अल्पवयीन मुलींवर बलात्कार, गरोदरपणाच्या प्रकरणांचं वाढतं प्रमाण पण आरोपी मोकाट

- Author, तमासीन फोर्ड
- Role, बीबीसी आफ्रिका आय
कोरोनाच्या काळापासून उत्तर युगांडातील 10-14 वयोगटातील मुलींचं गरोदर राहण्याचं प्रमाण चार पटीने वाढल्याचं दिसून आलं.
यामागे नेमकं कोणतं कारण आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला असता असं दिसून आलं की, तरुण मुलींच्या लैंगिक शोषणात वाढ झाल्यामुळे हे प्रमाण देखील वाढलंय. पण यातले गुन्हेगार मात्र मोकाट फिरत आहेत. बीबीसी आफ्रिका आयने यामागची कारणं शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
बारा वर्षांची गरोदर मुलगी स्थानिक कौन्सिल चेअरमनकडे आली होती. चेअरमनने तिला डॉक्टरांच्या व्हिजिट बद्दल विचारलं असता तिने काही न बोलता मान झुकवली आणि तिच्या हातांकडे बघू लागली.
चेअरमनने विचारलेला प्रश्न खरं तर तिच्या कुटुंबीयांनी तिला विचारणं गरजेचं आहे. तसं पाहायला गेलं तर तिची गर्भधारणा देखील सामान्य नाहीये.
ही मुलगी किटगुम जिल्ह्यातील एका लहानशा घरात राहते. तिचे गर्भारपणाचे दिवस भरत आले असून आता कोणत्याही दिवशी तिची प्रसूती होण्याची शक्यता आहे.
तिच्या पालकांनी कसावाचा व्यवसाय सुरू केला होता. कसावा ही उष्ण प्रदेशात येणारी वनस्पती असून त्याच्या मुळाचा उपयोग कंद भाजी म्हणून होतो. ही भाजी रताळ्या सारखी दिसते.
पण हा व्यवसाय अयशस्वी झाला, आणि ते कुटुंबासाठी पैसे आणण्यासाठी त्यांच्या गावी परतले.
कौन्सिल चेअरमन असलेले ओबिता डेव्हिड लिव्हिंगस्टोन सांगतात की, "पालकांनी गावी जाताना तिला इथेच सोडलं कारण तिची शाळा इथून जवळच आहे."
"पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, इथल्या पुढच्या खोलीत काही पुरुष मद्यपान करतात. त्यामुळेच तिला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं."
तिच्या होणाऱ्या बाळाचा पिता कोण आहे किंवा नेमकं काय घडलं याविषयी कोणालाच माहिती नाही.
आठवड्यातून तीन प्रकरणं

लिव्हिंगस्टोन म्हणतात की त्यांना समाजात होत असलेल्या लैंगिक हिंसाचाराबद्दल जागरूकता वाढवायची आहे. त्यामुळेच बीबीसी आफ्रिका आयला अत्याचाराला बळी पडलेल्या या मुलींचं नाव न छापण्याच्या अटीवर चित्रीकरणाची परवानगी मिळाली.
लिव्हिंगस्टोन सांगतात, "आमच्याकडे एका आठवड्यात तीन प्रकरणं येतात. काहीवेळा गुन्हेगार सापडल्यावर आम्ही त्याला दोरखंडाने बांधून पोलिसांत घेऊन जातो. पण तिथे जाऊन फायदा होत नाही, कारण पोलिस याचा पाठपुरावा करण्याची तसदीच घेत नाहीत."
या प्रकारांना ते आता कंटाळले आहेत.
लिव्हिंगस्टोन म्हणतात, "बलात्कार झालेल्या मुलींना खऱ्या अर्थाने पाठिंबा देणारा कोणीही नाही. माझ्या दृष्टीने हा न्याय कमकुवत न्याय आहे."
निर्बंध (Defilement) म्हणजे 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीशी बेकायदेशीर लैंगिक संबंध ठेवणे.
युगांडाच्या आरोग्य व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील पहिल्या कोविड लॉकडाउन (मार्च-जून 2020) दरम्यान 10 ते 14 वयोगटातील मुलींच्या गर्भधारणेमध्ये 366% वाढ झाली आहे.
युगांडा मध्ये संमतीचं वय 18 वर्ष आहे. मात्र गुलू येथील स्थानिक रुग्णालयात आलेल्या गरोदर मुलींपैकी जवळजवळ एक चतुर्थांश मुली 18 वर्षाखालील होत्या.
प्रसूती आणि स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉ. बायफा अर्विन्यो सांगतात, "जर आपण किशोरवयीन मातांबद्दल बोलायला गेलो तर त्या सर्वचजणी लैंगिक अत्याचाराला बळी पडल्या आहेत. त्या किशोरवयीन आहेत, त्या गर्भवती नसल्या पाहिजेत."
"प्रसूतीवेळी दगवणाऱ्या मातांमध्ये किशोरवयीन मातांचं प्रमाण सर्वाधिक आहे. आईचं वय जितकं कमी असेल तितकी गुंतागुंत जास्त असते."
'लैंगिक अत्याचार ही युद्धनीती होती'
उत्तर युगांडाला दोन दशकांच्या संघर्षाचा वारसा आहे. आणि या संघर्षात मोठ्या प्रमाणावर लैंगिक हिंसाचार झाला.
या संघर्षाची सुरुवात लॉर्ड्स रेझिस्टन्स आर्मी (एलआरए) चे प्रमुख जोसेफ कोनी यांनी केली होती. लॉर्ड्स रेझिस्टन्स आर्मी हा बंडखोरांचा एक गट होता, ज्यांना सरकार उलथवायचं होतं.
या बंडखोर गटाचे सैनिक अपहरण केलेल्या लोकांना अमानुषपणे छळायचे. यातून लोकांना अपंगत्व यायचं.
या गटाने 40,000 मुलांचं अपहरण केल्याचा अंदाज होता. या मुलांना सैनिक किंवा लैंगिक गुलाम बनण्यास भाग पाडण्यात आलं. आज यातले 1.7 दशलक्ष लोक विस्थापित छावण्यांमध्ये राहतात.
गुलु वुमेन इकॉनॉमिक अँड ग्लोबलायझेशन या एनजीओच्या कार्यकर्त्या पामेला अँग्वेच यांच्या मते, 2008 मध्ये हे बंडखोर युगांडातून बाहेर पडले, पण त्यांनी केलेल्या अत्याचाराचे परिणाम आजही लोक भोगतायत.

"दूषित वातावरणाचा समाजावर दीर्घकालीन परिणाम झाला. लोकांना मृतदेह, मृत्यू पाहण्याची सवय झाली. बंडखोर गटाने लष्करी रणनीती म्हणून लैंगिक शोषण केलं."
"याचं वर्णन करायचं असेल तर मी म्हणेन की, हे युद्ध स्त्रीच्या शरीराभोवती झालं, स्त्री ही रणभूमी बनली."
युद्धादरम्यान जे घृणास्पद गुन्हे घडले त्यात फार कमी लोकांना न्याय मिळाला.
या बंडखोरांच्या गटाचा एक कमांडर, डोमिनिक ओन्ग्वेन याच्यावर फेब्रुवारी 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयात (ICC) खटला चालवला गेला. यात तो युद्ध आणि मानवतेविरुद्धच्या 61 गुन्ह्यांमध्ये दोषी आढळला.
आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाला, लॉर्ड्स रेझिस्टन्स आर्मी (एलआरए) चा प्रमुख जोसेफ कोनी हवा आहे मात्र त्याचा ठावठिकाणा अद्याप सापडलेला नाही.
कॅरिटास नामक एनजीओसाठी काम करणाऱ्या वकील युनिस लाकाराबेर लॅटिम यांच्या म्हणण्यानुसार, उत्तर युगांडामध्ये आजही उत्तरदायित्वाचा अभाव आहे.
"गुलूमध्ये मोठं होत असताना मी पाहिलं की, बऱ्याच मुलींवर अत्याचार झाले. पण या अत्याचााविरोधात दाद मागण्यासाठी किंवा त्या मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी बहुतेक पालकांकडे संसाधने नव्हती."
माझी मुलगी दुःखात आहे
मिस लॅटिम आफ्रिका आयला एका तीन वर्षांच्या बलात्कार पीडितेच्या घरी घेऊन गेल्या.
आपल्या तीन वर्षाच्या मुलीचं चालणं बदलल्याचं लक्षात येताच मुलीवर बलात्कार झालाय हे तिच्या आईला कळलं. जवळच्या नातेवाईकानेच मुलीवर अत्याचार केला होता. मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिल्यावर, पोलिस नातेवाईकाला अटक करण्यासाठी आले. पण त्यांनी या नातेवाईकाला पकडून नेण्यासाठी पैसे मागितल्याचं ती सांगते.
लॅटिम सांगतात, "न्याय मिळवण्यासाठी तुम्हाला अक्षरशः पैसे द्यावे लागतात. संशयिताला पकडण्यासाठी तुम्हाला इंधनाचे देखील पैसे द्यावे लागतात."
"ते पोलिस स्टेशनमध्ये असतील तर तुम्हाला त्यांच्या जेवणाचा खर्चही द्यावा लागतो."
संशयिताला सहा महिन्यांसाठी ताब्यात ठेवलं. पण काही योग्य कायदेशीर प्रक्रियांचे पालन न केल्यामुळे त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. खटल्याचा पाठपुरावा करण्यासाठी त्या मुलीच्या आईकडे पैसे नव्हते.
या तीन वर्षांच्या बाळाला लैंगिक संक्रमणाची लागण झाली असल्याचं पोलीस आणि वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
"माझ्या बाळाला अजूनही वेदना होतात." तिचा संसर्ग बरा झालेला नसल्याचं तिची आई सांगते.
"त्याला तुरुंगवासाची शिक्षा झाली पाहिजे. हे अशा पद्धतीने संपायला नको होतं."
लॅटिम सांगतात की, पीडितांना न्याय मिळत नाही हे आता नेहमीचंच झालंय.
"इथे खूप भ्रष्टाचार आहे. इथले लोक गुन्हे करायला घाबरत नाहीत, कारण ते म्हणतात, तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही यातून बाहेर पडाल. आणि तेच होत आहे."
अस्वाचे प्रादेशिक पोलीस कमांडर नचुला दामाली यांनी प्रकरणं हाताळण्याच्या समस्या मान्य केल्या, पण भ्रष्टाचाराचे आरोप त्यांनी नाकारलेत.
"आम्ही पीडित व्यक्तीला आमच्या सेवेसाठी पैसे मागू नये हे आम्हाला मान्य आहे, पण कधीकधी आमचं इंधन संपल्यावर आमच्याकडे पर्याय नसतो."
"त्यामुळे पोलिस अधिकारी भ्रष्ट आहेत, असा सर्वसाधारण समज झाला आहे. पण इतर संस्थांप्रमाणे सर्वच भ्रष्ट नाहीत. चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रवृत्ती असतात."
उत्तर युगांडाच्या राज्यमंत्री, ग्रेस फ्रीडम क्वियुक्विनी यांनीही अशा समस्या अस्तित्वात असल्याचं मान्य केलंय.
त्या म्हणतात, "मी भ्रष्टाचार नाकारू शकत नाही. भ्रष्टाचार आहे. तो सर्व स्तरांवर आहे, अगदी मंत्रालयांच्या पातळीवरही,"
"आमच्याकडे कायदे आहेत, पण लोक यातून पळवाट काढत पोलिसांना लाच देतात. मग पोलिसही यातून हात काढून घेऊन घरच्या घरी प्रकरण सोडवायला सांगतात. अत्याचाराच्या प्रकरणात कारवाई झाल्याची उदाहरणं आहेत पण त्यांची संख्या जास्त नाही."
पण बीबीसी आफ्रिका आयने ज्या प्रकरणांचा मागोवा घेतला त्यातल्या एकाही संशयितांवर कारवाई झालेली नाही.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








