जरंडेश्वर प्रकरणी मला कुठल्याही प्रकारची क्लीनचिट नाही- अजित पवार

आज विविध वर्तमानपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांचा थोडक्यात घेतलेला आढावा

1. मला कुठल्याही प्रकारची क्लीनचिट नाही- अजित पवार

राज्य सहकारी बँकेतील कर्ज आणि साखर कारखाने विक्री प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने आरोपपत्र दाखल केल्याची माहिती असून त्यात अजित पवारांचे नाव वगळल्यात आल्याच्या बातमीचे स्वत: अजित पवार यांनी खंडन केलं.

सकाळने ही बातमी दिली आहे.

जरंडेश्वर सहकारी कारखाना प्रकरणी राज्य सहकारी बँकेने दिलेल्या कर्जप्रकरणी अजित पवार यांना क्लीनचीट दिल्याची चर्चा सुरू झाली होती. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

ते म्हणाले, “काही प्रकरणांमध्ये माझी चौकशी सुरू असून यामध्ये मला कुठल्याही प्रकारची क्लीनचीट मिळाली नाही.”

तसंच नाना पटोले यांनी संयमाने वक्तव्य करायला हवीत, त्यांच्या सततच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत अंतर निर्माण होण्याची शक्यता आहे असंही ते यावेळी म्हणाले.

2.अपंगांना दिव्यांग तसे, विधवांना 'गंगा भागीरथी' म्हणा, मंगलप्रभात लोढांचं पत्र

अपंगांना हा शब्द अपमानकार वाटत असल्याने काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यासाठी 'दिव्यांग' हा शब्द सुचविला. पुढे एक आदेश काढून तो सरकारी अधिकृत शब्द केला. आता त्याच धर्तीवर विधवांना गंगा भागीरथी (गं.भा.) म्हणावे, असा प्रस्ताव तयार करण्याचा आदेश राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

मात्र, केवळ शब्दप्रयोग बदलून या महिलांचे प्रश्न सुटणार नाहीत, असे सांगून सामाजिक कार्यकर्त्यांनी याला आक्षेप घेतला आहे.

महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिली आहे.

केंद्र व राज्य शासनातर्फे अनेक उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित घटकांना न्याय व त्यांची प्रगती घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. या उपक्रमाअंतर्गत अपंग व्यक्तींचा उल्लेख दिव्यांग असा करण्याची प्रथा सुरू झाली.

त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी विधवा ऐवजी गंगा भागिरथी (गं. भा) हा शब्द वापरण्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव तयार करुन चर्चा करावी, असेही लोढा यांनी म्हटले आहे.

मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे एक पत्र व्हायरल झाले आहे. 12 एप्रिल रोजी त्यांनी ते महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिवांना लिहिले आहे.

3. महाराष्ट्रात कोरोनाचे 1115 रुग्ण, 9 लोकांचा मृत्यू

महाराष्ट्र राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच मृतांचा आकडाही वाढायला सुरुवात झाली आहे. 12 एप्रिलला महाराष्ट्रात 9 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसंच दैनंदिन संख्येने 1 हजाराचा टप्पा ओलांडला आहे.

यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे महापालिका, वसई विरार, आणि अकोला येथील रुग्णांचा समावेश आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 5421 झाली आहे.

एनडीटीव्हीने ही बातमी दिली आहे.

कोरोना रुग्णांची संख्या धीम्या गतीने वाढत असली तरी गेल्या दोन दिवसांमध्ये राज्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले आहेत. राज्यात मंगळवारी 919 रुग्णांची नोंद झाली होती, त्यात मुंबईत सर्वाधिक रुग्ण सापडले होते.

4. लाचेची रक्कम फेकून पळाला फौजदार पळाला, 9 लाखांची रोकड आणि 25 तोळे सोनं ताब्यात

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात येताच एका फौजदाराने घटनास्थळावरून पळ काढल्याची घटना जालना येथे घडली आहे. लाचेची रक्कम फौजदाराने रस्त्यातच फेकून दिली.

पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडलं. त्यावेळी कारमध्ये 9 लाख 41 हजार 590 रुपयांची रोकड आणि 25 तोळे सोनं पथकाच्या हाती लागलं.

लोकमतने ही बातमी दिली आहे.

गणेश शेषराव शिंदे असं लाच घेऊन पळून जाणाऱ्या फौजदाराचं नाव आहे. तक्रारदारास कदीम पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळाला आहे. या प्रकरणात कलम 110 ऐवजी 107 अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच घेतली.

ही लाच घेताना तो एसीबीच्या जाळ्यात अडकल्याचा संशय आल्याने रक्कम घेऊन कारमधून पळ काढला. पोलिसांनी पकडल्यावर कारमधून आणखी रक्कम जप्त झाली. रात्री उशीरापर्यंत ही कारवाई सुरू होती.

5.अभिनेत्री उत्तरा बावकर यांचं निधन

मराठी, हिंदी चित्रपटात तसेच हिंदी नाट्यसृष्टीत आपल्या अभिनयाचा स्वंतत्र ठसा उमटवणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ अभिनेत्री उत्तरा बावकर (वय ७९) यांचे खासगी रुग्णालयात निधन झाले. त्या अविवाहित होत्या.

गेल्या दीड वर्षापासून बावकर या पोटाच्या कर्करोगाने त्रस्त होत्या. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. बाणेर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.

बावकर या ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक इब्राहिम अल्काझी यांच्या तालमीत तयार झालेल्या त्या अभिनेत्री होत्या. त्यांनी दिल्ली येथील रंगभूमीवर ‘ऑथेल्लो’, गिरीश कर्नाड यांच्या “तुघलक’सह अनेक नाटकांत काम केले होते.

जयवंत दळवी यांच्या “संध्या छाया’ नाटकाचे “कुसुम कुमार’ या नावाने हिंदीत रुपांतर करून त्याचे दिग्दर्शनही बावकर यांनी केले होते. रंगभूमीवरील योगदानाबद्दल त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)