‘माझ्या मुलाला त्यांनी जनावरासारखं मारलं’; परभणीत 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
27 मे च्या मध्यरात्री परभणीच्या उखळद गावात शिकलकरी समाजातील 3 अल्पवयीन मुलांना मारहाण करण्यात आली.
बकरी चोर समजून त्यांना एवढं मारण्यात आलं की, त्यात किरपालसिंग भोंड या मुलाचा मृत्यू झाला आणि इतर दोघे, गोरासिंग दुधानी आणि अरुणसिंग टाक जखमी झाले. किरपालचं वय 15 वर्षं असल्याचं त्याचा मोठा भाऊ तेजूसिंग भोंड सांगतो.
“किरपालचं सातवीपर्यंत शिक्षण झालं होतं. मग घरची परिस्थिती पाहून त्यानं शिक्षण सोडलं आणि हातमजुरी करायला लागला,” तेजूसिंग सांगतो.
परभणीतल्या अण्णाभाऊ साठे नगर परिसरात किरपालचं कुटुंब राहतं. 2 जूनच्या सकाळी आम्ही किरपालच्या घरी पोहचलो, तेव्हा त्याच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी बरेचसे नातेवाईक तिथं जमलेले दिसून आले.

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC
27 मे च्या रात्री किरपाल मित्रांसोबत डुकरं पकडायला गेला होता, असा भोंड कुटुंबीयांचा दावा आहे.
तेजूसिंग सांगतो, “आम्ही डुकरं पकडायला जातो. डुकरं सकाळी मिळत नाही म्हणून रात्री जावं लागतं. त्यामुळे मग आम्ही सोडलेली डुकरं पकडण्यासाठी माझा भाऊ दोन मित्रांसोबत गेला होता.
“पण त्यांना तिथं डुकरं मिळाले नाहीत. तर तीन-चार वाजता ते वापस येत होते. तितक्यात गावकऱ्यांनी त्यांना रोखलं. जो गाडी चालवत होता त्याच्या तोंडावर दगड फेकून मारला. त्यामुळे गाडीवरचे तिघेही खाली पडले.”
“आपण एखाद्या जनावरालाही इतकं मारत नाही, इतकं माझ्या भावाला मारण्यात आलं. निर्दयीपणे मारहाण करण्यात आली. अंगावर गरम पाणी टाकलं. त्याचे केस ओढण्यात आले. खाली आदळत आदळत मारलं. डोक्यात रॉड घालण्यात आला. त्यांची छाती पूर्णपणे तुटली होती. किडनी पण कामातून गेली होती,” तेजूसिंग पुढे सांगतो.

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC
पण, किरपाल त्याच्या मित्रांसोबत बकरी चोरण्यासाठी गेला होता, असा उखळदच्या ग्रामस्थांचा दावा आहे. उखळदच्या गावकऱ्यांचा हा दावा तेजूसिंग फेटाळून लावतो.
तो म्हणतो, “डुकरं पकडणं हाच आमचा एकमेव धंदा होता. आम्ही तोच करायचो. त्याशिवाय इतर भानगडींमध्ये माझा भाऊ पडत नव्हता.”

फोटो स्रोत, tejusinh
किरपालची आई धनकोर कौर या गावोगावी फिरून मजुरी करतात. लोकांच्या इथं धुणीभांडी करतात.
घटनेविषयी बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. “माझे हाल पाहून माझ्या किरपालनं मजुरी सुरू केली. पण, माझ्या मुलाला जनावरासारखं मारण्यात आलं. त्याची छाती, किडनी सगळं खराब झालं होतं.”
धनकोर सध्या त्यांच्या भावाकडे राहत आहेत. एका छोट्याशा खोलीत त्यांचं कुटुंब तिथं वास्तव्याला आहे. त्यांच्याकडे स्वत:चं घर नाही.

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC
किरपालचे मामा भगतसिंग टाक सांगतात, परभणीमधील शिकलकरी समाजाचे 80% लोक हातमजुरी करतात. झारे, कढई बनवण्याचं काम करतात. तर 20% लोक जनावरांचा व्यवसाय करतात. वराह पालन करतात.
65 वर्षांचे गोपालसिंग टाक बीडहून किरपालच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आले होते. दु:ख झालं म्हणून भेटायला आलो, असं ते म्हणाले.
शिकलकरी समाजाला नोकरी नाही, जमीन नाही, सरकार काही देत नाही, हा मुद्दा बातमीत घ्या असं ते वारंवार सांगत होते.
उखळदमध्ये काय परिस्थिती?
उखळदच्या ग्रामस्थांचं म्हणणं जाणून घेण्यासाठी 2 जूनच्या दुपारी आम्ही उखळद गावात पोहोचलो. गावात शुकशुकाट होता. झालेल्या घटनेविषयी बोलण्यास फार कुणी उत्सुक नव्हतं.
गावाच्या एका टोकाला ज्या गॅरेजसमोर ही घटना झाली तिथं आम्ही गेलो. पण घटनास्थळी फार काही दिसून आलं नाही.
तिथं आसपासच्या लोकांना घटनेविषयी विचारपूस केली, तर त्या दिवशी आम्ही बाहेरगावी होतो, असं उत्तर मिळालं.
गावात आत चक्कर मारली तेव्हा श्रीलक्ष्मी नृसिंह मंदिरासमोरील झाडाखाली दादाराव बागल भेटले. झाडाखाली ते आराम करत होते.

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC
गावातल्या घटनेविषयी विचारल्यावर 65 वर्षीय बागल म्हणाले, “आमच्या इथं एक महिना,दीड महिना झालं चोऱ्या व्हायल्यात. कुणाचे पैसे, कुणाचं गंठण, कुणाच्या शेळ्या गेल्या. कुणाची मोटारसायकल गेली.
"त्या लोकांपाशी चाकू, चटणी, फवारे, च्याब्यांचे घोशे असतात. हे रात्री 1-2 वाजता गावात कशासाठी येतात? डुकरं पकडायला गेल्यावर चटणी आणि च्याब्यांनी डुकरं पकडतात का?”
पण मग गावकऱ्यांनी चोरीची तक्रार पोलिसात केली का, असं विचारल्यावर ते म्हणाले,”चोरीची तक्रार करायला लोक भीत आहेत.”

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC
शिकलकरी तरुणांनीच चोरी केल्याचा पुरावा काय, या प्रश्नावर ते म्हणाले, “चाब्या कशाला पाहिजे? चाकू कशाला पाहिजे? मला सांगा चटणी कशाला पाहिजे? चटणी टाकून फवारे मारतात डोळ्यावर. ते कशाला पाहिजे? ते डुकरं धरायला पाहिजे का? डुकरं हातानं धरून त्याच्या डोळ्यात फवारा टाकतात का? चटणी टाकतात का? काय करतात?”
परभणीपासून जवळपास 25 किलोमीटर अंतरावर उखळद गाव आहे. गावची लोकसंख्या 5000 आसपास आहे. गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे.
उखळदमधल्या काही ग्रामस्थांशी बोललो तर त्यांचं असं म्हणणं होतं की, घटना घडल्यापासून दररोज पोलिसांची गाडी गावात येत आहे आणि संशयितांना ताब्यात घेत आहे. त्यामुळे गावातले बरेचसे लोक घरांना कुलूप लावून बाहेरगावी राहायला गेलेत.
पोलिस तपासात काय समोर आलं?
उखळदमधील घटनेचा तपास परभणी पोलीस करत आहे. पोलिसांच्या तपासात काही बाबी समोर आल्या आहेत.
27 मे च्या रात्री जी मोटारसायकल किरपालसिंग भोंड, गोरासिंग दुधानी आणि अरुणसिंग टाक यांनी वापरली ती चोरीची असल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलं आहे.
याशिवाय, बकरी चोरी संदर्भात उखळद गावातून आतापर्यंत एकही तक्रार आली नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
परभणीच्या पोलीस अधीक्षक रागसुधा आर यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, “या घटनेतील जखमी व्यक्तीचा जबाब घेण्यात आला आहे. त्यानुसार, कलम 302, 307 सोबतच 143 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“आमच्या प्राथमिक तपासात एकूण 11 आरोपी निष्पन्न झाले आहेत. त्यापैकी 3 जून पर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. इतर तिघांना पकडण्यासाठी पोलिसांच्या 2 टीम तैनात करण्यात आल्या आहेत.”

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC
अटक केलेल्या आरोपींमध्ये हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजाचे आरोपी असल्यानं लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहनही परभणी पोलिसांनी केलं आहे.
रागसुधा आर यांनी सांगितलं की, “लोकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. खरं असं आहे की, ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला त्याच दिवशी आम्ही 2 आरोपींना अटक केली. त्यात एक हिंदू, तर एक मुस्लिम आहे.
"आतापर्यंत जे 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे, त्यातही हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्माचे लोक आहेत. कोणत्याही एकाच धर्माचे लोक या घटनेत सामील नाहीयेत.”

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC
या घटनेतील जखमी गोरासिंग आणि अरुणसिंग या दोघांचीही तब्येत स्थिर आहे. अरुणसिंगला दाताशी संबंधित उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आल्याची माहिती परभणीच्या जिल्हा रुग्णालय प्रशासनानं बीबीसी मराठीला दिली.
दरम्यान, नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा बोर्डाकडून हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी करण्यात आलीय.
नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव रविंदर सिंग बुंगाई यांनी सांगितलं की, “आम्ही जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं आहे. या घटनेतील दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यात यावं.”
शिकलकरी समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय?
किरपालचं कुटुंब शिकलकरी समाजातून येतं. महाराष्ट्रात शिकलकरी या शिखांच्या भटक्या विमुक्त जमातीची लोकसंख्या साधारण 2 लाखाच्या आसपास आहे. परभणीतील वस्त्यांमध्ये राहणारा हा समाज विळे, लोखंडी कढई, झारे बनवण्याचा पारंपरिक व्यवसाय करतो.
परभणी शहरात शिकलकरी समाजाचे 150 ते 200 घरे आहेत. तर लोकसंख्या 500च्या जवळपास आहे.
महाराष्ट्र शीख शिकलकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ठाकूरसिंग बावरी सांगतात, “आम्ही अनेक पिढ्यांपासून लोखंडाचा व्यवसाय करत आलो आहोत. पण आजच्या जमान्यात हा व्यवसाय पूर्णपणे बंद झाल्यामुळे आमचे तरुण आता हॉटेल्स आणि दवाखान्यात वॉचमन म्हणून काम करतात. तर काही जण डुकरं पाळून, त्यांना गावोगावी सोडून जे चार पैसे मिळतात, त्यावरून आपला उदरनिर्वाह चालवतात.”

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC
पूर्वी शिकलकरी समाजातील व्यक्तींकडे चोरी करणारे म्हणून संशयानं पाहिलं जायचं, पण आता या दृष्टिकोनात मोठी सुधारणा झाल्याचंही बावरी सांगतात.
बकरी चोरीसाठी आल्याचा संशय आल्यानं उखळदच्या ग्रामस्थांनी केलेल्या मारहाणीत किरपालचा मृत्यू झाला. अशाप्रकारे नुसता संशय आहे म्हणून आणि अफवा ऐकून एखाद्याला मारणं चुकीचं असल्याचं त्याचा मोठा भाऊ तेजूसिंग सांगतो.
“जे आमच्यासोबत झालं ते कुणासोबतही होता कामा नये. माझा भाऊ गेला आहे. दु:ख सगळ्यात जास्त आम्हाला झालं आहे. तुम्हाला कुणावर संशय असेल तर पोलिसांना बोलवा. त्यांना पोलिसांच्या हवाली करा. कायदेशीर कारवाई करा. पण हे असं कुणाचं तरी ऐकून मारहाण करणं चुकीचं आहे.”

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC
किरपालसिंग खून प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी भोंड कुटुंबाची मागणी आहे.
तर ही अशी प्रकरणं होऊच नये यासाठी शिकलकरी समाजातील व्यक्तींनी डुकरं पकडण्यासाठी एखाद्या गावात जाण्यापूर्वी तशी पूर्वकल्पना पोलीस पाटलांना दिल्यास या घटना टाळण्यास मदत होऊ शकते, अशी सूचना काही जण करत आहेत.
पण चोरीच्या संशयावरून झुंडबळीसारखी घटना घडणं समाजासाठी लाजीरवाणं असल्याचंही बोललं जात आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








