You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राहुल गांधी प्रकरणी भाजपने काँग्रेसला आयता मुद्दा हातात दिला आहे का?
- Author, सलमान रावी
- Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी
1975 ची ही घटना आहे. इलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जगमोहन लाल सिन्हा यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अपात्र ठरवलं होतं आणि त्यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय दिला होता.
हा निर्णय आल्यानंतरच इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला होता अशी चर्चा आजही राजकीय वर्तुळात केली जाते.
सुरत न्यायालयाने राहुल गांधींनी मोदी आडनाव प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर राहुल गांधींची खासदारकी लोकसभा सचिवालयाने रद्द केली आहे.
इंदिरा गांधींचं प्रकरण राहुल गांधींपेक्षा वेगळं होतं. ते निवडणुकीशी संबंधित होतं.
इंदिरा गांधीचे प्रतिस्पर्धी राज नारायण यांनी त्यांच्या याचिकेत निवडणुकीत घोटाळा केल्याचा आरोप लावला होता.
राज नारायण यांच्या याचिकेत आरोप होता की, “इंदिरा गांधीचे पोलिंग एजंट यशपाल कपूर यांनी रायबरेली मध्ये झालेल्या निवडणुकीत घोटाळे केले होते.”
या प्रकरणाची इतकी चर्चा यासाठीही झाली होती कारण इंदिरा गांधींची खासदारकी दोन वेळा रद्द करण्यात आली होती.
इंदिरा गांधींच्या वेळी काय झालं होतं?
एकदा रायबरेली मधून निवडून आल्यावर आणि दुसऱ्यांदा चिकमंगळूर मधून जिंकून आल्यावर. या दोन्ही प्रकरणांची चर्चा यासाठी होत आहे कारण 1977-78 मध्ये इंदिरा गांधींची खासदारकी रद्द झाली होती, त्यानंतर 1980 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांना मोठा विजय मिळाला होता.
ज्येष्ठ पत्रकार जयशंकर गुप्ता यांनी बीबीसीला सांगितलं की ज्या पद्धतीने इंदिरा गांधीची खासदारकी गेली त्यापेक्षा राहुल गांधीचं प्रकरण एकदम वेगळं आहे. कारण राहुल गांधींच्या प्रकरणात सत्तारुढ भाजप आता दबावाखाली असल्याचं जाणवत आहे.
त्यांच्या मते ज्या पद्धतीने भाजप नेते वक्तव्य करीत आहेत ते बघता हे अगदी स्पष्ट दिसतं की अदानी प्रकरणात सरकारवर दबाव आला आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते ज्या पद्धतीने राहुल गांधींची खासदारकी गेली त्यामुळे ज्या विरोधी पक्षांनी काँग्रेसपासून अंतर ठेवलं होतं, तेही आता काँग्रेसच्या जवळ गेले आहेत.
उदा. तृणमूल काँग्रेस, भारत राष्ट्र समिती, जनता दल (युनायटेड) आणि समाजवादी पक्षाने संसदेत सुरू असलेल्या आंदोलनात अदानीच्या प्रश्नावर एकजूट दाखवली होती. मात्र तेव्हा राहुल गांधी संसदेत बोलायला उभे राहिले तेव्हा याच पक्षांनी काँग्रेसपासून अंतर राखणं पसंत केलं.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक झाल्यानंतर काँग्रेसनेही आम आदमी पक्षाच्या विरोधात दिल्लीच्या रस्त्यांवर पोस्टरबाजी केली होती.
वाढता पाठिंबा
मात्र राहुल गांधींची खासदारकी गेल्यानंतर जे लोक राहुल गांधीवर टीका करतात त्यांनीही राहुल गांधींना पाठिंबा दिला.
सोमवारी आम आदमी पार्टीनेही काँग्रेसला पाठिंबा दिला.
राहुल गांधी काँग्रेस कार्यालयात झालेल्या एका पत्रकार परिषदेत म्हणाले की माफी मागायला ते काही सावरकर नाही. हे शिवसेनेला अजिबात रुचलं नाही.
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधीच्या वक्तव्याचा निषेध केला आणि त्यांनी सल्ला दिला की त्यांनी कोणाच्याही प्रभावाखाली येऊ नये. तसंच अशा प्रकारची वक्तव्यं करू नये कारण ते सावरकरांना आपला आदर्श मानतात.
असं असलं तरी उद्धव ठाकरे गटाने राहुल गांधींना पाठिंबा दिला.
जयशंकर गुप्ता म्हणतात की राहुल गांधींची खासदारकी संपल्याने इतर पक्षही विचार करायला प्रवृत्त झाले आहेत.
ते म्हणतात, “आधी विरोधी पक्षांची वेगवेगळी भूमिका होती. मात्र राहुल गांधींच्या प्रकरणानंतर त्यांना वाटलं की हे कोणाबरोबरही होऊ शकतं. एका सत्र न्यायालयाने एका प्रकरणात राहुल गांधींना दोषी ठरवलं. त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्याच कोर्टाने अपील करण्यासाठी एक महिन्याची मुदतही दिली. मात्र दुसऱ्याच दिवशी राहुल गांधीची खासदारकी गेली. त्यामुळे कधीही काहीही होऊ शकतं याची खात्री विरोधकांना झाली आहे.”
राहुल गांधी यांनी संसदेत बोलण्याच्या मागणीवर जनता दल (युनायटेड) ने स्वत:वेगळं ठेवलं होतं.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार काहीही मोकळेपणाने बोलत नव्हते. मात्र सोमवारी जनता दलचे (U) राज्यसभेचे खासदार अनिल हेगडेसुद्धा काँग्रेस नेत्यांनी बोलावलं म्हणून विरोध प्रदर्शित करण्यासाठीच्या बैठकीत सहभागी झाले.
या बैठकीत सोनिया गांधी, पक्षाध्यक्ष मलिक्कार्जुन खरगे यांच्याबरोबर सर्व सदस्यांनी काळे कपडे परिधान केले होते.
आधी टीका आणि आता पाठिंबा
आतापर्यंत ज्या विरोधी पक्ष नेत्यांनी या प्रकरणापासून स्वत:ला दूर ठेवलं आहे त्यात मायावती, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी आणि नवीन पटनायक सामील आहेत.
जनता दल (युनायटेड) चे राष्ट्रीय सचिव नीरज यांनी बीबीसीशी बोलताना स्पष्ट केलं की राहुल गांधी प्रकरणाने विरोधी पक्षात प्राण फुंकले आहेत.
ते म्हणतात, “भारतीय जनता पक्ष लोकशाही संस्थांची गळचेपी करतेय म्हणून विरोधी पक्षाचे लोक काँग्रेसबरोबर एकत्र आले आहेत.”
त्यांचं म्हणणं होतं, “बँकांचा पैसा घेऊन परदेशात पळून जाणारा इतर मागासवर्गीय नव्हता. मात्र भाजप उगाच गोंधळ घालत आहे. एका बाजूला शिक्षणाच्या अधिकाराअंतर्गत गरीब मुलांची शिष्यवृत्ती संपवली आहे आणि दुसऱ्या बाजूला मागासवर्गीयांचा कैवारी असल्याचं ढोंग सरकार करत आहेत. “
“मी तुरुंगात जायला घाबरत नाही आणि त्यांना आयुष्यभर संसदेतून बेदखल केलं तरी ते लोकशाही वाचवण्यासाठी बोलत राहतील आणि सरकारला प्रश्न विचारत राहतील.”
या वक्तव्याचा वेगळ्या पद्धतीने अर्थ काढला जात आहे. काही जण मानतात की राहुलच्या वक्तव्यामुळे त्यांच्या आक्रमक वृत्तीचा अंदाज येतो.
काही विश्लेषकांना असं वाटतं की राहुल गांधींची खासदारकी संपल्यावर त्यांच्या आक्रमक वृत्तीवरून असं वाटतं की हीच आक्रमक वृत्ती काँग्रेसचं पुनरुज्जीवन करण्याच्या कामात येईल.
राजकीय विश्लेषक विद्या भूषण रावत मानतात की आज जे भाजप करत आहे तेच काँग्रेस एकेकाळी करत होती.
त्या म्हणतात, “युपीएच्या दुसऱ्या कार्यकाळात सरकारच्या मंत्र्यांनी भरपूर मनमानी केली आहे. त्यामुळे पक्षाच्या पातळीवर सरकारचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. लोकांच्या मनात त्यांची प्रतिष्ठा कमी झाली होती. राहुल गांधींनी काँग्रेसला उभारी देण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यात ते यशस्वी होताना दिसत आहे.”
बीबीसीशी बोलताना रावत म्हणाल्या की भारत जोडो यात्रा झाल्यानंतरच राहुल गांधींना घेरण्याचं काम सरकारने सुरू केलं होतं.
त्या म्हणतात, “ज्या पद्धतीने ते सदनात बोलतात आणि अदानी प्रकरणात सरकारला घेरत होतो त्यामुळे सत्ताधारी पक्षात अस्वस्थता वाढत होती. राहुल यांच्या वक्तव्यावरून कळत होतं की ते कोणत्याही प्रकारचं बलिदान देण्यास राजी आहेत. त्यामुळे काँग्रेसला फायदा होताना दिसत आहे. काँग्रेसला स्वत:चं अस्तित्व टिकवणं हा एकमेव पर्याय शिल्लक होता. तोच पर्याय भाजपने त्यांना आयता दिला आहे. आता काँग्रेस त्याचा किती फायदा घेतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)