मोहम्मद सिराजला रोहित शर्माने का थांबवलं? स्टुअर्ट बिन्नीचा विक्रम का मोडू दिला नाही?

रविवारी कोलंबोत झालेल्या एशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेच्या पूर्ण संघाला केवळ 50 धावांमध्ये बाद केलं.

आर प्रेमदासा स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात श्रीलंकेला 10 विकेटने हरवून भारत आठव्यांदा विजेता ठरला.

या सामन्यात मोहम्मद सिराजने आपल्या गोलंदाजीने सात षटकांत श्रीलंकेचे सहा गडी बाद केले. आणखी एक षटक टाकायला मिळालं असतं तर कदाचित त्याने सात बळी घेतले असते, मात्र असं झालं नाही कारण कर्णधार रोहित शर्माने असं करण्यावाचून त्याला रोखलं.

सामन्यानंतर रोहित शर्माने संवादकर्त्यांशी बोलताना म्हटलं की त्याला प्रशिक्षकांनी असं करण्यासाठी सांगितलं होतं.

काय कारण होतं?

मोहम्मद सिराजने आपलं सहावं षटक संपवल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा थर्डमॅनकडे गेला आणि त्यांच्यासोबत बोलला.

सिराजला आणखी गोलंदाजी करायची होती, मात्र हा संदेश आल्यानंतर सिराजला आणखी एक षटक टाकायची संधी मिळाली नाही.

त्याने सहा बळी घेतले होते मात्र त्याला सातवा बळी घेता आला नाही. जर त्याने सात बळी घेतले असते तर स्टुअर्ट बिन्नीचा विक्रम मोडून एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी घेणारा खेळाडू ठरला असता.

2014 साली मीरपूरमध्ये बांगलादेशच्या विरोधात खेळताना बिन्नीने 4 षटक 4 बॉल मध्ये 6 बळी घेतले होते.

सामन्यानंतर झालेल्या संवाद परिषदेत कर्णधार रोहित शर्माने त्याचं कारण नमूद केलं आणि सांगितले की त्याला मोहम्मद सिराजला थांबवण्यासाठी सांगितले गेलं होतं.

त्याने सांगितले की, “सिराजने 7 षटक टाकले आणि माझी अशी इच्छा होती की त्याला आणखी षटक टाकायला मिळायला हवेत पण माझ्या प्रशिक्षकांकडून संदेश मिळाला की त्याला आता थांबवायला हवं.”

आपल्या या निर्णयाबद्दल त्याने अतिशय संयमाने सांगितले की, “गोलंदाजीला घेऊन सिराज स्वत: उत्साहित होता, तो आणखी गोलंदाजी करू इच्छित होता.

परंतु कोणताही गोलंदाज किंवा फलंदाजाचा स्वभाव असतो की जेव्हा केव्हा संधी दिसते तेव्हा त्यांना संधीचं सोनं करायचं असतं. पण इथेच माझी भूमिका येते, मला सर्व गोष्टी नियंत्रणात ठेवायच्या असतात जेणेकरून कोणताही खेळाडू स्वत:वर गरजेपेक्षा जास्त दबाव घेणार नाही आणि थकणार नाही."

“मला आठवतंय की त्रिवेंन्द्रममध्ये जेव्हा आम्ही श्रीलंकेच्या विरोधात खेळत होतो, त्यावेळीसुद्धा अशीच परिस्थिती होती. त्याने 4 बळी घेतले होते आणि 8-9 षटक टाकले होते. पण मला वाटतं की 7 षटकसुद्धा पुरेसे आहेत.”

श्रीलंकेसोबत झालेल्या सामन्यातील गोलंदाजीबद्दल रोहित शर्मा म्हणाला की,

“सामन्यामध्ये भारतातर्फे तीन गोलंदाजांनी गोलंदाजी केली आणि सिराजला इतर दोघांच्या तुलनेत अधिक षटक टाकण्याची संधी मिळाली. रविवारचा दिवस सिराजचा होता. तो त्या दिवसाचा हिरो होता."

रोहित शर्मा आणखी काय-काय म्हणाला?

पत्रकार परिषदेत रोहित शर्मा म्हणाला की, “खेळात वेगवेगळ्या वेळी आमच्यासमोर वेगवेगळी आव्हानं होती आणि आम्ही संघभावनेने त्याचा सामना केला.”

मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीच्या प्रश्नावर तो म्हणाला, “मला खूप समाधान वाटतं, जेव्हा मी कोणत्याही गोलंदाजाला अशी गोलंदाजी करताना पाहतो.

माझ्या आधी जितके खेळाडू खेळले, ज्यांनी कर्णधारपद भूषविलं मला असं वाटतं की जलद गोलंदाज अशी गोष्ट आहे, ज्यांच्याबद्दल कर्णधाराला कायम अभिमान वाटतो.”

आमच्या संघात पाच जलद गोलंदाज आहेत आणि सर्वजण वेगवेगळ्या क्षमतेचे आहेत, म्हणूनच कर्णधार म्हणून मला संघात खूप विश्वास मिळतो.

आमचा प्रयत्न होता की वेगवेगळी शैली असलेले आक्रमक गोलंदाज असतील आणि आत्ताच्या संघात आमच्याकडे तशी विविधता होती.

कुलदीप यादवबद्दल तो म्हणाला, “मागील अडिच वर्षात त्याचा खेळ सुधारत गेला आहे, संघाला आवश्यकता असताना त्याने सामन्यांमध्ये आपल्या गोलंदाजीने योगदान दिलं. त्याचं संघात असणं ही चांगली गोष्ट आहे."

सिराजची गोलंदाजी

मोहम्मद सिराजने अवघ्या 16 चेंडूत श्रीलंकेच्या पाच फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यादरम्यान सिराजने एका षटकात चार बळी घेतले. जसप्रीत बुमराहने एक आणि हार्दिक पांड्यानेही तीन बळी घेतले.

मोहम्मद सिराजने पथुम निसांका, सदीरा, चरिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, दासुन शनाका आणि कुसल मेंडिसचे बळी घेतले.

त्याला 7 षटकांत 6 बळी घेतल्याबद्दल सामनावीराचा पुरस्कार दिला गेला.

मोहम्मद सिराज कोण आहे?

1994 साली जन्माला आलेल्या सिराजचे वडिल मोहम्मद हे रिक्षाचालक होते. कुटुंबाचं उत्पन्न मर्यादित असल्यामुळे सिराजला कधीही कोणत्याही क्रिकेट अकॅडमीमध्ये जाता आलं नाही.

टेनिस बॉलने गोलंदाजी करत त्याने क्रिकेटचे धडे घेतले. खरंतर सुरूवातीला त्याला फलंदाजीमध्ये अधिक रस होता.

2015 साली हैदराबादच्या रणजी संघात स्थान मिळवण्यात तो यशस्वी झाला. पहिल्याच सत्रात त्याने आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

2017 हे वर्ष त्याच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरले. 2017 च्या आयपीएल लिलावादरम्यान, हैदराबाद सनरायझर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात त्याला त्यांच्या संघात समाविष्ट करण्यासाठी स्पर्धा लागली होती.

याचा परिणाम असा झाला की त्याला त्यांच्या मूळ किमतीपेक्षा 13 पट जास्त किंमत मिळाली. त्याची मूळ किंमत 20 लाख रुपये होती.

सनरायझर्स हैदराबादने त्याला 2.6 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं.

यानंतर त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 संघात संधी मिळाली. त्यानंतर 2019 मध्ये, त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि पुढच्या वर्षी 2020 मध्ये, त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्याच सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)