'फळबागा बुडाल्या, जनावरं वाहून गेली, माणसं गमावली', शेतकऱ्यांचे हाल दाखवणारे 11 फोटो

20 सप्टेंबरपासून राज्यात पावसानं थैमान घातलं आहे. राज्यातील 30 जिल्ह्यांना पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. यात हजारो हेक्टर क्षेत्र बाधित झालं.

या पावसामुळं अनेक जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं नुकसान झालेलं असलं तरी प्रामुख्यानं राज्यभरात शेतकऱ्यांचे प्रचंड हाल यामुळं झाल्याचं पाहायला मिळत आहे.

अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण शेतं पाण्याखाली गेलेली आहेत. तर अनेकांनी जनावरं आणि कुटुंबातली माणसंही गमावली आहेत.

याचं प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे अतिवृष्टीमुळे 10 दिवसांपासून पाण्यात बुडालेल्या जालना जिल्ह्यातील कडवंची गावच्या या द्राक्षबागा.

दुसरीकडे या अतिवृष्टीचा खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर इत्यादी पिकांना मोठा फटका बसला आहे. अनेक भागांमध्ये सगळीच पिकं हातची गेली आहेत.

छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूरच्या इंदिरानगर येथे नागरिकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले तो क्षण.

या पुरस्थितीनं ग्रामीण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पूर्णपणे उध्वस्त झाली आहे. राज्यभरात पावसामुळे अनेक माणसांसह जनावरांचाही मृत्यू झाला आहे. याशिवाय घरे-गोठ्यांची पडझड झाल्याचीही माहिती आहे.

पावसानं ग्रामीण भागाचं प्रचंड नुकसान झालं आहे. बीडच्या पालवण गावातही सगळीकडं पाणीच पाणी साचलेलं पाहायला मिळालं.

पावसामुळे मराठवाड्यासह राज्यात अनेक ठिकाणी घरे, झोपड्या, गोठे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे नागरिकांनी निवाराही गमावला आहे.

बीडमधील बिंदुसरा नदीला आलेल्या पुरात वाहून एका 10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय. पुरात मृत्यू झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

सातत्यानं पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील फळभागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. द्राक्ष बागांवर मुळ्या आल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

पावसामुळे कापसाची बोंडं काळी पडली आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी घट होणार आहे.

अनेक ठिकाणी पाऊस इतका पडला की, अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील माती खरडून गेली आहे. त्यामुळे शेतात उभं राहिलेलं पिक तर हिरावलं गेलंच, मात्र पुरस्थिती ओसरल्यावर ज्या मातीच्या आधारे नव्यानं सुरुवात करण्याची आशा होती तीही संपलेली दिसत आहे.

सोयाबीनला लागलेल्या शेंगा सडायला लागल्या असून काही ठिकाणी शेतकरी पंचनाम्याच्या प्रतीक्षेत आहेत.

सिंदफणा नदीने पात्र सोडल्यामुळे आजूबाजूची शेती मोठ्या प्रमाणात पाण्याखाली गेलीय. त्यामुळे शेतकरी हवालदील झाले असून मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)