डान्सिंग ऑन द ग्रेव्ह : पत्नीची संपत्ती मिळवण्यासाठी तिला जिवंत गाडलं, 3 वर्षांनी उलगडला गुन्हा

    • Author, इमरान क़ुरैशी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

नव्वदच्या दशकातली ही गोष्ट. बंगरुळूत नव्याने रुजू झालेले एक रिपोर्टर घाईघाईने न्यूज रूममध्ये शिरले. समोर ब्युरो चीफ दिसताच त्यांनी उशीर का झाला, याचं कारण सांगायला सुरुवात केली.

ते म्हणाले, "पोलिसांनी तीन वर्षांपूर्वी घडलेल्या एका महिलेच्या खुनाचा उलगडा केलाय. पोलीस आयुक्त आज आम्हाला (प्रसारमाध्यमांना) भेटले. त्यामुळे मला कार्यालयात पोहोचायला उशीर झाला."

28 मार्च 1994 च्या रात्री घडलेला हा प्रसंग ऐकून घेत, घटना नेमकी किती मोठी असावी, याचा अंदाज ब्युरो चीफ लावत होते.

रिपोर्टरने प्रकरणाशी संबंधित अधिक माहिती देताना सांगितलं की, "ती म्हैसूरच्या दिवाण साहेबांची नात होती."

ब्युरो चीफने विचारलं, "कोणते दिवाण?"

यावर रिपोर्टर उत्तरले, "सर मिर्झा इस्माईल"

1926-41 पर्यंत म्हैसूरच्या दिवाण पदावर कार्यरत असणारे सर मिर्झा इस्माईल यांनी बंगळुरू आणि म्हैसूर सजवण्याचं काम केलं. शिवाय त्यांनी किल्ल्याबाहेर जयपूर देखील उभारलं. 1942 ते 1946 दरम्यान पर्यटनासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचं काम केलं.

पण तेव्हाच्या निजामाचा ओढा पाकिस्तानच्या दिशेने होता आणि यावरून मतभेद होऊन हैदराबादचे दिवाण म्हणून 1947-48 मध्ये त्यांची कारकीर्द संपुष्टात आली.

दिवाण साहेबांना शाकिरा खलीली नावाची नात असल्याचं आम्हाला पहिल्यांदाच कळलं होतं. त्यांच्या नातीने भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी अकबर खलीली यांच्याशी लग्न केलं होतं.

अकबर खलीली यांनी इराण आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये भारताचे राजदूत आणि उच्चायुक्त अशी महत्त्वाची पदे भूषवली होती. शिवाय त्यांचा मध्यपूर्व देशांवरही चांगला अभ्यास होता.

हरवल्याची तक्रार तीन वर्ष जुनी

शाकिरा यांच्या मुलीने म्हणजे सबा खलीली हिने आपली आई हरवल्याची तक्रार दाखल केली होती. पुढे तीन वर्षांनी आपण या घटनेचा उलगडा केलाय, असं पोलिसांनी अभिमानाने जाहीर केलं.

पोलीस आयुक्त पी. कोदंडरामय्या यांनी त्या रात्री रिपोर्टरशी बोलताना सांगितलं की, "मी सबा खलीली या महिलेला पहिल्यांदा माझ्या कार्यालयात भेटलो. माझ्या तक्रारीवर अजून कोणतीच कारवाई झाली नसल्याचं म्हणत ती माझ्याजवळ ओरडत आली होती."

तक्रारदार सबा खलीली यांनी कार्यालयात आल्यानंतर जोरजोरात आरडाओरड करायला सुरुवात केली आणि नंतर पोलीस आयुक्त पी. कोदंडरामय्या आणि इतर कर्मचार्‍यांसमोर जोरजोरात रडू लागली.

पुढे शांत झाल्यावर त्यांनी आपल्या आईविषयी सांगायला सुरुवात केली. सबाने मागील तीन वर्षांपासून तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी किती प्रयत्न केलेत हे देखील सांगितलं.

शाकिरा खलीली यांनी 13 एप्रिल 1991 रोजी त्यांची आई गौहर ताज नमाझी यांची भेट घेतली होती. सहा दिवसांनी त्या सबाला भेटल्या. शाकिरा यांना घरकामात मदत करणाऱ्या जोसेफिन आणि घरातील मदतनीस राजू यांनी त्यांना शेवटचं 28 मे 1991 रोजी पाहिलं.

सबाला आपल्या आईपर्यंत पोहोचायचं होतं. पण तिच्या प्रयत्नात आडकाठी होत होती स्वामी श्रद्धानंद उर्फ मुरली मनोहर मिश्रा यांची.

शाकिराने अकबर खलीली यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर श्रद्धानंदशी लग्न केलं होतं.

सबा जेव्हा जेव्हा आपल्या आईला मुंबईहून फोन करायची तेव्हा तेव्हा श्रद्धानंद तिला काही ना काही कारण देऊन टाळायचे. कधी सांगायचे शाकिरा हिरे व्यापाऱ्यांच्या लग्नाला गेलीय तर कधी सांगायचे, अमेरिकेतील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेलीय. पुढे पुढे तर त्यांनी, भरपूर मालमत्ता असल्यामुळे तिला आयकर विभागाची भीती वाटत असून तिला समोर यायचं नाहीये, असं कारण सांगितलं.

आता सबाला श्रद्धानंदच्या कारणांवर शंका येऊ लागली आणि तिने आई बेपत्ता होण्यासाठी त्याला जबाबदार धरायला सुरुवात केली.

शाकिराने अकबर खलीली यांच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर श्रद्धानंदसोबत लग्न केलं. शाकिरा आणि अकबरला चार मुली होत्या. यातली एकमेव मुलगी सबा आपल्या आईला भेटायला बंगळुरूला यायची. श्रद्धानंदसोबत लग्न केल्यानंतर शाकिराने तिच्या चार मुली आणि कुटुंबाशी संबंध तोडले होते.

श्रद्धानंद आणि शाकिराची ओळख रामपूरच्या बेगमने करून दिली होती. श्रद्धानंद तेव्हा बेगमच्या रिचमंड रोडवरील बंगल्यात राहायला आले होते. तिच्या मालमत्तेची अनेक प्रकरणं श्रद्धानंदने मिटवली होती.

त्यावेळी अकबर खलीली इराणमध्ये कार्यरत होते. त्या देशातील अंतर्गत परिस्थितीमुळे कुटुंबांना सोबत घेऊन जाणं शक्य नसायचं. याच दरम्यान शाकिरा आणि श्रद्धानंद जवळ आले. श्रद्धानंदला माहित होतं की, शाकिराला मुलगा हवाय आणि त्यासाठी ती काहीही करायला तयार आहे. त्यामुळे श्रद्धानंदने शाकिराला सांगितलं की, माझ्याजवळ अशा काही शक्ती आहेत ज्यामुळे हे सर्व शक्य आहे.

पोलिस आयुक्त पी. कोडंदरामय्या यांनी हे प्रकरण केंद्रीय गुन्हे शाखाकडे वर्ग केल्यावर प्रकरणाचा तपास वेगाने सुरू झाला.

सीसीबीच्या तपासात अडचणी

या रिपोर्टरने पोलीस आयुक्त पी. कोदंडरामय्या यांना विचारलं की, या प्रकरणाचा छडा नेमका कोणी लावला? या प्रश्नावर कोदंडरामय्या मनापासून हसले आणि म्हणाले की, "मीडियातील तुमचे सहकारी मला मारतील."

त्यावेळी कोदंडरामय्या यांचे सहकारी पत्रकार परिषदेचा रिपोर्ट लिहीत होते.

सीसीबीच्या पथकाने पुरावे शोधण्यासाठी बरीच मेहनत घेतली. याचवेळी पोलीस कॉन्स्टेबल महादेव यांना एक जुनी युक्ती सुचली.

कोदंडरामय्या यांनी रिपोर्टरशी बोलताना सांगितलं की, "महादेवने शाकिराच्या घरी काम करणाऱ्या एका मदतनीसाला गाठलं आणि दारू पिण्यासाठी त्याला ब्रिगेड रोडवरील एका प्रसिद्ध ठिकाणी नेलं. (त्याकाळी देशी दारूला अरक म्हटलं जायचं.) या प्रकरणात श्रद्धानंदचा हात असल्याचं स्पष्ट होताच आणि आम्ही त्याच्यावर पाळत ठेवायला सुरुवात केली."

बरीच दारू प्यायल्यानंतर राजूने पोलिस कॉन्स्टेबल महादेव समोर तोंड उघडलं. त्याने सांगितलं की, बंगल्याच्या पाठीमागे असलेल्या एका छोट्या बेडरूमसमोर जमिनीत खड्डा खोदला असून त्यात पाणी भरण्याची सोय होती. यानंतर शिवाजीनगरमधून एक मोठा बॉक्स बनवून घरी आणला होता. या बॉक्सला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता यावं अशा पद्धतीची चाकं बसविण्यात आली होती.

राजूने सांगितलं की, "गेस्ट हाऊसमधून तो बॉक्स आणण्यासाठी मी चार जणांना बोलावलं होतं."

तपास अधिकारी वीरैया यांनी या रिपोर्टरशी बोलताना सांगितलं की, "शाकिराने श्रद्धानंदला बँकेच्या लॉकरची पॉवर ऑफ अॅटर्नी दिली होती. याचा वापर करत श्रद्धानंदने सेंट मार्क्स रोडवर असलेल्या बँकेच्या लॉकर मध्ये प्रवेश मिळवला."

वीरैय्यांनी सांगितलं की, "श्रद्धानंद बऱ्याचदा बँकेत गेला. शाकिराला आता त्याच्या हेतूबद्दल संशय येऊ लागला होता. त्यामुळे तिने मे 1991 मध्ये श्रद्धानंदला तिच्या सर्व संपत्तीतून बेदखल केलं. ती बेपत्ता होण्यापूर्वीची ही गोष्ट आहे."

बंगळूर येथील प्रसिद्ध फौजदारी वकील सी व्ही नागेश यांना या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. त्यांनी या रिपोर्टरशी बोलताना सांगितलं की, "सबा आणि इतर मुलींशी वाढलेली जवळीक श्रद्धानंदला खटकू लागली."

श्रद्धानंद आणि शाकिरा ज्या घरात राहत होते ते घर सोडलं तर श्रद्धानंदने बाकी सर्व संपत्ती विकायला काढली असल्याचं पोलिसांना आढळलं.

हा व्यवहार नेमका किती रुपयांना पार पडला अशी विचारणा रिपोर्टरने केली.

यावर कोदंडरामय्या म्हणाले, "किंमत ऐकून खुर्चीवरून पडशील. हा व्यवहार जवळपास सात कोटी रुपयांचा होता." (त्यावेळी बेंगळुरूमधील मालमत्तेच्या किंमती अजून गगनाला भिडल्या नव्हत्या .)

पोलिसांनी श्रद्धानंदची चौकशी केल्यावर त्याने शाकिराची हत्या केल्याचं कबूल केलं

हत्या केल्यानंतरही श्रद्धानंद सापडला नाही...

हत्येची कबुली दिल्यानंतर श्रद्धानंदने पोलिसांना गुन्ह्याच्या ठिकाणी नेलं.

वीरैयाने सांगितलं की, "त्याने आम्हाला ती जागा दाखवली, जिथे त्याने लाकडी पेटी ढकलली होती. या पेटीला चाकं होती. तो आपल्या पत्नीला रोज चहा बनवून द्यायचा. याच चहामध्ये त्याने झोपेच्या गोळ्या टाकल्या होत्या."

वीरैया पुढे सांगतात की, "त्यानंतर त्याने शाकिराला गादीसह उचलून पेटीत टाकलं आणि वरचं झाकण बंद केलं. त्याने बेडरूमच्या खिडकी खाली असलेली भिंत तोडली, आणि समोरच खोदलेल्या खड्ड्यात पेटी ढकलून दिली. हा खड्डा त्याने आधीच तयार करून ठेवला होता."

त्याने शाकिराला जिवंत गाडलं होतं. फॉरेन्सिक टीमला त्याचे पुरावे मिळाले होते.

पत्रकार परिषदेनंतर दोन दिवसांनी श्रद्धानंदला घरी नेण्यात आलं. तिथे पोहोचल्यानंतर त्याने पेटी पुरलेल्या ठिकाणी खडू फेकून मारला.

पोलिसांच्या तपास पथकाने पेटी काढली असता, त्यात कवटीसहित शरीराचा सांगाडा सापडला. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला सापडलेला हा एक महत्त्वाचा पुरावा होता.

क्रॅनिओफेशियल तंत्राच्या मदतीने त्यांनी शाकिराचा चेहरा बनवला. हा फोटो कुटुंबातील सदस्यांना ओळखण्यासाठी पाठवला गेला आणि ती शाकिरा असल्याचं सिद्ध झालं.

डीएनए फिंगरप्रिंटिंगच्या मदतीने तो सांगाडा शाकिराचाच असल्याची खात्री पटली. शाकिराच्या आईने तिच्या बोटातील अंगठ्या ओळखल्या.

कर्नाटक सरकारने सीव्ही नागेश यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली.

सत्र न्यायालयाने 21 मे 2005 रोजी या प्रकरणाचा निकाल दिला. त्या दिवशी न्यायालयाबाहेर पत्रकारांशी बोलताना सी व्ही नागेश म्हणाले, "फिर्यादीने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायाधीशांनी आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे."

या प्रकरणाचा निकाल ऐकल्यावर सबाला अश्रू अनावर झाले होते. ती म्हणाली, "मी माझी आई परत मिळवू शकत नाही, पण तिला न्याय मिळाला आहे."

कर्नाटक उच्च न्यायालयाने 20 सप्टेंबर 2005 रोजी आरोपींची फाशीची शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्ती एस आर बन्नूर मठ आणि न्यायमूर्ती ए सी काबीन यांच्या खंडपीठाने निकाल देताना म्हटलं की, "पत्नीची हत्या करण्यासाठी आरोपीकडे पुरेसं कारण होतं. तिची हत्या करून तिच्या मौल्यवान संपत्तीचा वापर करून स्वत: श्रीमंत होणं हा आरोपीचा एकमेव उद्देश होता. आमच्या मते, हे प्रकरण दुर्मिळ प्रकरणाच्या श्रेणीत येतं."

यावर आरोपीने सर्वोच्च न्यायालयात अपील केलं. सर्वोच्च न्यायालयातील आठ न्यायाधीशांच्या दोन खंडपीठांनी यावर सुनावणी केली. या प्रकरणात आरोपींना दोषी ठरवलं. प्रकरण शेवटच्या टप्प्यात असताना एका न्यायाधीशांना वाटलं की, फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली जाऊ शकते. पण या निकालानुसार श्रद्धानंदची मरेपर्यंत तुरुंगातून सुटका होणार नव्हती.

तात्पुरता पॅरोल मिळविण्यासाठी श्रद्धानंदने प्रयत्न केला होता. मात्र तीन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती केएम जोसेफ, बी व्ही नगररत्न आणि आशानुद्दीन अमानुल्लाह यांच्या खंडपीठाने हा पॅरोल फेटाळला.

शाकिरा खलीलीची ही स्टोरी आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)