You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डोनाल्ड ट्रम्प यांना हश मनी प्रकरणी शिक्षा सुनावताना न्यायायाधीश काय म्हणाले?
- Author, अॅना लामचे
- Role, बीबीसी न्यूज
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची हश मनी खटल्यातील सर्व 34 आरोपांमधून बिनशर्त सुटका झाली आहे.
निकाल ऐकवताना जस्टीस जुआन मर्चन यांनी म्हटलं, "मी तुमच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या यशस्वीतेसाठी सदिच्छा व्यक्त करतो."
ट्रम्प यांना बिनशर्थ सोडण्याचा अर्थ असा आहे की, त्यांना या प्रकरणी ना कसली तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे, ना त्यांना कसला दंड भरावा लागणार आहे.
जस्टीस जुआन मर्चन यांनी न्यायालयाला सांगितलं की, या प्रकरणात ट्रम्प यांना बिनशर्त मुक्त करणं ही या देशाच्या सर्वोच्च पदावर अतिक्रमण न करता दिलेली वैध शिक्षा आहे.
ट्रम्प यांच्यावर 2016 साली एका स्कँडलमधून वाचण्यासाठी पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्स यांना गप्प राहण्याच्या बदल्यात गुप्तपणे पैसे दिल्याचा आरोप होता. या प्रकरणी त्यांना गेल्यावर्षीच्या मे मध्ये दोषीही ठरवण्यात आलं होतं.
ट्रम्प 20 जानेवारी रोजी दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहेत.
ट्रम्प काही दिवसांत दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. त्याआधी त्यांना या प्रकरणी शिक्षा सुनावली जाणार होती, त्यामुळे, खटल्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं होतं.
न्यूयॉर्कमधील जस्टीस जुआन मर्चन यांनी ट्रम्प यांना तुरुंगवास, प्रोबेशन किंवा दंडाची शिक्षा सुनावणार नसल्याचे संकेत दिले होते. तर त्यांची "बिनशर्त सुटका" केली जाईल. तसंच या सुनावणीसाठी ट्रम्प प्रत्यक्ष किंवा ऑनलाईनही उपस्थित राहू शकतात, असंही आदेशात म्हटलं होतं. त्यानुसार, ट्रम्प आजच्या सुनावणीवेळी ऑनलाईन उपस्थित राहिले होते.
ट्रम्प यांनी अध्यक्षीय निवडणुकीतील विजयाचा वापर करून त्यांच्यावरील खटला रद्द करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या टीमनं न्यायमू्र्तींच्या शिक्षा सुनावण्याच्या निर्णयावर टीका केली होती. हा खटला बेकायदेशीर असून तो तातडीनं रद्द करण्याची मागणी त्यांनी केली होती.
मर्चन म्हणाले की, "ही दुर्मिळ परिस्थिती होती. यापूर्वी न्यायालयाने अशा परिस्थितीचा सामना केला नव्हता."
यापूर्वी वकील जोशुआ स्टेनग्लास यांनी सुनावणीदरम्यान ट्रम्प यांच्या वर्तनावर टीका केली होती. ही सुनावणी प्रक्रिया कमकुवत करण्यासाठी ट्रम्प यांनी अभियान चालवत न्याय व्यवस्थेला बदनाम केल्याची टीका त्यांच्यावर करण्यात आली होती.
ट्रम्प यांना अॅडल्ट स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला दिलेल्या $130,000 (£105,000) पेमेंटशी संबंधित खोट्या व्यावसायिक नोंदींच्या प्रकरणात ट्रम्प यांना दोषी ठरवण्यात आलं होतं. डॅनियल्स यांना ट्रम्प यांच्याबरोबर असलेल्या लैंगिक संबंधांबाबत काहीही बोलू नये म्हणून पैसे देण्यात आले होते.
ट्रम्प यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावले होते. 2024 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रचाराला हानी पोहोचवण्याचा हा प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
दरम्यान, शिक्षेचा आदेश म्हणजे 'विच हंट'चा प्रकार असल्याचं ट्रम्प यांच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला काही बोलू नये म्हणून पैसे दिल्याचे तसेच या खटल्यात पेमेंट करण्यासाठी व्यवसायात खोट्या नोंदी केल्याचा आरोप आहे.
पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सनं ती आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात लैंगिक संबंध होते, असा आरोप केला आहे.
या प्रकरणाबद्दल गप्प राहण्यासाठी स्टॉर्मी डॅनियल्सला ट्रम्प यांच्याकडून 1,30,000 डॉलर्स मिळाले होते. ही रक्कम ट्रम्प यांच्या माजी वकिलानं 2016च्या निवडणुकीपूर्वी दिली होती, असा आरोप होता.
या वकिलाचं नाव मायकल कोहेन असं असून त्यांना नंतर विविध आरोपांखाली तुरुंगवास झाला होता.
हे आरोप 2018 मध्ये उजेडात आले. त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टॉर्मी डॅनियल्सबरोबर कोणत्याही प्रकारचा लैंगिक संबंध ठेवल्याचे आरोप फेटाळले होते.
स्टॉर्मी डॅनियल्सचे आरोप
स्टॉर्मी डॅनियल्सने प्रसार माध्यमांमध्ये दिलेल्या मुलाखतींमध्ये म्हटलं होतं की, डोनाल्ड ट्रम्प यांची आणि तिची भेट जुलै 2006 मध्ये समाजसेवेसाठी निधी गोळा करणाऱ्या एका गोल्फ स्पर्धेत झाली होती.
डोनाल्ड ट्रम्प आणि तिने कॅलिफोर्निया आणि नेवाडा दरम्यान असणाऱ्या लेक ताहो या रिसोर्ट मधील हॉटेलच्या रुममध्ये एकदा सेक्स केल्याचा आरोप तिनं केला होता. त्यावेळी ट्रम्प यांच्या वकिलानं डॅनिएल्सचा आरोप धुडकावून लावला होता.
ट्रम्प यांनी तिला त्या रात्रीच्या प्रसंगाबद्दल गप्प राहण्यास सांगितलं आहे का? असा प्रश्न इंटरव्ह्यूमध्ये विचारला होता. त्यावर ''त्यांना याबद्दल कोणतीही चिंता दिसत नाही. ते खूपच उद्धट आहेत,'' असं उत्तर डॅनियल्सनं दिलं होतं.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलेनिआ ट्रम्प त्या गोल्फ स्पर्धेच्या ठिकाणी हजर नव्हत्या. त्यांनी त्यावेळी नुकताच बाळाला जन्म दिला होता
स्टॉर्मी डॅनियल्स म्हणाल्या की, कोहेन यांनी 2016च्या निवडणुकीच्या काही दिवस आधीच तिला 1,30,000 डॉलर्सची रक्कम दिली होती. डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरच्या संबंधांबद्दल गप्प राहण्यासाठी तिला हे पैसे देण्यात आले होते. त्या निवडणुकीत ट्रम्प यांचा विजय झाला होता.
डॅनियल्स यांच्या मते, त्यांनी ते पैसे घेतले कारण त्यांना कुटुंबाच्या सुरक्षिततेची चिंता वाटत होती. गप्प राहण्यासाठी तिला मारण्याच्या आणि कायदेशीर कारवाई करण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या, असंही त्यांनी सांगितलं.
2018 मध्ये लास वेगासच्या पार्किंग परिसरात एक अनोळखी व्यक्ती डॅनियल्स आणि तिच्या लहान बाळाला भेटली होती. त्या व्यक्तीनं डॅनिएल्सला धमकावताना ट्रम्पपासून दूर राहण्यास सांगितलं होतं.
तिनं 'इन टच' या मासिकाला या कथित प्रकरणाबद्दल मुलाखत देण्यास होकार दिल्यानंतर लगेचच हा प्रसंग घडला असल्याचं डॅनिएल्स सांगतात.
ही मुलाखत प्रसारित होण्याआधी कोहेनशी संबंधित एका बनावट कंपनीनं डॅनियल्सला धमकावलं होतं. या कंपनीनं डॅनियल्सला त्यांच्यावर 2 कोटी डॉलर्सचा खटला दाखल करण्याची धमकी दिली होती. गप्प राहण्यासाठी डॅनिएल्सनं त्यांच्याबरोबर केलेली डील मोडल्याचं त्या कंपनीचं म्हणणं होतं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.