'मसाज करताना तो अचानक असभ्य वागायला लागला, काय घडतंय हेच मला कळेना'

- Author, इलेनॉर लायहे आणि हना प्राईस
- Role, बीबीसी फाईल ऑन4 अँड युके इनसाईट
घरी मसाज करून घेण्याचे प्रमाण इंग्लंडमध्ये वाढल्याचं दिसत आहे. पण घरी मसाजसाठी येणाऱ्या व्यावसायिकांकडून महिलांवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची माहिती बीबीसीला मिळाली आहे.
मसाज व्यवसाय करण्यासाठी इंग्लंडमध्ये कुठल्याही परवान्याची गरज नसते. लोक सरकारकडे अशी मागणी करत आहेत की या व्यवसायवर सरकारचे नियंत्रण हवे आणि अशा प्रकारचे हल्ले थांबावेत.
सूचना - या बातमीतील काही माहिती तुमचं लक्ष विचलित करू शकते.
कॅलम उर्कहर्टने या व्यक्तीची मसाज सर्व्हिसची जाहिरात सोशल मीडियावर पाहून यास ( नाव बदलण्यात आले आहे.) यांनी त्याची सर्व्हिस बुक केली. यासने आपल्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. सुरुवातीला कॅलमने आधी तिची रीतसर परवानगी घेतली. शरीरातील काही भागांना स्पर्श करण्यासाठी देखील त्याने आधी तिची परवानगी मागितली. पण तिला काही कळायच्या आतच त्याने तिच्यासोबत असभ्य वर्तन करण्यास सुरुवात केली.
मला वाटतं त्या स्थितीत मला हेच कळत नव्हतं की काय करावं. माझ्यासोबत काय घडतंय हेच मला कळत नव्हतं. माझा त्यावर विश्वासच बसत नव्हता आणि दुसरं मन असं सांगत होतं की यावर ओव्हररिअॅक्ट नको करू. तिने बीबीसीला सांगितलं. पण त्याने धसमुसळेपणा करण्यास सुरुवात केली. त्या वेळेपर्यंत मला पूर्ण कल्पना आली होती माझ्यासोबत काय होत आहे. मला हे कळत नव्हतं की तो माझा आता बलात्कार करणार आहे की मला जीवे मारणार आहे. मला खरंच माहीत नव्हतं.
यासने या घटनेची तक्रार पोलिसांकडे केली. यासला समजलं की कॅलमजवळ हे करण्यासाठी कुठलीही पदवी नव्हती. त्याने मसाज थेरेपीचं प्रशिक्षण घेतलेलं नव्हतं. पोलिसांनी याचा तपास सुरू केला, तपास सुरू असताना आणि अटक होऊन तो जामिनावर बाहेर असल्यावर देखील कॅलमने काही क्लायंट्सवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनांची माहिती बीबीसीकडे आली आहे.
गेल्या वर्षी कॅलमला अटक करण्यात आली होती. त्याने ब्रिस्टल शहरातील चार महिला क्लायंट्सवर लैंगिक अत्याचार केले होते. या घटनेमुळे यासला दुःख झाल्याचं ती सांगते. कारण कॅलमसारख्या लोकांकडून या महिलांना झालेला त्रास थांबवण्यासाठी कुठलीही यंत्रणा कार्यरत नव्हती. जर त्यावर कठोर नियंत्रण असलं असतं तर तो निगराणीत असला असता आणि हे अत्याचार थांबले असते असं यास यांना वाटतं.
त्याने जे केलं त्याची त्याला काही ना काही शिक्षा व्हायला हवी. या गोष्टीची तक्रार करण्याचं कारण म्हणजे भविष्यात त्याने असा त्रास कुणालाही देऊ नये.
नियंत्रणाचा अभाव
सध्या युनायटेड किंगडममधील नियमांनुसार मसाज थेरेपीचा व्यवसाय करण्यासाठी कुठल्याही परवान्याची आवश्यकता नाही. किंवा काही औपचारिक प्रशिक्षण असावे अशी देखील कुठली अट नाही. त्यामुळे ज्या व्यक्तीला वाटेल तो स्वतःला थेरेपिस्ट म्हणवून घेऊ शकतो. ही पदवी देखील संरक्षित नाही. एका सरकारी कार्यालयाद्वारे मसाजर किंवा मसाज थेरेपिस्टची नोंद केली जाते. पण ही नोंद स्वयंस्फूर्तीने करावी असं सांगण्यात आलेलं आहे. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की नोंदणीचे प्रमाण अत्यल्प आहे.
जर एखाद्या व्यापारी संकुलात मसाजचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर नगर परिषद किंवा त्या स्तरावरील इतर संस्थांनी नियमावली घालून दिली आहे आणि जर या ठिकाणी काही गैरप्रकार आढळल्यास किंवा असुरक्षित वाटल्यास लायसन्स रद्द करण्यात येते. पण ज्याप्रमाणे आरोग्य व्यवस्थेतील इतर व्यावसायिकांची नोंदणी होते जसं की फिजियोथेरपिस्ट, त्याप्रमाणे मसाज करण्यांची सुद्धा नोंदणी व्हावा असा एक सूर सामान्य जनतेतून येत आहे.
मसाज इंडस्ट्रीशी निगडित असलेल्या लोकांकडून बलात्कार किंवा लैंगिक अत्याचार झाल्याच्या अनेक घटना गेल्या सहा वर्षांत घडल्याचे बीबीसीला तपासातून समजले आहे. धक्कादायक बाब ही आहे की, मसाज करताना केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेत अटक झाल्यानंतर देखील बाहेर परतल्यावर या लोकांनी याच प्रकारचा गुन्हा पुन्हा पुन्हा केल्याचे समोर आले आहे.
यास सांगते की या घटनेचा खोलवर परिणाम तिच्या मनावर झाला आहे. मला कित्येक दिवस झोप आली नाही. कारण याच गोष्टी माझ्या स्वप्नात येतील अशी भीती मला होती. त्यामुळे मी झोपत देखील नव्हते. मला पॅनिक अॅटक देखील आले. आणि यामुळे मी माझ्यावरील विश्वास गमावू लागले होते. कारण या व्यक्तीला मी माझ्या घरी येण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे मला असं वाटत होतं की यापुढे मी कुणावर विश्वास ठेवू शकेल की नाही.

वेलनेस अॅप्स मोठ्या प्रमाणावर निघाली आहेत त्यामुळे घरबसल्या मसाजसाठी बुकिंग करणं अतिशय सोपं झालं आहे. अर्बन या नावाच्या अॅपवर ग्राहकांना प्रशिक्षित मसाजिस्ट बुक करता येतात.
टेलरने (नाव बदललं आहे) अॅपच्या माध्यमातून बुकिंग करतेवेळी नेहमी महिला मसाजरकडून मसाज करून घेणं पसंत केलं आहे. पण ऑक्टोबर 2019 मध्ये जेव्हा तिला डीप टिश्यू मसाज करायचा होता तेव्हा संबंधित अॅपवर महिला मसाजर उपलब्ध नव्हती. त्याऐवजी शेकडो चांगले रिव्ह्यू असलेला पुरुष मसाजर उपलब्ध होता. काहींना त्याच्या कामाला फाईव्हस्टार रेटिंग दिलं होतं.
मला असं वाटलं इतक्या लोकांनी या माणसाच्या कामाला चांगलं रेटिंग दिलं आहे. हा माझं मसाजचं कामही चांगल्या प्रकारे करू शकेल. म्हणून टेलरने त्या मसाजरची वेळ बुक केली. दिलेल्या वेळी तो मसाजर आला. पण थोड्या वेळातच टेलरला सगळं नीट नसल्यासारखं वाटू लागलं.
जेव्हा अतिशय निष्णात मसाजर मसाज करतो तेव्हा शरीराचा कोणताही भाग उघडा पडलाय असं होत नाही पण या माणसाने माझ्या कमरेखालच्या शरीरावरचा टॉवेल काढून टाकला.
त्यानंतर त्याने माझ्या परवानगीविना जननेंद्रियांना स्पर्श करायला सुरुवात केली. त्यानंतर त्याने माझ्यावर अत्याचार केला. मी थिजून गेले. मी काही प्रतिकार केला तर तो आणखी काय करेल या विचाराने मी घाबरले. मी त्याला हे सगळं करण्यापासून रोखलं तेव्हा त्याने माझं ऐकलं नाही.
रडता रडता कोसळले
तो घरातून बाहेर पडला आणि मी रडता रडता कोसळले. मी घर आतून बंद केलं आणि स्वत:ला कोंडलं. टेलरने घडलेला प्रसंग अर्बन अॅप कंपनीला आणि पोलिसांना सांगितला. पुरेशा पुराव्याअभावी पोलिसांनी नंतर याप्रकरणाचा तपास बंद केला.
या मसाजरला तातडीने सेवेतून काढलं जाईल असं अर्बन अॅप कंपनीतर्फे सांगण्यात आलं. पण दोन आठवड्यानंतर त्याचं अॅपवरचं प्रोफाईल अॅक्टिव्ह होतं असं टेलरच्या लक्षात आलं.

टेक्निकल ग्लिचमुळे त्याचं प्रोफाईल अॅक्टिव्ह दिसतं आहे, तांत्रिक अडचण दूर झाली की त्याचं नाव दिसणार आहे असं टेलरला सांगण्यात आलं पण बीबीसीने याची पडताळणी केली तेव्हा त्या मसाजरचं प्रोफाईल तीन वर्षांनंतरही अॅक्टिव्ह असल्याचं दिसून आलं.
बीबीसीने अर्बन अॅप कंपनीशी यासंदर्भात विचारलं. त्या मसाजरचं प्रोफाईल पूर्णत: काढून टाकण्यात आलं आहे असं कंपनीने सांगितलं.
त्याचं प्रोफाईल दिसू शकतं पण ग्राहक त्याची वेळ बुक करू शकणार नाहीत. टेलर यांनी केलेल्या तक्रारीनंतर प्रोफाईलची सेवा ग्राहकांसाठी खंडित करण्यात आली आहे.
अॅपच्या माध्यमातून बुकिंग मिळालेल्या कॉस्मिन तुटोअच या अर्बन कंपनीच्या मसाजरने एका महिलेवर बलात्कार केला. त्याला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली.
मसाजर म्हणून काम करायचं असेल तर अतिशय काटेकोर शहानिशा प्रक्रियेला सामोरं जावं लागेल असं अर्बन अॅप कंपनीने स्पष्ट केलं. 2019मध्ये डीबीएस चेक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. अगदी मर्यादित बुकिंग्जसंदर्भात तक्रारी येतात असं कंपनीने सांगितलं. प्रत्येक तक्रार अतिशय गांभीर्याने घेतली जाते आणि त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात येते असंही कंपनीने स्पष्ट केलं.
सध्याच्या नियमांमुळे कोणीही अगदी कुणीही कुठल्याही पडताळणीविना मसाजर म्हणून काम सुरू करू शकतो किंवा शकते असं जनरल काऊंसिल फॉर मसाज थेरपीज या व्यावसायिक प्रतिनिधींचे असे युव्होन ब्लेक यांनी सांगितलं.
लैंगिक अत्याचारासंदर्भातील केसमध्ये ब्लेक तज्ज्ञ साक्षीदार म्हणून काम करतात. कोणीही क्वालिफिकेशन लिहू शकतं. माहितीची सत्यासत्यता तपासण्याची व्यवस्था असायला हवी असं त्यांना वाटतं.
या उद्योगाच्या नियमावलीसंदर्भात आम्ही आरोग्य आणि उद्योग या खात्यांमध्ये कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांना आम्ही गाठलं. पण जबाबदारी नेमकी कुणाची यावरून संभ्रम असल्याचं आम्हाला आढळलं.
सरकारी प्रवक्त्याने बीबीसीशी बोलताना सांगितलं की, लैंगिक शोषणाच्या घटना भीषण स्वरुपाच्या असतात. यासंदर्भात मदत पुरवणाऱ्या, पाठिंबा देणाऱ्या उपक्रमांमध्ये पीडितांनी सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं. मसाजच्या नावावर लैंगिक शोषण करणाऱ्या मसाजरविरोधात पोलीस कारवाई करतीलच पण एखादं मसाज केंद्र असुरक्षित असेल तर त्या केंद्राला देण्यात आलेली परवानगी रद्द करावी.
महिला आणि समानतेसंदर्भातील समितीच्या प्रमुख कंझर्व्हेटिव्ह खासदार कॅरोलिन नोक्स यांनी मसाजच्या नावावार लैंगिक शोषण प्रकरणांमध्ये कठोर कारवाई करण्यात यावी असं म्हटलं आहे. मसाज करायचा असल्याने कपडे अंगावर नाहीत अशा अवघडलेल्या स्थितीत लोक मसाजरला मिळतात. तुम्ही विकृत असाल तर अशा अवस्थेतला माणूस सापडणं माकडाच्या हाती कोलीत सापडल्यासारखं आहे. सरकारने या विषयाचं गांभीर्य समजून घेऊन यावर कार्यवाही करावी.
मसाज उद्योगाची नियमावली तसंच पडताळणीसंदर्भात काटेकोर नियमन झाल्यास आम्ही त्याचं स्वागतच करू असं अर्बन अॅप कंपनीने म्हटलं आहे.
माझ्यासाठी या कटू आठवणीतून बाहेर पडणं अत्यंत कठीण आहे असं टेलरने सांगितलं. या प्रसंगाने मला बदलवलं. या नकोशा प्रसंगाचा बोजा माझ्या डोक्यावर राहील. माझ्या खांद्यावरून ते बोचणारे क्षण कधीच उतरणार नाहीत असं टेलरने सांगितलं.
हे वाचलंत मला?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








