सालीसहित टोमॅटो खाणं शरीरासाठी किती चांगलं?

सांबार, रस्सम, ग्रेव्ही, भाजी, चटणी...टोमॅटो ही फळभाजी बहुतांश सगळ्याच स्वयंपाकघरात दिसते.

सगळ्याच पदार्थांची चव वाढवणारी ही भाजी अगदी कशातही टाकता येते.

आज टोमॅटो इतके महागलेत की, त्याच्या किंमती सर्वसामान्य लोकांच्या आवक्याबाहेर गेल्या आहेत. पण तरीही टोमॅटोशिवाय स्वयंपाकाचा विचार करणं अगदीच कठीण आहे.

बऱ्याचदा आपण टोमॅटो कच्चा खातो कारण त्यातून आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात.

जगभरात टोमॅटोच्या सुमारे 10,000 जाती आहेत. त्यांच्या आकारात, रंगात खूप विविधता आहे. पण सरसकट सगळीकडे वापरले जातात ते लालबुंद टोमॅटो.

टोमॅटोच्या रंगाचा त्याच्या संरचनेशी काही संबंध आहे का?

खरं सांगायचं तर टोमॅटोच्या रंगामुळेच त्याची पौष्टिकता वाढते असं कॅटालोनिया मुक्त विद्यापीठातील पोषण विषयाच्या प्राध्यापक जेम्मा सिवा-ब्लॅंचे सांगतात.

त्या सांगतात, "भाज्यांना रंग त्यांच्यात असणाऱ्या पॉलिफेनॉल आणि कॅरोटीनॉइड्स नावाच्या विशिष्ट पदार्थांमुळे येतो. जसं की पिवळ्या (लिंबू) रंगापासून जांभळ्या (वांगी) रंगापर्यंत सगळ्या रंगाच्या भाज्या असतात."

"टोमॅटो लाल असतात कारण त्यात या संयुगांची पातळी जास्त असते. पण पॉलिफेनॉल आणि कॅरोटीनोइड्सच्या विविध संयोजनांमुळे टोमॅटोचेही वेगवेगळे रंग आहेत."

'बायो-अॅक्टिव्ह कंपाऊंड्स' असलेले हे पदार्थ अँटी-ऑक्सिडंट म्हणून काम करतात. यामुळे आपल्या शरीराचा दाह थांबतो.

टोमॅटोमुळे हृदयविकाराचा धोका टळतो

80 ग्रॅम टोमॅटोमध्ये 5% पोटॅशियम असते आणि एखाद्या व्यक्तीला त्याच्या दैनंदिन जीवनात इतक्याच पोटॅशियमची गरज असते.

पोटॅशियममुळे स्ट्रोक हृदयरोगाचा धोका कमी होतो.

टोमॅटोमध्ये लाइकोपीन नावाचा घटक असतो. हे अँटी-ऑक्सिडंट शरीरातील दाह कमी करते. अनेक अभ्यासांनुसार यात हृदयविकाराचा धोका कमी करण्याची क्षमता असते.

सिवा-ब्लॅंचे म्हणतात की, जेव्हा आपण स्वयंपाकात टोमॅटोचा वापर करतो तेव्हा आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणावर लाइकोपीन मिळते.

इतर भाज्या जास्त प्रमाणात शिजवल्या की, त्याच्यातील जीवनसत्त्वे आणि खनिजे कमी होतात. पण याउलट टोमॅटोचं आहे. उष्णतेमुळे लाइकोपीनचे अँटिऑक्सिडंट गुणधर्म वाढल्याचं अनेक अभ्यासंमधून समोर आलंय.

त्याचप्रमाणे, ऑलिव्ह ऑईल मध्ये शिजवलेले टोमॅटो खाल्ल्याने हे संयुग शरीरात चांगल्या प्रकारे शोषले जातात.

बीबीसीच्या गुड फूड मॅगझिननुसार, टोमॅटोमधील बहुतेक कॅरोटीनोइड्स त्याच्या सालीत असतात. त्यामुळे टोमॅटोची साल न काढता टोमॅटो खाणं केव्हाही चांगलं.

टोमॅटो डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले

टोमॅटोमध्ये असलेल्या फायटोकेमिकल्समुळे डोळ्यांचं आरोग्य सुधारतं. वैद्यकीय तज्ञांच्या मते, वाढत्या वयानुसार मॅक्युलर डिजनेरेशन आणि डोळ्यांच्या इतर आजारांपासून वाचण्यासाठी टोमॅटोचा खाण्यात वापर करणं आवश्यक आहे.

सिवा-ब्लॅंचे सांगतात, "मधुमेह असलेल्या लोकांना हृदयविकाराचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. जर त्यांनी टोमॅटो जास्त खाल्ले तर त्यांचे स्नायू मजबूत होऊन स्क्लेरोटिक लोड कमी होतो. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो."

हेही वाचलंत का?

बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.