आपण मृत पूर्वजांना भेटू शकतो का? आइन्स्टाईनचं क्वांटम मेकॅनिक्स काय सांगतं?

    • Author, डेलिआ व्हेंचुरा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

एकदा सबीन होसेनफेल्डर आणि एक तरुण सोबत प्रवास करत होते. प्रवासात गप्पा मारता मारता त्या तरुणाला कळलं की सबीन भौतिकशास्त्रज्ञ आहेत.

त्यामुळे त्याने सबीनला विचारलं की, "माझी आजी वारली आहे. पण एका पुरोहिताने मला सांगितलं की, क्वांटम मेकॅनिक्समुळे माझी आजी आजही जिवंत आहे. हे कितपत खरं आहे?"

त्या तरुणाने हा प्रश्न योग्य व्यक्तीला विचारला होता.

कारण सबीन होसेनफेल्डर जर्मनीतील म्युनिक युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर मॅथेमॅटिकल फिलॉसॉफीच्या शास्त्रज्ञ आहेत. त्यांचा बराचसा वेळ अशा प्रश्नांची उत्तरं शोधण्यात जातो.

बीबीसी मुंडोशी बोलताना सबीन होसेनफेल्डर सांगतात, "माझा भौतिकशास्त्राकडे ओढा का वाढला हे सांगणं खरं तर खूप अवघड आहे."

"मी 20 वर्षांपासून या क्षेत्रात आहे, पण आजही माझ्याकडे याचं उत्तर नाहीये. पण जर या प्रश्नाचं उत्तर द्यायचंच असेल तर ते खूप लांबलचक असेल."

त्या सांगतात, "या विश्वात आपण कसे सामावलोय? भौतिकशास्त्राचे मूलभूत नियम याविषयी काय सांगतात हे जाणून घेण्याच्या इच्छेमुळे कदाचित मी या क्षेत्रात आले असेन."

"आपल्याला पडलेल्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतातच असं नाही. पण शक्यता काय असू शकतात याविषयीचे ठोकताळे नक्कीच बांधता येतात."

मग पुरोहित म्हणाले ते कितपत खरं आहे?

यावर सबीन होसेनफेल्डर सांगतात, "यावर काय बोलायचं मला समजलं नाही, कारण क्वांटम मेकॅनिक्सचा मृत्यूनंतरच्या जीवनाशी फारसा संबंध नाहीये."

"पण थोड्या विचारांती मी या निष्कर्षावर आले की हे अगदीच खोटं म्हणावं असंही नाहीये. तुम्ही क्वांटम मेकॅनिक्स थोड्या वेळासाठी बाजूला ठेवलं तर आपलं अवकाश आणि काळाचे सिद्धांत आपल्याला भूतकाळ आणि भविष्यातील वास्तवाविषयी सांगतात."

त्या सांगतात, "आइन्स्टाईनच्या सिद्धांताप्रमाणे भूतकाळाचं अस्तित्व मान्य केल्याशिवाय तुम्हाला वर्तमानाविषयी बोलता येणार नाही."

म्हणजे वर्तमानकाळ हा भूतकाळ आणि भविष्य काळातील एक क्षण आहे.

उदाहरण म्हणून बघायचं तर, तुम्ही हा लेख वाचणाऱ्याला विचारलं की, तू सध्या काय करतोयस तर त्याच्या उत्तरात भूतकाळ दडलेला असेल.

होसेनफेल्डर सांगतात की, "तुम्ही जे काही अनुभवता, तुम्ही जे काही पाहता त्यात भूतकाळ दडलेला असतो."

त्यामुळे वर्तमान ही मायावी गोष्ट आहे.

होसेनफेल्डर सांगतात की, "आपल्या वर्तमानातील एखादा क्षण दुसऱ्या एखाद्याचा भूत किंवा भविष्यकाळ असू शकतो. आइन्स्टाईनने त्याला व्यक्तिनिष्ठ स्वातंत्र्य असं म्हटलंय."

आईन्स्टाईनची कल्पना

आता हे उदाहरण नीट समजून घेण्यासाठी आइन्स्टाईनचा प्रसिद्ध थॉट एक्स्परिमेंट बघता येईल.

या प्रयोगात दोन संकल्पना मांडल्या होत्या. त्यानुसार न्यूटोनियन म्हणजेच न्यूटनचा सिद्धांत मानणाऱ्या लोकांचं म्हणणं होतं की, प्रकाशाचा वेग वस्तूंच्या हालचालींवर अवलंबून असतो. तर पण मॅक्सवेलीयन्स म्हणजेच जेम्स क्लर्क मॅक्सवेल यांचा सिद्धांत मानणाऱ्या लोकांनी युक्तिवाद करताना म्हटलं की प्रकाशाचा वेग कायम एकसारखा असतो.

पण आइन्स्टाईनने वेगाचा मुख्य घटक म्हणून वेळेवर लक्ष केंद्रित केलं.

उदाहरणार्थ एखादी रेल्वे 7 वाजून 5 मिनिटांनी येत असेल असं आपण म्हणत असू तर घड्याळात 7.05 च्या ठोक्यालाच ती रेल्वे स्थानकावर येत असते.

या सर्व गोष्टी तुमच्या हालचालींवर अवलंबून असतात. आणि हे सगळं एकाचवेळी घडत असतं असं आइन्स्टाईनचं म्हणणं होतं.

म्हणजे वेळ प्रत्येकासाठी सारखी नसते.

आईन्स्टाईनने रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या माणसाचं चित्र काढलं.

त्याच्या दोन्ही बाजूला समान अंतरावर वीज कोसळल्याचं दाखवलं.

प्रयोगात, दोन्ही बाजूंच्या विजांचा प्रकाश एकाचवेळी त्याच्या डोळ्यांपर्यंत पोहोचला.

नेमकी त्याच क्षणी एक रेल्वे महिला प्रवाशासोबत प्रकाशाच्या वेगाने पुढे गेली.

ही रेल्वे एका बाजूच्या विजेला समांतर तर दुसऱ्या बाजूला विजेच्या विरूद्ध दिशेने पुढे गेली.

रेल्वे ज्या दिशेने पुढे जात होती त्या दिशेच्या विजेचा प्रकाश त्या स्त्रीच्या डोळ्यांपर्यंत लवकर पोहोचला. कारण विजेचा प्रकाश आणि महिलेमधील अंतर कमी होतं.

भूतकाळ, वर्तमानकाळ

थोडक्यात आपण वेळेची संकल्पना मांडण्यात अक्षम आहोत आणि याचमुळे त्याला विशेष सापेक्षता सिद्धांत असं म्हटलं गेलं.

होसेनफेल्डर सांगतात, "आइन्स्टाईनच्या म्हणण्यानुसार वेळ ही एक आयामी असल्याने त्याला स्पेस-टाइम असं नाव दिलं."

"तुम्ही एका विशिष्ट वर्तमान काळाची व्याख्या करू शकत नाही. कारण ती प्रत्येक साच्यात बसेलच असं नाही."

होसेनफेल्डर सांगतात की, अताचा क्षण नंतर कोणाचा तरी असू शकतो.

यात तुमच्या भूतकाळातील आणि तुमच्या भविष्यातील सर्व क्षणांचा समावेश आहे.

होसेनफेल्डर पुढे सांगतात की, "त्यामुळे आम्ही या निष्कर्षापर्यंत आलोय की, भूतकाळ वर्तमानकाळाइतकाच वास्तविक आहे."

त्यामुळे आपल्या वर्तमानाप्रमाणेच एक भूतकाळ असा ही आहे जिथे तुमची आजी जिवंत असल्याचा तुम्ही विचार करता.

होसेनफेल्डर म्हणतात, "पण तुम्हाला जर तुमच्या आजीशी बोलायचं असेल तर त्यासाठी सध्या तरी कोणताच मार्ग उपलब्ध नाहीये."

नियम

त्या सांगतात की, "मला ज्या गोष्टी वाटतात त्या बरोबर किंवा चुकीच्याही असू शकतात."

येत्या अब्ज वर्षांत विश्वाचं अस्तित्व कायम राहणार का? पुढे काय घडणार याविषयी कोणालाच काही माहिती नाही. पण हे जाणून घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा विकास होण्याची शक्यता आहे.

होसेनफेल्डर म्हणतात की, माझं बोलणं तुम्हाला कदाचित वेडेपणाचं वाटू शकतं. पण जे सिद्धांत अस्तिवात आहेत त्याचा विचार करता आपलं अस्तित्व काळाच्याही पलीकडे असल्याचं दिसतं.

माहिती ही अशी गोष्ट आहे जी काल विरहित आहे. माहितीमुळे विश्वातील प्रत्येक गोष्ट तयार होते.

आइनस्टाइनने म्हटल्याप्रमाणे, भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यात फरक करणं भौतिकशास्त्रज्ञांसाठी मृगजळाप्रमाणे आहे. पण हे सगळे काळ स्थिर आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)