती कार्यक्रमाला शनिवारी बीडमध्ये हजेरी लावली.
भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या घरीही भेट देऊन पक्षाच्या आमदारांबरोबर चर्चा केली. पण भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व खासदार प्रीतम मुंडेसह मुंडे भगिनी समर्थक पक्षनेतृत्वाच्या दौऱ्याकडे फिरकले नाहीत. त्यामुळे भाजप अंतर्गतचा कलह ठळकपणे दिसून आला.
5. वन-डे वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयची बैठक
बीसीसीआयने 1 जानेवारीला एक बैठक घेतली. मुंबईतील एक हॉटेलमध्ये ही बैठक पार पडली. जवळपास 4 तास ही बैठक चालली. यामध्ये भारतीय टीमचे हेड कोच राहुल द्रविड, नियमित कर्णधार रोहित शर्मा, एनसीए हेड व्हीव्हीएस लक्ष्मण तसंच चीफ सिलेक्टर चेतन शर्मा यांना समावेश होता. या बैठकीमध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.
ही बातमी झी 24 तासने दिली आहे.
बीसीसीआयने काही मोठे निर्णय घेतले ते असे -
अनेकदा आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूचा टीम इंडियामध्ये समावेश केला जातो. मात्र आता असं होणार नाही. टीममध्ये निवड होण्यापूर्वी देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीच्या आधारे युवा खेळाडूंचं सिलेक्शन होणार आहे.
यो-यो टेस्टशिवाय डेक्सा टेस्ट पास करणं आता बंधनकारक असणार आहे. या टेस्टमध्ये पास होणाऱ्या खेळाडू टीममध्ये जागा दिली जाणार आहे.
आगामी दौरे आणि आगामी वनडे वर्ल्डकप पाहता एनसीएन आयपीएल टीमसोबत काम करणार आहे. यावेळी अशा खेळाडूंवर लक्ष ठेवले जाईल, जे आयपीएल 2023 चा भाग असतील.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








