डोनाल्ड ट्रम्प : कॅपिटॉल हिल हल्ला प्रकरणातील जवळपास 1600 जणांना 'माफी'

अमेरिकेत 6 जानेवारी 2021 रोजी कॅपिटॉल इमारतींवर झालेल्या हल्ला आणि हिंसाचार प्रकरणातील आरोपींना नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'माफ' केलंय.

कॅपिटॉल इमारतीतवर हल्ला करण्याच्या आणि दंगल माजवणाच्या आरोपाखाली जवळपास 1500 जणांना अटक करण्यात आली होती.

पण ट्रम्प यांनी अटकेतील लोकांना 'ओलीस' ठेवल्याचं म्हटलं आणि या लोकांनीही काहीही चुकीचं केलं नव्हतं असं म्हणत, त्यांना 'माफ' केलं आहे.

कॅपिटॉल हिंसेतील आरोपींचे वकील डेरिक स्टॉर्म्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'जानेवारी 6 चे ओलीस' मध्यरात्रीच वॅाशिंग्टन डीसीमधील तुरुंगातून सुटतील.

कॅपिटॉल इमारतीतच अमेरिकेच्या काँग्रेसची म्हणजे विधामंडळाची अधिवेशनं भरतात.

6 जानेवारी 2021 रोजी या कॅपिटॉल इमारतीवर हल्ला झाला होता आणि तिथे दंगल माजली होती. हा हल्ला अमेरिकन नागरिकांनीच केला होता आणि यात चार लोकांचा जीवही गेला होता.

त्यावेळी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत जो बायडन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला होता.

पण ट्रम्प यांच्या समर्थकांना हा निकाल मान्य नव्हता. त्यांनी केलेल्या निदर्शनांचं कॅपिटॅाल इथे हिंसाचारात रूपांतर झालं.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यानंतर बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी एकापाठोपाठ अनेक घोषणा केल्या.

सर्वात आधी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची दक्षिण सीमा म्हणजे मेक्सिकोच्या सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करणार असल्याची घोषणा केली. मेक्सिकोच्या सीमेवर आणखी सैन्य पाठवणार असल्याचंही ट्रम्प म्हणाले.

तसंच, माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या प्रशासनाने घेतलेले निर्णय परत घेण्याचा निर्धार त्यांच्या या वक्तव्यातून दिसला.

मेक्सिको सीमेवर लावणार 'राष्ट्रीय आणीबाणी'

ट्रम्प यांनी आपल्या भाषणात योजना सविस्तररीत्या सांगितली. आजच आपण राष्ट्रीय आणीबाणीच्या आदेशावर स्वाक्षरी करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

अमेरिकेत होणारी बेकायदा घुसखोरी थांबवण्यात येईल असे ट्रम्प यांनी सांगितले. त्याचबरोबर देशात वास्तव्य करणाऱ्या 'परकीय गुन्हेगारां'ना त्यांच्या मायदेशाचा रस्ता दाखवण्यात येईल असे देखील त्यांनी म्हटले.

पुढील काळात मेक्सिकोच्या सीमेवर जास्त सैनिक तैनात करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दुसऱ्या देशांमधून येऊन विविध कारणांच्या आधारे अमेरिकेत स्थायिक होणाऱ्यांचा मुद्दा अमेरिकेच्या यावेळच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत देखील गाजल्याचे पाहायला मिळाले.

बेकायदा स्थलांतरबाबत आपण कठोर भूमिका घेऊ असे त्यांनी यापूर्वीच म्हटले होते. आजवरची सर्वांत मोठी डिपोर्टेशन मोहीम म्हणजेच बेकायदा स्थलांतरितांना त्यांच्या घरी पाठवण्याची मोहीम राबवणार असल्याचे ट्रम्प यांनी प्रचारावेळी म्हटले होते.

जेव्हा ट्रम्प म्हणतात 'ड्रिल बेबी ड्रिल'

ट्रम्प यांनी आपल्या भाषणात महागाई आणि इंधनाच्या वाढत्या किमतीवरही भाष्य केले. महागाईचा पराभव करण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील आणि त्यासाठी आपण आपल्या मंत्रिमंडळाला आदेश देणार आहोत असे ट्रम्प यांनी म्हटले.

अमेरिका पुन्हा एकदा निर्मितीवर लक्ष केंद्रित करेल असे ते म्हणाले. अमेरिका नैसर्गिक साधनसंपत्तीबाबत सधन असून आपण पृथ्वीवरील सर्वांत मोठ्या तेलाच्या साठ्यावर बसून आहोत. आपल्याला त्याचा वापर करावा लागणार आहे.

पुढे ते म्हणाले, ड्रिल बेबी ड्रिल.. म्हणजे येत्या काळात उत्खनन करूया.

डोनाल्ड ट्रम्प यांनी पनामा कालव्याच्या मुद्द्यावरही यावेळी स्पष्टपणे भूमिका मांडली. पनामा कालवा हा चीनला नव्हे तर पनामाला दिला होता. त्याचा वापर चीनकडून केला जात असेल तर तो परत घेऊ, असा पुनरुच्चारही यावेळी ट्रम्प यांनी केला.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.