You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नेपाळमध्ये पूर आणि भूस्खलनामुळं मृत्यू झालेल्यांचा आकडा पोहोचला 200 वर, 26 जण अजूनही बेपत्ता
- Author, फणींद्र दहल
- Role, बीबीसी न्यूज नेपाळी
नेपाळमध्ये गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसामुळे पूर आणि भूस्खलनाचे संकट ओढवले आहे.
नेपाळमधील पोलिसांच्या माहितीनुसार, या घटनांत आतापर्यंत 200 जणांचा मृत्यू झाला असून, 126 लोक जखमी आहेत. तसंच, 26 जण अद्याप बेपत्ता आहेत.
मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती नेपाळच्या गृहमंत्रालयानं व्यक्त केलीय.
पूर, भूस्खलन आणि विजा पडल्यानं अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती नेपाळच्या गृहमंत्रालयानं दिली. अनेक ठिकाणचे रस्ते आणि पूलही वाहून गेले आहेत.
नेपाळचे लष्कर दल, सशस्त्र पोलीस दल आणि नेपाळ पोलीस मदत आणि बचावकार्यात गुंतले आहेत.
मुसळधार पावसामुळे नेपाळच्या अनेक भागात मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळं नदी-नाले भरून वाहत असून नदीकाठच्या भागातील अनेक घरं पुराच्या पाण्याखाली गेली आहेत. अनेक महामार्ग, राजधानी काठमांडूला जोडणारे अनेक रस्तेही पावसामुळे बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना वाहतुकीस अडचणी येत आहेत.
मंगळवारपर्यंत रस्ते पुन्हा सुरू व्हावेत यासाठी प्रयत्न करत असल्याचं, गृहमंत्रालयाचे प्रवक्ते ऋषिराम तिवारी यांनी सांगितलं.
दरम्यान, हवामानात सुधारणा झाल्यानं पूरही ओसरला आहे.
रविवारी (29 सप्टेंबर) पर्यंत परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा होती. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता पावसाचा मुक्काम मंगळवारपर्यंत (2 ऑक्टोबर) वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
याबाबत नेपाळ पोलिसांचे उप-प्रवक्ते वरिष्ठ अधीक्षक बिश्वो अधिकारी रविवारी (29 सप्टेंबर) बीबीसीसोबत बोलताना म्हणाले की, “शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे. धाडिंगजवळील झापलेखोला येथे दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरड हटवून रस्ता मोकळा करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत.”
नेपाळच्या विविध भागांमध्ये दरड कोसळून महामार्ग बंद झाल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत. तेथे अडकून पडलेल्या प्रवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी आम्ही प्राधान्याने काम करत असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.
गृह मंत्रालयाचे प्रवक्ते ऋषी राम तिवारी यांनी बीबीसीला सांगितले की, “कावरेपलांचोक जिल्हा आणि झापलखोला येथे सुरक्षा दलाकडून शोध आणि बचावकार्य सुरू आहे.
लष्करासह देशातील सुरक्षा दलाच्या सर्व तुकड्यांना बचावकार्यात मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केंद्राकडून जिल्हास्तरीय प्रशासनालाही सूचना देण्यात आल्या आहेत.”
ढिगाऱ्याखालील वाहनांतून काढले 35 मृतदेह
अधिकाऱ्यांनी सांगितले की, काठमांडूमधील चंद्रगिरी नगरपालिका आणि धाडिंगच्या सीमेवरील झापलेखोला इथं भूस्खलनानंतर ढिगाऱ्याखाली दबलेल्या वाहनांमधून 21 मृतदेह बाहेर काढण्यात आले.
सशस्त्र पोलीस दलाचे सह-प्रवक्ते शैलेंद्र थापा यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (28 सप्टेंबर) या ठिकाणाहून 14 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते.
आतापर्यंत इथून एकूण 35 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, अजूनही शोध आणि बचावकार्य सुरू आहे. पंरतु, ढिगाऱ्याखाली किती वाहनं दबून आहेत, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याचंही थापा यांनी सांगितलं.
ढिगारा हटवण्याचं काम सुरू असून या कार्यात दोन किंवा त्यापेक्षा अधिक दिवस लागू शकतात, असंही त्यांनी सांगितलं.
आतापर्यंत किती नुकसान
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत पुरात अडकलेल्या 3600 हून अधिक नागरिकांची सुटका करण्यात आली आहे.
काठमांडू घाटातील तीन जिल्ह्यांमधून जवळपास 2000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. या भागातील लोकांना या संकटाचा सर्वाधिक फटका बसला.
सततच्या पावसामुळं 300 हून अधिक घरं आणि 16 पुलांचं नुकसान झालं आहे. पाचथर आणि सिंधुपाल चौक याठिकाणचे दोन पूल पुरात वाहून गेल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. यासह चार काँक्रीट पूल, तीन सस्पेंशन पूल आणि 7 विविध प्रकारचे पूलही वाहून गेल्याची माहिती आहे.
रविवारी सकाळी नेपाळ पोलिसांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काठमांडू खोऱ्यातील पाच तर कोसी प्रांतातील सहा ठिकाणचे महामार्ग पूर्णपणे बंद आहेत.
रविवारी (29 सप्टेंबर) सकाळपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, बागमती प्रांतात 25 ठिकाणचे रस्ते पूर्णपणे बंद आहेत. याशिवाय गंडकी प्रांतातील तीन, लुंबिनीमध्ये सात आणि कर्नालीमध्ये एक रस्ता बंद आला आहे. अनेक जलविद्युत प्रकल्पांचंही नुकसान झाल्याची माहिती आहे.
पूर व भूस्खलनाने अनेक ठिकाणचे मार्ग प्रभावित झाले आहेत. हे मार्ग सुरळीत करण्यावर आमचा भर असल्याची माहिती गृह मंत्रालयाचे प्रवक्ते ऋषी राम तिवारी यांनी बीबीसीसोबत बोलताना दिली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)