सीरियाच्या कुख्यात तुरुंगातून सुटका झालेला तो गूढ कैदी नेमका कोण आहे?

सीरियाच्या सेडनाया तुरुंगात गुप्त खोल्यांचा शोध घेण्यात आला.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सीरियाच्या सेडनाया तुरुंगात गुप्त खोल्यांचा शोध घेण्यात आला.
    • Author, हुसाम असाल
    • Role, बीबीसी अरबी, अम्मानहून

सीरियातील बशर अल-असद राजवटीचा शेवट झाल्यापासून तिथल्या कुख्यात सेडनाया तुरुंगासंदर्भात येणाऱ्या कहाण्या संपतच नाहीत. या तुरुंगात केवळ सीरियाच्या विविध भागातील लोकांना ठेवण्यात आलं नव्हतं, तर शेजारच्या जॉर्डनमधील लोकही या तुरुंगात असल्याचं समोर येत आहे.

या तुरुंगात अनेक वर्षे अटकेत असल्याच्या एका कैद्याची सुटका झाली आहे. मात्र त्याची स्थिती ओळखण्यापलीकडची झाली आहे. हा कैदी आपल्याच कुटुंबातील बेपत्ता सदस्य किंवा नातेवाईक असल्याची शक्यता सीरियाबरोबर जॉर्डनमधील कुटुंबांना वाटते आहे.

त्याची ओळख पटवण्यासाठी चक्क डीएनए चाचण्या केल्या जात आहेत. हा गूढ कैदी कोण आहे आणि त्याच्या सुटकेनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीविषयी...

सीरियातील बशर अल-असद यांची राजवट संपुष्टात आल्यानंतर, जॉर्डनचे बशीर अल-बतायनेह आपल्या मुलाची आतुरतेनं वाट पाहत होते. त्यांचा मुलगा ओसामा, 38 वर्षांपासून सीरियामध्ये बेपत्ता झाला होता.

अल-बतायनेह 83 वर्षांचे आहेत. ते उत्तर जॉर्डनमधील इरबिद शहरातील आहेत. त्याचं म्हणणं आहे की, ओसामानं त्याच्या शालेय शिक्षणाच्या शेवटच्या वर्षापूर्वी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये एक आठवड्यासाठी सीरियात जाणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र तो तिथून कधीच परतला नाही.

तीन दशकाहून अधिक काळानंतर अल-बतायनेह यांना शेवटी ती बातमी मिळाली. ज्या बातमीसाठी ते आणि त्यांचं कुटुंब सातत्यानं प्रार्थना करत होतं.

त्यातच एक व्हिडिओ समोर आला. त्यात एक व्यक्ती दमास्कसच्या जवळ असणाऱ्या सेडनाया तुरुंगातून बाहेर पडताना म्हणत होता, "मी इरबिदचा निवासी आहे."

यानंतर जॉर्डनच्या परराष्ट्र मंत्रालयानं घोषणा केली की, ओसामा नावाचा जॉर्डनचा एक नागरिक सापडला आहे आणि तो जॉर्डनला परतला आहे. मात्र त्या व्यक्तीनं त्याची स्मरणशक्ती गमावली आहे.

लाल रेष
लाल रेष

लवकरच अधिकाऱ्यांनी सेडनाया तुरुंगातून सुटका झालेला कैदी आणि अल-बतायनेह कुटुंबाची इरबिदमध्ये भेट घडवून आणली. अल-बतायनेह यांनी बीबीसीला सांगितलं, "त्यानं बराच वेळ माझा हात पकडून ठेवला आणि त्याचं चुंबन घेतलं."

ओसामाच्या स्थितीबद्दल त्यांनी सांगितलं, "तो अगदी सांगाड्यासारखा दिसत होता. त्याची स्मरणशक्ती गेली आहे. त्याची अवस्था ह्रदय पिळवटून टाकणारी आहे. त्याचं सगळं व्यक्तिमत्वच बदलून गेलं आहे."

ओसामाच्या बहिणीनं बीबीसीला सांगितलं की, ओसामानं त्यांच्या आईचं नाव घेतलं आणि कुटुंबाबरोबरचा आपला जुना फोटो ओळखला.

मात्र या कथेत पुन्हा एक अनपेक्षित, नाट्यमय वळण आलं.

जॉर्डनहून पुन्हा सीरिया

त्या व्यक्तीला (ओसामा) जॉर्डनची राजधानी असलेल्या अम्मानमधील एका हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथे त्याची डीएनए चाचणी झाली. त्यातून असं समोर आलं की, त्या व्यक्तीचा अल-बतायनेह कुटुंबाशी कोणताही अनुवंशिक संबंध नाही.

यानंतर तो व्यक्ती नेमका कोण आहे, याबद्दलची अनिश्चितता वाढू लागली. कारण सोशल मीडियावर त्याच्यासंदर्भात अनेक परस्परविरोधी दावे समोर येऊ लागले.

फेसबुकवर एका व्यक्तीनं सांगितलं की, व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती सीरियातील तर्तूस शहरातील आहे. ते दोघंही एकत्रच कैदेत होते.

सीरियाला लागून असलेली जॉर्डनची सीमा. दोन्ही देशांदरम्यान 360 किलोमीटर लांबीची समान सीमा आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सीरियाला लागून असलेली जॉर्डनची सीमा. दोन्ही देशांदरम्यान 360 किलोमीटर लांबीची समान सीमा आहे.

आणखी एका महिलेनं फेसबुकवर दावा केला की, "हा व्यक्ती तर्तूसच्या ग्रामीण भागात असणाऱ्या काफरौन सादेह गावचा रहिवासी आहे. 1986 मध्ये सीरियाच्या गुप्तचर संस्थेनं बैरूतमधून त्याचं अपहरण केलं होतं."

कॅटालिना सादेह म्हणाल्या की, सुटका झालेला कैदी हबीब सादेह या त्यांच्या एका नातेवाईकासारखा दिसतो. त्यांच्या मते, हबीबचं लेबनॉनच्या राजधानीतून अपहरण करून त्याला सीरियाच्या तुरुंगात टाकण्यात आलं होतं.

त्या पुढे म्हणाल्या की, त्यांच्या आजोबांचे भाऊ सादेह सेडनाया या कुख्यात तुरुंगात आहेत, अशी माहिती त्यांच्या कुटुंबाला अडीच वर्षापूर्वी मिळाली होती.

कुटुंबाला आशा आहे की, डीएनए चाचणी केल्यावर हे सिद्ध होईल की तुरुंगातून सुटका झालेली ती व्यक्ती म्हणजेच त्यांचा बेपत्ता झालेला नातेवाईक आहे.

आता सर्व लक्ष डीएनए चाचणीवर

सादेह यांनी बीबीसीला सांगितलं, "आम्ही जॉर्डनमधील (जिथे ती बेपत्ता व्यक्ती आहे) डीएनए चाचणीचा रिपोर्ट पाठवू आणि काफरौन सादेह गावातील माझ्या आजोबांचा नमुना घेतला जाईल."

सादेह म्हणाल्या, "माझ्या आजोबांना त्यांचा भाऊ सापडला तर खूपच आनंद होईल."

हा बेपत्ता व्यक्ती जॉर्डनला पोहोचल्यानंतर, जॉर्डनचे माजी कामगार मंत्री निदाल अल-बतायनेह त्याच्यासोबत होते. निदाल अल-बतायनेह यांचं म्हणणं आहे की, त्यांना अनेक कॉल आले. ज्यात अनेकांनी ती व्यक्ती म्हणजे आपला नातेवाईक असल्याचं सांगितलं.

ज्या कुटुंबाना वाटतं की, ती व्यक्ती म्हणजे त्यांचा नातेवाईक असू शकतो, अशा सर्वांना निदाल यांनी डीएनए चाचणीसाठी त्यांचे नमुने पाठवण्यास सांगितलं आहे.

बशर अल-असद सरकार पडल्यानंतर सेडनाया तुरुंगातील गुप्त खोल्या अशा स्थितीत सापडल्या.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बशर अल-असद सरकार पडल्यानंतर सेडनाया तुरुंगातील गुप्त खोल्या अशा स्थितीत सापडल्या.

दरम्यान जॉर्डनमध्ये राहणाऱ्या कासिम बश्तावी आणि त्यांच्या कुटुंबाला वाटतं की तुरुंगातून सुटका झालेली ती व्यक्ती म्हणजे त्यांचा चुलत भाऊ अहमद असू शकतो.

बश्तावी यांनी बीबीसीला सांगितलं की, त्यांचा चुलत भाऊ एक पॅलेस्टिनी सैनिक होता. त्याचं लेबनॉनमधून अपहरण करून त्याला सीरियात पाठवण्यात आलं होतं.

बश्तावी म्हणाले की, 1995 मध्ये तुरुंगातून सुटका झालेला एक कैदी त्यांच्या कुटुंबाकडे आला आणि त्यानं सांगितलं की, अहमद सीरियातील कुख्यात सेटनाया तुरुंगात आहे.

यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी तुरुंगात त्या व्यक्तीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र सीरियाच्या सुरक्षा दलांनी त्यांना धमकी दिली.

सुटका झालेली व्यक्ती हा आपला बेपत्ता झालेला नातेवाईक आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी बश्तावी कुटुंब देखील डीएनए चाचणी करण्याचा विचार करतं आहे.

'देव आमची मदत करेल अशी आम्हाला आशा आहे'

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

सुटका झालेल्या कैद्याचा अल-बतायनेह यांच्या कुटुंबाशी कोणताही संबंध नाही हे डीएनए चाचणीत सिद्ध झाल्यामुळे, अल-बतायनेह यांचं कुटुंब निराश झालं आहे.

ओसामा यांचे भाऊ मोहम्मद अल-बतायनेह यांनी बीबीसीला सांगितलं, "आम्ही काहीच करू शकत नाही आणि आता देव आमची मदत करेल अशी आम्हाला आशा आहे'

बतायनेह कुटुंबानं सांगितलं की, वडिलांनी आपल्या मुलाची माहिती मिळवण्याचे सर्व प्रयत्न केले. तर मुलगा दुरावण्याच्या दु:खामुळे आईची दृष्टी गेली आणि काही वर्षांपूर्वीच त्यांचं निधन झालं.

मोहम्मद अल-बतायनेह म्हणाले, "त्याच्या अटकेपासून, त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न आम्ही कधीच थांबवले नाहीत. तो जिवंत आहे की नाही याबद्दल आम्ही सीरियातील लोकांकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत."

ते पुढे म्हणाले की, सेडनाया तुरुंगात मृतदेहांना अॅसिडमध्ये विरघळवून टाकण्यात आल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये आल्या आहेत. या बातम्यांमुळे ते अस्वस्थ झाले आहेत.

मात्र अजूनही या कुटुंबानं आशा सोडलेली नाही. आपल्या मुलाचा शोध घेण्याचे प्रयत्न त्यांनी सुरूच ठेवले आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)