नेपाळ अपघात: ‘4 वर्षांपूर्वी नवं घर बांधलं, घरात राहायला कुणीच उरलं नाही’

    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी

भुसावळपासून मोठा हायवे नागपूरकडे जातो. त्या दिशेला साधारणपणे दहा किलोमीटरवर वरणगांवचा फाटा येतो. त्या रस्त्यानं हायवे सोडल्यावर, वरणगांव ओलांडल्यावर, दहा मिनिटांमध्ये तळवेल येतं. छोटं, जुनं, गल्ल्यागल्ल्यांचं गांव. शिरताक्षणी त्या गल्ल्यांमध्ये स्मशानशांतता जाणवते.

पाऊस जोरात सुरू आहे. हिरवी शेतं ओली झाली आहेत. श्रावणाचा ऊनपावसाचा खेळ आहे. पण त्यात अवस्थता आहे.

जी पुढे गांवभर पाठ सोडत नाही. फारसे लोकही रस्त्यांवर नाहीत. कुठं पारावर, ग्रामपंचायतीबाहेरच्या कट्ट्यावर काही जण घोळक्यात गंभीर चेहऱ्यानं उभी असलेली दिसतात.

ती अस्वस्थता समजण्यासारखी आहे. या एका गावातल्या 7 जणांचा 23 ऑगस्टला नेपाळच्या दुघर्टनेत मृत्यू झाला आहे. तीर्थयात्रेला जातो म्हणून उत्साहानं त्या छोट्याशा गावासमोर गेलेली ही सात जणं, आता परत कधीच येणार नाहीत, हा धक्का नजरेतूनही जाणवतो आणि नंतर बोलण्यातही. इथली तीन कुटुंबं अक्षरश: होत्याची नव्हती झाली आहे.

त्यातलं एक जयेश राणेचं. काहीच दिवसांपूर्वी त्याचं पाच जणांचं मोठं कुटुंब होतं. आता फक्त तो आणि त्याची घरी असलेली 75 वर्षांची आजीच उरले आहेत.

त्याचे आई-वडील आणि 12 वीत असणारी लहान बहीण, तिघेही त्या 45 जणांबरोबर त्या बसमध्ये होते जी नेपाळच्या पर्वतरांगांमधल्या नागमोडी रस्त्यावरुन दरीत नदीमध्ये पडली. ते तिघे त्या 25 जणांमध्येही आहेत, जे प्राणाला मुकले.

गल्लीच्या एका टोकाला असलेल्या राणेंच्या घराबाहेर गावकऱ्यांची, नातेवाईकांची गर्दी आहे. ती गेले तीन दिवस तशीच आहे जेव्हापासून अपघाताची बातमी आली.

जयेश आता घरातच बसून आहे. तो फारसा कोणाशी बोलत नाही. कोणी आत जाऊन निरोप दिल्यावर आम्हाला भेटायला बाहेरच्या खुर्च्यांवर येऊन बसतो, पण नजर निर्विकार. धक्का जाणवणारा.

त्याचे वडील सुहास राणे टेंटचा व्यवसाय करायचे. गावाबाहेर थोडी शेती होती, पण रस्ता नसल्यामुळे करायला अवघड होती, असं त्या गर्दीतलं कोणीतरी सांगतं.

बहीण चंदना बारावीत होती. जयेश जवळ मलकापूरला इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला. घरी सोबत आई आणि आज्जी.

गावातले, नात्यातले सगळेच या यात्रेला चालले होते, म्हणून जयेशच्या आई-वडिलांनीही जायचं ठरवलं.

"बहीण जायला फारशी उत्सूक नव्हती. पण आम्ही आग्रह केला. परत पुढे असं लांब जायला मिळेल किंवा नाही असा विचार करुन," जयेश सांगतो.

आता पुढे काय, असा प्रश्न विचारल्यावर 'सध्या काहीच कळत नाहीये' असं त्रोटक उत्तर देऊन पुन्हा नजर खाली एकटक लावून बसतो.

बाजूचे जमा झालेले नातेवाईक काय झालं, कसं झालं सांगत राहतात. पण तो फारसा बोलत नाही. त्याचं आयुष्य एका क्षणात बदललं आहे.

'माझ्या वडिलांनी गाडीची काच फोडून वाहून चालेल्या आईला वाचवलं'

पण हे असं त्याचं एकट्याचं नाही. या अपघातानंतर अशी अनेक कुटुंबं आहेत, जी चार दिवसांपूर्वी होती, आता नाहीत. भुसावळ तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये या जीवघेण्या ठरलेल्या यात्रेच्या कहाण्या आहेत.

शेजारच्या वरणगावात तीन कुटुंबातले 10 जण गेले आहेत. दर्यापूर, सुकळी या जवळपासच्या गावातही काही प्रभावित कुटुंबं आहेत.

इथं फिरुन स्थानिकांशी, नातेवाईकांशी बोलून हे समजतं की जवळपास 100 हून अधिक जण जळगाव जिल्ह्यातून या यात्रेसाठी गेले होते.

यातले अनेक एकमेकांच्या नात्यातले होते, पूर्वीपासूनचे ओळखीचे होते. काही जण गेल्या वर्षी एकत्र केदारनाथला जाऊन आले होते.

यंदा प्रयागराज, अयोध्या असं करुन नंतर गोरखपूरमार्गे नेपाळमध्ये जाऊन पशुपतीनाथ आणि सोबत इतरही काही ठिकाणी जायचं ठरलं होतं.

काही जण आपल्या सगळ्या कुटुंबासह होते. ठरलेल्या कार्यक्रमानुसार 30 ऑगस्टला परत घरी येणार होते.

इथून रेल्वेनं उत्तर प्रदेशमध्ये गेले आणि तिथून एका खासगी प्रवास एजन्सीमार्फत नेपाळसाठी बसची आणि इतर व्यवस्था केली होती.

नेपाळचा काही प्रवास व्यवस्थित झाला होता. पण पोखरा भागातून परतताना मात्र होत्याचं नव्हतं झालं. एकूण 2 बसेस होत्या. एक बस सुखरुप राहिली. पण दुसरी बस, जिच्यात 45 जण होते, ती तनहून जिल्ह्यात मारस्यांगदी नदीत कोसळली. 25 जणांचा मृत्यू झाला. 16 जण जखमी झाले.

त्यांच्यावर काठमांडूच्याच हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. एकाचा शोध सुरू आहे. जे सुखरुप राहिले ते आता पुन्हा परतीच्या प्रवासाला लागले आहेत.

तळवेलमध्ये जयेशच्या घरापासून थोड्याच अंतरावर त्यांच्याच नात्यात असलेले इंगळे कुटुंबीय राहतात. त्यांचाही डोळ्याला डोळा लागत नाही, अश्रू थांबत नाहीत.

कारण त्यांचे आई-वडील, अनंत आणि सीमा इंगळे, या अपघातातून बचावले, पण गंभीर जखमी आहेत. ते काठमांडूतच हॉस्पिटलमध्ये आहेत आणि कधी परत येणार याबद्दल त्यांना काही माहिती नाही.

"जेव्हा अपघात घडला तेव्हा माझ्या आईला फक्त माझा नंबर आठवत होता. तिनं मला तिथून फोन हे सांगायला केला की ती अक्षरश: नदीतून वाहून चालली होती. पण वडिलांनी गाडीची काच फोडून तिला वाचवलं. नाहीतर ती नदीतून वाहून चालली होती.

ते दोघेही हॉस्पिटलमध्ये आहेत. पण त्यांच्यासोबत इतर पेशंट्ससुद्धा म्हणताहेत की त्यांना तिथे नका ठेवू. इकडे घरी आणलं की ते लवकर बरे होतील. तिथली भाषाही समजत नाही. इथे आपल्या कुटुंबासोबत त्यांना लवकर आणायला हवं आहे," त्यांची मुलगी प्राजक्ता भरल्या डोळ्यांनी सांगतात.

नवीन बांधलेलं घर, पण राहणारे चौघेही गेले

भुसावळची कहाणी हृदय पिळवटून टाकणारी आहे. ती भारंबे कुटुंबीयांची आहे. या कुटुंबातलं आता कोणीही उरलं नाही. चौघे होते आणि चौघांनीही या अपघातात आपला जीव गमावला.

भुसावळ शहरातल्याच एका मध्यवस्तीत, ज्यात बहुतेक छोटेखानी बंगले आहेत, तिथं भारंबेंचा बंगला आहे, 'पांडुरंग'.

या घरात चौकोनी कुटुंब रहायचं. गणेश, त्यांच्या पत्नी मीनल, त्यांची पहिलीत जाणारी मुलगी परी आणि सरकारी नोकरीतून थोड्याच वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या त्यांच्या आई सुलभा. हे घर अक्षरश: मोकळं झालं.

"चारेक वर्षांपूर्वीच त्यांनी हे नवं घर बांधलं होतं. माझ्या आत्यानंच ते उभं केलं. गणेशच्या वडिलांचं काही वर्षांपूर्वी निधन झाल्यावर ती त्या जागी नोकरीला लागली. पुढे गणेशही शिकून कमावायला लागला. पण आता या घरातलं कोणीच राहिलं नाही," आत्येभाऊ सुमिल बलाडे सांगतात.

23 तारखेला हा अपघात झाल्यावर 25 तारखेला रात्री उशीरा सगळ्यांचे म्हणजे 25 जणांचे मृतदेह जळगांवला आणले गेले. रक्षा खडसे इथून खासदार आहेत. त्या केंद्रात मंत्रीही आहेत. त्या काठमांडूला गेल्या. तिथून वायुसेनेच्या विशेष विमानानं हे मृतदेह आणले गेले.

भुसावळ असेल, तळवेल किंवा वरणगांव, रात्री उशीरापर्यंत गावं जागी होती. दिवसभर वाट पाहात होती. साधारण रात्री 8 च्या सुमारास जळगावला अगोदर सगळ्यांना आणण्यात आलं. तिथून आपापल्या गावी त्यांना नेण्यात आलं. आम्ही तेव्हा वरणगांवमध्ये होतो.

गावच्या वेशीपासून प्रत्येक चौकात आणि पुढे स्मशानभूमीपर्यंत माणसं उभी होती. चौकाचौकात श्रद्धांजलीचे फलक उभारले होते. मध्यरात्रीनंतर उशीरा सगळ्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

'आईचा बसमधून व्हीडिओ कॉल सुरू होता आणि तो अचानक बंद झाला'

वरणगांववर आलेली शोककळा सगळीकडे जाणवते. इथं या एका गावात तीन कुटुंबातल्या 10 जणांचा जीव गेला. इथल्या एकट्या जावळे कुटुंबातले 7 जण त्यात आहेत. जावळे या गावातलंच नव्हे तर पंचक्रोशीतलं एक प्रभावी कुटुंब आहे.

सुधाकर जावळे भाजपात होते. इथले नगरसेवक होते. त्यांच्या पत्नी रोहिणी याही नगरसेवक होत्या. गावातल्या प्रत्येक घराशी या कुटुंबाचा संबंध होता. त्यांचा पुतण्या, सून, भाचा यांच्यासह मोठा कबिला या यात्रेत तालुक्यातल्या इतर परिवारासोबत गेला होता.

वरणागावच्या मुख्य चौकापासून आतल्या दाट वस्तीच्या भागात जावळेंचा वाडा आहे. घटना घडल्यापासून वाड्यात मोठी गर्दी आहे. जिल्ह्याभरातून लोक येताहेत. असेच त्यांचे संबंध होते. आम्ही जेव्हा गेलो तेव्हा त्यांचा मुलगा शुभम सगळ्यांना भेटत वाड्याच्या चौकात बसलेले होते.

"आम्ही रोज त्यांच्याशी बोलायचो. सगळा प्रवास चांगला चालला होता. त्या दिवशी हॉटेलमधून निघाल्यावर माझी आई दाजींशी व्हीडिओ कॉलवर बोलत होती. ते बोलत असतांनाच अचानक काहीतरी झालं आणि तो कॉल बंद झाला. अगोदर कळलंच नाही की काय झालं. त्यानंतर थोड्या वेळात ही बातमी आली," शुभम सांगतात.

"कुटुंबाच्या जबाबदा-या होत्या. इथली कामं होती. म्हणून गेली वीस वर्षं ते कुठं फिरायला गेले नव्हते. गेल्या वर्षीपासूनच ते जाऊ लागले होते. पण आता हे असं झालं..." शुभम म्हणतात.

एक भरलेलं कुटुंब असं अचानक रितं झालं आहे. त्यांना पुन्हा उभं रहायला वेळ लागणार आहे. अपघात, त्याची कारणं, नेमकं त्या क्षणी काय झालं, ते टाळता आलं असतं का हे आणि असे अनेक सवाल या सगळ्या कुटुंबीयांच्या, त्यांच्या आप्तांच्या मनात दाटले आहेत.

पण मागे राहिलेली ही सगळी कुटुंबं मुळापासून हादरली आहेत. पुढे काय हा त्या सगळ्यांसमोरचाच प्रश्न आहे. जे जखमी आहेत, जे दुस-या सुरक्षित बसमध्ये होते, ते सगळे आता परतीच्या मार्गावर आहेत. पण या धक्क्यातून सावरायला त्या सगळ्यांनाच किती वेळ लागेल, हे सांगता येणार नाही.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.