सांगलीत मायलेकींच्या खुनासाठी पतीला अटक, मात्र नंतर वेगळंच सत्य समोर...

करणी-भानामतीच्या संशयातून एका माय-लेकीचा नात्यातील लोकांनीच खून केल्याचा प्रकार सांगली येथे समोर आला आहे.

सांगलीतील जत तालुक्यात कोणीकोणूर गावात 23 एप्रिल रोजी ही घटना घडली.

या प्रकरणात पोलिसांनी दोन व्यक्तींना अटक केली असून आणखी एका व्यक्तीचा शोध आणि पुढील तपास सुरू आहे.

नेमकं काय घडलं?

कोणीकोणूर येथील बेळुंखे वस्तीतील एका झोपडीत 23 एप्रिल रोजी माय-लेकींचे मृतदेह आढळून आले होते.

प्रियंका बिराप्पा बेळुंखे (वय 32) आणि मोहिनी बिरापा बिराप्पा बेळुंखे (वय 14) अशी दोघींची नावे आहेत.

हे प्रकरण समोर आल्यानंतर परिसरात प्रचंड खळबळ माजली. एकाच वेळी आई आणि मुलीचा खून होतो, हा प्रकार गंभीर असल्याने पोलिसांनीही वेगाने सूत्रे हलवली.

दरम्यान, माय-लेकींच्या मृत्यूबाबत विविध प्रकारचे तर्कवितर्क करण्यात येत होते.

पती बिराप्पावर संशय

प्रियंका आणि मोहिनी यांच्या खूनावेळी चोरी किंवा दरोड्याचा उद्देश असा कोणताच प्रकार दिसून आला नाही.

बेळुंखे कुटुंबासंदर्भात अधिक माहिती घेतली असता पोलिसांना अशी माहिती मिळाली की मृत प्रियंका आणि तिचा पती बिराप्पा यांच्यात सतत काही ना काही वाद-भांडणे होत असत.

यामुळे, पोलिसांचा संशय साहजिकच बिराप्पा यांच्यावर गेला. चारित्र्याच्या संशयातून बिराप्पा बेळुंखे याने खून केल्याची गावभर चर्चा सुरू झाली.

दरम्यान, मृत प्रियंका यांच्या नातेवाईकांनीही पती बिराप्पा बेळुंखे यांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली.

यानंतर, मृत प्रियांकाचे नातेवाईक संतोष चौगुले यांनी उमदी पोलीस ठाण्यात बिराप्पा बेळुंखे यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली.

पोलिसांनी तत्काळ बिराप्पा बेळुंखे यांना ताब्यात घेऊन तपास सुरू केला. बिराप्पा यांना आता अटक झाली, आता प्रकरणाचा तपास इथेच थांबेल, असं सर्वांना वाटत होतं. मात्र, प्रत्यक्षात या प्रकरणातील ट्विस्ट अजून आलेला नव्हता.

पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे बिराप्पा बेळुंखे यानेच खून केल्याचा समज सर्वांचा झाला. मात्र उमदी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पंकज पवार आणि लक्ष्मण खरात यांच्या पथकाने अतिशय शांत डोक्याने प्रकरणाचा तपास केला.

त्यांनी सखोल तपास करून खूनातील प्रत्यक्ष आरोपी शोधून काढले.

करणी-भानामतीचा संशय

खरं तर प्रियंका-मोहिनी यांच्या खूनात चारित्र्याचा संशय असा अँगल नव्हताच. तर पती बिराप्पाच्या भावकीतील तीन तरुणांनी मिळून या खूनाचं षडयंत्र रचलं होतं.

प्रियंका या आपल्या कुटुंबावर करणी-भानामती करतात, अशी त्यांची धारणा झाली होती.

प्रियंका यांच्या करणी-भानामतीतून भावाचा मृत्यू झाला आणि वडील गंभीर आजाराने ग्रस्त झाले आहेत, असा त्यांना संशय होता.

यानंतर, पोलिसांनी खात्री पटवून अक्षय बेळुंखे, विकास बेळुंखे व बबलू उर्फ बबल्या बेळुंखे या तिघांवर गुन्हे दाखल केले.

त्यामध्ये, अक्षय आणि विकास बेळुंखे या दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं. तर बबलू बेळुंखे अद्याप फरार आहे.

उमदी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण खरात याबाबत म्हणाले, “जत तालुक्यातल्या कोणीकोणूर या ठिकाणी 23 एप्रिल 2023 रोजी रात्रीच्या सुमारास मायलेकींच्या खुनाचा प्रकार घडला होता. खूनाचा पहिला संशय मृत महिलेच्या पतीवर गेला. तशी तक्रारही मृत महिलेच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात दिली.

“आम्ही पती बिराप्पा बेळुंखे याला अटक केली. पोलीस कोठडीमध्ये त्याची कसून चौकशीही करण्यात आली. त्याने पत्नीवर संशय असल्याचं मान्य केलं, मात्र खुनाची कबुली दिली नाही. शिवाय, संबंधित कृत्य तो एकटा शकणार नाही, हे आमच्या निदर्शनास आलं.”

खरात पुढे सांगतात, “गावात चौकशी करत असताना मृत प्रियंका यांची पती बिराप्पा बेळुंखेसोबतच त्याच्या भावकीतील आणि शेजारीच राहणाऱ्या भावकीच्या कुटुंबातील सदस्यांसोबतही भांडणे होत असल्याचं पोलिसांना समजलं.

त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला. यावेळी शेजारच्या कुटुंबातील अक्षय बेळुंखे, विकास बेळुंखे आणि बबल्या बेळुंखे हे तिघेही खूनाच्या घटनेनंतर गायब असल्याचं समोर आलं. विशेष म्हणजे, तिघेही मृत महिलेच्या अंत्यविधीसाठी उपस्थित राहिले.

पण, नंतर ते अचानक गायब होण्याचं कारण पोलिसांना समजू शकलं नाही. त्यांचा तपास सुरू करून लवकरच पोलिसांनी अक्षय बेळुंखे आणि विकास बेळुंखे यांना ताब्यात घेतलं. दोघांनीही खूनाची कबुली दिली असून एकाचा शोध अजूनही सुरू असल्याचं पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण खरात यांनी सांगितलं आहे.

आरोपीने काय म्हटलं?

संशयित आरोपी अक्षय बेळुंखे याने चौकशीदरम्यान खूनाचं कारण सांगितलं. प्रियंका बेळुंखे या करणी-भानामतीचा प्रकार करायच्या असा त्यांचा संशय होता.

प्रियंकाच्या करणी-भानामतीनेच सहा महिन्यांपूर्वी आपल्या वडिलांना गंभीर आजाराने ग्रासलं. शिवाय एका महिन्यापूर्वी आपला भाऊ विजय बेळुंखे याचाही मृत्यू झाला. या सगळ्याचं मूळ प्रियंका आहे, अशी त्यांची धारणा बनली होती.

या कारणामुळे त्यांच्यात भांडणेही व्हायची. अखेर, 23 एप्रिल रोजी प्रियंकाचा दोरीने गळा आवळून त्यांनी खून केला. तिचा मृतदेह उचलून घेऊन जात असताना अचानक त्याठिकाणी मुलगी मोहिनी बेळुंखेसुद्धा आली. त्यामुळे तिचाही खून केल्याची कबुली अक्षय बेळुंखे याने दिली, असं पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण खरात यांनी सांगितलं.

माय-लेकीच्या खूनाच्या प्रकरणात अक्षय, विकास आणि बबलू उर्फ बबल्या बेळुंखे या तिघांच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रियंकाचा पती बिराप्पा बेळुंखे याचा सदर खूनाशी संबंध नसल्याची बाब आता समोर आली आहे. त्यामुळे त्यांना सोडण्याची लवकरची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असं उमदी पोलिसांनी सांगितलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)