9 चेंडूत 50 धावा, 34 चेंडूत शतक; नेपाळने एकाच सामन्यात केली अनेक विक्रमांची नोंद

चीनमध्ये सुरु असलेल्या एशियन गेम्समध्ये नेपाळने इतिहास घडवलाय.

या स्पर्धेत सहभागी झालेल्या नेपाळच्या क्रिकेट टीमने 'न भूतो, न भविष्यती' अशी कामगिरी करून एकाच टी-ट्वेन्टी सामन्यात अनेक विश्वविक्रमांची नोंद केली आहे.

वीस ओव्हर्सच्या डावात तब्बल तीनशे धावा करून नेपाळच्या फलंदाजांनी मंगोलियाच्या गोलंदाजांची दाणदाण उडवली.

याच सामन्यात सर्वाधिक वेगवान अर्धशतक, शतक करून आणखीन दोन विश्वविक्रम नेपाळने आता त्यांच्या नावावर केले आहेत.

नेपाळच्या एका फलंदाजाने फक्त 9 चेंडूत अर्धशतक झळकावलं, तर दुसऱ्या एका फलंदाजाने केवळ 34 चेंडूंमध्ये शंभर धावा करून विक्रम केला.

अर्धशतक झळकावल्यानंतर नेपाळच्या दीपेंद्र सिंगने पुढच्या दहा चेंडूंमध्ये 6,6,6,6,6,6,2,6,6,2 अशा धावा केल्या.

मंगोलियाच्या गोलंदाजांनी टाकलेल्या 120 चेंडूंपैकी तब्बल 26 चेंडू हे मैदानाबाहेर फटकावण्यात आले. नेपाळ विरुद्ध मंगोलिया सामन्यात हे सगळे विक्रम मोडण्यात आले.

नेपाळने 20 ओव्हर्समध्ये तीन गडी गमावत 314 धावा केल्या.

2019 मध्ये अफगाणिस्तानने आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात 278 धावा करून टी-ट्वेन्टी सामन्याच्या एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला होता. नेपाळने आता हा विक्रम मोडून काढला आहे.

नेपाळने उभारलेल्या या धावांच्या माउंट एव्हरेस्टला प्रत्युत्तर देताना क्रिकेटमध्ये दुबळा समजला जाणारा मंगोलियाचा संघ फक्त 41 धावाच करू शकला आणि नेपाळने मंगोलियावर 273 धावांनी विजय मिळवला.

नेपाळच्या फलंदाजांनी एकाच डावात 26 षटकार खेचून आणखीन एक विश्वविक्रम त्यांच्या नावे केला. याआधी टी-ट्वेन्टी सामन्यात एकाही संघाला एवढे षटकार मारता आलेले नव्हते.

2019 मध्ये अफगाणिस्तानच्या संघाने एकाच डावात 22 षटकार खेचले होते.

9 चेंडूत अर्धशतक आणि 34 चेंडूंमध्ये खणखणीत शतक

नेपाळचा ऑल राउंडर दीपेंद्र सिंग इरी याने 9 चेंडूत अर्धशतक झळकावून युवराज सिंगचा विश्वविक्रम मोडला आहे.

2007 ICC T20 विश्वचषक स्पर्धेत युवराज सिंगने फक्त 12 चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं.

इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडला सहा चेंडूत सहा षटकार खेचण्याची कामगिरी युवराजने त्याच सामन्यात केली होती. त्यामुळे प्रत्येक भारतीय क्रिकेट रसिकाच्या मनावर तो सामना कोरला गेला होता.

डावाच्या शेवटी नाबाद राहिलेल्या दीपेंद्र सिंगने खेळलेल्या एकूण दहा चेंडूंमध्ये त्याने 8 षटकार खेचले. त्याचप्रमाणे नेपाळच्या कुशल मल्लाने भारताचा रोहित शर्मा आणि दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलर यांच्यासारख्या टी-20 दिग्गजांचे विक्रम मोडीत काढत 34 चेंडूत शतक झळकावलं.

त्याने 50 चेंडूत 8 चौकार आणि 12 षटकारांसह 137 धावा केल्या. रोहित आणि मिलरने यापूर्वी 35 चेंडूत शतकं झळकावली होती. या मालिकेत भारतीय संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत सहभागी होणार आहे. 3 ऑक्टोबरला भारताचा हा सामना असेल.

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)