You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
टोमॅटोपासून बटाटे कसे विकसित झाले, शास्त्रज्ञांनी 90 लाख वर्षांपूर्वीचे रहस्य कसं उलगडलं?
बटाटा प्रत्येकाच्या रोजच्या आहाराचा अविभाज्य भाग आहे. याची लागवड, प्रक्रिया आणि निर्यात यामध्ये गुजरातनं देशात मोठी आघाडी घेतली आहे.
फ्रेंच फ्राइज, चिप्ससारख्या उत्पादनांमधून गुजरात आता आंतरराष्ट्रीय बाजारात आपली छाप सोडत आहे. या यशामागे संशोधन, हवामानाशी जुळवून घेतलेली शेती आणि स्पर्धात्मक किमती यांचा मोठा वाटा आहे.
जगभरात बटाटा खूप महत्त्वाचा अन्नपदार्थ मानला जातो. गहू, तांदूळ आणि मका यांच्यासोबत तो जगातील 80 टक्के लोकांचं पोट भरतो.
गुजरातसह जगातील अनेक भागांमध्ये बटाट्याची मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. मोठ्या संख्येने शेतकरी बटाट्याच्या लागवडीतून आपला उदरनिर्वाह करतात. टोमॅटो ही सुद्धा अशीच एक महत्त्वाची भाजी आहे.
बटाटा आणि टोमॅटो हे दिसायला आणि चवीलाही एकमेकांपेक्षा वेगळे असले तरी केवळ खाण्यासाठीच नाही, तर त्यांची उत्पत्तीही एकमेकांशी निगडीत आहे, असं आता समोर आलं आहे.
अलीकडेच प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, साधारण 80-90 लाख वर्षांपूर्वी दक्षिण अमेरिकेच्या भागात बटाट्यासारखा एका वनस्पती आणि जंगलात उगम पावणाऱ्या टोमॅटोच्या वनस्पतीमधील मिश्र प्रजोत्पत्तीमुळे बटाट्याची ही जात निर्माण झाली होती.
नव्या संशोधनात बटाट्याच्या उगमाचं रहस्य समोर
'सेल' जर्नलमध्ये अलीकडे प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, बटाटा हा टोमॅटो आणि बटाट्यासारख्या एका प्रजातीमधील खूप वर्षांपूर्वी झालेल्या मिश्रप्रजोत्पत्ती किंवा आंतरप्रजनन मधून तयार झाला आहे.
संशोधनात असं म्हटलं आहे की, जुन्या दोन प्रजातींमधून मिळालेली जनुके (वंशसूत्र) आणि आजच्या काळातील बटाटा व जंगली बटाट्यातून मिळालेली 450 गुणसूत्रं (क्रोमोसोम) यामध्ये साम्य आढळून आलं आहे.
अभ्यासानुसार, ही आंतरप्रजननाची क्रिया बटाट्याच्या प्रजातीसाठी खूप महत्त्वाची ठरली.
यामुळेच बटाट्याच्या वनस्पतीला जमिनीखाली खाण्यासाठी योग्य गाठ (कंदमूळ) तयार होऊ लागली आणि ती प्रजाती अधिक मजबूत व विविध प्रकारच्या परिस्थितींना अनुरूप होणारी बनली.
बटाट्याच्या वनस्पतीला हे गुण त्याच्या पूर्वज वनस्पतींपासूनच मिळाले, ज्यामुळे तो स्वतःची जात पुढे नेऊ शकतो.
'रॉयटर्स डॉट कॉम'वर या संशोधनाबाबत प्रकाशित झालेल्या एका वृत्तानुसार, या संशोधनाचे वरिष्ठ लेखक आणि चायनीज अॅकॅडमी ऑफ अॅग्रीकल्चरल सायन्सेसमधील वनस्पती सुधारक सानवेन हुआंग यांनी सांगितलं की, "बटाटा हा माणसांसाठी मुख्य अन्नपदार्थांपैकी एक आहे.
त्यामध्ये विविधता, पोषणमूल्य आणि सर्वत्र उपलब्ध असण्याचे असे अनेक गुणधर्म आहेत, जे इतर काही मोजक्या अन्नपदार्थांमध्येच दिसून येतात."
या संशोधनामुळे कोणत्या नवीन संधी निर्माण होतात?
'बीबीसी गुजराती'नं डीसामधील बटाटा संशोधन केंद्राचे प्रमुख दिनेश जी. पटेल यांच्याशी बटाट्याच्या शेतीतील संशोधनाचं महत्त्व यावर चर्चा केली.
त्यांनी सांगितलं की, "अलीकडचं संशोधन हे इंटरस्पिसीज हायब्रिडायझेशनविषयीचं (आंतर-प्रजाती संकरीकरण) आहे. ही प्रक्रिया अनेक वेळा खूप उपयोगी ठरते आणि तिच्यामुळे चांगले परिणामही मिळू शकतात."
त्यांनी सांगितलं की, भारतात इंटरस्पिसीज हायब्रिडायझेशनवर सिमलाजवळील कुफरी-फागू इथल्या सेंट्रल पोटॅटो रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे.
ते पुढे म्हणाले की, "या प्रक्रियेतून पिकांमध्ये होणाऱ्या रोगांचा नाश करण्यासाठी काम करता येतं. या प्रक्रियेमुळे रोगांना प्रतिकार करणारी उत्तम जात विकसित करण्यास मदत होते. अशा प्रकारचं संशोधन भविष्यासाठी चांगल्या संधी निर्माण करू शकतं."
गुजरातमधील बटाटा उत्पादक शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींबद्दल बोलताना ते म्हणाले की, "ग्लोबल वॉर्मिंग (जागतिक तापमानवाढ) हा गुजरातमध्ये बटाट्याच्या शेतीसमोरील सर्वात मोठा अडथळा आहे. त्यामुळे तापमानात सतत चढ-उतार होतात, जे बटाट्याच्या शेतीसाठी अडचणीचं ठरतं."
ते पुढे म्हणाले, "ग्लोबल वॉर्मिंगच्या परिणामांपासून बटाटा शेतकऱ्यांना संरक्षण मिळावं म्हणून आम्ही नवे संशोधन करत आहोत. आमचे काही प्रयत्न शेतकरी आणि बटाट्याचे व्यापारी यांच्यासाठी फायदेशीरही ठरले आहेत."
आमचा मुख्य उद्देश हा अशी प्रजाती विकसित करणं आहे, जी ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटाला सामोरे जाऊ शकेल."
ते सांगतात की, "चिप्स, फ्रेंच फ्राइज आणि टेबलवर वापरल्या जाणाऱ्या बटाट्यांसाठी (टेबल पर्पज पोटॅटो) गुजरातमध्ये कोणती हायब्रिड (संकरित) जात योग्य ठरेल, हे शोधण्याचं काम सुरू आहे. याशिवाय बटाट्यावर होणाऱ्या रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठीही काम केलं जात आहे."
प्रक्रिया केलेल्या बटाट्याच्या निर्यातीत गुजरात आघाडीवर
गुजरातमध्ये बटाटा मोठ्या प्रमाणावर खाल्ला जातो आणि त्याची शेतीही भरपूर केली जाते.
अलीकडच्या काळात गुजरातमध्ये बटाट्याचं एकूण लागवडीचं क्षेत्रही वाढलं आहे.
प्रोसेस (प्रक्रिया) केलेल्या बटाट्याच्या उत्पादन आणि निर्यातीमध्ये गुजरात आघाडीवर आहे.
गुजरात राज्याच्या कृषी संचालक कार्यालयाच्या 2024-25 च्या तिसऱ्या अंदाजानुसार, राज्यात अंदाजे 1,56,200 हेक्टर क्षेत्रामध्ये बटाट्याची लागवड होणार आहे आणि सुमारे 49.34 लाख टन उत्पादन होईल, असा अंदाज होता.
'द हिंदू'च्या वृत्तानुसार 2024-25 या हंगामात गुजरातमध्ये एकूण 48.59 लाख टन बटाट्याचं उत्पादन झालं होतं.
'द हिंदू डॉट कॉम'च्या एका अहवालानुसार, 2025 मध्ये प्रोसेस्ड बटाट्याच्या उत्पादनामध्ये गुजरात देशात पहिल्या क्रमांकावर होता. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे उत्तर प्रदेश आणि पंजाब होते.
राज्यात एकूण बटाट्याच्या उत्पादनामध्ये सुमारे 25 टक्के हिस्सा प्रोसेस्ड बटाट्याचा होता. उरलेल्या उत्पादनामध्ये 'कुफरी'सारख्या जातीच्या बटाट्यांचाही समावेश होता.
फ्रेंच फ्राइजच्या उत्पादनात गुजरात भारतात आघाडीवर आहे. येथे अनेक कारखान्यांमध्ये चिप्स तयार केले जातात. त्यामध्ये कॅनडाची आघाडीची कंपनी 'मॅक्केन फूड्स' आणि भारतातील सर्वात मोठी फ्रेंच फ्राइज उत्पादक कंपनी 'हायफन फूड्स' यांच्या कारखान्यांचाही समावेश आहे.
गुजरातमधून फ्रेंच फ्राइज जगभर निर्यात केले जातात. अनेक वर्षांपासून बटाट्याच्या बाजाराचा अभ्यास करणारे देवेंद्र के. यांच्या मते, सर्वात महत्त्वाची बाजारपेठ आशियात आहे, ज्यामध्ये फिलिपाइन्स, थायलंड आणि इंडोनेशिया यांचा समावेश होतो.
या वर्षी फेब्रुवारीमध्ये, भारतीय फ्रोझन फ्राइजच्या मासिक निर्यातीने पहिल्यांदाच 20,000 टनांचा टप्पा ओलांडला. फेब्रुवारीपर्यंत भारताची एकूण फ्राइजची निर्यात 1.81 लाख टन होती, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 45 टक्के जास्त आहे.
या यशामागचं एक मोठं कारण म्हणजे त्याची किंमत आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)