नेपाळमध्ये महाराष्ट्राच्या प्रवाशांची बस नदीत कोसळली, 27 जणांचा मृत्यू, 16 जखमी

नेपाळमधील पोखरा-काठमांडू दरम्यान मर्स्यांगदी नदीत महाराष्ट्रातील प्रवाशांची बस कोसळली आहे. तनाहूचे मुख्य जिल्हा अधिकारी जनार्दन गौतम यांनी या घटनेत 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. तसेच 16 लोकांवर उपचार सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं.

बसमध्ये वाहक आणि चालकांसह एकूण 43 जण होते अशी माहिती मिळाली आहे. त्यापैकी बहुतांश प्रवासी जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातल्या वरणगाव, तळवेल परिसरातील आहेत.

या अपघातानंतर बाधितांना पूर्णपणे मदत केली जात असल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

काठमांडूतील दुर्घटनेबाबत मी संरक्षण मंत्रालयाशी बोललो आहे. गृहमंत्र्यांनी नोडल ऑफिसरची नियुक्ती केली आहे, असं त्यांनी सांगितलंच. तसंच मृतदेह वायुसेनेच्या विमानानं नाशिकला नेले जातील. जखमींवर उपचार सुरू आहेत, असंही शिंदे म्हणाले.

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक यांनी काठमांडूतील त्रिभुवन विद्यापीठ शिक्षण रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांनी याबाबत सचिवांशी चर्चा केल्याची माहिती दिली. उत्तर प्रदेशच्या अधिकाऱ्यांशी सरकारचा समन्वय आहे. त्यांच्या मदतीनं मृतदेह महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, असं फडणवीस म्हणाले.

त्यापूर्वी महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी 41 पर्यटक हे नेपाळमध्ये दर्शनासाठी आणि पर्यटनासाठी गेले होते, अशी माहिती दिली.

प्रशासनाला जे मृतदेह मिळाले असतील, ते तत्काळ महाराष्ट्रातील संबंधित जिल्ह्यांमध्ये पोहोचवण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना दिल्याचंही पाटील म्हणाले.

जळगाव जिल्ह्यातले आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातले भावीकही यात असल्याचं त्यांनी सांगितलं. पण त्यात सर्वाधिक आकडा, जळगावमधील लोकांचा आहे.

स्थानिक पोलिसांच्या मते यात काही प्रवासी जखमी झाले आहेत. तर अनेकजण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे.

ही बस 300 मीटर खोल असलेल्या नदीत कोसळली. ऐनफारा याठिकाणी घटना घडली.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी X वर पोस्ट करत यातील भाविक महाराष्ट्रातील असल्याचं म्हटलं आहे. तसंच काही भाविकांचा मृत्यू झाल्याचा दावा करत फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

नेपाळ शासनाने रात्री उशीरा मृतांची अधिकृत आकडेवारी जारी केली.

रणजीत मुन्ना (क्लीनर), मुस्तफा मुर्तजा (चालक), सरला राणे (42), भारती प्रकाश जावळे (62), तुळशीराम बुधो तायडे (62), सरला तुळशीराम तायडे (62), संदीप राजाराम सरोदे (45), पल्लवी संदीप सरोदे (43), अनुप हेमराज सरोदे (22), गणेश पांडुरंग भारंबे (40), नीलिमा सुनील धांडे (वय 57), पंकज भागवत भंगाळे (45), परी गणेश भारंबे (वय 8), अनिता अविनाश पाटील (वय 44), विजया कडू जावळे (वय 50), रोहिणी सुधाकर जावळे (वय 51), प्रकाश नथू कोळी (वय 52), सुधाकर बळीराम जावळे (वय 60), सुलभा पांडुरंग भारंबे (वय 60), सुभाष रडे (वय 45), सुहास प्रभाकर राणे (वय 49), लीना भारंबे, रिंकी राणे (वय 18), नीलिमा चंद्रकांत जावळे (वय 45).

जखमींची नावे

अनंत ओंकार इंगळे (58), सीमा आनंद इंगळे (वय 49), रेखा प्रकाश (वय 59), हेमराज राजाराम सरोदे (वय 56), रूपाली हेमराज सरोदे (वय 50), भारती पाटील (वय 52), शारदा सुनील पाटील (वय 38), कुमुदिनी रवींद्र जावळे (वय 62), ज्ञानेश्वर नामदेव बोंडे (वय 60), आशा ज्ञानेश्वर बोंडे (वय 45), आशा पांडुरंग पाटील (वय 63), सुनील जगन्नाथ बोंडे (वय 52), वर्षा पंकज बोंडे (वय 39), प्रवीण पांडुरंग पाटील (वय 52), अविनाश भागवत पाटील (वय 51) हे गंभीर जखमी झाले आहेत.

हेल्पलाईन क्रमांक

बस अपघातानंतर काठमांडू येथील भारतीय दूतावासाने आपत्कालीन मदत हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे.

भारतीय दूतावासाच्या माहितीनुसार, "पोखराहून काठमांडूला जाणारी एक बस आज मर्स्यांगदी नदीत, 150 मीटर खाली कोसळली. त्यात सुमारे 43 लोक होते. भारतीय दूतावास स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने मदत आणि बचाव कार्य पाहत आहे. भारतीय दूतावासाच्या आपत्कालीन मदत क्रमांक +977-9851107021 हा आहे."

तनाहूचे मुख्य जिल्हाधिकारी जनार्दन गौतम ताडीने घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी 12 गंभीर जखमींना लष्कराच्या हेलिकॉप्टरनं काठमंडूला उपचारासाठी हलवल्याची माहिती दिली.

गेल्या महिन्यातही नेपाळमधून बस अपघाताच्या दोन बातम्या समोर आल्या होत्या.

चितवनच्या सिमलताल येथे भूस्खलनामुळे दोन प्रवासी बस त्रिशूली नदीत कोसळल्या होत्या, त्यात डझनभर लोकांचा मृत्यू झाला.

बचावकार्यात अडचणी?

घटनास्थळावरून समोर आलेल्या फोटो आणि व्हीडिओत, मर्स्यांगदी नदीच्या किनाऱ्यावर अपघातग्रस्त बसचे अवशेष दिसून आले होते.

अंबुखेरानी पोलीस स्थानकाचे प्रमुख शिव थापा यांनी, “बस एका विचित्र जागी कोसळली त्यामुळे बचावकार्य करणं कठीण आहे,” असं म्हटलं.

नेपाळच्या गृह मंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुखे भीष्म कुमार भुसाल यांनी बचावकार्यासंदर्भात माहिती दिली.

ही बस कुणाची होती आणि प्रवासी कुठे थांबले होते?

अपघातग्रस्त बस गोरखपूरच्या केसरवाणी टूर अँड ट्रॅव्हल्स एजन्सीची (क्र. युपी 53 एफटी 7623) असून असून ती पोखराहून काठमांडूला जात होती. गोरखपूरच्या धर्मशाला बाजार भागात राहणारे विष्णू शंकर केसरवानी यांची पत्नी शालिनी केसरवानी यांच्या नावावर बसची नोंदणी आहे.

विष्णू केसरवानी याबाबत म्हणाले की, “महाराष्ट्रातील भुसावळच्या एका समुहानं 2 मोठ्या बस आणि 1 टेम्पो ट्रॅव्हलर बूक केल्या होत्या. अलाहाबादहून ते बसमध्ये बसले. तिथून चित्रकूट, अयोध्या, गोरखपूर, सुनौदी, लुम्बिनी इथं भेटी देऊन पोखराला गेले होते. पोखराहून सकाळी बस काठमांडूकडे निघाली होती. त्यावेळी 11 वाजेच्या सुमारास बस घसरली आणि दरीतून नदीत कोसळली. आम्हाला नंतर ही बातमी मिळाली. बसचालकाचाही अपघातात मृत्यू झाला आहे.”

बसमध्ये चालक आणि मदतनीस यांच्याव्यतिरिक्त 40 जण होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सर्व प्रवासी भैरवा हॉटेलमध्ये थांबले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी बसने त्याला पोखराला नेल्याचं भट्ट म्हणाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बस आठ दिवसांच्या परमिटवर नेपाळमध्ये दाखल झाली होती.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.