42 मुलांचं अपहरण, भीक मागायला लावून बहुतेकांची हत्या, 3 बायका आणि 25 वर्षं चाललेला खटला

गावित भगिनी

फोटो स्रोत, SWATI PATIL/BBC

    • Author, अरूंधती रानडे-जोशी
    • Role, बीबीसी मराठीसाठी

35 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्याची 25 वर्षं चाललेली केस अखेर गेल्या वर्षी अंतिम निकाल फिरवून निश्चित झाली.

मंत्रालयातल्या आगीपासून राजकारणापर्यंत आणि लालफितीपासून कायद्याच्या किचकट सोपस्कारांपर्यंत अनेक कारणं एकत्र येत या गुन्ह्यातील सीरिअल किलर्सना सर्वोच्च व्यवस्थेने मान्य केलेली फाशी कधीच देण्यात आली नाही.

महाराष्ट्रातल्या सर्वांत क्रूर सीरिअल किलर ठरलेल्या, मुलांना भिकेला लावणाऱ्या, मुलं मारणाऱ्या तीन बायकांची ही भयकथा... अथपासून इतिपर्यंत.

नराधम, क्रूरकर्मा वगैरे क्रौर्यातिरेकाची विशेषणं बहुतेक पुल्लिंगी असतात. कारण स्त्रीस्वभाव हा आपल्या समाजात दयाळू, प्रेमळ, वगैरे समजला जातो.

स्त्रियांच्या बाबतीतल्या कनवाळू, दुर्बल वगैरे सगळ्या स्टीरिओटाइप्स म्हणजेच ठोकताळ्यांना छेद देत या तिघींनी मिळून अगदी योजनाबद्धपणे 42 मुलांना पळवलं त्यातल्या बहुतेकांना ठार मारलं.

हे इतकं बेमासूमपणे सहा वर्षं किंवा त्याहूनही अधिक काळ सुरू होतं की प्रकरण उलगडायलाच बरीच वर्षं लागली.

अखेर 13 लहान मुलांना किडनॅप केल्याचा आणि त्यातल्या किमान सहा जणांची निर्दयीपणाने हत्या केल्याचं सिद्ध झालं.

महाराष्ट्राच्या इतिहासातला सर्वाधिक गाजलेला, सर्वाधिक लांबलेला आणि सर्वांत क्रूर गुन्ह्याचा खटला म्हणून ओळखला जातो गावित भगिनींनी आईच्या साथीने केलेलं क्रूरकर्म.

ही बातमी बाहेर यायलाच मुळात उशीर झाला होता. त्यानंतर खटला लांबला. निकाल आल्यानंतर फाशीचा निर्णय लांबला. इतका लांबला की, सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलेली, राष्ट्रपतींनी दयायाचिका फेटाळलेली ही फाशी या विलंबापायी रद्द करावी लागली.

कोण होत्या सीरिअल किलर भगिनी?

1990 ते 1996 च्या दरम्यान पुणे, मुंबई उपनगर, नाशिक, कोल्हापूर अशा पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि मुंबईजवळच्या शहरांमधून लहान मुलं गायब होत होती.

या काळात तब्बल 42 लहान मुलांना रीतसर पळवण्यामागे होत्या तीन महिला. अंजनाबाई गावित, तिची मुलगी सीमा उर्फ देवकी गावित आणि दुसरी विवाहित मुलगी रेणुका शिंदे (उर्फ रिंकू उर्फ रतन) 90च्या दशकाच्या सुरुवातीला पुण्यात गोंधळेनगर वस्तीत एक खोली भाड्याने घेऊन राहात असत.

मोलमजुरी आणि मुख्यतः चोरीमारी करून पोट भरत असत. रेणुकाचा नवरा किरण शिंदे त्या वेळी पुण्यात शिंप्याचं काम करीत असे. याच किरणने पुढे खटल्याच्या वेळी महत्त्वाची भूमिका निभावली.

स्वतःच्या मुलापासूनच झाली सुरुवात

गर्दीच्या ठिकाणी, बाजारात, जत्रेत बेसावध महिलांची पर्स ,दागिने चोरणे, पुरुषांची पाकिटं मारणं असली कामं सीमा, रेणुका आणि त्यांची आई अंजनाबाई करीत असे.

1990 मध्ये एकदा रेणुकाने अशीच गर्दीच्या ठिकाणी एका महिलेची पर्स खेचली. पण तिची चोरी पकडली गेली. त्या वेळी रेणुकाचा जेमतेम 2 वर्षांचा मुलगा तिच्याबरोबर होता. पकडलं गेल्यावर रेणुकाने मुलाला पुढे करत कांगावा सुरू केला.

'मी चोर नाही. या लहान लेकराची फक्त माय आहे', असं सांगत रडत रडत तिने सहानुभूती मिळवली आणि त्या गर्दीत चक्क तिची सुटका झाली.

हा किस्सा तिने आईला आणि बहिणीला ऐकवला आणि त्या तिघींना चोरीचा नवा, 'सुरक्षित' मार्ग सापडला.

मुलांना पळवून वापर करायचं सत्र सुरू

रस्त्यावरची अनाथ मुलं, भिकारी मुलं यांना पळवून नेऊन वेगवेगळ्या शहरांत जायचं. तिथल्या जत्रा, मंदिरं अशा गर्दीच्या ठिकाणी मुलासह जाऊन चोरी करायची.

मुलाबाळासह असलेल्या स्त्रीकडे कोणी सहजी चोर म्हणून पाहात नाही, या ठोकताळ्याचाच गैरफायदा घेत गावित भगिनी आणि अंजनाबाईने चोरीचा सपाटा लावला.

पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर अशा अनेक ठिकाणी त्यांनी अशा चोऱ्या केल्याचं पुढे खटल्यादरम्यान उघड झालं.

पहिला बळी: अति रडतो म्हणून संतोषला संपवलं

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

एकदा अंजनाबाई आपल्या मुलींसह चोरी करायला गेली. एका भिकाऱ्याचं दीड वर्षाचं पोर त्यांनी कडेवर उचलून बरोबर नेलं होतंच. त्या पोराला काही दिवसांपूर्वीच या भगिनींनी पळवून आणलं होतं. त्याला संतोष असं म्हणत असत.

तिथे दागिने पळवताना सीमा पकडली गेली. गर्दी जमली. गर्दीतल्या बायकांनी मारहाण सुरू केली. अंजनाबाईच्या काखेत छोटा संतोष होता. मुलीला वाचवायला अंजनाबाईने वेगळाच कांगावा सुरू केला. संतोषला जमिनीवर फेकलं आणि पोर पडलं म्हणत आरडा-ओरड सुरू केली.

ते कसं आपलं पोर आहे म्हणत सीमाने रडारड सुरू केली आणि संतोषची शपथ घेत आपण चोर नसल्याचं सांगू लागली. पोलिसांच्या ताब्यात देण्याच्या तयारीत असलेल्या जमावाला अचानक त्या छोट्या रडणाऱ्या आई-मुलाकडे पाहून 'दया' आली आणि त्यांनी सीमाला सोडून दिलं.

पुढे तिघी ते गाव सोडण्याच्या तयारीत भराभर एसटी स्टँडवर आल्या. कडेवरचा संतोष अखंड रडत होता. जमिनीवर आपटल्यामुळे त्याला सणकून मार लागला होता. त्याच्या दुखापतीकडे सपशेल दुर्लक्ष करत तिघींना पळून जायची घाई लागली होती. जखमी अवस्थेतल्या संतोषला तसंच घेऊन जाणंही धोक्याचं होतं. त्याचं रडणं थांबतच नव्हतं. पोरगं अडचणीत आणणार याची जाणीव झाली तसं अंजनाबाईने सरळ एका दिव्याच्या खांबाला त्याचं डोकं आपटवलं.

त्या माराने पोर बेशुद्ध झालं. आणखी एक घाव वर्मी बसला तसा संतोषचा जीव गेला. त्याला तिथेच जवळ पुरून तिघी जणी पसार झाल्या.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त, 1

दीड वर्षांच्या मुलाचा अगदी 'सहज' खून करून त्या तिघी सहीसलामत सटकल्या. त्यांचा धीर आणखीनच वाढला आणि चोरीची नवी कल्पना सुचली. मग पळवून आणलेल्या मुलांची किरकिर वाढायच्या आत त्यांनी थेट त्यांना संपवायला सुरुवात केली.

भीड चेपलेल्या तिघी जणी अगदी थंडपणे मुलांना मारायला लागल्या. वेगवेगळ्या शहरात घटना घडत असल्याने या सगळ्याचा एकसंध विचार झालाच नाही. शिवाय रेणुका आणि सीमा अशीच मुलं हेरून पळवायच्या, जी गरीब घरातली आहेत.

झोपडपट्टीतली, अनाथ मुलं त्यांची शिकार होती. कारण ती हरवल्याची तक्रार शक्यतो पोलिसांपर्यंत पोहचत नसे आणि पोहोचली तरी अशा कुटुंबांना पोलिसांचा पाठपुरावा करणं फार काळ शक्य होत नसे. त्यामुळे या तिघींचं फावलं.

क्रौर्याची परिसीमा

रेणुका, सीमा आणि अंजना गावित यांनी मिळून 42 मुलं पळवली असावीत, असा आरोप त्यांच्यावर होता. त्यातल्या बहुतेकांना त्यांनी मारलं असावं. पोलीस यातल्या काही हत्यांची केसच उभे करू शकले कारण पुराव्याचा अभाव.

न्यायालयात 13 मुलांचं अपहरण आणि किमान 6 खून सिद्ध झाले. पळवलेली बहुतांश मुलं अगदी लहान होती. त्यांना कुठल्याही शस्त्राशिवाय मारल्याने पुरावाच मागे उरला नाही. बहुतेकांचे खून जमिनीवर आपटून, डोकं खांबाला आपटून, गळा आवळून, नाक-तोंड दाबून झाले होतो.

एकाला तर त्यांनी पायाखाली ठेचून मारल्याचं सांगितलं गेलं, पण हे सिद्ध होऊच शकलं नाही कारण अनेक मुलांचे मृतदेहसुद्धा एवढ्या वर्षांनी सापडले नाहीत.

नवऱ्याच्या दुसऱ्या बायकोमुळे गुन्हा प्रकाशात

अंजनाबाई गावितचं दोन वेळा लग्न झालं होतं. पहिल्याने नांदवलं नाही, तेव्हा मोहन गावित या माजी सैनिकाबरोबर अंजनाबाईने सूत जमवलं. पण त्याच्याशीही पटलं नाही. तोवर पदरी दोन मुली होत्या.

पुढे मोहन गावितनेही दुसरं लग्न केलं आणि त्याला दुसऱ्या बायकोपासूनही एक मुलगी झाली. तिचं नाव क्रांती. या क्रांतीला पळवायचा अंजनाबाईने डाव रचला. नवऱ्याला आणि सवतीला धडा शिकवण्यासाठी मुलींना हाताशी धरून अंजनाबाईने क्रांतीला पळवलं.

9 वर्षांच्या क्रांतीचा मृतदेह नाशिकजवळच्या गावात शेतात सापडला होता. मोहन गावितांच्या दुसऱ्या बायकोने आपली मुलगी हरवल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. त्या तपासादरम्यान पोलीस अंजनाबाईपर्यंत पोहोचले.

सीमा, रेणुकालाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं. त्यावेळी पोलिसांनी त्यांचा बडगा दाखवल्यानंतर प्रथम रेणुकाने तोंड उघडलं.

प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

आईच्या सांगण्यावरून क्रांतीला मारल्याचं तिने कबूल केलं.

अंजनाबाई, रेणुका, सीमा, किरण शिंदे यांनी 19 ऑगस्ट 1995 रोजी क्रांतीचे शाळेतून अपहरण केले. हे सगळे पुण्यात मकवाना चाळीत क्रांतीसोबत साडे तीन महिने राहिले.

पुढे 6 डिंसेबर 1995 रोजी क्रांतीला घेऊन हे सगळे कोल्हापूर जिल्ह्यातील नरसोबाची वाडी इथं आले. दत्त जयंतीमुळे मंदिरात गर्दी होती. या सगळ्यांनी देवाचे दर्शन घेऊन बाहेर आल्यावर एसटी स्टॅंडच्या शेजारी असलेल्या शेतात क्रांतीची गळा आवळून खून केला आणि तिचा मृतदेह नदीकाठी तिथेच फेकुन दिला अशी कबुली या गावित बहिणींनी दिली.

ती केस उलगडण्याच्या बेतात असताना कोल्हापूरच्या काही बेपत्ता मुलांसदर्भातल्या केस उलगडण्यात आल्या. पोलीस तपास अधिकारी सुहास नाडगौडा यांनी या घटनांचा संबंध जोडून तपास करायचं मोठं काम निभावलं.

सीरिअल किलर म्हणून समोर आले भयानक गुन्हे

कोल्हापूरला पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले सुहास नाडगौडा यांना नाशिक पोलिसांनी अंजनाबाईला अटक केल्याची माहिती मिळाली.

कोल्हापूरच्या काही मुलांच्या बेपत्ता होण्याशी संबंध जोडत त्यासंदर्भात अंजनाबाई आणि तिच्या मुलींकडे चौकशी करण्यात आली.

रेणुकाचा नवरा किरण शिंदे याला ताब्यात घेतल्यानंतर रेणुका आणि त्याने मिळून अनेक गुन्ह्यांची कबुली दिली आणि पोलिसांसमोर सीरिअल किलिंगचं भयंकर प्रकरण उलगडलं. पण सहा वर्षांत घडलेल्या सगळ्या गुन्ह्यांचा एकत्र विचार करत पुरावे गोळा करून केस मजबूत करणं जिकिरीचं काम होतं.

नुसत्या पोलिसांसमोरच्या कबुली जवाबाने कोर्टात केस टिकलीच नसती.

यासंदर्भात हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना तत्कालीन पोलीस अधिकारी सुहास नाडगौडांनी सांगितलेलं, "अनेक जिल्ह्यातल्या पोलिसांच्या टीमने एकत्रित काम सुरू केलं. गुन्हे अन्वेषण शाखेने तपास केला आणि कोल्हापूर सत्र न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. त्या वेळी मी कोल्हापुरात नियुक्तीवर होतो."

रेणुकाचा नवरा झाला माफीचा साक्षीदार

रेणुका आणि सीमाकडून न्यायाधीशांसमोर गुन्ह्याची कबुली मिळणं शक्य नव्हतं. त्या मुरलेल्या गुन्हेगार होत्या. अजिबात बधत नव्हत्या. अखेर अनेक गुन्ह्यांमध्ये त्यांना साथ करणारा किरण शिंदे म्हणजे रेणुकाचा नवरा - त्याला माफीचा साक्षीदार म्हणून तयार करण्यात आलं.

किरणच्या तोंडूनच न्यायालयाला आणि पर्यायाने अवघ्या जनतेला या चौघांनी केलेल्या क्रूर कर्माचा एकेक वृत्तांत समजला. महाराष्ट्र नव्हे तर देश या सीरिअल किलिंगच्या प्रकरणाने हादरला.

प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

दुर्मिळातली दुर्मिळ घटना आणि क्रौर्याची परिसीमा गाठलेली असल्याने रेणुका शिंदे आणि सीमा गावित यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 1996 ला हे प्रकरण उजेडात आलं. त्यानंतर दोन बहिणी, आई अंजनाबाई आणि किरण शिंदे यांना अटक करण्यात आली होती.

पण न्यायालयात खटला उभा राहण्यापूर्वीच पोलीस कोठडीतच अंजनाबाईचा मृत्यू झाला. त्यामुळे पुढे रेणुका आणि सीमाविरोधातच खटला चालला. किरणला माफीचा साक्षीदार म्हणून मुक्त करण्यात आलं.

लांबलेला खटला

प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि पुराव्यांचा अभाव असल्याने पोलिसांना गुन्हेगारांपर्यंत पोहोचूनही खटला उभा करण्यासाठी बरेच कष्ट करावे लागले, असं या खटल्याशी संबंधित वकील सांगतात. तरीही 156 साक्षीदार खालच्या कोर्टाने तपासले.

"गावित भगिनींनी अपहरण केलेल्या किंवा मारून टाकलेल्या काही मुलांचे पालक खटला उभा राहिला तेव्हा सुरुवातीला नियमितपणे कोर्टात हजर असायचे. त्यांनी न्यायाधीशांसमोर जबाबही नोंदवला. पण जसजशी केस अधिकाधिक गुंतागुंतीची होत गेली आणि विलंब होत राहिला तसे या पालकांची उपस्थितीही कमी होत गेली", असं अॅड माणिक मुळीक यांनी हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना नोंदवलेलं.

अॅडव्होकेट मुळीक यांनी गावित भगिनींतर्फे कनिष्ठ न्यायालयात युक्तिवाद केला होता.

या सीरिअल किलर भगिनींची शिकार झालेली बहुतेक मुलं अतिसामान्य किंवा गरीब कुटुंबातली होती. रस्त्यावर राहणारी अनाथ मुलंही यात होती. त्यामुळे त्यांच्या वतीने केसचा पाठपुरावा करणारं कुणीच नव्हतं वा त्या मुलांच्या पालकांना परवडणारं नव्हतं.

खटल्या दरम्यान लोकांमध्ये तीव्र संताप

दैनिक पुढारीचे ज्येष्ठ पत्रकार महेश कुर्लेकर यांनी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात या खटल्याचे वार्तांकन केले होते. इतक्या क्रूर पद्धतीने बालकांना ठार करणाऱ्या या तिघींबद्दल लोकांमध्ये प्रंचड रोष होता. त्यावेळी सुनावणीदरम्यान न्यायालयाच्या आवारात गर्दी असल्याची आठवण कुर्लेकर यांनी सांगितली होती.

"या हत्याकांडात निष्पाप मुलांनी जीव गमावला होता. त्यामुळं लोकांमध्ये खास करुन महिला वर्गात याबद्दल चीड आणि संतप्त भावना होत्या. विशेष म्हणजे हा राग व्यक्त करण्यासाठी त्यावेळी काही महिलांनी न्यायालयात येतांना सोबत पिशवीत वरंवटा आणला होता.

"असं कृत्य करणाऱ्या या तीन महिलांना ठेचून मारण्याच्या भावनेत आलेल्या महिलांना पोलिसांनी वेळीच रोखलं. पण ज्या मुलांचा या तिघींनी जीव घेतला त्यांच्याशी संबंध नसताना महिला वर्गात मोठ्या प्रमाणात संतापाची लाट होती," अशी माहिती कुर्लेकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली होती.

ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी सांगतात, "जेव्हा हा खटला सुरू होता. त्यावेळी न्यायालयात सुनावणीसाठी आलेल्या या मायलेकींच्या चेहऱ्यावर पश्चातापाची भावना नसायची.

फाशीवर सर्वोच्च शिक्कामोर्तब, फेटाळलेला दयेचा अर्ज तरीही टळलेली फाशी

1996 मध्ये सीरिअल किलिंगचं हे प्रकरण प्रथम उघडकीस आलं. त्यानंतर तपासाची चक्र फिरून प्रकरण न्यायालयात उभं राहण्यास दीड वर्षाचा कालावधी गेला.

कोल्हापूर सत्र न्यायालयाने 28 जून 2001 रोजी रेणुका शिंदे आणि सीमा गावितला 13 अल्पवयीन मुलांचं अपहरण करून किमान 6 मुलांची हत्या केल्यासाठी दोषी ठरवलं आणि फाशीची शिक्षा दिली. पुढच्या पाच वर्षांत मुंबई उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम ठेवली. पण 6 ऐवजी 5 मुलांचा खून केल्याचा आरोपच सिद्ध झाल्याचं सांगितलं.

2006 मध्ये सर्वोच्च न्यायालयानेही हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवत फाशीवर शिक्कामोर्तब केलं. मग नियमानुसार, या दोन बहिणींनी दयेचा अर्ज केला. पण तो राष्ट्रपतींपुढे निर्णयाला यायला 2014 साल उजाडलं. तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दयेचा अर्ज फेटाळला आणि फाशीचा मार्ग मोकळा झाला. पण दयेच्या अर्जावर विचार करायला पाच वर्षांहून अधिक काळ लागला.

सर्वोच्च न्यायालय

फोटो स्रोत, Getty Images

या विलंबामुळे आता फाशी रद्द करावी, असा अर्ज गावित भगिनींच्या वतीने करण्यात आला. त्यावर 2021 मध्ये सुनावणी होऊन अखेर 20 जानेवारी 2022 रोजी फाशी रद्द करून त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.

गावित भगिनी त्यांचं उर्वरित आयुष्य आता पुण्याच्या येरवडा कारागृहात घालवत आहेत. सध्या रेणुका 49 तर सीमा 44 वर्षांची आहे.

खटला सुरू व्हायच्या आतच त्यांची आई अंजनाबाई वयाच्या 50 व्या वर्षी पोलीस कोठडीतच मरण पावली होती.

मंत्रालयाच्या आगीपासून लालफितीपर्यंत विलंबाची असंख्य कारणं

सीमा गावितने 10 ऑक्टोबर 2008 मध्ये आणि रेणुकाने 17 ऑक्टोबर 2009 मध्ये दयेचा अर्ज दाखल केला.

प्रणव मुखर्जींनी तो फेटाळल्यानंतर 2014 मध्ये त्यांनी या अतार्किक विलंबाचं कारण देत फाशी रद्द करण्यासाठी अपील केलं.

"7 वर्षं 10 महिने 15 दिवस एवढ्या विलंबाचं कुठलंही स्पष्ट कारण नसल्याने त्यांची फाशी रद्द करून जन्मठेप दिली जात आहे", असं न्यायालयाने सांगितलं.

अशा दया याचिकांवरचा निर्णय तीन महिन्यांत येणं अपेक्षित असतं. सरकारी अधिकाऱ्यांची गांभीर्याने न घेण्याची वृत्ती आणि 'कॅज्युअल अप्रोच' यामुळे दया याचिकेवरचा निर्णय अकारण लांबल्याचं न्यायालयाने नमूद केलं.

नेहमीप्रमाणे राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने हात झटकत एकमेकांकडे बोट दाखवलं. पण केंद्र सरकारच्या वतीने सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात मुंबईत मंत्रालयाला लागलेल्या आगीचा उल्लेख होता. या आगीत दयेचा अर्ज जळून गेला. नव्याने कागदपत्रे करायला राज्य शासनाने आणखी वेळ घेतल्याचं त्यांनी नमूद केलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)