योग, सेक्स, धोका; एका योगसंस्थेचं गूढ

इशलीन कौर
फोटो कॅप्शन, इशलीन कौर
    • Author, इशलीन कौर
    • Role, बीबीसी लंडन

(सूचना - या लेखामध्ये लैंगिक शोषणाबाबत वर्णन आहे.)

जगातील सर्वात मोठ्या योग संस्थांपैकी एक असलेल्य "शिवानंद" या संस्थेशी मी योग शिक्षिका म्हणून संलग्न होते. पण सोशल मीडियावरची एक पोस्ट वाचल्यानंतर मी संस्थेपासून दुरावा घेतला. या पोस्टमधून संस्थेत अनेक दशकांपासून सुरू असलेल्या लैंगिक शोषणाचे अनेक आरोप समोर आले होते.

वयाच्या विशीमध्ये असताना मी योगासनं करू लागले. त्यानंतर तो माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला. अनेक समर्पित योगींप्रमाणे माझ्यासाठी तो केवळ व्यायाम नव्हे तर जीवन जगण्याची पद्धत बनली.

मी स्थानिक शिवानंद सेंटरमध्ये केवळ योगासनंच शिकले असं नाही, तर मी त्याठिकाणी स्वेच्छेनं स्वयंपाक करणं, स्वच्छता करणं अशी कामंही केली. शिवानंद यांच्या विचारांनी मी प्रभावित झाले होते.

पण नोव्हेंबर 2019 च्या डिसेंबर महिन्यात माझ्या फोनवर एक नोटिफिकेशन आलं. शिवानंद फेसबुक ग्रुपमध्ये आलेली ती नोटिफिकेशन संस्थापक स्वर्गवासी स्वामी विष्णुदेवानंद यांच्याबाबतच्या पोस्टची होती.

अनेक दशकांनंतर धीर एकवटून व्यवस्थापकीय मंडळाला सांगितलं, पण याबाबतच्या प्रतिक्रिया गप्प बसून सुरू झाल्या, आणि मला गप्प बसवण्यापर्यंतच त्या मर्यादीत राहिल्या, असं त्या पोस्टमध्ये लिहिलं होतं.

वरिष्ठ शिवानंद शिक्षकांवर गैरवर्तनाचा आरोप करणाऱ्या सर्व 14 महिलांची मुलाखत मी घेतली. यापैकी अनेक महिलांनी याबाबत कुटुंबाला किंवा मित्रांनाही काहीच सांगितलेलं नव्हतं.

केवळ एकीनं सर्वांसमोर माहिती सांगितलेली. मी एका कर्मचाऱ्याशीही बोलले, पण त्यानं याबाबत चिंता व्यक्त करूनही त्याची दखल घेतली नसल्याचं ती म्हणाली.

एकेकाळी मला अत्यंत प्रिय असलेल्या या संघटनेतील सत्ता आणि अधिकारांच्या दुरुपयोगाबाबत करण्यात आलेले दावे खरे असल्याचं, माझ्या चौकशीमध्ये समोर आलं.

शिवानंद योग काय आहे ?

शिवानंद ही शास्त्रीय योगासनांची एक पद्धत आहे. त्यात शारीरिक आणि अध्यात्मिक आरोग्य दोन्हींवर भर देण्यात आला आहे.

स्वामी विष्णुदेवानंद यांनी 1959 मध्ये कॅनडाच्या माँट्रियलमध्ये याची स्थापना केली आणि त्याचं नाव गुरू स्वामी शिवानंद यांच्या नावावर ठेवलं.

जगभरातील 35 देशांमध्ये जवळपास 60 शिवानंद आश्रम आणि केंद्र आहेत. तसंच प्रशिक्षित शिवानंद शिक्षकांची संख्या जवळपास 50,000 आहे.

मी 2014 मध्ये भारतातील केरळमध्ये असलेल्या शिवानंद आश्रमात योग शिक्षिका म्हणून प्रशिक्षण घेतलं होतं. मला आश्रमातील पहिला दिवस आजही चांगला आठवतो.

भिंतीवर शिवानंदचे संस्थापक स्वर्गीय स्वामी विष्णुदेवानंद यांचा एक सुंदर फोटो सजवलेला होता.

केरळच्या शिवानंद आश्रमात इशलीन

फोटो स्रोत, ISHLEEN KAUR

फोटो कॅप्शन, केरळच्या शिवानंद आश्रमात इशलीन

त्यांच्या विचारांचा शिष्यांवर एवढा प्रभाव होता की, अनेक योगींनी सर्व संसारिक बंधनांचा त्याग करून जीवन संघटनेसाठी समर्पित केलं होतं.

त्याचं कारण मी समजू शकते? मी तेव्हा जीवनातील अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करत होते. शिवानंदमुळं मला एकप्रकारची शांतता मिळाली. आसनांमुळं किंवा योगमुद्रांमुळं शारीरिक बळ मिळालं आणि शिवानंद यांच्या कर्म, सकारात्मक विचार आणि ध्यानाबाबतच्या तत्वांनी मला आत्मिक समाधान मिळालं.

2015 मध्ये मी लंडनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीशी विवाह केला. त्यांच्याबरोबर लंडनमध्ये राहण्याच्या भीतीनं मी घाबरत होते. पण तिथं पुटने याठिकाणी शिवानंद सेंटर असल्याचं समजलं आणि माझी भीती पळाली. हे सेंटर आमच्या नव्या घरापासून फार लांबही नव्हतं.

माझ्या पती नेहमी गमतीत म्हणायचे की, त्यांच्यापेक्षा शिवानंदवर माझं अधिक प्रेम आहे.

ज्युली साल्टर यांच्या फेसबूक पोस्टनंतर दोन महिन्यांनी शिवानंद बोर्डाचे दोन सदस्य युरोपच्या पुटनेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी बोलायला आले. त्यावेळी मला आशा होती की, ते माझ्या मनात सुरू असलेल्या अनेक प्रश्नांपैकी किमान काही प्रश्नांची उत्तर नक्कीच देतील. पण त्यांचं उत्तर अस्पष्ट होतं. तसंच उत्तरं देताना त्यांचा बचावात्मक पवित्रा दिसून आला.

यासाठी मी स्वतःच ज्युली यांच्याशी बोलायला हवं हेही मला माहिती होतं.

मूळच्या न्यूझीलंडच्या असलेल्या ज्युली त्यावेळी केवळ 20 वर्षांच्या होत्या. त्या इस्रायलला गेलेल्या असताना सर्वप्रथम शिवानंदबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनीही हा मार्ग स्वीकारला. 1978 मध्ये त्या कॅनडामध्ये असलेल्या शिवानंदच्या मुख्यालयात पोहोचल्या.

विष्णुदेवानंद तिथंच राहत होते. ज्युली यांना त्यांची खासगी सचिव बनण्यास सांगण्यात आलं. सुरुवातीला तर ज्युली यांना हा विशेषाधिकार वाटला.

पण त्यांचा दिनक्रम अत्यंत कठीण असल्याचं त्या म्हणाल्या. ज्युली यांना पहाटे 5 पासून जवळपास मध्यरात्रीपर्यंत आठवड्याचे सातही दिवस काम करावं लागायचं. तेही कोणत्याही वेतनाशिवाय. स्वामी विष्णुदेवानंद यांचा स्वभाव अंदाज लावता येणार नाही असा झाला होता. ते नेहमी माझ्यावर ओरडायचे, असं ज्युली म्हणाल्या.

माझी सहनशक्ती संपत चालली होती, असं ज्युली यांनी सांगितलं.

त्यानंतरच्या घटना या अत्यंत निराशाजनक होत्या.

एक दिवस ज्युली विष्णुदेवानंद यांच्या घरी काम करत होत्या. त्यावेळी ते आडवं पडून भक्तीसंगीत ऐकत होते. विष्णुदेवानंद यांनी ज्युली यांना शेजारी झोपायला सांगितलं. पण ज्युली यांनी ते नेमके काय म्हणत आहेत ते कळलं नाही असं म्हटलं. त्यावर विष्णुदेवानंद म्हणाले, हा "तंत्र योग" आहे. अध्यात्मिक सेक्सशी संबंधित हा योगाभ्यास आहे. त्याचा अर्थ विश्रांतीच्या माध्यमातून अध्यात्मिक ज्ञानाकडं प्रवास करणं असा असल्याचं ते म्हणाले.

विष्णूदेवानंद यांनी प्रवचनादरम्यान बोलताना याचा उल्लेख केला होता, असं ज्युली म्हणाल्या.

"मी म्हटलं की, मला कळलं नाही पण शरीर आणि मन दोन्हीचा नकार असतानाही मी आडवे पडले. मग आमच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले.

त्यानंतर मी पुन्हा काम करू लागले. मला अत्यंत लाज वाटत होती. तसंच वेदना, पश्चात्ताप आणि अपराधिक भावनाही होतीच. "

ज्युली यांच्याबरोबर तीन वर्षांपेक्षा अधिक काळ विविध प्रकारच्या लैंगिक गोष्टी करण्यात आला. त्यात थेट सेक्सचाही समावेश होता, असं त्या म्हणाल्या.

गुरू-शिष्य यांच्यातील संबंधांना योगमध्ये गुरू-शिष्य परंपरा म्हणून ओळखलं जातं.

हा एक प्रकारचा अलिखित करार असतो. त्याचा अर्थ गुरूच्या इच्छेप्रति पूर्ण समर्पण असणं असा असतो.

केरळच्या आश्रमात व्यासपीठावर इशलीन

फोटो स्रोत, ISHLEEN KAUR

फोटो कॅप्शन, केरळच्या आश्रमात व्यासपीठावर इशलीन

विष्णुदेवानंद यांनी ज्युली यांच्याबरोबर जे केलं त्याला त्या आता, 'बलात्कार' म्हणतात. त्याचं कारण म्हणजे विष्णुदेवानंद यांची सत्ता आणि त्यांच्या वलयासमोर त्यांची सहमती किंवा असहमती याला काहीही अर्थ नव्हता.

"मी इतरांपेक्षा फार वेगळी होते. कुटुंबापासून दूर दुसऱ्या टोकाला राहत होते. आर्थिक बाबींसाठीही संघटनेवर अवलंबून होते. "

इतर महिलांनीही आवाज उठवला

त्यानंतर ज्युली यांच्या फेसबूक पोस्टवर काही मिनिटांमध्ये प्रतिक्रिया देणाऱ्यांशी मी बोलले. विष्णुदेवानंद यांनी त्यांचंही शोषण केलं असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

पामेला यांनी मला सांगितलं की, 1978 मध्य लंडनच्या विंडसर कॅसलमध्ये एका रिट्रीट दरम्यान विष्णुदेवानंद यांनी तिच्यावर बलात्कार केला होता.

त्या त्यावेळी शवासनात होत्या.

आणखी एक महिला ल्युसिलनं, विष्णुदेवानंद यांनी 70 च्या दशकात कॅनडाच्या आश्रमात त्यांच्यावर तीन वेळा बलात्कार केल्याचं सांगितलं. आधी दोन वेळा तंत्र योग म्हणून मी ते मान्य केलं, पण तिसऱ्या वेळी त्यानं मला पैसे दिले तेव्हा मला, ''वेश्येसारखं'' वाटलं असं त्या म्हणाल्या.

विष्णुदेवानंद यांचा मृत्यू 1993 मध्ये झाला. पण ज्युली यांना संघटना सोडण्याचं धैर्य एकवटण्यासाठी आणखी 6 वर्षे लागली.

आपल्यावर ओढवलेला प्रसंग सर्वांसमोर मांडल्यामुळेच, आपण सहन केलेल्या वेदनांपासून इतरांना वाचवता येऊ शकेल, एवढी एकच आशा त्यांना आहे. कारण विष्णुदेवानंद यांचा मृत्यू झाला तरी त्यांच्या भक्तांचं लैंगिक शोषण संपलं नव्हतं हे ज्युली यांच्या लक्षात आलं. त्यामुळं ज्युली यांच्या फेसबुक पोस्टनं सगळ्या अडचणींचा पेटाराच खोलला गेला.

11 महिलांनी मांडली आपबिती

मी बोललेल्या 11 महिलांनी शिवानंदच्या शिक्षकांवरही गंभीर आरोप केले आहेत. बीबीसीच्या मते, यापैकी एक व्यक्ती अजूनही संघटनेत सक्रिय आहे.

यापैकी एक असलेल्या मेरी (नाव बदललेलं) यांनीही एक धक्कादायक आरोप केला आहे. मेरी म्हणाल्या की, एका शिक्षकानं त्यांना अनेक वर्ष प्रोत्साहन दिलं. (या व्यक्तीचं नाव कायदेशीर बाबीमुळं देता येत नाही) त्यांचं नातं जेव्हा शारीरिक संबंधांपर्यंत पोहोचलं तेव्हा मेरी प्रचंड संभ्रमात होत्या. पण याशिवाय दुसरा पर्याय नाही, असं त्यांना वाटलं होतं.

वर्षभरापेक्षा जास्त काळ त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध नव्हते. पण त्यानंतर एक दिवस तो व्यक्ती अचानक गुपचूप मेरी यांच्या खोलीत आला. त्यानं मेरी यांच्याबरोबर सेक्स केला आणि एकही शब्द न बोलता निघून गेला.

इतरही पाच महिलांनी याच व्यक्तीनं त्यांचं शोषण केलं असं सांगितलं. या महिला एकमेकिंना ओळखत नाही. पण त्यांच्याबरोबर घडलेल्या घटना अगदी सारख्या आहेत. पद्धतही सारखीच आहे. म्हणजे आधी प्रोत्साहित करणं आणि नंतर शोषण करणं.

17 व्या वर्षी लैंगिक शोषण

'कॅथरीन' (नाव बदललेलं) 80 च्या दशकात कॅनडामध्ये शिवानंद यांच्या मुलांच्या शिबिरात सहभागी झाली होती. त्यावेळी ती केवळ 12 वर्षांची होती. त्यावेळी एका शिक्षकाला तिच्याबाबत लैंगिक आकर्षण निर्माण झालं. तो शिक्षक तिला मालिश करायचा, त्यादरम्यान तो तिच्या हिप्सला (पार्श्वभागाला) देखिल स्पर्श करायचा, असं कॅथरीननं सांगितलं.

ती 15 वर्षांची झाली तेव्हा, त्यानं तिला स्पर्श करणं वाढवलं. तो तिच्या पायांच्या मध्ये हात घुसवायचा आणि तिचे स्तनही पकडायचा

ती 17 वर्षांची असतानं त्यानं तिचं शेवटंच लैंगिक शोषण केलं होतं, असं कॅथरीननं सांगितलं. ती त्यावेळी झोपली होती. झोपेतून उठली तेव्हा तो तिच्यावर होता. या घटनेनंतर कॅथरीननं आश्रमच सोडला.

जूली साल्टर

फोटो स्रोत, JULIE SALTER

फोटो कॅप्शन, जूली साल्टर

तक्रार करणाऱ्या दुसऱ्या एका महिलेनं नुकतंच 2019 मध्ये त्याच व्यक्तीनं त्यांचं लैंगिक शोषण केल्याचं सांगितलं.

आम्ही त्या व्यक्तीशीदेखील संपर्क साधला. त्या व्यक्तीला आरोपांवर स्पष्टीकरण देण्याची संधी दिली. पण त्या व्यक्तीनं काहीही उत्तर दिलं नाही. बीबीसीच्या मते, ही व्यक्ती अजूनही शिवानंदमध्ये सक्रिय आहे. मात्र संघटनेनं याला नकार दिला आहे.

आणखी एका शिक्षकावर शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. त्याचं खरं नाव मॉरिफोजी फिनोची असं आहे. त्यांना स्वामी महादेवानंद नावानं ओळखलं जातं. मी बोललेल्या 8 महिलांनी त्यांच्यावर आरोप केले आहेत.

वेंडी यादेखील यापैकीच एक आहेत. त्या 2006 मध्ये कॅनडाच्या मुख्यालयात महादेवानंद यांची स्वीय सहाय्यक होती.

ईमेलची प्रिंट काढून त्यांच्या केबिनमध्ये न्यायची हेही त्यांचं एक काम होतं. एके दिवशी महादेवानंद यांनी ई मेल आणि नाश्ता आणण्यासाठी वेंडीला बेडरूममध्ये बोलावलं. तिथं ते बेडवर होते.

वेंडी सांगतात की, त्यांनी ट्रे देताच तिचा हात पकडला आणि अंगावरची चादर काढली. चादरीखाली ते हस्तमैथुन करत होते. त्यानंतर महादेवानंद यांनी त्यांच्या हातावरच वीर्य स्खलन केलं.

"मला जाणिव झाली की.. त्यांच्यासाठी मी मानवच नव्हते. ही घटना शिवानंद आणि माझ्यामध्ये असलेल्या नात्याचा शेवट करणारी होती."

महिलांनी जर त्यांच्या अशा काही तक्रारी आश्रमातील वरिष्ठांना सांगितल्या तर ते त्याला अध्यात्मिक शिक्षण आणि "गुरू ची कृपा" या नावाखाली समजवून सांगतात, असं वेंडी म्हणाल्या.

"जर एखादी समस्या किंवा संभ्रमाची स्थिती असेल, तर समजून जायचं की हे खरं नसून ती समस्या म्हणजे प्रत्यक्षात 'गुरू ची कृपा' आहे. मी हे लैंगिक संबंध आणि संशयाबाबत तर म्हणतच आहे पण सोबतच, प्रशासकीय बाबींबाबतही सांगत आहे."

"तसंच तुम्हाला एक अत्यंत मौल्यवान शिकवण दिली जात आहे."

आम्ही आरोपांची उत्तरं देता यावी म्हणून महादेवानंद यांच्याशी संपर्क केला, पण त्यांच्याकडून काहीही उत्तरं मिळाली नाही.

मात्र, बीबीसीनं एका वकिलाला पाठवलेल्या ईमेलची कॉपी पाहिली असून, त्यात त्यांनी कृत्यांबाबत माफी मागितली असून, पुन्हा असं न करण्याचं आश्वासन दिलं आहे.

'सत्य' हा प्रोजेक्ट शिवानंद समुदायानं फेसबूक च्या माध्यमातून क्राऊडफंड केला आहे, त्याची मीही सदस्य आहे.

मला आणखी एका गोष्टीबाबत माहिती घ्यायची होती. ती म्हणजे शिवानंदच्या व्यवस्थापनाला या सर्वाबाबत किती माहिती होती?

ज्युली यांनी मला सांगितलं की, 2003 मध्ये त्यांनी मोठ्या धीरानं त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचारांची तक्रार केली. त्यांच्या संस्थेच्या कार्यकारी सदस्य मंडळ (ईबीएम) च्या एका सदस्याची भेटही घेतली.

ईबीएमची स्थापना विष्णुदेवानंद यांनी केली होती. त्यांच्या मृत्यूनंतर शिवानंदचं कामकाज व्यवस्थित सांभाळलं जावं यासाठी ही स्थापना करण्यात आली होती. ज्युली यांनी सांगितलं की, ज्या सदस्यांना त्या भेटल्या होत्या, ते होते स्वामी महादेवानंद.

"आम्ही थोड्या वेळासाठीच भेटलो, पण त्यांना याबाबत अनेक वर्षांपासून माहिती होती, हे त्यांनी स्वीकारलं होतं."

स्वामी महादेवानंद हेदेखील लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्यांपैकी एक होते. पण ज्युली यांना तेव्हा याबाबत माहिती नव्हती.

त्यानंतर काही आठवड्यांत ज्युली यांनी मंडळातील इतर चार सदस्यांनाही आरोपाबाबत सांगितलं होतं.

मात्र विश्वस्त मंडळानं 2003 मध्ये त्यांनी या आरोपांबाबत चर्चा केल्याचंच मान्य केलेलं नाही. तसं असलं तरी बीबीसीनं महादेवानंद यांचा एक ईमेल पाहिला आहे. त्यात त्यांनी ज्युली यांना भेटल्याचं मान्य केलं. महादेवानंद यांनी ही अनौपचारिक भेट असल्याचं म्हटलं. पण त्यानंतर आरोप सर्वांसमोर आल्याचंही म्हटलं होतं.

2006 मध्ये ज्युली यांनी एका मध्यस्थाच्या मदतीनं ईबीएमबरोबर एका बैठकीत चर्चा केली. या बैठकीत ज्युली यांना आर्थिक मदत देण्याबाबत चर्चा झाली. तसंच शोषणाचे आरोपही करण्यात आले.

विश्वस्त मंडळानं बीबीसीला याबाबत माहिती दिली. दोन्ही बाजू त्यावेळी चर्चेनंतर समाधानी होत्या. पण ज्युली यांचं म्हणणं आहे की, काहीही ठरलं नव्हतं. त्यानंतर दुसऱ्याच वर्षी ज्युलीच्या वकिलांनी पत्र लिहित नुकसान भरपाईची मागणी करत, दावा करण्याची धमकी दिली.

त्याच्या उत्तरात ईबीएमच्या वकिलांनी एक पत्र पाठवलं. त्यात ज्युली यांचं प्रकरण एवढ्या दिवसांनी का समोर आलं असा प्रश्न त्यात उपस्थित करण्यात आला.

अशा प्रकारच्या आरोपांबाबत मोकळेपणानं बोलण्यासाठी वातावरण मिळावं, यासाठी बैठकीतील सदस्य आणि उपस्थितांसाठी प्रोटोकॉल लागू करण्यास सुरुवात झाल्याचं शिवानंदतर्फे सांगण्यात आलं.

मात्र ज्यानं शोषण केलं आहे, त्याचाच आदर एखादी व्यक्ती कसा करणार, असा प्रश्न आम्ही उपस्थित केला. त्यावर त्यांनी, "शिवानंद संस्थेत वारसा आणि शिकवणींचा आदर केला जातो," असं उत्तर मिळालं.

महादेवानंदांबद्दल बोलायचं झाल्यास, बोर्डाला त्यांच्या तथाकथिक लैंगिक वर्तनाबाबत 1999 पासून माहिती होती. कारण त्यांनी ते मान्य केलं होतं, याचे पुरावे आमच्या चौकशीत मिळाले आहेत.

त्यावेळी ईबीएममधील एक अमेरिकन महिला स्वामी शारदानंद यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, 1998/99 मध्ये त्यांना दिल्ली आश्रमाच्या संचालिकांनी रडत रडत फोन केला. महादेवानंद धोतराविनाच फिरत होते, असं त्यांनी सांगितलं. शारदानंद यांना त्याचा अर्थ अंडरवेअरमध्ये फिरत होते, असं वाटला.

पण शारदानंद यांनी महादेवानंद यांना फोन केला तेव्हा त्यांनी हे खरं नाही असं सांगितलं. ते अंडरवेअरमध्ये नव्हे तर नग्न फिरत होते, असं त्यांनी सांगितलं. हे काही त्यांचं एकमेव रहस्य नव्हतं.

"त्यांनी मला सांगितलं की, त्यांनी कमरेखाली काहीही परिधान केलेलं नव्हतं. संचालिका काम करत असलेल्या ठिकाणी ते गेले आणि... त्यांच्या समोरच त्यांनी हस्तमैथुन केलं."

स्वामी शारदानंद यांना हा मुद्दा अत्यंत गंभीर वाटला. त्यांनी पुढच्या ईबीएम बैठकीत तो उपस्थित केला.

बैठकीत रेकॉर्डींगची सर्व उपकरणं बंद केली आणि सचिवांना बाहेर पाठवण्यात आलं होतं, असं त्या म्हणाल्या.

महादेवानंद तिथं उपस्थित होते आणि त्यांनी हे सर्व खरं असल्याचा दुजोरा दिला.

"त्यानंतर महादेवानंद म्हणाले : 'जर त्यांना मी असं पुन्हा करू नये असं वाटत असेल, तर ठिक आहे मी पुन्हा तसं करणार नाही."

शारदानंद यांनी बैठकीत म्हटलं की, आता महादेवानंद यांनी आरोप मान्य केले आहेत, तर आता यावर काय कारवाई करणार. त्यावर बोर्डाच्या एका सदस्यानं म्हटलं, "त्यांनी आता पुन्हा असं करणार नाही असं मान्य केलं आहे. तुम्हाला अजून काय हवं आहे. त्यांचा खून करायचा का?"

काही महिन्यांनी शारदानंद यांना एक फॅक्स मिळाला, त्यात त्यांची बोर्डातून हकालपट्टी करण्यात आल्याचा उल्लेख होता. आम्ही ईबीएमवर हा आरोप केला पण त्यांनी काहीही उत्तर दिलं नाही.

शारदानंद यांनी उकललेलं गूढ कदाचित 2006 मध्ये वेंडी यांनी जे पाहिलं त्या तुलनेत फार गंभीर नव्हतं. तेव्हा त्यांनी कॅनडाच्या मुख्यालयात असलेल्या एका वरिष्ठ कर्मचाऱ्याला सांगितलं होतं की, महादेवानंद यांनी त्यांच्यावरच स्खलन केलं होतं.

त्यावर त्यांची प्रतिक्रिया होती, "अरे, पुन्हा का? "

कर्मचाऱ्यानं त्यांना सांगितलं की, चिंता करून नका, संस्थाननं स्वामी महादेवानंद यांच्यासाठी समुपदेशनाची व्यवस्था केली आहे.

विष्णुदेवानंद यांच्यासोबत ज्यूली

फोटो स्रोत, JULIE SALTER

फोटो कॅप्शन, विष्णुदेवानंद यांच्यासोबत ज्यूली

वेंडी यांनी मला सांगितलं की, "कॅनडात हा प्रकार लैंगिक शोषणाच्या श्रेणीत असेल हे मला माहिती नव्हतं. हे प्रकरण पोलिसांत नेता येऊ शकते असं मला त्यावेळी वाटलं नव्हतं. "

तेरा वर्षानंतर ईबीएमनं अखेर महादेवानंद यांची चौकशी केली आणि त्यांच्या मासिकात निवृत्तीची घोषणा केली. पण ही निवृत्ती सन्मानजनक होती. नोटीस मध्ये असा उल्लेख करण्यात आला की, कार्यकारी बोर्डानं त्यांच्या "समर्पण आणि प्रेरक सेवेसाठी " आभार मानले.

सत्य प्रोजेक्टसाठी काम करणाऱ्या वकील कॅरल मर्चसिन म्हणाल्या की, त्यांनी 25 ते 30 महिलांशी चर्चा केली आहे. त्यांनी शिवानंदच्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.

त्या सगळ्या विश्वसनीय आहेत, असंही त्या म्हणाल्या.

विश्वस्त मंडळातील सदस्यांना आरोपांबाबत समजलं तेव्हा पोलिसांना माहिती का देण्यात आली नाही, असा प्रश्न कॅथरीन प्रकरणात उपस्थित करण्यात आला. अनेक वर्षांनी कॅथरीन यांच्या आई वडिलांना याबाबत समजलं तेव्हा त्यांनी बोर्डाकडे विषय मांडला. कॅरल म्हणाल्या की, पुराव्याशिवाय काहीही करता येऊ शकत नाही, असं त्यांना सांगण्यात आलं.

ईबीएमनं आम्हाला सांगितलं की, ज्या शिक्षकावर कॅथरीन आणि इतरांच्या शोषणाचे आरोप आहेत, त्यांना चौकशीदरम्यान निलंबित करण्यात आलं आहे. पण बीबीसीला इतर अनेक सुत्रांकडून माहिती मिळाली की, ती व्यक्ती अजूनही शिवानंद आश्रमात काम करत आहे. जेव्हा मी स्वतः केरळच्या आश्रमात फोन केला, तेव्हा मला समजलं की, या व्यक्तीनं या वर्षाच्या सुरुवातीला याठिकाणी शिकवलंही होतं.

आश्रमानं मांडली भूमिका

ईबीएमनं आम्हाला मुलाखत द्यायला नकार दिला. पण त्यांनी आम्हाला त्यांचं म्हणणं पाठवलं. ते पूर्ण आम्ही याठिकाणी देत आहोत.

"समोर आलेल्या सर्वांप्रती विश्वस्त मंडळाला सहानुभुती आहे. जर कुणाला एखाद्याच्या वर्तनाचा त्रास होत असेल तर, त्या व्यक्तीचं शोषण सहन केलं जाणार नाही, याबरोबरच अशा गोष्टींकडं दुर्लक्ष केलं जाणार नाही, असा विश्वासही देण्यात आला. ज्या प्रकारच्या आरोपांबाबत माहिती समोर आली आहे, त्याबाबत भूतकाळात झालेल्या चुकांसाठी मंडळ खेद व्यक्त करत आहे. "

"या आरोपांमुळं शिवानंद संस्थेनं स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे. कायदेतज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी सुरक्षेसंबंधीच्या उपाययोजनांचा आढावा घेतला असून, त्या लागू करण्यासाठी मदत करत योग्य ते प्रशिक्षणही दिलं आहे. शोषणाबाबत तक्रार देण्यासाठी व्यवस्था तयार करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या तक्रारी सोडवण्यास शिवानंद संस्थेचं प्राधान्य आहे. शिवानंद असा आश्रम आहे, जो भौतिक, मानसिक आणि अध्यातमिक आरोग्याप्रती समर्पित आहे. तसंच सदस्यांप्रतिही कटिबद्ध आहे."

असे शिक्षक ज्यांचं आम्ही नाव घेऊ शकत नाही, त्यांच्याबाबत मी चार चौकशी अहवाल पाहिले आहेत. त्या सर्वांच्या निष्कर्षांचा विचार करता सर्व पीडित विश्वसनीय असल्याचं समोर येतं. सर्वांचं म्हणणं खरं असून त्यापैकी दोघींनी ईबीएमला त्यांच्याबरोबर झालेल्या शोषणाबाबत माहिती दिली होती.

एप्रिल महिन्यात मी पुटने आश्रमात गेले होते. गेली पाच वर्ष मी इथं शिक्षिका आणि भक्त म्हणून घालवली होती. पण यावेळी मी आत गेले नाही.

शिवानंदच्या सर्वाना आत्मसात करण्याच्या वृत्तीकडं मीही आकर्षित झाले होते. पण ते एवढं धोकादायक बनू शकतं असा विचारही मी केला नव्हता. ज्या महिलांशी मी बोलले त्या सर्वांचा एकच सूर होता. तो म्हणजे सत्याची भावना हरपणं हे अगदीच सोपं आहे. त्यामुळं नेमकं काय घडत आहे? हा प्रश्न उपस्थित करणंही कठिण झालं आहे.

आमच्या चौकशीत ज्या महिला समोर आल्या त्या सर्व पाश्चिमात्य देशातील आहेत, हे मला माहिती आहे. पण भारतीय महिलाही पीडित आहे असं वाटत आहे. मी महिलांचे ई मेल पाहिले आहेत. त्यात त्यांनी त्यांच्या बरोबर काय घडलं याचं वर्णन केलं आहे. पण माझ्याशी बोलण्याची त्यांना भीती वाटते.

माझ्याबद्दल बोलायचं झाल्यास हा माझ्या आणि शिवानंदमधील नात्याचा अंत आहे.

बीबीसीच्या या विशेष सादरीकरणाच्या निर्मात्या लुईस अदामो आहेत.

या लेखातील पीडितांनी मांडलेली मतं, त्यांचे खासगी अनुभव आहेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)