एक हत्या, दुसरी आत्महत्या...विवाहबाह्य संबंध की अजून काही कारण?

    • Author, भार्गव परिख
    • Role, बीबीसी गुजराती

गुजरातमध्ये सध्या एका घटनेची चर्चा सुरू आहे. कंचन नावाच्या एका महिलेची हत्या झाली आणि तिचा मृतदेह एका बंद खोलीत सापडला. ते घर त्रिकम चावडा नावाच्या व्यक्तीचं ते घर होतं. त्रिकमने कंचनची हत्या केली असा संशय बळावल्यानंतर त्रिकमचा शोध सुरू झाला. पण त्रिकमने पोलिसांच्या हाती येण्याआधीच आत्महत्या केली.

नेमकं काय घडलं, या प्रकरणाची चर्चा का होत आहे या संबंधीचा हा रिपोर्ट.

ही घटना घडली 6 एप्रिल रोजी. पोरबंदरच्या नवी खंडपीठ भागातला गावगुंड त्रिकम चावडा त्याच्या कुटुंबीयांसह चोटीला येथील चामुंडा देवीच्या दर्शनाला गेला होता. चोटिला हे ठिकाण पोरबंदरपासून 225 किमी दूर आहे आणि चोटीला पासून जवळचे शहर हे राजकोट आहे.

त्रिकमने मुली आणि बायकोला त्याने देवीच्या दर्शनाला पाठवलं आणि तो मात्र गाडीतच थांबला.

थोड्यावेळात त्याची बायको धामीबेन दर्शन करून परत आली तर गाडीत त्रिकम रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला दिसून आला. त्याच्यावर चाकूने वार झाला होता.

धामीबेननं पोलिसांना तातडीनं कळवलं. त्याला लगेचच रुग्णालयात नेण्यात आलं. परिस्थिती गंभीर असल्यामुळे त्याला अॅम्ब्युलन्सने राजकोटच्या मोठ्या रुग्णालयात नेण्याचं ठरलं. पण रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.

माझ्या नवऱ्यानं स्वतःवर वार करून आत्महत्या केल्याचं, धामीबेन यांनी पोलिसांना सांगितलं आहे.

आता जरा 2 दिवस मागे जाऊ या.

4 एप्रिलला अश्विन बलेजा यांनी पोलिसांत तक्रार दिली की त्यांची पत्नी कंचन बलेजा अंगणवाडीत औषधं आणायला गेली होती, पण ती परतच आली नाही. तसंच तिच्या गायब होण्यामागे गावगुंड त्रिकमचा हात असल्याचा दावासुद्धा त्याने पोलिसांकडे केला.

त्याला त्रिकमवर संशय होता कारण तोसुद्धा गेल्या काही दिवसांपासून मोहल्ल्यात नव्हता. त्याच्या घराला कुलूप होतं.

अश्विनच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास करण्यासाठी त्रिकमच्या नवी खांदापीठ भागातल्या घराचं टाळं तोडलं. घरात शोध घेतल्यानंतर सोफ्याच्या शेजारी कांचनचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला.

पोलिसांनी त्यानंतर त्रिकम चावडाविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला आणि त्याचा शोध सुरू केला. पण त्याचवेळी चोटीला पोलिसांनी पोरबंदर पोलिसांना त्रिकमने आत्महत्या केल्याचं कळवलं.

नेमकं काय घडलं?

पोरबंदरच्या नवी खांदापीठ भागात राहाणारा त्रिकम चावडाच्याविरोधात अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. दारू पिऊन गोंधळ घालणे, लोकांना धमकी देणे असे गुन्हे त्याच्यावर आहेत.

परिसरातले फेरीवाले आणि भाजीविक्रेत्यांकडून तो खंडणी वसूल करायचा, असं तिथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे.

याच भागात राहणारे हिराभाई मकवाना बीबीसीशी बोलताना सांगतात, “त्रिकम इथल्या भागातल्या लोकांच्या डोक्याला ताप होता. दारू पिऊन तो लोकांशी भांडायचा. महिलांची छेड काढायचा. त्याच्या त्रासाला कंटाळून आमच्या भागातल्या 2 जणांनी स्वस्तात घर विकून दुसरीकडे राहायला गेले.”

अनेकांना त्यांच्या गरीब परिस्थितीमुळे हा परिसर सोडून जाणं शक्य नाही, त्यामुळे ते इथंच राहत त्याचा त्रास सहन करत होते, मकवाना पुढे सांगतात.

कंचन आणि त्रिकमची ओळख होती आणि त्यांच्यात भांडण व्हायचे असं देखील मकवाना सांगतात.

त्याच्याविरोधात कुणी पोलिसात तक्रार दिली की जेलमधून परत आल्यावर तो त्या लोकांना धमकावायचा.

कंचन बलेजा आणि त्याचं दररोज भांडण व्हायचं, अशी आठवण मकवाना यांनी सांगितली.

त्याच्या जाचाला कंटाळून त्रिकमची पत्नी धामीबेन तिच्या दोन मुलींसह घर सोडून गेली होती, मुलगाही एक आठवड्यापूर्वीच घर सोडून गेला, असंही मकवाना यांनी सांगितलं.

पोरबंदरच्या पोलीस उपाधीक्षक नीलम गोस्वामी यांनी सांगितलं की, “कंचन यांचा मृतदेह त्रिकम यांच्या घरात जेव्हा सापडला तेव्हा त्यांच्या घरात कुणीच नव्हतं. त्यांची पत्नी 25 दिवसांपूर्वीच बोताडला गेली होती.”

आम्ही त्यांच्या घराचं सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत. तसंच कंचन यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेलं हत्यार पोलिसांना सापडलं आहे. पोलीस सर्व बाजूंनी त्याचा तपास करत आहेत, गोस्वामी पुढे म्हणाल्या.

चोटीला पोलीस सध्या त्रिकमच्या कथित आत्महत्येचा तपास करत आहेत. याबाबत चोटीलाचे पोलीस उपाधीक्षक चेतन मुंढवा यांनी बीबीसीला सांगितलं.

त्रिकम यांना वेगवेगळ्या गोष्टींचं खूप टेन्शन होतं म्हणून त्यांनी हे पाऊल उचललं, असं त्याची पत्नी धामीबेन ने पोलिसांना सांगितलंय.

तसंच त्या गेल्या काही दिवसांपासून बोताडला राहत होत्या.

बीबीसीनं याबाबत धामीबेन यांच्याशी संपर्क केला. सध्या त्या त्यांच्या पतीवर अंत्यसंस्कार आणि पुढची कार्य करण्यासाठी बोताडमध्ये आहेत. त्यांनी सांगितलं, “माझे पती आणि कंचन यांच्यात प्रेमसंबंध होते. पोरबंदर पोलिसांना मी त्या अॅंगलने तपास करण्याची विनंती केली आहे.”

त्यावर पोरबंदरच्या पोलीस उपाधीक्षक नीलम गोस्वामी यांनी सांगितलं, आम्ही अजून कुठल्याही अंतिम निष्कर्षापर्यंत आलेलो नाही. सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. धामीबेन यांचीसुद्धा या प्रकरणी चौकशी केली जाईल.”

पोलीस सध्या दोघांच्याही शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत. तसंच या प्रकरणी फॉरेन्सिक विभागाची मदत घेतली जात आहे. कंचन आणि त्रिकम यांचे कॉल रेकॉर्डसुद्धा तपासले जात आहेत.

माझ्या पत्नीचे त्रिकमशी सतत वाद होत होते म्हणून त्याने तिची हत्या केल्याचा आरोप अश्विन बलेजा यांनी केला आहे.

या सगळ्या घटनाक्रमातून काही प्रश्न उपस्थित होत आहेत. बंद असलेल्या त्रिकमच्या घरात कंचन यांची हत्या कशी झाली? त्रिकमने आत्महत्या करण्यासाठी स्वतःलाच चाकू का मारून घेतला? त्रिकम आणि कंचन यांचे प्रेमसंबंध होते तर त्यांच्यात वाद नेमका कशावरून घडायचा?

पोलीस सध्या सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)