सत्तांतरानंतर सीरियात कशावर बंदी, कशाला सूट? बंडखोर नेत्यांनी केलं स्पष्ट

अहमद शल शरा
फोटो कॅप्शन, अहमद शल शरा
    • Author, जेरेमी बोवेन
    • Role, आंतरराष्ट्रीय संपादक, बीबीसी न्यूज

सतत सुरू असलेल्या युद्धांनी आता सीरिया पुर्णपणे थकला आहे. पण आता आपल्या देशाला कोणत्याही शेजारील किंवा पश्चिमेकडील देशाकडून कोणताही धोका नसल्याचं सीरियाचे नेते अहमद-अल शरा यांनी सांगितलं.

पाश्चिमात्य देशांनी सीरियावर लावलेले निर्बंध आता काढायला हवेत, असं त्यांनी सीरियाची राजधानी दमस्कसमध्ये बीबीसीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितलं.

"आता जे काही झालंय त्यानंतर निर्बंध काढून टाकायला हवेत. हे निर्बंध जुन्या सरकारसाठी होते. त्रास देणारा आणि त्रास सहन करणारा दोघांसोबत सारखाच व्यवहार करून कसं चालेल?" ते म्हणाले.

दोन आठवड्यांपुर्वी सीरियामधली नागरिकांनी बंड करून बशर अल-असद यांची सत्ता उलथवून टाकली. बंडखोरीत सहभागी झालेल्या गटांपैकी हयात ताहरीर अल-शाम (एचटीएस) या प्रमुख गटाचे अल-शरा नेते आहेत.

पुर्वी त्यांना अबू मोहम्मद अल-जुलानी या टोपणनावाने ओळखलं जात होतं.

बीबीसीशी बोलताना अल शरा यांनी एचटीसीला दहशतवादी संघटनांच्या यादीतून काढून टाकलं जावं असं म्हटलंय.

संयुक्त राष्ट्र, अमेरिका, युरोपीयन संघ आणि ब्रिटनने या विद्रोही गटाचं नाव दहशतवादी संघटनांच्या यादीत टाकलंय. अल-शरा यांनी 2016 मध्ये अल कायदा या दहशतवादी संघटनेतून वेगळं होऊन एचटीएसची स्थापना केली होती.

पण हा दहशतवादी गट नसल्याचं अल शरा यांचं म्हणणं आहे. त्यांच्या संघटनेनं सैन्य नसलेल्या जागा किंवा सामान्य लोकांना कधीही लक्ष्य केलं नाही. उलट ते स्वतःला अल-असद यांच्या अत्याचाराचे पीडित मानतात.

'सीरियाचा अफगाणिस्तान होऊ देणार नाही'

सीरियाचा अफगाणिस्तान होऊ द्यायचा नाही, असं अल-शरा म्हणाले.

अफगाणिस्तान आणि सीरिया हे दोन्ही देश फार वेगळे आहेत. दोन्हीच्या परंपरा आणि रितीरिवाजात फार तफावत आहे. अफगाणिस्तानात आदिवासी समाज होता, पण सीरियाची विचारधारा फार वेगळी आहे.

अल-शरा महिला शिक्षणाचे पुरस्कर्ते असल्याचं त्यांनी सांगितलं.

"आपल्याकडे इदलिबमध्ये गेल्या 8 वर्षांपासून विश्वविद्यालय आहे," ते म्हणाले. 2011 पासून सीरियाच्या उत्तर-पश्चिमेला असलेला हा भाग 2011 पासून बंडखोरांच्या ताब्यात आहे.

"तिथल्या विश्वविद्यालयात महिलांची संख्या 60 टक्क्यांपेक्षा जास्त आहे असं मला वाटतं," अल-शरा पुढे सांगत होते.

सीरियात दारू प्यायची परवागनी असेल का असंही त्यांना विचारलं गेलं होतं. "अशा कायद्याशी जोडलेल्या अनेक गोष्टी आहेत. त्याबद्दल मी आत्ताच काही सांगू शकत नाही," ते म्हणाले.

"नवं संविधान लिहिण्यासाठी एक समिती बनवली जाईल. ही समिती अशाच विषयांवर निर्णय घेईल. सत्तेवर येणाऱ्या, राष्ट्राध्यक्ष म्हणून येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीलाही या कायद्यांचं पालन करावं लागेल," ते म्हणाले.

संपूर्ण मुलाखतीदरम्यान अल शरा आरामात बसले होते. सामान्य लोकांसारखे कपडे त्यांंनी घातले होते. या गटानं जहालमतवादी लोकांशी भूतकाळात असलेले संबंध आता तोडले आहेत, असा विश्वास लोकांना द्यायचा त्यांचा प्रयत्न होता.

बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.
बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.

कोण आहेत अहमद अल-शरा?

अल-शरा आत्तापर्यंत अबू मोहम्मद अल-जुलानी या टोपणनावाने ओळखले जात होते.

पीबीएस या अमेरिकेच्या वृत्तसंस्थेने फेब्रुवारी 2021मध्ये अल-जुलानी यांची एक मुलाखत घेतली होती.

त्यावेळी त्यांचं खरं नाव अहमद अल-शरा असल्याचं त्यांनी सांगितलं. सीरियातला गोलन प्रांत हे त्यांचं मूळ ठिकाण.

सौदी अरेबियाची राजधानी रियादमध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे वडील तिथे काम करत असत. पुढे सीरियाची राजधानी दमस्कसमध्ये ते मोठे झाले.

मात्र त्यांचा जन्म पूर्व सीरियातल्या एज जोर या भागात झाला होता, असंही म्हटलं जातं. मुस्लिम कट्टरतावादी नेते बनण्यापुर्वी ते एक डॉक्टर होते अशीही अफवा आहे.

संयुक्त राष्ट्र आणि युरोपीयन संघाच्या एका अहवालानुसार, त्यांचा जन्म 1973 ते 1979 या काळादरम्यान झाला असावा.

अहमद शल शरा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अहमद शल शरा

इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलिस सहयोग संघटनेच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचा जन्म 1979 ला झालाय. तर अस सफिर या लेबेनॉनमधल्या वृत्तपत्राने त्यांचं जन्म वर्ष 1981 असल्याचंं सांगितलंय.

दहशतवादी संघटनांसोबत जोलानी यांचा प्रवास इराकमधल्या अल कायदा या संघटनेतील सहभागामुळे सुरू झाला.

2003 मध्ये अमेरिका आणि त्यांच्या सोबती सैन्याने इराकवर हल्ला केला होता. तेव्हा तिथल्या अल कायदा या दहशतवादी संघटनेसोबत अल-शरा काम करत होते, असं म्हटलं जातं.

अमेरिकेच्या नेतृत्त्वाखालील या सैन्याने राष्ट्रापती सद्दाम हुसैन आणि त्यांच्या बाथ या पक्षाला सत्तेवरून खाली खेचलं. तेव्हा अल-शरा यांनी तेथील इतर दहशतवादी संघटनांसोबत काम सुरू केलं होतं.

पुढे 2010 ला अल-शरा यांना अमेरिकेने अटक केली आणि कुवेतजवळच्या बुका कँम्पमध्ये बंदिस्त ठेवलं.

तिथेच इस्लामिक स्टेट (आयएस) या जगप्रसिद्ध दहशतवादी गटाचं संघटन करणाऱ्या जिहादी नेत्यांशी त्यांची ओळखं झाल्याचं म्हटलं जातं. त्यात आयएसचे नेते अबू-बक्र-अल-बगदादी यांनाही ते भेटले.

अल-शरा कसं चालवतात त्यांची संघटना?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

अल शरा यांच्या नेतृत्त्वाखाली एचटीएस संस्था उत्तर पश्चिम सिरीयामध्ये इदलिब आणि आसपासच्या भागात सक्रिय झाली. तिथं उपस्थित असणारा हा महत्त्वाचा विद्रोही गट बनला.

सीरियामध्ये युद्ध होण्यापुर्वी या भागाची लोकसंख्या 27 लाख होती. पण देशाच्या वेगवेगळ्या भागातून एका लष्करी गटानं एखाद्या प्रांतावर सत्ता चालवताना येणारे अडथळे दूर करण्यासाठी एटचीएसने इदलिब प्रांतात सॅल्हेशन गर्व्हर्मेंट या नावाने 2017 मध्ये नागरिकांचाच एक गट बनवला. आरोग्य, शिक्षण आणि बांधकाम अशा काही विषयांवर हा गट प्रशासकीय काम करतो.

अल कायदा या आपल्या भूतकाळातील गटाच्या जहालमतवादी पद्धतीचा आपण वापर करत नसल्याचं 2021 च्या पीबीएसच्या मुलाखतीत अल-जुलानी म्हणाले होते.

सीरियाचे राष्ट्रपती बशर अल असद यांना सत्तेवरून काढून टाकणं हा त्यांचा एकमेव हेतू होता.

पुढे 2020 मध्ये एचटीएसने इदलिबमधली अल कायद्याची केंद्र बंद करून टाकली. त्यांची शस्त्रास्त्र जप्त केली. त्यासाठी काही नेत्यांना अटकही केलं.

त्यांच्या नियंत्रणात असलेल्या या भागातही एचटीएसने मुस्लिम कायदा लागू केला आहे. पण इतर दहशतवादी गटांच्या तुलनेत या गटाने फार कमी निर्बंध लावले आहेत.

काही मानवाधिकार संघटनांनी एचटीएसवर जनतेचा विरोध दाबण्याचे आणि मानवी अधिकारांचं उल्लंघन केल्याचे आरोप लावले आहेत.

अल-शरा यांनी मात्र हे आरोप अमान्य केलेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)