You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दिल्ली स्फोट : आतापर्यंत 'या' 4 प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी (10 नोव्हेंबर) सायंकाळी एका कारमध्ये स्फोट झाला. मंगळवारी सकाळपासूनच तपास अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी स्फोटाचा तपास सुरू केला आहे.
सोमवारी सायंकाळी जुन्या दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे.
या स्फोटानंतर पोलीस आणि तपास अधिकारी त्वरीत घटनास्थळी पोहोचले होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही घटनास्थळाला भेट दिली. फॉरेन्सिक अधिकाऱ्यांनी तेथून नमुने गोळा करून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत.
पण चार महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं अद्यापही मिळालेली नाहीत.
1. हा दहशतवादी हल्ला होता का?
या हल्ल्याबाबत पोलीस प्रशासनाने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. पण, दिल्ली पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाचा तपास अनेक यंत्रणा एकत्रितपणे करत असल्याचे सांगितले आहे.
फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचे अधिकारी मोहम्मद वाहिद यांनी पत्रकारांना सांगितलं, "घटनास्थळावरून गोळा केलेले नमुने तपासासाठी प्रयोगशाळेत पाठवले जात आहेत. त्यानंतरच आम्हाला अधिक माहिती मिळेल. नमुन्यांच्या तपासणीनंतरच आम्ही एखाद्या निष्कर्षावर पोहोचू शकू."
या स्फोटाबाबत प्रसारमाध्यमांमध्ये अनेक चर्चा सुरू होत्या. काही प्रत्यक्षदर्शींनी असा दावा केला होता की, हा स्फोट सीएनजीमुळे झाला. मात्र पोलिसांनी याबाबत अधिकृतपणे काहीही भाष्य केलं नव्हतं.
मात्र मंगळवारी (11 नोव्हेंबर) सकाळी दिल्ली नॉर्थचे डीसीपी राजा बांठिया यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, "दिल्ली स्फोटाप्रकरणी यूएपीए कायदा, स्फोटक पदार्थ कायदा आणि भारतीय न्याय संहिता (बीएनएस) यांच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फॉरेन्सिक तज्ज्ञ, एफएसएल टीम आणि इतर तज्ज्ञांची टीमही घटनास्थळी हजर आहे. आम्ही सर्व पुरावे गोळा करत आहोत."
2. स्फोट कसा झाला?
दिल्ली पोलीस आयुक्त सतीश गोलचा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, "या स्फोटामुळे आजूबाजूच्या वाहनांचेही नुकसान झाले आहे. माहिती मिळताच दिल्ली पोलीस, एफएसएल, एनआयए आणि एनएसजीच्या टीम्स घटनास्थळी पोहोचल्या आहेत आणि ते परिस्थितीचा आढावा घेत आहेत. स्फोटाची तपासणी सुरू आहे आणि लवकरच त्याबाबत माहिती दिली जाईल."
मात्र, कारमध्ये स्फोट नेमका कशामुळे झाला हे अजून स्पष्ट झालेलं नाही. हा स्फोट नेमका कसा झाला? कारमध्ये आधीपासूनच काही स्फोटक पदार्थ किंवा बॉम्ब ठेवलेला होता का? की इंधन टाकी किंवा सीएनजी टाकीत स्फोट झाला आणि त्यामुळे इतर वाहनांही त्याचा फटका बसला?
कारमधील लोकांना याची आधीपासून कल्पना होती का? या सर्व प्रश्नांची उत्तरं अद्याप मिळालेली नाहीत.
3. या कारचा मालक कोण आहे?
या घटनेची माहिती देताना गृहमंत्री अमित शाह म्हणाले, "सोमवारी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सुभाष मार्ग ट्रॅफिक सिग्नलवर आय-20 ह्युंदाई कारमध्ये स्फोट झाला.
"या स्फोटामुळे आजूबाजूच्या काही वाहनांचे नुकसान झाले आणि काही लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. प्राथमिक माहितीनुसार काही लोकांचा मृत्यूही झाला आहे."
या कारबाबत भारतीय प्रसारमाध्यमांमधून विविध प्रकारचे वृत्त समोर येत आहे. परंतु, अजून कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही. ही कार कोणाची होती? ती कुठून आली आणि कुठे जात होती? कारमध्ये किती लोक होते आणि त्यापैकी स्फोटात किती जणांचा मृत्यू झाला? या सर्व प्रश्नांची उत्तरं अद्याप अस्पष्ट आहेत.
तपास अधिकारी त्या कारच्या हालचालींचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. काही प्रसारमाध्यमांनी असं वृत्त दिलं आहे की, स्फोट झालेल्या परिसरात ही कार काही तासांपासून पार्किंगमध्ये उभी होती.
स्फोट होण्याच्या काही वेळापूर्वी ही कार हळूहळू पुढे सरकू लागली. ज्या ठिकाणी स्फोट झाला, ते ठिकाण लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या अगदी जवळ असल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र, पोलीस किंवा बीबीसी या वृत्ताला अजिबात दुजोरा देत नाही.
4. या स्फोटाचे लक्ष्य कोण होतं?
हा स्फोट अपघाताने झाला का, की तो जाणीवपूर्वक त्या ठिकाणी घडवून आणला गेला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जर हा स्फोट जाणीवपूर्वक घडवून आणला गेला असेल, तर याच्या निशाण्यावर कोण होतं? सामान्य नागरिक त्याचे लक्ष्य होते का? आणि या घटनेचा संबंध फक्त स्थानिक स्तरावर होता का, की यामागे राज्याबाहेरील किंवा देशाबाहेरील काही दुवेही आहेत?
या सर्व प्रश्नांची माहिती अजून मिळायची आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)